नात्यांची गोष्ट : भाग १ : जगण्याची कला


नात्याची गोष्ट ही एक दीर्घकथा आहे. आज या कथेचा पहिला भाग, जगण्याची कला, सादर करत आहे.

“डेड”, खातखात बोलताना विन्याने डॅडचा डेड केला होता. “जरा एक पिवळा गांधी द्या.”
“डेड काय? गद्ध्या, मी अजून जिवंत आहे. आणि बापाला बाप म्हणायला लाज वाटते का रे? आणि हा पिवळा गांधी काय भानगड आहे?” अठ्ठेचाळीस मध्ये गांधीजी गेल्यामुळे मी ते काळे का गोरे ते पाहिले नव्हते परंतु पिवळे तर नक्कीच नसावेत.
“बापा”, विन्या चूक सुधारून म्हणाला “ पिवळा गांधी म्हणजे पाचशे रुपये, हिरवा गांधी म्हणजे शंभर रुपये आणि लाल गांधी म्हणजे पन्नास रुपये!”
“मग बाकीच्या नोटांचे काय?”
“बाकीच्या नोटांना काही किंमत आहे का आजकाल?”
“तुमच्या आजकालच्या मुलांची भाषाच मला समजत नाही. आता हेच बघ, तुम्ही एखादी गोष्ट कूल असेल तर हॉट म्हणता आणि हॉट गोष्टीला कूल म्हणता. आणि लेका, मल्टीनॅशनल कंपनी मध्ये काम करतोस, मग बापाकडे पैसे कसले मागतोस?”
“अहो जाताना एटिएम मधून काढीन, पण तोपर्यंत खिशात पैसे नकोत का थोडेतरी? संध्याकाळी परत करीन.”
“काही गरज नाही”
“नाहीतर परत म्हणाल, बापाकडून पैसे घेतो म्हणून.”

विन्या म्हणजे आमचे मोठे चिरंजीव. वास्तविक त्याचे नाव आमच्या तीर्थरूपांनी विनायक ठेवले होते. पण हा स्वतःला विन म्हणवतो, आणि एखाद्या फिल्मी नायकाप्रमाणे रहातो.
“पण तुझी सर्व कॅश संपली कशी काय?”
“काल निशाचा बर्थडे होता ना! तिला पार्टी दिली.”
निशा म्हणजे विन्याची चालू गर्लफ्रेंड आहे. मोठी गोड पोरगी आहे. फॅशन ड़िझायनर आहे पण स्वत:च मॅाडेल असल्यासारखी वागत असते.
“कितवा बर्थडे तिचा?”
“सोळाव्या वर्षाचा पाचवा.”
“म्हणजे एकवीस ना?”
“हो पण असे म्हणायचे नसते.”
“अरे मग तिला घरी का नाही बोलावलेस? केक वगैरे कापला असता.”
“म्हणूनच नाही बोलावले. तुम्हाला केक खायला घातला असता तर मातोश्रीन्कडून मला किक मिळाली असती त्याचे काय?”
“मी काय तुझ्याआयला-“
“बाबा लॅंग्वेज!”
“मी काय तुझ्या आईला भीतो की काय?”
“तुम्ही नाही हो, पण मी भीतेा.”
“अरे पण माझे वजन कंट्रोल मध्ये आहे.”
“ते आईला सांगा. मला सांगून काही उपयोग नाही.”
“ही तर हुकुमशाही झाली!”
“मग अण्णांना सांगा.”
“ते मला उपवास करायला सांगतील, म्हणजे केक नाही तो नाहीच.”

“सुप्रभात, कोणी केक आणलाय?” मागून कालिंदीचा आवाज आला. हे आमचं कन्यारत्न. B.Com. च्या शेवट्च्या वर्षाला आहे. अतिशय मॉड मुलगी आहे, पण गम्मत म्हणजे मराठीचा अतिशय अभिमान आहे. त्यामुळे नेहमी शुद्ध मराठी बोलते जे आम्हाला समजायला कधीकधी खूप अवघड जाते.
“गुडमॅानिॅंग भेजाकम”, हे विन्याचे रोजचे वेलकम. ”केक का आणला नाही ते सांगत होतो.”
“का?” “बाबा ने विचारले म्हणून.”
“नाही, केक का आणला नाही?”
“कारण आई बाबांना खाऊ देणार नाही.”
“हो, बरोबर आहे. केकमध्ये उष्मांक खूप असतात. त्याने शरीरातला मेद वाढतो.”
“अरे म्हणजे कॅलरीज खूप असतात त्यामुळे वजन वाढते.” मी विन्याला समजून सांगितलं.
“मग असे मराठीत बोल ना.”
“पण केक कशाबद्दल?”
“”निशुचा बर्थडे होता ना.”
“अरे हो, मी तिला अभिनंदनपर संदेश तिच्या भ्रमणध्वनीवर पाठविला होता, तो तिला प्राप्त झाला का?”
“हो, आणि तिने त्याचा आनंदपूर्वक स्वीकार देखील केला.” हे वाक्य संपवेपर्यंत विन्याला दम लागला.
“कोणी कुणाचा स्वीकार केला?”, हा आमच्या अदितीचा आवाज!
“अग, काही नाही काल निशाचा बर्थडे होता ना, त्याच्या बद्धल बोलत होतो. हा विन्या मला केक देत होता पण मी म्हटले माझे डायेट चालू आहे म्हणून मला नको. उगाचच वजन वाढेल.”
“कायरे तब्बेत ठीक आहे ना? तू केकला नाही म्हणतोस?” बाकी आमची अर्धांगी आम्हाला बरोबर ओळखून आहे.
“बऱ्याच दिवसात निशाचे दर्शन नाही. तिला एकदा आपल्या गृही पाचारण कर ना.” कालिन्दी उद्गारली.
“कसलं रण कर?” इति विन्या.
“अरे म्हणजे घरी बोलव तिला.”
“हा, ठीक आहे, उद्याच सांगतो.”
“अहो साहेब, जरा पाय वर करा, मला कचरा काढू दे घरातला.” ही कमल, आमची कामवाली बाई, पु.लं. च्या रविवारच्या सकाळ मधल्या रामा प्रमाणे अतिशय आगाऊ आहे. ही आमच्या सकट सर्व घर झाडायला कमी करणार नाही. आणि झाडून झाल्यावर फॉलोअप म्हणून आपल्याला परत झाडू मारावा लागतो तो वेगळाच. घरातला केर कमी होत नाही पण हिचा पगार मात्र वाढतो आहे. परत आता यांची युनियन आहे. त्यामुळे बोलायची सोय नाही. हिचा एक किस्सा ऐकण्यासारखा आहे. मी आणि अदिती एकदा रस्त्याने चाललो होतो. समोरून येणाऱ्या एका फटाकडीने तिला हाय केले. मी विचारले,

“ही कोण ग?”
“अरे, ही आपली कमल नाही का, कामवाली? तू ओळखलं नाहीस तिला?”

बाकी सकाळी ज्या स्टाईलमध्ये ती कामाला येते ते पाहून मला समजायला पाहिजे होतं. सकाळी सकाळी घराची मालकीण कामवाल्या बाईसारखी आणि कामवाली बाई मालकिणी सारखी दिसते हे मात्र खरे. एकदा माझा एक मित्र घरी येणार होता. आमच्या बाईसाहेब बाहेर गेल्या होत्या आणि घरी ही कमल काम करत होती. मी आपले मित्राला फोन करून सागितले की बाबारे, दार उघडणारी आमची कामवाली असेल, नाहीतर तू म्हणशील काय वहिनी, कसं काय!

"कमाल आहे, म्हणजे.... कमल आहे होय! मला वाटले तुझी कोणी मैत्रीण असेल. हल्ली कामवाल्या पण हायफाय व्हायला लागल्या आहेत. तिचा ड्रेसपण अगदी तुझ्या ड्रेससारखाच आहे.”
“माझ्या ड्रेस सारखा नाही माझाच जुना ड्रेस आहे तो.”
“तू तुझा चांगला ड्रेस तिला देऊन टाकलास? घेऊन सहा महिने पण झाले नसतील.”
“हो पण मला कंटाळा आला त्याचा.”
“उद्या माझा कंटाळा आला तर.....”
“वाटेल ते बोलू नकोस, तुला सोडले तर गाडी कोण चालवणार?”
आमच्या बाईसाहेब एकदम प्रॅक्टिकल आहेत. घरचा ड्रायव्हर असताना पैसे देऊन का आणा? पण हल्ली कसलाच भरोसा नाही. एकदा ती मला सांगत होती की लग्न व्हायच्याआधी चप्पलेचा अंगठा तुटला तर ती चप्पल टाकून देत असे. तेव्हापासून मी माझ्या अंगठयाची विशेष काळजी घेतो.

आदितीची कमलची गोष्ट अजून संपली नव्हती. “तरी आपली बाई खूप बरी आहे. महिन्यातून फक्त दोनच सुट्ट्या घेते. परवा शेजारच्या काकू सांगत होत्या, त्यांची कामवाली तीनचार दिवस कामाला आली नाही म्हणून त्यांनी तिला फोन केला. तर ती म्हणते कशी, मी फेसबुकवर माझे स्टेटस अपडेट केले होते. तुमच्या साहेबांनी कॅामेंटपण केली होती की मिस यु कम सून म्हणून! आता बोल!” एक दिवस हे फेसबुक माझा पण काटा काढणार कधीतरी!

“आज न्याहरीला काय आहे?” कालिंदीने मुद्द्याला हात घातला.
“पोहे”,आदिती उद्गारली.
“नेहमी काय पोहे करतेस? जरा पास्ता वगैरे बनव ना.” पास्त्याला मराठी शब्द अजून सापडलेला नाही.
“मला वेळ नाही. स्टुडिओला जायचंय. अनिल आत्ता येईलच.”

अनिल म्हणजे आदितीचा पार्टनर आहे. अतिशय आगाऊ आहे. दिसायला एखादा फिल्म्स्टार वाटतो आणि माझ्या समोर बिनदिक्कत आदितीवर लाईन मारत असतो. आता तो उत्तम चित्रकार आहे व अदिती आणि अनिलचा स्टुडीओ चांगला चालतो ही गोष्ट खरी आहे पण म्हणून काय माझ्या बायकोवर लाईन मारायची? अर्थात त्याला दोन हात दूर कसे ठेवायचे ते आदिती बरोबर जाणते. पण.....

मॉडर्न आर्ट किंवा पेंटिंग्जचे माझं ज्ञान शून्य आहे. म्हणून मी एकदा अनिलला विचारलं की बाबारे, तुम्ही कलेचं मूल्य कसे ठरविता? माझ्या दृष्टीने होळीत रंगविलेला चेहरा आणि कॅनव्हासवर ओतलेला रंगांचा डबा यात काहीच फरक नाही. तेव्हा तो मला म्हणाला की ते तुझ्या सारख्या अरसिक माणसाला नाही कळणार! खरतर आदितीशी लग्न केल्यावर माझा रसिकपणा त्याला कळायला हवा होता. वास्ताविक कला खरोखरच कोणाला कळतेका हा प्रश्नच आहे. म्हणून तर अशा चित्रांना लोकं हजारो रुपये मोजतात आणि आदिती व अनिल सारख्यांची पोटं भरतात.

यावरून मला एक किस्सा आठवला. एकदा एक माणूस हँडीक्राफ्टच्या प्रदर्शनाला जातो व त्याचा धक्का लागून एक फुलदाणी पडून फुटते. मालक धावत येतो आणि जोरजोरात शिव्या द्यायला लागतो,
“मूर्ख माणसा, तुला काही अक्कल आहे की नाही? तीनशे वर्ष जुनी फुलदाणी तू फोडलीस!” ते ऐकून तो माणूस शांतपणे म्हणतो, “एवढेच ना, मला वाटले नवीन आहे म्हणून तुम्ही चिडलात की काय!”

“हाय कालिंदी, हाय विन, हाय अशोक कसा आहेस?” नाव घेतल्याघेतल्या साहेब हजर झालेच!
“अदिती, आर यू रेडी? यू आर लुकिंग ग्रेट!” असे मी पण तिला फारसे म्हणत नसेन पण हा अन्या मात्र न चुकता म्हणतो. “लेट अस गो!”

आदितीने देखील मोठ्या उत्साहाने अन्याला हाय करून टेबलवरचा आपला क्लच उचलला, पायात अडीच इंची सिलेटॅान चढवल्या आणि मला हळूच डोळा मारून बाय केले. ह्या सिलेटॅान घालून बायका चालू कश्या शकतात हे मला एक न सुटलेल कोडंच आहे.

“सहा वाजता येईन. आशु,“ प्रेमाने आदिती मला आशु म्हणते, ”आज डिनरला जायचं लक्षात आहे ना?” मला आठवण करून आदिती बाहेर पडली. आणि मला आठवले की आज विन्या आणि निशा प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्या साठी निशाच्या आईवडिलांना भेटायचं ठरलं होतं.

“बाबा, अनिल खूप देखणा आहे नाही? मिशी ठेवली तर अजून छान दिसेल.” इति कालिंदी!
“एकदम चॉकलेट हिरो! यू लुक हँडसम विथ मूसटॅश अँड प्रीटी विदाऊट वन!” विन्याने तिला दुजोरा दिला. मी काही न बोलता मनात माझ्या मिशीला पीळ देत पोहे खाऊ लागलो.

कालिंदी कॉलेजला आणि विन्या ऑफिसला गेल्यावर सारे घर शांत झाले. मी पण माझा लॅपटॉप उघडला आणि इमेल्स बघायला सुरवात केली. हल्ली माझी सॉफ्टवेअर कन्सल्टन्सी घरूनच चालते. हार्डवेअर शॉप बघायला मधून मधून जावे लागते म्हणा! हा पण एक साईड बिझनेस!

बरोबर संध्याकाळी सहाच्या ठोक्याला आदिती हजर झाली. निशाच्या घरी सात वाजता पोहोचलो. विन्या आधीच उगवला होता. खरतरं कुठेही वेळेवर न येणं हा विन्याचा स्वभावधर्म आहे. निदान स्वत:च्या लग्नाचं ठरवायला स्वारी वेळेवर आली हे आमचं नशिबच म्हणायला हवं.

दोन मिनिटात “हाय अंकल“, म्हणत निशा बाहेर आली. नेहमी प्रमाणे बॉब केलेले केस, मेकपचं नामोनिशाण नसलेला चेहरा आणि लेटेस्ट फॅशनच्या नी लेंग्थ स्कर्टमध्ये खूपच छान दिसत होती. तिच्या मागोमाग शरद आणि स्वाती बाहेर आले. त्यांच्या कडे बघून हे निशाचे आईवडील आहेत हे वेगळं सांगायची गरजचं नव्हती. अर्थात आम्ही आधी देखील भेटलो होतो.

यथावकाश डिनर झाल्यावर मी विषयाला हात घातला.

“आता पुढे कसं करायचं?, म्हणजे लग्न वगैरे?”
“आम्हाला लग्न करायचं नाहीये. आम्ही सुरवातीला लिव्ह इन रिलेशनशिप मधे रहाणार आहोत.” विन्या आणि निशा एका सुरात म्हणाले.

मी सोफ्यावरून खाली पडतापडता स्वतःला सावरले. तसा मी ओल्ड फॅशनचा माणूस आहे आणि लग्नसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. आदितीच्या मागे अनिलासारखे बरेच जण आहेत हे मला चांगले ठावूक आहे आणि मी देखील...! जाऊदे, मुद्दा हा की तरीही आमचे लग्न इतके वर्ष टिकून आहे.

“पण का?”, आदिती शांतपणे उद्गारली. ही म्हणजे शांततेचा कळस आहे. हीच्या खुर्चीखाली बॉम्ब जरी फोडला तरी शांतपणे विचारेल, “कसला आवाज झाला रे?”
“कारण आम्हाला एक वर्ष ट्रायल घ्यायची आहे.” विन्या.
“पण का?, तुम्ही इतके वर्ष बरोबर आहात. एकमेकांना चांगले ओळखता. आम्हाला कोणालाही काहीही प्रॉब्लेम नाही. मग?” मी.
“ओळखणं वेगळं आणि लग्न वेगळं.” निशा.
“आम्हाला एकत्र राहून पाहायचं आहे. मग आम्ही डिसाईड करू.” विन्या.
“मला काही हे पटत नाही.” मी म्हणालो, ”आणि आदिती तुला हे चालेल का?”
शरद आणि स्वाती निर्विकार चेहऱ्याने हे सर्व ऐकत होते.
“तुम्हा दोघांना हे पसंत आहे?” मी शरदकडे बघून म्हणालो.
“हो, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही.” स्वातीने परस्पर उत्तर दिले, “कारण आम्ही दोघे देखील पहिले वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिलो होतो.” मी (मनातल्या मनात) कपाळाला हात लावला.

विन्याने आणलेला केक कापून आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. पुढील सेलिब्रेशनसाठी निशा आणि विन्या क्लबमधे गेले आणि मी आणि अदिती घरी परतलो. कार चालवता चालवता माझ्या डोक्यात चक्रं चालू होती. सर्व आवराआवर करून आम्ही बेडरूममध्ये आलो. मी अदितीला म्हटलं, “मला असं वाटायला लागलंय की आपणपण एकमेकांना घटस्फोट देउया आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहूया. त्यामुळे तुला आणि मला दोघांनाही अधिक स्वातंत्र्य मिळेल, असं तुला नाही वाटत?” अलगद माझ्या मिठीत येऊन माझं तोंड बंद करत अदिती म्हणाली, “असा स्वातंत्र्यदिन आपल्या या आयुष्यात तरी उगवेल असं मला वाटत नाही.”

Comments

मिश्किल कथा.हल्ली निघालेल्या फॅडवर विनोदी अंगाने भाष्य करणारी...

By : Pratibha Tarabadkar
06/05/2023 1 : 56 : 16 PM

Hilarious

By : Hema Ratnaparkhi
06/05/2023 11 : 14 : 26 PM

मस्त

By : शितल
07/05/2023 1 : 22 : 42 PM

Mast

By : Prasad Khare
10/05/2023 09 : 29 : 48 AM

Mast

By : Prasad Khare
10/05/2023 09 : 29 : 48 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article