साहित्य संमेलन
मी माझे साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण संपवले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडात झाला. यावेळी साहित्य संमेलन बंदिस्त सभागृहात आयोजित केले होते. फक्त शंभर मान्यवरांनाच प्रवेश दिला गेला होता. त्यातील चाळीस जण आयत्यावेळी संमेलनावर बहिष्कार टाकून विद्रोही संमेलनात सामील झाले होते. त्यामुळे सभागृहात पन्नास एक जणच उपस्थित होते. त्यातही दहा स्वयंसेवकच होते. संमेलन सेमी-ऑनलाईन होते. म्हणजे मी जरी सभागृहात उपस्थित होतो तरी माझे रेकॉर्ड केलेले भाषणच पडद्यावर आणि इंटरनेटवर दाखवले होते. ABCD वाहिनीवर लाईव्ह टेलीकास्ट होत होता. मी उभं राहून टाळ्यांचा स्वीकार केला. अर्थात रेकोर्डेड टाळ्या वाजवून टाळ्यांचा आवाज वाढवला गेला होता.
मी सभागृहातून बाहेर पडलो. समोरच एक तरुणी हातात माईक घेऊन उभी होती. एक कॅमेरामन व्हिडिओ घेत होता.
“नमस्कार, मी वैशाली मानमोडे. ABCD वाहिनीची वार्ताहर. मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. आमच्या वाहिनीकडे एक्सक्लुझीव अधिकार आहेत.” हल्ली क्रिकेट मॅचची इनिंग संपल्यावर जशी लगेच खेळाडूची मुलाखत घेतात तसेच काहीसे मला वाटले. मी माझा झब्बा नीट करून केसांवरून हात फिरवून सोफ्यावर बसलो. वैशाली समोर बसली आणि तिने मुलाखत सुरु केली. समोरच कॅमेरामनने व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली.
“प्रथम अध्यक्षपदी विजारमान झाल्याबद्धल तुमचे अभिनंदन!”
“अहो, तुम्ही माझी चड्डीच काढलीत! विजारमान नव्हे विराजमान! विजार म्हणजे चड्डी! पण तरीही धन्यवाद.”
“पण तुमच्या निवडीत घोटाळा झाला आहे असे पण ऐकायला आले आहे.”
(हिला कसे समजले?) “माझी निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली आहे.”
“पण तुम्ही मतदारांना पैसे दिले असा आरोप आहे.”
(त्या बँक मॅनेजरने बातमी लीक केली बहुतेक. पैसे घेऊन वर हे! सच्चाईचा जमाना राहिला नाही हेच खरं!) “मी एक गरीब साहित्यिक आहे. मी कुठून आणणार पैसे?”
“त्यासाठी तुम्ही सहकारी बँकेचे लोन काढले आहे, जे परत करण्याची गरज नसते.”
“हे धादांत खोटे आहे. माझ्या विरोधकांनी माझ्या विरुद्ध रचलेले षडयंत्र आहे.”
“आम्ही असेही ऐकले आहे की तुम्हाला विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याची ऑफर होती.”
(त्यांनी मानधन कमी दिले, नाहीतर गेलो असतो) “मी साहित्याशी नेहमीच एकनिष्ठ असतो. मला साहित्याशी विद्रोह मान्य नाही.”
“ठीक आहे आपण आता तुमच्याकडे वळूया.” असे म्हणून वैशालीने नाईलाजाने कॅमेऱ्यावरून माझ्याकडे नजर वळवली.
“तुम्हाला साहित्याची आवड कशी निर्माण झाली?”
“माझे जीवन अगदी शाळेत असल्यापासून साहित्याशी निगडीत आहे. मला लेखनाची सुरुवातीपासूनच आवड होती. शाळेत वर्ग सुरु असताना मी चिठ्ठ्या लिहून सर्व वर्गमित्र-मैत्रीणींना पाठवत असे. पण साहित्यशत्रू लिमये मास्तरांना ते न आवडल्यामुळे ते मला बाकावर उभे करत असत. दहावीत गेल्यावर मला कविता आवडू लागली. मी तिला प्रेमकविता लिहून पाठवू लागलो. त्या सर्व कविता तिने वर्गात प्रसिद्ध केल्या. मग लिमये मास्तरांनी मला वर्गाबाहेर काढले होते. माझ्या बाबतीत हे नेहमीचेच होते. मग मी दाराबाहेर उभा राहून हिंदी सिनेमातली गाणी म्हणत असे. मी बहुभाषी आणि एकपाठी असल्यामुळे सर्व गाणी मला तोंडपाठ असायची. मला माझ्याच कविता आवडायच्या म्हणून मी पाठ्यपुस्तकातील कवितांकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे मला मराठीत फक्त ३५ गुण मिळाले होते.”
“तुम्हाला लेखनाची आवड कधी लागली?”
“कॉलेजात गेल्यावर. तिथे मी प्रेमपत्र लिहू लागलो. मी आमच्या वर्गातल्या सर्व ४९ मुलींना एकाच दिवशी प्रेमपत्रे पाठवली होती. क्लासचा डस्टबिन त्या दिवशी माझ्या प्रेमपत्रांनी भरून ओसंडून वहात होता. नंतर मी ही प्रेमपत्रे “प्रेम पत्रांचे” या नावांनी हस्तलिखित स्वरूपात छापली होती. पहिल्या पानावर माझ्या स्वत:च्या रक्ताने केलेली स्वाक्षरी होती.”
“तुमच्या व्यावसायिक लेखनाची सुरुवात तुम्ही रहस्य कथांनी केलीत, बरोबर? तुमची पहिली रहस्यकथा ‘कुणी खून केला?’ ही होती. पण अनेक वाचकांनी तक्रार केली की तुम्ही त्यात कुणी खून केला हे शेवटपर्यंत सांगितलेच नाही.”
“तेच तर माझ्या कथेचे नाविन्य होते. सर्व रहस्यकथांमध्ये शेवटी रहस्याचा उलगडा होतो. मी तसे न करून एक नवीन पायंडा पाडला. खून कुणी केला ते शोधणे मी वाचकांवरच सोडले.”
“तुम्ही लहान मुलांसाठी बडबडगीते लिहिली होती. पण लिहिताना गडबड झाली म्हणून त्याला गडबड गीते असे खोचक नाव दिले गेले होते.”
“मी प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करायला बांधील नाही.”
“तुम्ही रमीचा डाव नावाची कादंबरी लिहिलीत पण त्यात रमीचा उल्लेखदेखील नव्हता. वाचकांची तुम्ही फसवणूक केलीत असे नाही तुम्हाला वाटत?”
“त्याचे असे झाले, कादंबरीचे शीर्षक रडीचा डाव असे होते पण छापताना ते रमीचा डाव असे छापले गेले. प्रकाशकाने पुस्तक परत छापायला नकार दिला त्यामुळे माझा नाईलाज झाला.”
“’श्यामा परत येईल का?’ ही तुमची कादंबरी खूप भडक आणि अश्लील होती.”
“जर काकोडकर लिहू शकतात तर मी का लिहू नये?”
“अलीकडच्या काळात तुम्ही राजकीय लिखाण करू लागलाय. ते सरकारधार्जिणे असते आणि म्हणून तुम्हाला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले असे सर्वजण म्हणतात.”
“तुम्ही एकदा नक्की काय ते ठरवा. एकदा म्हणता राजकीय लिखाणामुळे अध्यक्षपद मिळाले, एकदा म्हणता मी सभासदांची मते विकत घेतली. वास्तविक माझ्या लेखनामुळेच मला हा मान मिळाला आहे आणि याबद्धल मी सर्वांचा ॠणी आहे.”
“तुम्ही बँकेचे ॠणी आहात असे बँकेचे लोकं म्हणतात.”
“मला जसे मित्र आहेत तसे काही शत्रू देखील आहेत, जे मला पाण्यात पाहतात.”
“असो. तुम्ही फक्त राज्यकर्त्यांच्या बाजूने लिहिता असा एक आरोप आहे.”
“मी नेहमी सत्याच्याच बाजूने लिहितो.”
“तुम्ही तुमचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध केलात, त्यात एकदम शंभर कविता होती. ‘वाट वाकडी, सत्य आडवे आले’, वगैरे खूप प्रक्षोभक कविता होत्या पण त्यात काव्य अजिबात नव्हते असे टीकाकारांचे मत होते.”
“काव्य वाचणाऱ्याच्या मनात असते. टीका करणे हा टीकाकारांचा स्थायीभाव आहे. त्यात विशेष काही नाही, मी अश्या गोष्टींना महत्व देत नाही.”
“नवीन लेखकांविषयी तुमचे काय मत आहे?”
“सगळे चांगले आहेत. पण लेखन, वाचन आणि व्यासंग अजून वाढविल्याशिवाय चांगला लेखक बनू शकत नाही असे माझे स्पष्ट मत आहे.”
“तुम्ही तुमच्या मुलाला प्रमोट करता अशी टीका तुमच्यावर होत असते.”
“तो स्वत:च अतिशय प्रतिभावान आहे. (फक्त शुद्धलेखन कच्चं आहे आणि निम्या गोष्टी माझ्याकडून लिहून घेतो.) त्याला प्रमोशनची गरज नाही.”
“संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही किती मानधन घेतले?”
“ते तुम्ही आयोजकांना विचारा.”
“साहित्याच्या प्रसारासाठी तुम्ही काय करणार आहात?”
“उद्या माझी सर्व पुस्तके मी माझ्या स्वाक्षरीसहित विकणार आहे. (लोकं विकत घेतील तर ना!!??!!) नवीन दहा एक रचना लिहून तयार आहेत. मी गावोगावी जाऊन व्याख्याने देऊन साहित्य जागृती करणार आहे. (लोकांनी फक्त येण्याजाण्याचे पैसे द्यावेत आणि राहण्या खाण्याची व्यवस्था करावी!)
“अजून दहा वर्षांनी तुम्ही स्वत:ला आणि मराठी साहित्याला कुठे पहाता?”
“मी आजन्म साहित्याची सेवा करण्याचे व्रत आचरले आहे. (पैसे मिळेपर्यंत चालू ठेवेन) आज मराठी साहित्य उर्जित अवस्थेकडे आहे. त्याला साता समुद्रापलीकडे पोहोचवणे हे माझे ध्येय आहे. पुढील साहित्य संमेलन फ्लोरिडा मध्ये आयोजित करण्याचा विचार आहे.” (झेपतंय तोवर डिस्ने वर्ल्ड वगैरे बघून घेऊ दुसऱ्याच्या पैशाने!)
“तरुण साहित्यिकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?”
“’वाचाल तर वाचाल’, आणि एका महिला लेखिकेच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘लिहिते व्हा!’”
“तुम्ही तुमच्या व्यग्र दिनचर्येमधून वेळ काढून (हिला गुण नाही पण वाण लागला वाटतं) मुलाखत दिल्याबद्धल ABCD वाहिनी आपली आभारी आहे. धन्यवाद.”
वैशालीने मुलाखत संपवली.
“चला, वाहिनीच्या गाडीने मी तुम्हाला हॉटेलवर सोडते,” वैशाली म्हणाली.
हॉटेलवर आल्यावर मी तिला वर रूमवर येऊन पेयपान करण्याचे निमंत्रण दिले. गाडी आणि कॅमेरामनला जाण्यास सांगून वैशाली वर आली.
मग आमची पूर्ण रात्र साहित्य सहवासात छान गेली.



Comments
भन्नाट मुलाखत.सगळ्या खुपणाऱ्या त्रुटींवर मार्मिक उत्तरं दिली आहेत. फक्त शेवट नाही पटला.
By : Pratibha Tarabadkar
New generation at work! Not your cup of tea apparently !
By : Admin