अंजली
अंजलीः भाग पहिला
शशांक पुरंदरे
आज सकाळपासूनच बाहेर ढगाळ, निर्जीव वातावरण होते. त्याचे प्रतिबिंब कारण नसताना माझ्या मनात उमटले होते. खरंतर माझा कालचा दिवस खूप छान गेला होता. रात्री ओटीटीवर एक रोमॅंटिक विनोदी मूव्ही पाहताना खूप मजा आली होती. त्यामुळे रात्री झोपही मस्त लागली होती. सकाळी सहा वाजता उठले तेव्हा एकदम फ्रेश वाटत होते. योग अभ्यास, चहा, प्रातर्विधी, ब्रेकफास्ट उरके पर्यंत आठ वाजून गेले होते. सकाळचा पेपर देखील चाळून झाला होता. त्यात नेहमीच्या रटाळ बातम्या होत्या. पण गॅलरीत बसून दुसऱ्या चहाचा आस्वाद घेताघता अवकाशातील मळभ कधी मनात शिरले ते समजलेच नाही. आज काय करावे याचाच मनात विचार करत होते. तसा आजचा आराखडा कालच मनात तयार झाला होता. आता शुभस्य शीघ्रम म्हणणार तेव्हढ्यात दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. समोर एक साधारण पंचविशीतील तरुणी उभी होती.
“अंजली ताई? हाय, मी सायली. काल आपण फोन वर बोललो होतो. मी आत येऊ का?”
“अगं हो, ये ना.”
सायली आत आली. मी खुणेनेच तिला बसायला सांगितले. काल झालेले आमचे बोलणे मी साफ विसरून गेले होते. पाच फूटाच्या आतबाहेर उंची, गोल छोटेखानी चेहरा, बॅाब केलेले केस, चेहऱ्यावर नो मेकप, अंगावर साधा कॅाटनचा ड्रेस, अशी ही सायली आली आणि माझ्या मनातील मळभ क्षणार्धात दूर झाले. तिची पर्सनॅलिटी होतीच तशी! कुंद वातावरणात मंद वाऱ्याच्या झुळकीसम ती माझ्या घरात आणि मग आयुष्यात दाखल झाली.
तिच्या डोळ्यांनी क्षणभर माझा आणि माझ्या दिवाणखान्याचा सर्व्हे केला आणि मग मला नजरेनेच विचारले, मग?
“सायली परांजपे. वय वर्ष पंचवीस. बी ए इन लिबरल आर्ट्स. डिजिटल मार्केटिंगचा डिप्लोमा. दोन वर्ष जॅाब. आता फ्री लॅन्सिंग. का?”
“इतरांसाठी काम करायचा कंटाळा आला.”
“पण इथे देखील माझ्यासाठीच काम करणार ना?”
“पण हे वेगळं आहे. मी माझ्या अटी शर्तींवरच काम करेन. मला यात क्रिएटीव्ह फ्रीडम असेल तरच मी हा जॅाब करेन.”
मी आज जवळ जवळ पन्नास वर्षांची होते. माझे आईवडील माझे शिक्षण संपल्यावर लगेचच गेले होते, पण मी तेव्हा जॅाब करत होते. लवकरच मी जॅाब सोडून माझी स्वतःची डिजिटल चॅनेल सुरु केली, त्यात माझे वेगवेगळ्या विषयांवरचे ब्लॅागज, यूट्यूब व्हिडीओ, विविध विषयांवर लेख वगैरे गोष्टी समाविष्ट होत्या. शिवाय मी माझी चित्रकला देखील जोपासत होते. हे सर्व करताना आयुष्याची पंधरा वर्षे कधी सरली ते कळलेच नाही.
पण आता मला माझे वय जाणवू लागले होते. तशी मी फिट होते. योग, नियमित व्यायाम सर्वकाही चालू होते. घरात माझी स्वतःची जिम होती. पण माझ्या कामाची व्याप्ती इतकी वाढली होती की सर्व मॅनेज करणे कठिण होत होते. मला एका सहाय्यकाची गरज भासू लागली होती. म्हणूनच आज सायली इंटरव्ह्यू करता आली होती.
“माझ्या तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत ते मी फोनवर सांगितलेत आहे. या व्यतिरिक्त तू मला काय देऊ शकतेस?”
माझ्याकडून तिला असा प्रश्न अपेक्षित नसावा. तिच्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नचिन्ह हेच दर्शवित होते.
“मला याचे लगेचच उत्तर नको आहे. तुला माझ्या अटीशर्ती मान्य असतील तर आपण काम सुरु करुया का?”
सायलीने मान डोलावली. पहिलाच चेंडू गुगली पडल्यामुळे तिचा चेहरा जरा पडला होता.
“आपण कॅाफी घेऊया का?”
“हो चालेल, पण मी करते.”
“बरं. किचन डावीकडे आहे. सर्व सामान किचन प्लॅटफॉर्म वरच आहे.”
दोन मिनिटात सायली कॅफी घेऊन आली. एकंदरीत चुणचुणीत वाटली. आम्ही कॅाफी सिप करता करता अवांतरच गप्पा मारल्या. म्हणजे, तिची फॅमिली, मित्र मैत्रीणी, आवडीनिवडी वगैरे!
“आज तुला एकदम सोपे काम आहे. म्हणजे तुला फक्त बसायचे आहे. तुला तर माहित आहे की मी एक चित्रकार आहे. मी पेन्सिल ड्रॅाईंग्ज बनवते. मला तुझा चेहरा खूप आवडला. आपण तुझे एक पोर्ट्रेट बनवले तर तुला चालेल का?”
हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले.
“बस, हेच तुला करायचे आहे. असेच स्मितहास्य चेहऱ्यावर ठेऊन एक तासभर बसावे लागेल.”
मी सायलीला माझ्या स्टुडियोमधे घेऊन गेले. तिला स्टूलावर बसवून मी लायटिंग ॲडजस्ट केले. तिच्या चेहऱ्यावर एका बाजूने प्रकाश पडला होता. मी पेलेटवर कॅनव्हास चढवला आणि पेन्सिल घेऊन चित्र रेखाटायला सुरवात केली.
एक तासानंतर चित्र तयार झाले. इतका वेळ सायली चित्रासारखी न हलता बसून होती. मी तिला तिचे पोर्ट्रेट दाखवले. ते पाहून तिचा डोळ्यांवर विश्वास बसेना.
“हे तुझ्या पहिल्या दिवसाचे बक्षिस! चल, मला भूक लागली आहे, आपण लंच करुया का?”
अंजलीः भाग दुसरा
शशांक पुरंदरे
सायली मला जॅाईन होऊन दोन महिने होऊन गेले होते. आमच्या दोघांची वेव्हलेग्थ छान जुळली होती. एकतर ती खूप वक्तशीर होती. एखादी गोष्ट एकदा सांगितली की परत सांगायची गरज मला कधीच भासली नाही. शिवाय तिचे मत स्पष्टपणे मांडायची तिची नेहमीच तयारी होती. पण मी सांगितलेली बाब तिला एकदा पटली की मग व्यवस्थित काम करण्याची तिची सवय मला खूप आवडली होती.
या दोन महिन्यात आम्ही अनेक प्रोजेक्ट केले. वेगवेगळ्या विषयांवर माझे व्हिडीओज बनवून आम्ही ते यूट्यूब वर पोस्ट केले होते. त्यात मी बुलेट पॅाईंटस बनवून दिल्यावर त्याला टेक्स्ट मधे कन्व्हर्ट करण्याची जबाबदारी सायलीने उत्तम प्रकारे सांभाळली होती.
माझ्या लेखांचे प्रुफ रीडिंगचे काम मी सायलीवरच टाकली होती. या सर्व गोष्टींमुळे मला माझे काम करायला अधिक वेळ मिळत होता, त्यामुळे माझी प्रॅाडक्टिव्हिटी खूपच वाढली होती.
लवकरच आम्ही माझ्या रेखाचित्रांचे प्रदर्शन भरविण्याची मी तयारी सुरु केली होती. प्रदर्शनाची थीम, त्यानुसार चित्रांची निवड, त्यांची सेटिंग्ज, प्रदर्शनाची डेट, त्यासाठी गॅलरीचे बुकिंग वगैरे सर्व गोष्टी मी सायलीवरच सोडल्या होत्या.
मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा सायलीने मला सांगितले की ती स्वतः उत्तम तैलचित्र बनवते. मग मी एक दिवस जाऊन तिची तैलचित्र पाहिली. तिच्या आईवडीलांवा भेटले. मग मी त्यांना माझ्या घरी डिनरसाठी आमंत्रण दिले.
अरे, मी सांगायला विसरले की सविताबाई दिवसातून तीन वेळा घरी येऊन आमच्या खाण्यापिण्याची सोय करुन जातात. शिवाय घराची साफसफाई वगैरे देखील करुन जातात. सायलीचे आईवडील डिनरला आले तेव्हा सर्व स्वयंपाक सविताबाईंनीच केला होता.
सायली काही काळातच जणू माझ्या घरचीच सदस्य बनून गेली होती. आयुष्याची इतकी वर्षं एकट्याने घालवलेल्या मला हा सुखद बदल होता.
सायली मधे अनेक चांगले कलागुण होते आणि मी शक्यतो ते फुलवायचे प्रयत्न करत होते. लवकरच आम्ही सायलीच्या तैलचित्रांचे प्रदर्शन करण्याचे ठरविले. त्याचा सर्व खर्च उचलण्यात जबाबदारी अर्थातच मी घेतली होती. एकंदरीत वीस चित्रे त्यात मांडण्याचे ठरल्यावर सायली दुप्पट जोमाने कामाला लागली.
एक दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध चित्रकार हेमंत आगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. हेमंतला मी अनेक वर्षे ओळखत होते. तसे कलाविश्वाची व्याप्ती खूप मोठी नसते आणि बहुतेक कलाकार एकमेकांना ओळखत असतात. हेमंत तीस वर्षांचा होता पण पाचच वर्षांमध्ये वॅाटर कलर पेंटिंग्ज मधे त्याने चांगले नाव कमावले होते. अर्थात हेमंत आणि सायलीची ही पहिलीच भेट होती. पण पहिल्या भेटीतच दोघांमधील अंडरकरंट मला जाणवला होता.
सायलीच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत होता. तिची दहा तैलचित्रे लगेचच विकली गेली होती. तिची ‘वारा’ आणि ‘नभांतर’ ही दोन चित्रे तर हेमंतनेच बुक केली होती.
रात्री माझ्या घरी डिनरला आम्ही दोघीच होतो. सायली खूप खुश दिसत होती. तिच्या मूळच्या सौंदर्यावर एक वेगळाच रंग चढला होता. न बोलताही तिच्या नजरेतील कृतज्ञता मला जाणवत होती.
सायली निघून गेल्यावर मी बेडरुममधे गेले, पण झोप काही येत नव्हती. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. सतत कुशी बदलत झोपण्याचा प्रयत्न करताना शेवटी कधीतरी माझा डोळा लागला असावा. पण स्वप्नांमधे सतत त्याचाच चेहरा दिसत होता.
अंजलीः भाग तिसरा
शशांक पुरंदरे
माझा होरा खरा ठरला होता. सायली आणि हेमंत वारंवार भेटू लागले होते. हे सायलीनेच मला सांगितले होते. तसे दोघेही एकमेकांना अनुरूप होते. फक्त प्रश्न एकच होता. दोघेही एकाच क्षेत्रात काम करत होते आणि कधीकधी व्यावसायिक इर्षा पर्सनल नात्यांमधे खो घालू शकते, जसे माझ्या आणि अनिकेतच्या बाबतीत झाले होते.
अनिकेत कॅालेजच्या पहिल्या दिवशी मला भेटला. ग्रॅज्युएशन होईपर्यंत आम्ही एकमेकांमधे आकंठ बुडालो होतो. आम्हाला जॅाब देखील एकाच फर्म मधे लागला होता आणि तिथेच प्रॅाब्लेम्सना सुरवात झाली होती. जॅाब प्लेस कॅन बी क्रुऐल समटाईम्स, आणि आमच्या बाबतीत तेच झाले. कॅाम्पिटिशनच्या नादात आमच्या प्रेमाचा बळी गेला. शेवटी मी जॅाब सोडला आणि स्वतःची प्रॅक्टिस सुरु केली. त्यानंतर आत्तापर्यंत आमचा एकमेकांशी काही कॅान्टॅक्ट नव्हता. पण कधीकधी मला एकटे पण खायला उठते. पन्नाशीच्या आसपास मला ते जास्तीच जाणवू लागलंय. पण आता करणार तरी काय?
सायली आणि हेमंत आता एकत्र राहू लागले होते. दोघांच्याही घरी काहीच प्रॅाब्लेम नव्हता. अर्थात सायली माझ्याबरोबर काम करत होतीच. शिवाय तिची स्वतःची करीयर देखील चांगली चालली होती. मी देखील आपण बरे आणि आपले काम बरे या तत्वावर काम करत होते.
आणि एके दिवशी अचानक अनिकेतचा फोन आला.
“हाय, अनिकेत बोलतोय.” मी उडालेच. इतक्या वर्षांनंतर त्याचा आवाज ऐकत होते. अजूनही आवाजात तेच मार्दव होतं.
“अ-अनिकेत???”
“हो, कशी आहेस?” मी स्वतःला सावरले.
“मी ठीक आहे. तू कसा आहेस? आ-आणि आहेस कुठे?”
“तुझ्या बिल्डिंग खालीच आहे. वर येऊ?”
“ये-येना. विचारतोस कशाला?”
मी घाईघाईने आरशात बघून साडी ठीक केली, ओठांवर हलकासा वॅार पेंट, म्हणजे लिपस्टिक लावली. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते, इतके की समोरच्याला देखील ऐकू जावेत.
दोन मिनिटांनी दरवाजावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. समोर अनिकेत उभा होता. अगदी तसाच ! तोच चेहरा, तशीच केसांची स्टाईल, तेच पाणीदार डोळे ज्यांनी मला वेड लावले होते.
“ ये, आत ये.” मी म्हणाले. त्याने रजनीगंधांचा गुच्छ माझ्या हातात दिला आणि म्हणाला, “हॅपी बर्थडे!”
नकळत माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटले. मी माझा हात त्याच्या हाती दिला आणि म्हणाले, “सेम टू यू!”
आमचे वाढदिवस एकाच दिवशी होते आणि आम्ही दोघेही आजच पन्नाशी पूर्ण करत होतो. आम्ही दोघे सोफ्यावर बसलो आणि परत बेल वाजली. मी उठून दरवाजा उघडला. समोर सायली आणि हेमंत उभे होते.
सायलीने दारातच मला मिठी मारून हॅपी बर्थडे केले. दोघेही आत आले आणि अनिकेतला पाहून हेमंत आश्चर्याने उद्गारला, “अन्या, तू इथे काय करतो आहेस?”
कला क्षेत्रात सर्वच एकमेकांना ओळखतात. हेमंत अनिकेतपेक्षा दहा वर्षांनी तरी लहान असावा तरी त्यांची एव्हढी मैत्री आहे ही मला न्यूजच होती.
“ अनिकेत, सायली, माझी असिस्टंट, सायली अनिकेत!” अनिकेत म्हटल्यावर तिची ट्यूब पेटली. ती सूचक नजरेने माझ्याकडे पहात होती. मी हलकेच मान डोलावली. कधीतरी मी सायलीला अनिकेत बद्दल सांगितले होते.
“अंजलीताई, मीच अनिकेतला तुमचा नंबर आणि पत्ता दिला होता, पण तो आज उगवेल याची मला अजिबात कल्पना नव्हती.”
“कारण आज आमचे दोघांचेही वाढदिवस आहेत.”
“अन्या, तू मला बोलला नाहीस कधी?”
“कधी वेळच आली नाही.”
हेमंत आणि सायलीने आणलेला केक आम्ही दोघांनी एकदम कापला. मग हेमंतने शॅम्पेनची बॅाटल ओपन केली. सविताताईंचा स्वयंपाक तयार होताच.
जेवताना इतर अवांतर गप्पा होत होत्या. मला तर काय बोलावं तेच सुचत नव्हतं. सायलीला माझी अस्वस्थता जाणवली असावी. कारण जेवण झाल्यावर दोघेही बाहेर पडले. हेमंतला आमच्या नात्याची कितपत कल्पना होती ते मला समजत नव्हतं. कदाचित सायलीने थोडीफार कल्पना दिली असावी.
ते दोघे गेल्यावर मी कॅाफी केली. कॅाफी घेऊन आम्ही बाल्कनीत बसलो. समोर मुंबई अस्ताव्यस्त पसरली होती. वर आकाशात हजारो चांदण्या चमचम करत होत्या.
शेवटी अनिकेतनेच विषयाला हात घातला. मी जॅाब सोडल्यावर त्याने देखील लगेचच जॅाब सोडला होता. दोनतीन जॅाब बदलले पण त्याचे मन लागत नव्हते. शेवटी सर्व सोडून काही वर्ष त्याने अमेरिकेत घालवली. सहा महिन्यांपूर्वीच तो परत आला होता. हेमंतने त्याला माझा पत्ता दिला. इतके वर्ष आम्ही अजिबात एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. पण दोघांच्याही डोक्यात तेच विचार घोळत होते.
“किती मूर्ख होतो आपण! फालतू कारणांनी एकमेकांना सोडून दिले.” अनिकेत म्हणाला.
“अजूनही वेळ गेलेली नाही.” मी नकळत बोलून गेले. “ पण जरा सबूरीने घेऊया. जरा वेळ देऊया एकमेकांना!”
“खरं आहे तुझं. सध्या वरचेवर भेटत राहूया.”
आम्ही बराच वेळ एकमेकांशी बोलत होतो. भानावर आलो तेव्हा समोर चंद्राची कोर उगवली होती. आमचे वाढदिवस ही कालची बातमी झाली होती. समोर टेबलावर कॅाफीचे रिकामे कप पडले होते. आमची अंतःकरणे मात्र भरुन आली होती.
शेवटी अनिकेत उठला. न राहवून मी त्याला मिठी मारली. त्याच्या ओठांची चव अजूनही तशीच होती. आमच्या डोळ्यातून गळणारे अश्रू गालांवर एकत्र होऊन वहात होते.



Comments
काळाच्या ओघात अपूर्ण राहिलेल्या प्रेमाची, विरहाची आणि पुन्हा एकदा आयुष्याने दिलेल्या संधीची हळुवार कहाणी आहे.विरहाची कथा असली तरी तिचा शेवट विरहात होत नाही; तो एका नव्या आशेच्या उंबरठ्यावर येऊन थांबतो.
By : नितीन पागेदार