प्रभात फेरी


प्रभात फेरी शशांक पुरंदरे तो नेहमीसारखाच एक दिवस होता. म्हणजे ऐन उन्हाळ्यात सकाळी आठ वाजता जसा मुंबईत असतो तसा! सूर्याच्या उन्हाची प्रखरता जाणवू लागली होती. त्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. रस्त्यावर वाहनांची येजा सुरु होती. कडेला लागलेल्या नाश्त्याच्या टपऱ्यांवरुन पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी यांचा मिळून एक संमिश्र वास आसमंतात भरुन राहिला होता. समोरच्या आंतरराष्ट्रीय प्लेस्कूल समोर आपल्या तीन ते पाच वर्षांच्या पाल्यांना सोडायला आलेल्या पालकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे वाहतुक मुरंबा झाला होता. त्यात बेशिस्त ॲाटोरिक्षा आपली भर घालत होत्या. पलिकडच्या पदपथावर एका टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरु होते. त्यांचे सिमेंट मिक्सर्स, डंपर्स, क्रेन्स यांनी रस्त्याचा तो भाग काबीज केला होता. हेल्मेट घातलेले कामगार मधेच घोळका करुन उभे होते.

अशा परिस्थितीतून मार्गक्रमण करत राजा प्रभातफेरीला निघाला होता. घामाने त्याचा टीशर्ट पाठीला चिकटला होता. या सर्व गदारोळात कुणीतरी त्याला हाक मारली.

वळून पाहिल्यावर त्याला बंडू आणि स्वाती पलिकडच्या पदपथावर दिसले. आश्चर्य म्हणजे दोघांनीही एकसारखे ट्रॅकपॅंट आणि ट्रॅकटॅाप घातले होते. खाली स्केचर्सचे वॅाकिंग शूज होते.

“कुठे?” राजाने रस्ता ओलांडून दोघांनीही प्रश्न केला.
“सकाळचा मॅार्निंग वॅाक!” बंडू उत्तरला.
“चला, मी पण येतो.” राजा म्हणाला.

अर्ध्या तासानंतर परत त्याच ठिकाणी एका चहाच्या टपरीवर तिघेही जाऊन बसले तेव्हा बंडूची पार हवा गेली होती. स्वाती मात्र तरतरीत वाटत होती. राजाने खुणेनेच तीन कटिंगची ॲार्डर दिली. चहाचे दोन घोट पोटात गेल्यावर बंडूच्या जीवात जीव आला.

“काय रे बंडू तुझी अवस्था?” राजा म्हणाला.
“बघाना भावजी, मी पंधरा दिवस मागे लागून याला तयार करतेय. नवीन कपडे, शूज, कॅंप केव्हापासून आणून ठेवलंय. पण हा प्राणी हलेल तर शपथ! शेवटी आज मुहूर्त लागला. आता समजंल असेल याला किती फिट आहे ते. इतकं वजन वाढलंय, आणि तोंडावर ताबा नाही अजिबात!”
“ऐ बाई, माझ्या नसेल, पण तू तरी स्वतःच्या तोंडावर ताबा ठेव. काय पटर पटर लावली आहेस!” बंडू वैतागून म्हणाला.

नंतरची काही मिनिटे शांततेत गेली.

“बाकी?” शेवटी राजा म्हणाला. आता प्लेस्कूलची गर्दी कमी झाली होती. उन्हाचा तडाखा जरा जास्तीच जाणवत होता.

“अरे हो, परवा शंभ्या आणि शंभी भेटले होते.”
“आता हे कोण?” स्वातीने उत्सुकतेने विचारले.
“शंभी म्हणजे शांभवी आणि अजय म्हणजे शंभ्या! आमचे शाळासोबती! अजय आणि शांभवी शाळेपासूनचे आयटम! शांभवीमुळे अजयचे नाव शंभ्या पडलं!” बंडूने माहिती पुरवली.

“काय म्हणत होता?” राजाने विचारले.
“आपल्या वर्गाची रियुनियन करुया म्हणत होता.” बंडू म्हणाला.
“कल्पना चांगली आहे. कधी करायची?”
“पुढच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणतोय आम्ही.”
“आपल्या व्हॅाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकूया.”
“राजे, टाकलाय आधीच! दहा मित्रांनी होकार पण कळवला आहे. शाळेच्या हॅालमधेच करायचं ठरतंय. पन्नासपैकी चाळीस जणं तरी येतील असं वाटतंय. क्षमा आणि सुजय नेमके तेव्हाच अमेरिकेहून येणार आहेत.”

“अय्या, किती मस्त! मी पण आमच्या ग्रुपमधे पिल्लू सोडून बघते.” स्वाती उद्गारली.

“राजा, अक्षया पण येणार आहे!”
“आता ही कोण?” स्वातीने प्रश्न केला.
“राजाची जुनी लाईन!!”
“मग मोडली कुठे?”
“उमा आली न मधे!”
“हे उमाला माहित आहे?” स्वातीने विचारले.
“हो. तिला सगळं माहिती आहे. पण शेवटी शाळा वेगळी आणि आयुष्य वेगळं, काय राजा?” बंडू म्हणाला.

“ती सध्या काय करते हं!!!” स्वाती हसत हसत म्हणाली. “म्हणजे खरी रियुनियन होणार तर! आम्ही बायका पण येणार तुमच्या रियुनियनला! एकदा भेटू तरी तुमच्या जुन्या मित्रमैत्रीणींना!”

“स्वाती, एका अटीवर तुम्ही आमच्या रियुनियनला येऊ शकता.”
“ती कोणती?”
“तुमच्या रियुनियनला आम्ही येणार!!”
“बापरे! मग कठिण आहे! पण ठीक आहे. डन!!!”
“चला, निघूया. उद्या याच वेळी भेटूया ॲापरेशन वेट लॅासच्या पुढील भागात.”

“उद्या उमालाही सांगा यायला.” जाता जाता स्वातीने राजाला एक मौलिक सल्ला दिला.

Comments

मस्त

By : Pradnya Gore
12/04/2026 2 : 33 : 20 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article