घराघरांची गोष्ट
घराघरांची गोष्ट
शशांक पुरंदरे
“अरे अशोक, आहेस कुठे तू? मीना, लीना ॲानलाईन यायची वेळ झालीये. त्यांना त्यांच्या शुक्रुवारी रात्रीच फक्त वेळ मिळतो, माहित आहे ना?” विद्या तावातावाने बोलत होती.
“अरे हो, एव्हढी कशाला हायपर होतेस? हा टर्निंगला आहे. पाच मिनिटांत पोहोचतोय.” असे म्हणून अशोकने फोन कट केला.
“तुला हजार वेळा सांगितलंय,” अशोक घरी पोहोचायचीच खोटी, विद्या सुरु झाली. “एक शनिवार सकाळ तुझ्या त्या हाहाहा क्लबला नाही गेलास तर काही इकडचे जग तिकडे होणार आहे का? पण ऐकेल तर अशोक कसला?”
“तुला काय प्रॅाब्लेम आहे? कॅाल सुरु झाला तर बोलायचं. मी येतंच होतो ना?”
“तुला माहिती आहे, मला ग्रुप व्हिडीओ कॅाल घेता येत नाही.”
“हं! हा खरा प्रॅाब्लेम आहे. जरा समजून घे ना. दहा वेळातरी सांगितले असेल तुला आत्तापर्यंत. पण नाही.”
“हो, नाही जमत मला, पण तुला नाही का वाटत, मुलींशी आठवड्यातून एकदा तरी बोलावे.”
“ठीक आहे, पण पाचदहा मिनिटे इकडे तिकडे होऊच शकतात ना. मी रिटायर्ड माणूस आहे. मलापण जरा शांतपणे राहूदे ना.”
“अरे पण उशीर झाला तर मुलं झोपतात. मग त्यांच्याशी बोलता येत नाही. गेले दोन वर्ष त्यांवरून यायला जमलं नाही आणि आपण देखील गेलो नाही. त्यामुळे व्हिडीओ कॅालवरच समाधान मानायचं.” विद्या आता रडायचीच बाकी होती.
“हे बघ, तू म्हणतेस ते अगदीच चुकीचे आहे असं नाही, पण अमेरिकेला रहायचा निर्णय त्या दोघींचा होता. आपण कायमचे तिकडे जाऊ शकत नाही. निवृत्त झालो तरी आपल्याला आपली आयुष्य आहेत. आता बघ, मला येऊन पण अर्धा तास होऊन गेला. पण दोन्ही ठमाकाकू अजून गायब आहेत.”
तेव्हढ्यात फोनची रिंग वाजली. लीना ॲानलाईन आली होती.
“हाय!” लीना म्हणाली. “कसे आहात?”
“चाललंय नेहमीचंच!” अशोक म्हणाला. जर
“आज तू एकटीच?”
“हो ना, मीना आणि रवि आज एका पार्टीला गेलेत. आमची मुले आज दमली होती, त्यामुळे लवकर झोपली. मिलिंद येणार होता पण त्याला अर्जंट कॅाल आहे.”
विद्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.
“तुमचे इकडे यायचे कन्फर्म आहे ना?”
“अगं नाही, त्यासाठीच हा फोन केला होता खरंतर. या इराण युध्दामुळे नाही जमणार. आता डिसेंबरमधेच जमेल असं दिसतंय.”
नंतर पाच मिनिटे इतर गप्पा मारुन मीनाने फोन ठेवला.
—————————-
“काय ग रेवा, कशी आहेस? चेहरा सांगतोय की बरेच काही बोलायचंय.” रमा व्हिडीओ कॅालवर रेवाशी बोलत होती. “एखादा मुलगा पसंत पडला की काय?”
“काय ग आई, तुला बोलायला दुसरा विषय नसतो का ग?”
“आता पस्तीशी आली तुझी. लग्नाच्या वय निघून जातंय.”
“तुला तर माहिती आहे, चांगली मुलंच मिळत नाहीत. एक बरा होता, पण तो इस्ट कोस्टला, मी वेस्ट कोस्टला. आमच्या दोघांच्याही बदल्या होणार नाहीत. मग कसे जमणार? फोन सेक्स???”
“रेवा !!!! तुझ्या जिभेला काही हाड? आईशी बोलते आहेस तू.”
“तूचतर म्हणतेस ना, हल्लीची आई मैत्रीणीसारखीच असते. मग!!??”
“तुझ्या घराचं काय झालं?” रमाने घाईने विषय बदलला.
“त्यासाठीच तर फोन केला. मी घर बुक केलंय. चार बेडरूम, दोन मजली, बेसमेंट गॅरेज आणि समोर गार्डन! ५०० के ला मिळालं. फुल्ली फर्निशड् . पंधरा दिवसांत पझेशन!”
“एव्हढं मोठं! तू चार नवरे करु शकतेस.” रमा हसत हसत म्हणाली.
“चार!! इथे एक मिळताना मारामार! पण जाऊदे ते. तू आता इथे येऊन राहू शकतेस.”
“आणि करु काय तिथे येऊन? इथे माझे छान चाललंय. रमेश गेल्यावर खूप त्रास झाला. पण आता सगळं रुटिन सेट झालंय. सकाळी मॅार्निंग वॅाक, मैत्रीणींबरोबर गप्पा, मग नाश्ता, जेवण, दुपारी मराठी सिरीयल्स आहेत. संध्याकाळी मैत्रीणींचा दुसरा ग्रुप आहे. तुला गंमत सांगू, जी मैत्रीण ज्या दिवशी नसेल, त्या दिवशी सगळ्या तिच्याच उखाळ्या पाखाळ्या काढतात.”
“मग तू नसलीस तर तुलापण नावं ठेवत असतील ना?”
“आपल्यामागे कोण काय बोलतंय त्याच्याशी मलाकाही देणंघेणं नसतं. पण मी काय सांगत होते? हं, संध्याकाळी घरी येऊन परत एखादी सिरीयल बघितली किंवा वाचत बसलं तरी वेळ छान जातो. दहा वाजता गुडूप्प!”
“पण तुला एकटेपणा जाणवत नाही कधी?”
“जाणवतो ना. पण काय करु? परत लग्न करु? रमेशचं भूत येऊन मानगूट धरेल माझी!”
“पण आई खरंच, काय हरकत आहे? माझ्या ओळखीचे खरे काका आहेत. मी तुला मधे म्हणाले पण होते. विचारु का त्यांना? मस्त माणूस आहे.”
“अगं हो हो, आधी तुझे तर बघू!”
“आई, मला बिझनेस कॅाल येतोय. मी नंतर फोन करते. बाय.
—————————-
सुनीलने चौथ्यांदा अनिलला फोन केला आणि अनिलने तो चौथ्या वेळेसही कट केला. मग पाच मिनिटांनी अनिलचा फोन आला.
“मी तुला किती वेळा सांगितलंय की मला ॲाफिसच्या वेळात फोन करु नकोस. काय आहे?”
“बाबा गेले.”
“कधी???”
“एका तासापूर्वी. ताईचा फोन आला होता.”
“मग आता?”
“जायला लागेल.”
“तू जा. मला शक्य नाही. कंपनीचा क्वार्टरली रिपोर्ट दहा दिवसात द्यायचा आहे. मी एक महिन्याने जाईन ताईला भेटायला. रात्री फोन करतो. बाय.”
दोन दिवसांनंतर सुनीलने अनिलला फोन केला.
“अरे प्रॅाब्लेम झालाय. बाबांनी केलेले विल सापडत नाहीये, आणि ताई म्हणते की घर मला मिळालं पाहिजे कारण मी दहा वर्ष बाबांना सांभाळंल होतं.”
“हे बरोबर नाही. आज अडीच कोटी किंमत आहे त्या घराची. ते विकून तिघांनी वाटून घेऊया.”
“पण ताई म्हणते मी इतके वर्ष तिथे राहते आहे. माझाच त्यावर हक्क आहे.”
“तू तिथेच थांब. मी येतो परवा. मग आपण ठरवू काय करायचे ते.”
“पण तुझ्या कंपनीचे काम? तू तर म्हणत होतास की तुला त्यामुळे जमत नाहीये यायला.”
“ते मी बघतो. सांगेन कुणाला तरी करायला. घराची वाटणी जास्ती महत्वाची आहे.”
—————————-
अक्षयचा व्हिडीओ कॅाल आला. आई बाबा वाटच पहात होते.
“आई, गुड न्यूज आहे. सोनोग्राफीचा रिझल्ट पॅाझिटिव्ह आहे. अनन्या प्रेग्नंट आहे. चार महिन्यानंतरची तारीख दिली आहे. “
“अरे वा, छानच. अनन्याला आमचे आशिर्वाद कळव.”
“हो, पण एक प्रॅाब्लेम आहे. तिला बेडरेस्ट सांगितली आहे. तुम्हाला आता इकडे यायला लागेल.”
“डिलीव्हरीच्या महिनाभर आधी येऊ आम्ही.”
“ नाही, लगेच या.”
“अरे लगेच नाही जमणार. आम्ही दहा दिवसांनी ॲास्ट्र्लिया-न्यूझीलंड बघायला जातोय. अठरा दिवसांची टूर आहे. सर्व बुकिंग झाली आहेत. नऊ लाख रुपये भरले आहेत, नॅान रिफंडेबल!”
“अगं पण मग अनन्याकडे कोण पाहणार मग? ते काही नाही, तुम्ही टूर कॅन्सल करा आणि या.”
“तू तिच्या आईवडीलांना बोलव ना!”
“ते पण अलास्काला जात आहेत. हा आता प्रॅाब्लेमच आहे.”
“ते आता बघ तू कसे करायचे ते. आम्ही महिनाभर आधी येऊ. तोपर्यंत मॅनेज कर. परत एकदा तुम्हा दोघांचे अभिनंदन. चल ठेवते. हे बघ हे कारखानीस पतीपत्नी आलेच. आज दोघांचा बसायचा बेत आहे. बोलू सावकाश. बाय!”
——————————-
“बाबा, मला एका जर्मन विद्यापीठात दोन वर्षांच्या एमेस साठी प्रवेश मिळाला आहे.”
“अरे वा, कधी जायचंय तुला?”
“दोन महिन्यात. पण एक प्रॅाब्लेम आहे. मी गेले दोन वर्ष जॅाब करुन काही पैसे गोळा केले आहेत. पण मला अजून काही पैसे लागतील.”
“किती?”
“साधारण तीस लाख या वर्षी. शिवाय पुढील वर्षी मला नोकरी मिळेपर्यंत अजून दहाएक लाखांची गरज पडेल.”
“बापरे, चाळीस लाख कुठून आणणार आहेस?”
“कर्ज काढावे लागेल.”
“पण फेडणार कसे?”
“पहिले दोन वर्ष तरी तुम्हालाच हप्ता भरावा लागेल.”
“कसं जमणार? तुला तर माहित आहे, या घराचा दरमहा पन्नास हजाराचा हप्ता जातो.”
“पण बाबा माझ्या भविष्याचा प्रश्न आहे.”
“अरे पण इथे तुला चांगली नोकरी आहे. पंचवीस लाखाचे पॅकेज आहे. अजून काय हवंय तुला?”
“मला अजून शिकायचंय, जग फिरुन बघायचंय.”
“हे बघ अजय, तुझी स्वप्नं चांगली आहेत. पण जरा आमच्याकडे पहा. पन्नाशी होऊन गेली पण अख्खा भारत देखील पाहिला नाहीये आम्ही. जग बघणं तर दूरची गोष्ट आहे. तुला एका स्थरापर्यंत नेण्याची जबाबदारी आमची होती. ती आम्ही पूर्ण केली. आमच्या आईवडीलांमधे तर तेव्हढी देखील क्षमता नव्हती. तेव्हा यापुढे जे काही करायचंय ते तुझे तुलाच करायचंय. आमचे आशिर्वाद नेहमीच तुझ्या बरोबर आहेत.”
ठीक आहे बाबा. हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नाही. मी बघतो काय करायचं ते !”
————————-
लीना,मीना,विद्या आणि अशोकचा पुढील आठवड्यात व्हिडीओ कॅाल झाला. छान तासभर गप्पा मारत होते सर्वजण!
रेवा नवीन घरी रहायला गेली आहे. रमा युध्द संपल्यावर तिकडे जाणार आहे. खरे काका पण भेटतील बहुतेक !
सुनील, अनिल आणि ताईचे युध्द सुरुच आहे. बहुतेक इराण, युक्रेनची युध्दे आधी संपतील.
अनन्याला मुलगी झाली. बाळ बाळंतीण सुखरूप आहेत. चारीही आजी आजोबा आळीपाळीने बाळाचा सांभाळ करत आहेत.
अजयला इथेच नवीन जॅाब मिळाला आहे. पस्तीस लाखाचे पॅकेज आहे. आईबाबा लवकरच भारत दर्शन सहलीला निघणार आहेत.
वैधानिक चेतावणीः
आयुष्यात तुम्हालाही अशा प्रसंगाला तोंड द्यायला लागू शकते, किंवा असे अनुभव येऊनही गेले असतील.
नक्की कळवा!



Comments
खूप छान कथा. सत्य परीस्थिती.
By : Shubhangi Railkar Joshi.
अगदी खरं आहे. प्रत्येक जण स्वतः पुरती स्वातंत्र्याची अपेक्षा बाळगतो. पाल्याला चांगल्या गोष्टी ह्या पालकांनी पुरवल्याच पाहिजेत. ही त्यांची जबाबदारीच आहे. समोरच्या व्यक्तीने मी अडचणीत असताना मदत केलीच पाहिजे, ही अपेक्षा. मी माझ्या सोयीने दुसऱ्यांशी वागेन. जागतिकीकरणाचा हा परिणाम चांगला म्हणायचं की वाईट?
By : संदीप नाचणे
Kiti bhangad
By : Subhash
वास्तवाची अचूक पकड आजच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील ताणतणाव, अंतर, प्राधान्यक्रम अगदी नेमके पकडले आहेत. – परदेशात गेलेली मुलं – पालकांची भावनिक गरज – तंत्रज्ञानावर टिकलेले नातेसंबंध – “वेळ नाही” ही सगळ्यांचीच सबब हे सगळं वाचताना “अरे, हे तर आपल्याच घरात घडतंय” असं वाटतं. २ संवादप्रधान शैली कथा पूर्णपणे संवादातून पुढे जाते — आणि हे तिचं सर्वात मोठं बळ आहे. प्रत्येक पात्राचा स्वभाव संवादातून स्पष्ट होतो: विद्या – भावनिक, जोडून ठेवणारी अशोक – थोडा practical, स्वतःच्या space कडे बघणारा रेवा – आधुनिक, स्पष्टवक्ती रमा – adjust झालेली पण आतून एकटी अनिल – करिअरला प्राधान्य देणारा अजय – स
By : नितीन पागेदार