पालकत्व ..पौगंडावस्था... वगैरे... वगैरे!


पालकत्व ..पौगंडावस्था... वगैरे... वगैरे!

शशांक पुरंदरे

टीप: विषय जरा नाजूक आहे. काळजीपूर्वक हाताळावा.

हे आजचे जग आहे. २०२४-२५. १९५०-७० चे निकष आता लागू होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मग तुम्ही कितीही नाकारा.

मी लहानाचा मोठा झालो ती २५० घरांची सोसायटी होती. एकाच वयाची साधारण २५-३० मुलं-मुली होती. दिवसभर नुसती धमाल! न टीव्ही होता, ना मोबाईल! पण कधी गरजच वाटली नाही. कळत नव्हतं तोपर्यंत सर्वजण एकत्र खेळायचो. पण नंतर आमचे खेळ वेगळे झाले. जरा वय वाढल्यावर काही गोष्टींची जाणीव होऊ लागली. बरोबर, चूक काहीही माहिती नव्हते. कुणाला विचारायची सोय नव्हती. आमची बहुतेक कुटुंब निम्न किंवा मध्यम वर्गीय होती. वडील जमेल तसे संसाराला लागणारे पैसे कमावण्यात मग्न होते. आई घरी कामे करून त्यांना साथ देत असे. शक्यतो बाहेरून गोष्टी न आणण्यावरच जोर होता. मुले आपापली जमेल तसे शिकत होती. आईवडीलांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता? अर्थात यात काही अपवाद असू शकतील.

पण कळत नकळत आमच्यावर चांगले संस्कार घडत गेले. कदाचित त्यावेळेच्या सामाजिक दृष्टीकोनाचा हा परिणाम असू शकेल. एखादा दुसरा नासका आंबा निघाला असेल पण आज आम्ही बहुतेक सर्व सुस्थितीत आहोत.

त्यावेळेला सेक्स बद्दल कुणी बोलत नव्हते. सेक्स शिक्षण तर कुणाच्या ध्यानीमनी देखील नव्हते. भारत वर्षात, जिथे पुरातन काळात या गोष्टी मुद्दाम शिकवल्या जात होत्या, तिथे हे घडावे हे खरे दुर्दैव आहे. याचे परिणाम आमच्या पिढीतील काही लोकांनी भोगले देखील आहेत. अगदी लहान वयात लग्ने झाली आणि मुले देखील झाली. वैवाहिक जीवनाचा किती आनंद घेता आला हा प्रश्नच आहे. ज्यांनी लग्ना आधी सेक्स उपभोगला त्यांना नको असलेल्या संतती झाल्या कारण गर्भनिरोधक साधने सहज उपलब्ध नव्हती.

मुले जशी मोठी होत जातात तसे त्याच्या शरीरात बदल घडत जातात. त्यांना त्याच्या लैंगिकतेची जाणीव आपोआपच होऊ लागते. त्यातून स्वप्नदोष (वीर्यपतन) यासारख्या गोष्टी घडतात. पूर्वीच्या काळात मुले घाबरून जायची. बरं सांगायचे कुणाला? मग मित्रांमध्ये चर्चा व्हायची आणि गोष्टी हळूहळू लक्षात यायच्या. यावर हस्तमैथुन हे नैसर्गिक समाधान होते. तेव्हा लग्नाआधी सेक्स असे काही नव्हते. काहींच्या बाबतीत असेल कदाचित, पण फार कमी प्रमाणात होते.

मुलींचे प्रॅाब्लेम्स वेगळे होते. पहिली मासिक पाळी आली की त्या घाबरून जायच्या. मग आई त्यांना समजावून सांगायची. पण फक्त तेव्हढेच. sanitari pads उपलब्ध नव्हते. कपडे धुवून सुकवून वापरले जायचे. स्वच्छतेची वानवाच होती. कित्येक स्त्रीयांना संभोगात आपल्याला देखील आनंद मिळतो हे देखील लग्न झाल्यावर सुरुवातीला समजत नसे. कारण याचे शिक्षण कुणी कधी दिलेच नव्हते.

पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज मुलाला आणि मुलीला त्यांना समजायच्या आत हाती मोबाईल दिला जातो. बारा वर्षाच्या मुलाला आज सेक्स बद्दल जेव्हढी माहिती आहे ती कदाचित त्याच्या पालकांना देखील नसेल!!!

मला खात्री आहे की आजच्या जमान्यात २५ वर्षाखालील अशी खूप कमी मुले असतील ज्यांनी लग्नापूर्वी सेक्सचा अनुभव घेतला नसेल. जशी पिढी बदलते आहे तसे विचारही बदलत आहेत. सेक्स ही उपभोगाची गोष्ट आहे हा विचार दृढ होऊ लागला आहे. आणि तो काही प्रमाणात बरोबरच आहे. पण सेक्स एकाच जोडीदाराशी करावा की नाही हा कळीचा मुद्दा आहे. यातही समलिंगी संबंध, Live-in या सारख्या गोष्टीही येतात. या परंतु या लेखाचा हा विषय नाही.

१२ ते २५-३० वयातील मुलेमुली सेक्शुअली सर्वात सक्रीय असतात. पण त्यांची शरीरे लग्नासाठी परिपक्व नसतात. विशेषत: लग्नानंतर होणार्‍या संतती करिता मुलींची शरीरे तयार नसतात. त्यामुळे लहान वयात लग्न करणे योग्य नाही. पण मग what about sex? याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. म्हणूनच कदाचित गर्भनिरोधक साधने वापरून pre-maritial सेक्स केला जातो आजकाल!

म्हणूनच कदाचित पालकांची भूमिका आता जास्त महत्वाची आहे. या विषयावर मुलांशी मोकळेपणी बोला. आपण आपल्या वयात केलेल्या चुका मुलांना करू देऊ नका. आपले विचार लादू नका पण काय चांगले आणि काय वाईट हे त्यांना शिकवा. आपल्याला वेळ नाही ही सबब सांगणे बंद करा. मुलाच्या सवयी, त्यांचे मित्र, त्यांची संगत, यावर लक्ष असू द्या. आजकालची मुले आपल्यापेक्षा हुशार आहेत. त्यांना स्वत:ला चांगल्या वाईटाची जाण आहे. त्यांच्यावर विश्वास दाखवा परंतु भरकटणार नाहीत याची काळजी घ्या.

या विषयाला अनेक कंगोरे आहेत. सर्व गोष्टी इथे हाताळणे शक्य नाही. म्हणूनच पालकांची आणि समुपदेशकांची भूमिका जास्त महत्वाची असते. यांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. लेखक या विषयातील तज्ञ नक्कीच नाही. पण आजूबाजूला जे घडते आहे यावर ही टिप्पणी आहे. कदाचित माझी मते चुकीची देखील असू शकतील. आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहीन.

Comments

आजच्या तरुणांनी खरोखर विचार करण्यासारखा लेख

By : मीना घाटपांडे
05/12/2024 8 : 53 : 28 PM

यावर उपाय काय? प्रश्न अनेक पिढ्यानपिढ्या आ वासून उभा आहे, पण सुयोग्य उपाय सापडत नाही

By : Bhalchandra Shrikhande
15/12/2024 11 : 21 : 35 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article