(काम न करता) पैसे कमविण्याचे सोपे उपाय
(काम न करता) पैसे कमविण्याचे सोपे उपाय
शशांक पुरंदरे
आईवडीलांकडून जमेल तसे एक लाख रुपये उसने घ्या. ते कधीच मुलांकडून परतफेडीची अपेक्षा करत नाहीत.
एक लाखात दहा ग्रॅम सोने विकत घ्या.
ते मुथुट फायनॅन्स मधे अमिताभच्या सल्याने गहाण ठेवा, ९० टक्के कर्ज घ्या, सुलभ हप्त्याने! (मला फक्त एकच “सुलभ” माहित आहे)
या पैशातून पुढील अनेक गोष्टी तुम्ही करु शकताः
क्रिकेटच्या मोसमात, जो हल्ली बारा महिने चालतो, जिओ स्टारवर जाउन, (जे फुकट आहे) विन्झो ॲपवर जाउन, अतिशय सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन एक लाखाचे सोने जिंका. मिळालेल्या सोन्याचा वर सांगितल्या प्रमाणे विनियोग करा.
शिवाय ड्रीम इलेव्हन, माझ्या टीमचे वाटोळे, अर्थात माय इलेव्हन सर्कल, झुपी का झुपो मला नक्की आठवत नाही, या सारख्या अनेक ॲपवर रमी, लुडो, कॅरम सारख्या अनेक गेम्स खेळून तुम्ही (पैशाने) गब्बर होउ शकता.
या गेम्स खेळत असताना विरंगुळा म्हणून घरबसल्या झेप्टो, ब्लिंकिट सारख्या ॲप्स वरुन चिप्स पासून डिप्स पर्यंत, पिझ्झ्या पासून पास्त्यापर्यंत आणि बर्गर पासून कॅाफी पर्यंत अनेक गोष्टी मागवू शकता. सर्व फक्त दहा मिनिटांत!
तुम्हाला आवडत असेल तर ताजमहालच्या तोडीचा रजनीगंधा किंवा शाहरुख, अजय देवगण, जॅकी, हृतिक यांनी नावजलेला जर्दा, (मी नाव विसरलो, क्षमस्व! ॲड बघायच्या नादात कसली ॲड आहे ते लक्षात रहात नाही. त्यातल्या एका नटीचे नाव मला काही केल्या आठवत नाहीये. काजोल, रवीना, सोनाली पैकी कुणीतरी असावी) पान मसाला वा तत्सम पदार्थ चघळत रहावा. हल्ली सगळे ॲानलाईन मिळते दहा मिनिटांत!
माफ करा, विषय जरा भरकटला. होतं असं हल्ली वयानुसार! मेंदू तल्लख ठेवण्यासाठी मला पण या गेम्स खेळणे गरजेचे झाले आहे. शिवाय तुटपुंज्या पेन्शनमधे एक लाख कुठून आणू हा यक्ष प्रश्न आहे. बायकोचे दागिने……! माफ करा हे वाचू नये. शिवाय त्या काळी घेतलेल्या सोन्याचे पितळ उघडे पडेल ते वेगळेच!
बघा, परत विषय भरकटला!
या शिवाय पैसे कमविण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. भिकाऱ्याचे कपडे घालून स्टेशन बाहेर बसलात तर लवकरच श्रीमंत व्हाल. खरं, सांगतो, निवृत्त होईपर्यंत रिक्षाला सुटे पैसे देण्यासाठी या लोकांनी मला जेव्हढी मदत केली तेव्हढी कुणीच केली नसेल. रुपयाला ऐंशी पैसे असा भाव होता तेव्हा! आता माहित नाही.
दुसरा चांगला उद्योग म्हणजे किन्नर बनून नाक्यावर गाडीवाल्यांकडे पैसे मागणे. फक्त पैसे मिळाल्यावर डोक्यावर टप्पल मारायला विसरू नये.
बघा, हल्ली असं होतंय माझं! मघाशी भिकाऱ्यांचा विषय निघाला तेव्हा सांगायला विसरलो. तुम्हाला जर, “ Hello, give me ten rupees please. Very hungry. Want to have a vadapav.” , एव्हढे इंग्रजी बोलता येत असेल तर रेल्वे स्टेशनच्या तिकिटाच्यी लाईनमधे तुम्ही भरपूर पैसे कमवाल. कपडे मात्र जरा बरे घालावे लागतील.
या व्यतिरिक्त अजूनही पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. पण त्याविषयी नंतर बोलूया.
एव्हढे भरमसाठ पैसे कमविल्यावर ते खर्च कसे करायचे हा प्रश्न उभा राहतो. काय, त्यात काय कठीण आहे? खूप अवघड आहे.
समजा, म्हणजे समजायची गरजच नाही. मी सांगतोय ते आचरणात आणले तर लवकरच तुम्ही सर्व कोट्याधीश व्हाल. माझा वाचकवर्ग सध्या लहान आहे म्हणून ठीक, नाहीतर काही दिवसांनी गरीब मराठी माणूस शोधायला पुण्याला जावे लागेल.(कारण पुणेरी लोकं कुणाचेच ऐकत नाहीत, तर म्या कोण लागून गेलाय रावसाहेब?)
तर पैसे कसे खर्च कराल? तुम्हाला टू व्हीलर, चारचाकी, घर, बंगला हवाय? सुलभ हप्त्यात कर्ज उपलब्ध आहे. शिवाय तुमच्याकडे आत्ता खूप पैसे आहेत, तेव्हा हप्ते न भरता जगू शकता, माल्या, नीरव मोदी वगैरेंचा आदर्श समोर ठेवायचा.
तेव्हा शुभमन गिल म्हणतो तसे, “क्या खाना पीना है, क्या खरीदना है, कहा घूमने जाना है, ये सब खूबसूरत चिंताए आप करो, बाकी सब हमपर छोड दो।” आणि सारा सार विचार केला तर ते बरोबरच आहे म्हणा!
एव्हढे सगळे करुनही बरेच पैसे आपल्याकडे बरेच पैसे शिल्लक राहतील. तेव्हा या लेखाच्या बदल्यात काही मला पाठवू शकता. विनंती केल्यास मी QR code पाठवू शकतो.
असो, लिहिण्याच्या नादात मी खूप फुकट सल्ले खूप दिले. याबद्दल मला कुणी एकही पैसा देणार नाही याची मला कल्पना आहे. कसं आहे, सल्ले देणं सोपं आहे, पण स्वतः अंमलात आणणे अवघड आहे. पण माझ्या कडे इतरही बरेच मार्ग आहेत पैसे कमविण्याचे, आणि तेही यापेक्षा सोपे!
आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर माझ्या लिखाणावर बारीक लक्ष असू द्दा. अहं, आता फुकट सल्ले नाहीत. मी लवकरच जीवन समुपदेशक म्हणून आपल्या समोर येणार आहे. शहरातील एका भव्य सभागृहात माझे व्याख्यान आयोजित करणार आहे. प्रवेशिका फक्त ₹१०००. ज्यांना पैसे कमवायची (कमवणे हा शब्द इथे चुकीचा आहे, पण मला दुसरा सापडत नाहीये) घाई आहे त्यांना मी प्रत्यक्ष मुलाखतीत सं. ५ ते ७ या वेळात भेटू शकतो. मानधन फक्त ₹५००० असेल. (मी कधीच आपल्या वामकुक्षीच्या वेळेत आडकाठी घालणार नाही
जाता जाता एकच सांगेन. पैसे मिळवणे हाच ध्यास मनी रुजवा.



Comments
छान जमलंय व्यंग
By : Swati Marathe
You are a multi faceted personality. First scientist then author of science fictions/stories etc. Now Financial Advisor that too not how to invest money but how to make money which very few persons will tell😂
By : Deepak Tikekar
👌👌👌Humour and sarcasm at it's best!
By : Sheela Bahadkar