कविता कशी सुचते
मध्यंतरी कलर्स मराठीवर गदिमा, पुलं आणि सुधीर फडके यांच्यावर एक सुरेल कार्यक्रम झाला. हे त्रिदल म्हणजे एक अक्षयपात्र आहे. त्यातील खजिना कधीच रिता होत नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमीत राघवन आणि स्पृहा
जोशींनी केले होते. गदिमांच्या कवितेवर बोलताना सुमीत राघवन स्पृहाला म्हणाले की अशा कवींचे लेखन वाचून इतरांना कल्पना सुचतात. त्यांवर स्पृहांनी गदिमांच्या एका कवितेचा उल्लेख केला,
नथीत अडकली बाही
राया, चला, आता सुटका नाही
यावरून मला पैंजण या कवितेची कल्पना सुचली. या कवितेत पाठमोऱ्या युवतीचे वर्णन केले आहे.
पैंजण
चालता चालता माझी नजर
तिच्या पावलांत अडखळली
तिच्या पायातील पैंजणे
माझ्या कानांत रूणझुणली
तिच्या डौलदार चालीने
माझी चाल बिघडवली
आणि लांबसडक तिच्या केसांनी
माझी मनपाखरं गुंतविली
तिचा शेलाटी तो बांधा
तिच्या पाठीचा तो बांक
पाहून वाढली माझ्या
ह्रदयाची धकधक
मग झाली नजरानजर
गेला तीर आरपार
घायाळ माझ्या मनांत
सप्तरंगांची उधळण
उजळले लक्ष दीप
मन बेभान बेभान!!!
ही कविता वाचून माझ्या एका मैत्रिणीने सुचवले की पाठीचा बांक च्या ऐवजी नाकाचा बांक असे लिही. या नाकाच्या बांकासाठी मग पुढील कवितेचा जन्म झाला.
ती
नाजुक सुंदर कान
मोरासम ती मान
नाकाचा तो बांक
हरिणाक्षी नयनबाण
ओठांच्या पाकळ्या
दातांच्या कुंदकळ्या
केशकुंतल काळे
करती स्वैर संचार
सतेज गहूवर्ण
मनमोहक सुगंध
शरीराचा तो डौल
राजहंसी ती चाल
कसे सावरू ग
मन बेताल बेताल!
मला जसे सुचले तसे मी लिहिले. बरेवाईट वाचकांनीच ठरवावे. परंतु यासाठी गदिमा, सुमीत, स्पृहा आणि शिल्पा या सर्वांचेच आभार मानले पाहिजेत, नाही का?



Comments
कवितेतून कवितेचा जन्म मस्त...कल्पक..हळुवार भावना असलेली कविता
By : हेमांगी