आकर्षण


आकर्षण

शशांक पुरंदरे

तसा माझा स्वभाव पहिल्यापासून जरा लाजराबुजराच आहे. म्हणजे असं की मनात अनेक गोष्टींचा धुमाकूळ चालू असतो पण काय बिशाद की त्यातील काही ओठांवर येईल!

मी अगदी लहानपणापासून अशीच होते. आता कुणी म्हणेल की हिला स्वतःचे असे मतच नसते. तर तसं नाहीये, पण मी अशी पटकन व्यक्त होऊ शकत नाही.

शाळेत असताना वर्गात बाई मुलांना प्रश्न विचारायच्या. खरंतर मला बहुतेक प्रश्नांची उत्तरे माहित असत. पण मी स्वतः कधीच हात वर करुन उत्तरे दिली नाहीत. मला जर उभे करुन प्रश्न विचारले तर मात्र मी बरोबर उत्तरे देत असे.

घरी देखील आईने कधी आज खायला काय करु असे विचारल्यावर सुमित, म्हणजे माझा धाकटा भाऊ, नेहमीच सांगून टाकायचा, की आज अमुक गोष्ट कर. पण मी कधी काही सांगितल्याचे मला आठवत नाही. मात्र आईने मला विचारले तर मात्र माझे उत्तर तयार असायचे.

शाळेत असताना कधी मला मित्रमैत्रीणींची कमतरता नव्हती. आम्ही खूप मजा केली पण एकंदर माझी गणना अबोल म्हणूनच केली जात असे. मी नेहमी माझ्याच विचारात मग्न असायचे. बाहेर काय चाललंय याकडे माझे नेहमी लक्ष असायचे पण तशी मी नेहमी अव्यक्तच होते.

हा माझा स्वभाव माझ्या घरच्यांच्या लक्षात अर्थातच आला नसता तरच नवल! त्यांनी आपापल्या परीने मला सांगायचा प्रयत्न केला पण मी तशीच राहिले. म्हणतात ना, अळवावरचे पाणी!

हा माझा स्वभाव माझ्या स्वतःच्या लक्षात आला नव्हता असं नाही. पण काय करणार? स्वभावाला औषध नसते ना!

मी दहावी बारावी उत्तम रित्या उत्तीर्ण झाले. मी कॅालेजमधे वाणिज्य शाखा निवडली. मला पहिल्यापासूनच इकॅानॅामिक्समधे रस होता. आणि कॅालेज जीवनामधे माझ्या आयुष्याने एक वेगळेच वळण घेतले.

मला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून मी एका कॅालेज जवळच्या मुलींच्या वसतीगृहात रहात होते. अर्थात आठवड्यांच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी घरी चक्कर होत असे.

कॅालेजच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्वच मित्रमैत्रीणी खूप उत्साहित होतो. आणि पहिलाच तास इकॅानॅामिक्सचा होता. वर्गात चाळीसएक विद्यार्थी होते. प्रचंड कलकलाट चालू होता. कुणीतरी समीर जोशी नावाचा प्राध्यापक येणार होता. बरोबर साडेदहा वाजता प्राध्यापक महाशय आत शिरले, आणि काय सांगू तुम्हाला, त्या क्षणी मी माझे हृदय हरवून बसले.

प्राध्यापक कसला, २६-२७ चा तरुण मुलगाच होता समीर जोशी. गोरापान, दाट काळ्याभोर केसांचा कपाळावर येणारा झुपका, जवळजवळ सहा फूट उंची, एकदम फिट आणि सहसा आपल्यात न दिसणारे ते निळे डोळे! मी बघता क्षणी त्याच्या प्रेमात पडले. मला वाटतंय, की वर्गातील बहुतेक सर्व मुलींचे असेच झाले असावे. मी तर दुसऱ्याच बाकावर बसले होते, त्यामुळे मला एकदम ७० एमेम स्टीरीओफोनिक व्ह्यू होता. त्याने लेक्चर सुरु केले. काय तो मधाळ आवाज! जणू बलराज सहानी आणि अमीन सयानी यांचे मिश्रणच. मी पाऊण तास तो आवाज कानात साठवत होते, पण डोक्यात काहीही शिरले असेल तर शपथ! तास संपून बुटांचा टॅाक टॅाक आवाज करत तो निघून गेल्यावर मी भानावर आले. लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणजे काय ते तेव्हा मला उमजले.

नंतर वर्षभर मी समीरचा एकही तास बुडवला नाही. विषय तर आवडता होताच, पण शिकविणारा त्यापेक्षा जास्ती आवडू लागला होता.

एकदा मी धीर करुन त्याच्या केबिनमधे गेले. मला एव्हढे धडधडत होते की माझ्या हृदयाचे ठोके त्याला ऐकू जातील की काय अशी भीती वाटत होती.

मी आत जाऊन त्याच्या टेबलासमोर उभी राहिले.

“सर?”

त्याने मान वर न करता मला हातानेच बसायची खूण केली. बहुतेक स्वारी टॅबमधे पुढच्या लेक्चरचे प्रेझेंटेशन बनवत होती. नंतरची पाच मिनिटे खुर्चीत बसून माझा घामेजलेला पुतळा झाला होता. तरी बरं, त्याच्या केबिनमधला एसी फुल ब्लास्ट चालू होता. मी पर्समधून माझा चतकोर रुमाल काढून कपाळावरील घर्मबिंदू पुसण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला. त्यात माझी कपाळावरची माझ्या ड्रेसला मॅचिंग गुलाबी टिकली पडून गेली. त्याच रंगाची दुसरी टिकली पर्समधे सापडत नव्हती.

“हं बोला मिस…?”
“स्वाती. स्वाती सबनीस. मी एफ वायला आहे.”

मी नुकतीच अठरा पूर्ण झाले होते. खरंतर स्वतःच स्वतः बध्दल काय बोलावं, पण दिसायला छानच होते. नाव ठेवावं असं माझ्यात काहीच नव्हते. येणारे जाणारे तरुण मला वळून न्याहाळतात हे माझ्या केव्हाच ध्यानात आले होते. म्हणतात ना, या बाबतीत मुलींना सिक्स्थ सेन्स असतोच.

“बोला, काय काम आहे? मला पाच मिनिटांत एक लेक्चर आहे.”

“स..!” मी समीरच म्हणणार होते, पण वेळेवर जीभ चावली म्हणून बरे! “सर, परवाचे तुमचे डिमांड-सप्लाय वरच्या लेक्चरमधली एक गोष्ट मला नीट समजली नाही.”
“तुम्ही एक तासांनी येऊ शकाल का? तेव्हा बोलू आपण.” सर समीर म्हणाला.
“स्वाती.”
“अं?”
“माझं नाव! प्लीज मला अहो म्हणू नका.”
“बरं बरं. भेट मला नंतर!”

मी मनातल्या मनात उडी मारून त्याच्या रुम मधून बाहेर पडले. वास्तविक मला लेक्चरबद्दल काहीच शंका नव्हती. काहीतरी कारण काढून मला त्याला भेटायचे होते एव्हढेच! त्यानंतर मला वरचेवर ‘डिफीकल्टी’ येत राहिल्या आणि मी त्याला भेटत राहिले.

कॅालेजची पहिली दोन वर्षं कशी निघून गेली ते समजले नाही. मी आणि समीर सर अधूनमधून भेटत होतो पण मला जे हवे होते ते काही घडत नव्हते.

सेकंड इयरच्या परीक्षेनंतर मी समीरच्या रुम मधे गेले तेव्हा तो सामान आवरत होता.

“सर, कुठे जाताय तुम्ही?”
“हो तुला सांगणार होतो. मला लंडन स्कूल ॲाफ इकॅानॅामिक्स मधे लेक्चरर म्हणून जॅाब मिळालाय. शिवाय मी आणि शनाया, माझी लहानपणापासूनची मैत्रीण, आम्ही पुढच्या रविवारी लग्न करतोय. ही माझी पत्रिका! लग्नाला नक्की ये.”

मी समीरचे कसेबसे अभिनंदन करुन बाहेर पडले आणि कॅालेजच्या पायऱ्यांवर येऊन बसले. माझे मन सुन्न झाले होते. खरंतर हे जे काही होतं ते एकतर्फीच होते. पण मला कुठेतरी आशा होती की काहीतरी चांगले निष्पन्न होईल पण मी बघितलेली सगळी स्वप्नं ही स्वप्नंच राहिली होती.

घाव जरी जिव्हारी लागला असला तरी मी त्यातून स्वतःला सावरले. उत्तम मार्कांसह बी. कॅाम आणि एम. कॅाम पास झाले. कर्मधर्मसंयोगाने मला लंडन स्कूल ॲाफ इकॅानॅामिक्समधे एम. एस. करायला ॲडमिशन मिळाली. पण एकंदरीतच परत समीरला सामोरे जाणे जरा अवघडच जाणार होते.

पण मी समीरला प्रत्यक्ष भेटले तेव्हा मला प्रचंड शॅाक बसला. तीनचार वर्षांपूर्वीचा समीर आणि आत्ताचा समीर यांच्यात जमीन अस्मानाचा फरक पडला होता. त्याचे निळे डोळे खोल गेले होते, जणू त्यातील तेजच लुप्त झाले होते. डोक्यावरचे केस विरळ झाले होते. आवाजातील धारही बोथट झाली होती.

आम्ही एका कॅफेमधे बसलो होतो.
“इथे आल्यावर एका वर्षातच माझा आणि शनायाचा घटस्फोट झाला.” समीर सांगत होता. “कारणे महत्वाची नाहीत, पण मी इथे अगदी एकटा पडलो ग स्वाती! त्यावेळी तुझ्या डोळ्यातलं प्रेम मला जाणवले नाही असं नाही. पण मी तेव्हा शनायासाठी वेडा झालो होतो.”

आता चकित होण्याची वेळ माझ्यावर आली होती. मी इतके दिवस माझे समीर बद्दलचे आकर्षण केवळ त्या वयातील आकर्षणच समजत होते. पता नही था आग दोनो तरफ बराबर लगी हुई थी। मला कसे रिॲक्ट व्हावे तेच कळेना. कशीतरी मी वेळ मारून नेली.

एम.एस. साठी मी अर्थातच समीरची गाईड म्हणून निवड केली आणि कामाला सुरवात केली. प्रोजेक्टमधे दिवस भराभर जात होते. मी स्वतःला कामात वाहून घेतले. समीरने देखील मला खूप मदत केली. दीड वर्षानंतर मला एम.एस. इन इकॅानॅामिक्सची पदवी मिळाली. सर्व झाल्यावर मी आणि समीर कॅफेमधे बसलो होतो. गेल्या दीड वर्षात जुना समीर जणू परत आला होता.माझ्या मनात पुन्हा जुने आकर्षण डोकं वर काढत होतं.

“मग, आता पुढे काय?” हे विचारताना समीरचे निळे डोळे लुकलूकत होते.
“समीर, मी भारतात परत जातेय. तिथे कुणीतरी माझी वाट पहात आहे.”

माझे बोलणे ऐकून समीरचा चेहरा खाडकन पडला.

“समीर, कॅालेजमधे असताना मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटत होतं. पण ते प्रेम नक्की नव्हते. एक आकर्षण म्हणू हवेतर. प्रेम हे सहवासाने निर्माण होते. पण तेव्हा तू शनायाच्या प्रेमात होतास. नंतर तुमच्या दोघात काय झालं, मला माहित नाही आणि आता मला जाणून घ्यायची इच्छा देखील नाही. तू गेल्यानंतर मला काही दिवस चुकल्याचुकल्या सारखे वाटले खरे, पण एम.कॅाम करत असताना विनीत माझ्या आयुष्यात आला. मी परत गेल्यावर आम्ही लग्न करणार आहोत. सॅारी.”

“स्वाती, तू कशाला सॅारी म्हणतेस? यात तुझा काहीच दोष नाहीये. मी तर उलट म्हणेन. तुला एम.एस. मधे मदत करताना मी बरेच काही शिकलो. मला जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. मला तुझी मदतच झाली आहे. आय ॲम व्हेरी हॅपी फॅार यू! आणि कसं आहे, शोधली तर मिळेल दुसरी कुणीतरी स्वाती लंडनमध्येच मला!”

“तुला शोधायची देखील गरज नाही. तुझी टीचींग असिस्टंट स्वप्ना सारखी तुझ्या मागेमागे असते.” मी हसतहसत म्हणाले.

“तुलापण जाणवले तर!” समीर उद्गारला.
“मग तुला काय वाटले? आम्हा मुलींच्या नजरेतून काही सुटत नाही.”

Comments

Good.

By : Samir Vinit Joshi
16/03/2026 6 : 24 : 12 PM

प्रसंग पूर्ण हुबेहूब तयार केला आहे . मनातले भाव व्यक्त करणे हे कला आहे आणि ती प्रत्येकाला जमतेच असे नाही. कोणत्याही व्यक्तीच्या अबोलपणामुळे होणारे परिणाम याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कथा होय

By : कृपा नितीन घाग
16/03/2026 11 : 07 : 52 PM

छान कथा .योग्य शीर्षक .

By : योगिनी लोथे
19/03/2026 8 : 05 : 56 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article