एक वादळी पहाणी


नुकत्याच येऊन गेलेल्या वादळामुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री दौऱ्यावर उन्हाळे गावात आले आहेत. त्यांची गावकऱ्यांबरोबर मीटिंग आयोजित केली आहे. गावात नुकतीच नवी टेक्नॅालॉजी उपलब्ध झाली आहे त्यात सॅटेलाईट लिंक, कॉम्पुटर प्रणाली वगैरे गोष्टी आहेत. आज प्रथमच या गोष्टी वापरल्या जात आहेत. व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर आलेले इतर जणं आणि गावातील काही प्रतिष्ठित मंडळी बसली आहेत.

गावाचे सरपंच श्री नामदेव घोटाळे, आठवी नापास, मुख्यंमत्र्यांचे स्वागत करण्या करता उभे आहेत. त्यांच्या समोर टेलीप्रॅाम्टर लावलेला आहे. यात सरपंचांचे भाषण आधीच फीड केलेले आहे. त्यांच्या सचिवाने (अकरावी पास) हे मराठीमध्ये टाईपिंग टूल वापरून टाईप केले आहे पण तो ऑटोकरेक्ट फीचर बंद करायला विसरला आहे. सरपंच भाषणाला सुरुवात करतात.

बंधु आणि भंगिणीनो,
(सचिवाकडे बघून, भ वरती टिंब तुझ्या बां न दिला हुता कारे? थांब, नंतर तुझ्या xxवरच टिंब देतो !)
आज आपले दयनीय मूर्खमंत्री (काय लिवताय राव?)आपल्या गावामंदी वादलाने झालेल्या नुस्कानीची पहानी करावयाला हुपास्थित झाले आहेत. मी त्याचं प्रथम वेलकम करतोय.
पर्वा रातच्याला समदं गाव शांतपने निजलं व्हतं. पन गावात अचानक सोसायटीचं वारं सुरु झालं आनं रातच्याला निजलेलं समदं जन सकाळी भिजलेलं झालं. या उन्हाळे गावात पावसाळा आला. कारन वाऱ्यावर घरांची सर्वी कौलं आनि पत्रं उडून गेलं. घरातंल समदं सामान ओलं झालं. सगळी कापड पन भिजून गेलं. म्हंजी सकाली घालाया एक सुका लंगोट पन नाही राहिला.
गावातील इलेक्ट्रिकशिटी पन इझली. नंतर आली पन सारखी गात (जात) होती. पीयम साहेबांच भाषन नीट ऐकू नाय आलं बघा. ते हिंदीमधी बोलत हुते ते ऐकू येत नव्हतं आणि इंग्रजी आम्हाला समजत नव्हतं. काहीतरी आत्मा वगैरे म्हनत हुते. आपले मुख्यमंत्री (आता बरोबर लिहिलंय) मराठीतच बोलतील.

तर आता नुसकानी बद्धल बोलूया. आमच्या घराची छप्पर रडली (उडाली हवं ना) ती सरकारनं लावून द्यावीत. शेतात जे पीक उभं होतं ते आडवं झालंय आणि जे आडवं होत ते वाहून गेलंय. तेची भरपाई हवीच. आमची जनावरं भेदरून गेल्याती. बैल दूधचं देईनाशी झालीत. (आरं बैला, गाई म्हैशी दूध देत असत्यात) तर प्रत्येक जनावरास्नी दूध काढाया दोन दोन पंप द्यावेत. नाहीतर यांचा संप संपनार न्हाई.

आमचं सगळं टीवी पान्यात गेले. पीयम साहेबांच भाषण ऐकायला नवीन टीवी पायजेत. आणि या टायमाला ते एलेस्डी का काय असतात ते द्या. आधीच्या टीवीवर अक्षय कुमार आणि करीना सारखेच दिसत व्हते.

पावसामुळं शाळेचा मास्तर पळून गेला. यावेळेला चांगली मास्तरीण हवी, म्हणजे मुलांची वेवस्थेशीर काळजी घेता येईल. बाईंची वाड्यावर सोय होईल. प्रौढ शिक्षनाला पन गती मिलेल.

याशिवाय शेतीचं नुसकान झालंय त्याकरता आधीची पाच वर्ष आनि नंतरची पाच वर्ष कर्जमाफी झालीच पायजेल. शिवाय सर्व लोकांना फुकट दारू (अरे दवादारू!) दिली गेली पायजेल.

हल्ली दर वर्षी तो एल एन ओ का काय तो येतो आणि पावसाचं सर्व गणित उस्कटून टाकतो. जूनचा पाउस जुली मध्ये पडतो मग लावलेली पिकं करपून जातात. हिवाळ्यात अवकाळी सुरु होते ती मे पर्यंत चालते. मग पिकांचं लई नुसकान होतंय बघा. तरी सरकारन आम्हाला बारा महिने बिनव्याजी कर्ज देऊन पुढच्या वर्षी ते माफ करण्याची तरतूद करावी.

पाउसवाऱ्या पासून संरक्षण म्हणून शेतीला कायमस्वरूपी छप्पर घालाव. तसेच अवकाळी गारपीट होते त्या गारा उचलून शहरात बर्फ म्हणून विकाव्यात, म्हणजे गावाल पैका मिळल आणि तळीरामांना बर्फ!

आमच्या गावात कोरोना बिरोना काय हाय नव्हं. घराला कुलूपं पन नसत्यात. तवा समदी मजा गेली आमची. तरी सहानुभूतीप्रती (अरे जरा लहान शबुद वापर, दम लागला वाचताना) निदान दोन दिवस तरी टाळंबंदी लावावी आनि हंसा बिरिजुकरिनिचा फक्कड तमाशा ठेवावा अशी इंनंती हाय.

आमचे गावचे साखर सम्राट श्री गुळचेपे यांनी मूर्ख (मुख्य) मंत्रांच्या पक्षाला पाच लाख रुपये आनि पाचशे पोटी गूळ गावाला दिलेला हाय. तो ग्वाड मानून घ्यावा. साखरसम्राटांना बिन इरोध इधानसभेला पाठविण्याची जबाबदारी गावाची हाय. आधी आमचं हे सचिव हा टेलीप्रॅाम्टर स्वत: नीट शिकून त्यास्नी पन शिकवतील.

शेवटी मी आता पाहुण्यांचे लय आभार मानून त्यास्नी दोन शबुद बोलाया बोलावतो. अरे हा, एक राहिलं. ते आमची सर्वे कापडं ओली आहेत ती सुकविन्याची वेवस्था करावी ही इनंती. जय हिंद जय महाराट्र आनि जय उन्हाळे गाव!

मुख्यमंत्री भाषण सुरु करतात. अनुभवी असल्यामुळे ते टेलीप्रॉम्टर वापरत नाहीत.

घोटाळे सरपंच आणि गावातील मित्रांनो,

तुमच्या गावाचे सर्व प्रश्न घोटाळे साहेबांनी सांगितले आहेत. आम्ही ते सर्व सोडवणारच! वेळ पडली तर आम्ही आमचं लंगोट पण देऊ! आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. आजच गृहमंत्र्यांना सांगून शंभर जॉकीच्या चड्ड्या आम्ही गावाला पाठवणार आहोत. या सभेनंतर आम्ही वाड्यावर जाऊन घोटाळे साहेबांशी विस्तृत चर्चा करणार आहोत. गावात पडलेल्या गारांची तपासणी करून त्या शहरात पाठविण्याची व्यवस्था करू. महिलांचे प्रश्न सोडविण्याकरिता जिल्हा पालकमंत्री मालतीबाई पळपुटे लवकरच गावाला भेट देतील. त्यांचीदेखील घोटाळे साहेब वाड्यावर सोय करणार आहेत.
वाडा लहान पडतो म्हणून आम्ही अधिक जागा घोटाळे साहेबांना सानुग्रह अनुदान म्हणून देण्याचे जाहीर करत आहोत.
शिवाय नवी टीव्ही, शेताला छत, दुध काढायला पंप वगैरे गोष्टींवर आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करू.
जेव्हाजेव्हा गावात वादळ येईल तेव्हा आम्ही इथे मदतीला धावून येऊ हा आमचा शब्द आहे. जयहिंद, जय महाराष्ट्र, जय उन्हाळे गाव!

या नंतर मुख्यमंत्री वाड्यावर गेले आणि घोटाळे साहेबांबरोबर त्यांची विस्तृत चर्चा झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता सर्व गावकरी मदतीच्या अपेक्षेत आहेत. पण सध्या जी काही राजकीय उलथापालथ चालू आहे त्यात सर्व राजकारण्यांनी स्वावलंबनाचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळं काही मदत मिळणे कठीणच आहे. जेव्हा नवीन काही (म्हणजे नवीन वादळ वगैरे) घडेल तेव्हा आम्ही इथे हजर होऊच.

Comments

Very very nice! Atta you must start with kathakathan karyakram soon!! 👍👏👏😃

By : Indrani Kakade
06/07/2023 11 : 31 : 03 AM

Very funny

By : Pratibha Tarabadkar
06/07/2023 12 : 09 : 50 PM

खरोखर मस्तच,पूर्ण थकवा निघून गेला,या पुढेही असेच हास्यास्पद वाचनीय लेखन आपणाकडून मिळत राहो,धन्यवाद .

By : नरेश कदम.
06/07/2023 2 : 56 : 31 PM

एकदम छान खुसखुशीत प्रासंगिक, ग्रामीण बोली पण मस्त

By : Devendra Buddhikot
06/07/2023 9 : 40 : 48 PM

Very funny, got the feel of watching some old Marathi comedy movie! I found myself picturing Neelu Phule as the sarpanch.

By : Sheela Bahadkar
07/07/2023 09 : 31 : 53 AM

hahaha

By : Admin
07/07/2023 10 : 41 : 14 AM

इनोदाचा आयटम... नाही नाही अ ... ॲटम बाॅम्ब!

By : Bhalchandra Shrikhande
07/07/2023 12 : 56 : 14 PM

लई भारी लिव्हलंय जाम मजा आली या कथेच कथाकथन मस्त वाटेल ऐकायला गावरान भाषा एकदम फक्कड 👌👌

By : SHEETAL SURESH KHIRE
11/07/2023 3 : 42 : 42 PM

झकास ! डोळ्यासमोर चित्र उभ राहिलं.ग्रामीण भाषेतला खुसखुशीत लेख.

By : योगिनी लोथै
18/02/2024 12 : 26 : 10 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article