हेल्पलाईन


हेल्पलाईन

शशांक पुरंदरे

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात प्रचंड तणाव निर्माण होत असतो. काही वेळा समुपदेशनाची गरज भासते. याचसाठी आम्ही ही हेल्पलाईन नि:शुल्क उपलब्ध केली आहे. श्वेता आणि श्रेयस समुपदेशन करतात. बऱ्याच जणांनी याचा लाभ घेतला आहे. समुपदेशनाचे काही नमुने आपल्यासाठी आम्ही सादर करत आहोत.

नमस्कार. मी श्वेता. ताणतणाव निवारण सेवेत आपले स्वागत आहे. काय मदत हवी आहे आपल्याला?
ही तन्वी न माझी नेहमी पेन्सिल चोरते.
आपले नाव सांगा.
मी संदेश.
संदेश तू किती वर्षाचा आहेस.?
मी न सात वर्षाचा आहे. मी आणि तन्वी न एकाच बाकावर बसतो. ही न रोज माझी पेन्सिल चोरते.
तू नीट ठेव. म्हणजे नाही घेणार.
मी कंपास पेटीत ठेवतो, तरीही ती चोरते.
कंपास लपवून ठेव.
लपवला तर मलाच सापडत नाही.
कंपासला कडी आहे का?
हो.
मग कुलूप लाव.
मग किल्ली हरवते.
उद्यापासून दोन पेन्सिली आणत जा. एक तन्वीला देत जा. मग नाही चोरणार ती. तू कोणाच्या मोबाईलवरून बोलतो आहेस?
हा तन्वीचा आहे. तिने बाबांना न सांगता शाळेत आणलाय. मी गेम खेळायला घेतला तर तिने मला मारले.
तिला सांग असे नाही करायचे.
तुम्हीच सांगा.
तन्वी, असा न सांगता मोबाईल आणणे बरोबर नाही. टीचर ओरडतील तुला.
आता लपवून ठेवते. परत नाही आणणार.
बरं. आता फोन बंद कर. धन्यवाद ताणतणाव सेवेकडून.

नमस्कार मी श्रेयस. ताणतणाव निवारण सेवेत आपले स्वागत आहे. मी आपली काय मदत करू शकतो?
मला माझे घर सापडत नाहीये.
काळजी करू नका. आम्ही तुम्हाला मदत करू. आपले नाव काय?
आठवत नाही.
आपले वय किती आहे?
माहित्त नाही.
कुठे राहता आपण?
लक्षात नाही.
ठीक आहे. अजिबात घाबरू नका. आत्ता कुठे आहात आपण?
समजत नाही.
बरं. आजूबाजूला कुणी आहे का?
हो, एक बाई टीव्ही पहात बसली आहे.
तिला फोन द्या.
दोन मिनिटे शांतता.
माफ करा, तुम्हाला उगाच त्रास झाला. आमच्या ह्यांना असे झटके येतात मधेमधे, मग कुणालाही फोन करतात. काय करावे ते समजेनासे झाले आहे. खूप ताण आहे.
तुमच्या ह्यांनी चुकून योग्य ठिकाणी फोन लावला आहे. ही ताणतणाव सेवा आहे. तुम्ही एक काम करा. फोन त्यांच्या पासून दूर ठेवा. म्हणजे प्रश्न मिटला.
बरं झाले सांगितलेत ते. माझ्या लक्षातच आले नाही.
धन्यवाद.

नमस्कार. मी श्वेता. ताणतणाव निवारण सेवेत आपले स्वागत आहे. काय समस्या आहे आपली?
माझे नाव रवींद्र झोपे. मला रात्री झोप लागत नाही.
बऱ्याच लोकांना ही समस्या आहे, काही विशेष कारण झोप न लागण्याचे?
जरा झोप लागली की मला स्वप्न पडते. त्यात माकडे येतात.
बर मग?
त्यांच्या दहा टीम्स आहेत. ते लीग बेसिस वर टी२० सामने खेळतात. रोज दोन असतात. ते संपले की मला जाग येते आणि मग मी रात्रभर जागा असतो. कालच सेमी-फायनल झाल्या.
तुम्ही IPL नेहमी बघता का?
हो. मी एकही सामना सोडत नाही.
हेच कारण आहे तुम्हाला झोप न लागण्याचे. तुम्ही एकतर IPL बघणे बंद करा आणि तुमच्या डॉक्टरला भेटा. ते तुम्हाला झोपेची गोळी देतील. मग हे सर्व बंद होईल.
ठीक आहे. पण एक विचारायचे होते.
काय?
हे तीन दिवसांनतर केले तर चालेल का?
का?
कारण तीन दिवसांनी माकडांची फायनल आहे.
श्वेताने फोन बंद केला.

नमस्कार. मी श्रेयस. ताणतणाव निवारण सेवेत आपले स्वागत आहे. मी काय मदत करू शकतो?
अहो मोठी समस्या आहे.
आपले नाव?
मी सांगू इच्छित नाही. अ धरून चाला.
बर, बोला अ.
असं आहे, माझे ब वर प्रेम आहे. पण तिचे माझ्यावर प्रेम नाही. तिचे क वर प्रेम आहे आणि क चे पण ब वर प्रेम आहे. आता पुढे अजून गुंता आहे. ड चे माझ्यावर म्हणजे अ वर प्रेम आहे पण माझे ड वर प्रेम नाही. अजून पुढे ई चे ड वर प्रेम आहे पण ड चे ई वर प्रेम नाही. मला समजत नाही मी काय करू.
तुम्ही मुक्कदर का सिकंदर नावाचा सिनेमा पहिला आहे का?
हो, रोज दोनदा तरी पहातो.
प्रथम तो पाहणे बंद करा आणि एखादी क्ष शोधा.
तुमच्या कडे श्वेता आहे ती फ्री आहे का?
श्रेयसने फोन कट केला.

नमस्कार मी श्वेता. काय समस्या आहे आपली?
मी सदा झिंगे. मी आणि माझे दोन जीवश्च्य कंठश्च मित्र आम्ही रोज रात्री बारमधे जाऊन एकेक ग्लास व्हिस्की पीत असू. नंतर माझे मित्र हे शहर सोडून गेले. तरीही त्यांची आठवण म्हणून मी बारमधे जाऊन माझा एक आणि त्या दोघांचा एकेक असे मिळून तीन ग्लास व्हिस्की पीत असे. कालांतराने मला लिव्हरचा प्रॉब्लेम झाला आणि डॉक्टरांनी दारू सोडण्याचा सल्ला दिला आहे. आता मी दारू सोडू शकतो, पण इतर दोन ग्लासांचे काय करायचे ते मला कळत नाही.
अगदी सोपे आहे. तुमचे दोन्ही मित्र देखील त्यांच्या शहरात तुमच्या सारखेच करत होते. त्यांची पण लिव्हर खराब झाली आहे आणि डॉक्टरांनी त्यांना देखील दारू सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचे देखील ताणतणाव निवारण केंद्राला फोन आले होते. त्यामुळे आता तुम्ही तिघेही एकदमच दारू पिणे बंद करू शकता.
धन्यवाद. तुमचे खूप उपकार झाले.
श्रेयस श्वेताला: खरच असे झालय का?
श्वेता: वेडा आहेस का? मी ठोकून दिली अशीच. पण समस्येचे निराकारण झाले की नाही?
श्रेयस: बाप आहेस तू सर्वांची!

नमस्कार. मी श्रेयस. ताणतणाव निवारण सेवेत आपले स्वागत आहे. काय सेवा करू शकतो आपली?
मी मनोहर. मला कॉलेजला जायचा कंटाळा आलाय.
का?
कारण सर्व विद्यार्थी माझी चेष्टा करतात. मला टोपण नावाने हाक मारतात. इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील माझा दु:श्वास करतात.
एक काम करा. काही दिवस रजा घ्या. मन शांत झाले की जा.
मी तसे करू नाही शकत कारण मी पन्नास वर्षांचा आहे आणि कॉलेजचा प्रिन्सिपल आहे.
मग सेवानिवृत्ती घ्या.
आणि खाऊ काय? मला तुमच्या इथे काम मिळेल का? श्रेयसने फोन बंद केला.

नमस्कार. मी श्वेता. काय समस्या आहे आपली.
मी मालती. वय पंचावन्न. मला माझी सून खूप त्रास देते. अजिबात नीट वागवत नाही. स्वत:च्या मनासारखेच सर्व करते.
तुम्ही मुलाच्या घरी राहता का?
हो.
तुमचे लग्न झाले तेव्हा तुम्ही स्वत:च्या घरी रहात होता का?
हो.
आणि तुमची सासू तुमच्या बरोबर रहात होती?
हो.
तेव्हा तुम्ही तिला किती त्रास दिला होता ते आठवा. तुम्ही सास भी कभी बहु थी ही मालिका पहिली आहे का?
नाही.
तिचे हजारावर भाग आहेत. तुम्ही घरात लुडबुड करणे बंद करा आणि रोज मालिका बघत वेळ घालवा. सर्व व्यवस्थित होईल. ताणतणाव निवारण सेवेचा लाभ घेतल्या बद्दल धन्यवाद.

नमस्कार. मी यमुना. पावसाळ्यात गंगेचे पात्र जसे वाढत जाते तसे माझे वजन वाढतंय. चष्मा काढून काट्यावर वजन केले तर 68 किलो दिसते पण चष्मा लावून केले तर 88 किलो दिसते, म्हणजे चष्म्याचे वजन 20 किलो आहे अशी मला शंका आहे.
तुमचे वजन 88 किलोच आहे, तुमची दृष्टी अधू आहे त्यामुळे चष्मा वापरूनच सर्व गोष्टी करा.
पण मग वजन कसे कमी करायचे?
आम्ही तुम्हाला साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्याच्या दोन बाटल्या मोफत पाठवत आहोत. त्यापैकी पहिल्या बाटलीत शंभर गोळ्या आहेत.
या कधी घ्यायच्या?
या पोटात घ्यायच्या गोळ्या नाहीत. दिवसातून तीन वेळा त्या जमिनीवर सांडायच्या आणि एकेक गोळी उचलून बाटलीत भरायच्या.
आणि दुसरी बाटली?
यात 90 गोळ्या आहेत. यातील रोज तीन गोळ्या खायच्या.
जेवणापूर्वी की जेवणानंतर?
जेवणा ऐवजी! धन्यवाद ताणतणाव निवारण सेवेचा लाभ घेतल्या बद्दल!

नमस्कार. ताणतणाव निवारण सेवेत मी श्वेता आपले स्वागत करते. काय समस्या आहे?
मी गंगाराम. माझे एका पुण्याच्या मुलीशी लग्न झाले आहे. मला नेहमी सासरी जावे लागते-
यापुढे सांगण्याची आवश्यकता नाही. पुण्याच्या जावयांसाठी आमच्याकडे वेगळे पॅकेज आहे. दर महिन्याला आम्ही तीस गोळ्याची बाटली पुरवतो. रात्री झोपताना एक गोळी घेतली की भीतीदायक विचार मनात येत नाहीत. त्याशिवाय एक जपमाळ देखील पाठवतो. पुण्याचा विचारही मनात आणायचा नाही असे म्हटले की सारखा तोच विचार मनात येतो. म्हणून रात्री झोपताना जपमाळ ओढत मुंबई, मुंबई असा जप करत रहायचा. छान झोप लागते.

श्रेयस: श्वेता, श्वेता....! पुण्याहून सारखे फोनवर फोन येत आहेत. काय करू?
श्वेता: बाप रे! पटकन हेल्पलाईन बंद करून टाक!!!!

सध्या आमची ताणतणाव निवारण सेवा तात्पुरती बंद आहे. श्रेयस आणि श्वेता मनोविकार तज्ञांकडून ट्रीटमेंट घेत आहेत. ज्यांना नोकरीची गरज आहे अशा गरजूंनी आमच्याशी ताबडतोब संपर्क करावा. नोकरीत इतर सवलती शिवाय रोज डोकेदुखीच्या गोळ्या फुकट देण्यात येतील. त्वरा करा!!!!

Comments

This proves that scientist can become excellent psychiatrist

By : deepak tikekar
12/08/2024 1 : 56 : 46 PM

हाहाहा..ताणतणाव सेवेचे समुपदेशन भारी,अफलातून.

By : हेमांगी प्रदीप कुलकर्णी
17/08/2024 12 : 33 : 01 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article