माझा स्तंभ १४-०७-२०२४


माझा स्तंभ १४-०७-२०२४

नेमेची येतो मग पावसाळा या वचनानुसार आम्ही लहान असताना पाउस आणि शाळा दोन्हीही सात जूनला सुरु होत असत. स्वत:ला आम्ही संबोधित केले आहे हे चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आलेच असेल. हल्ली माणसा-माणसांमधील आदर कमी झाला आहे म्हणून charity begins at home या वचनानुसार आम्ही स्वत: पासूनच सुरुवात करत आहोत. लवकरच ही चळवळ जोर पकडेल अशी आम्हाला आशा आहे. असो. पावसाळा. हल्ली एल निनो आणि एल नीना या दोघा महिलांच्या भांडणामुळे पावसाला कधी सुरु व्हावे हे समजेनासे झाले आहेत.

याउलट, शाळांचे झाले आहे. ICSE ची शाळा मार्चच्या सुरुवातीला संपते, परत दहा दिवसांनी एप्रिल मध्ये चालू राहते, मे मध्ये सुट्टी लागते आणि जूनमध्ये परत सुरु होते. बाकीचे बोर्ड्स सरकार आणि त्यांच्या मनाप्रमाणे शाळा सुरु करतात. चौथीपर्यंतचे वर्ग नऊ नंतरच चालू करण्याचा फतवा आता शिक्षण मंडळाने काढला आहे. त्यामुळे आमच्या वेळी आम्हाला लाथ मारून, कारट्या उठ, शाळेची वेळ झाली अशी कृती करण्याची आमच्या तीर्थरूपांना असलेली सवलत हल्लीच्या पप्पांना मिळत नाही याचा आम्हाला अतिशय विषाद वाटतो. आम्ही उगाचच साठ वर्ष आधी जन्माला आलो हेच खरे.

पुढल्या वर्षी किती पाउस पडेल याचा अंदाज विविध वेधशाळा आधीपासूनच वर्तवत असतात. हल्ली पाउस किती पडेल हे विविध रंगांनी दर्शविण्याची नवीन पध्दत सुरु झाली आहे. यामुळे पाउस किती पडेल हे समजण्या ऐवजी निदान आमचा तरी गोंधळाच होतो. रेड अलर्ट म्हणजे खूप जास्त पाउस इथपर्यंत ठीक आहे. पण ऑरेंज जास्ती की यलो हे समजत नाही, खरे म्हणजे यलो म्हणजे पिवळे ऊन पडेल असे पाहिजे. ग्रीन अलर्ट तर आमच्या समजाण्या पलीकडचा आहे. बहुतेक गवत ओले होईल एव्हढा पाउस पडेल असे असावे.

अर्थात निवृत्त झाल्यानंतर आमचा पावसाशी संबंध तसा कमी झाला आहे. घर सहाव्या मजल्यावर असल्यामुळे पाणी घरात येण्याची भीती नाही. फक्त पाउस जोरात पडू लागल्यावर वेळेत दारे खिडक्या बंद केल्या नाहीत तर सौ बरसते. बाजारहाट करायला कधी गाडी काढली तर रस्त्यातील खड्डे आणि उलट्या बाजूने येणारे वाहनधारक यांना चुकवणे एव्हढे मात्र पहावे लागते. छत्री वापरणे जवळजवळ बंदच झाले आहे त्यामुळे ती हरवणे किंवा विसरणे अशा गोष्टी आता होत नाहीत. शाळा-कॉलेज करून झाल्यावर सर्वांनी निवृत्ती घेऊन आईवडीलांनी कमावलेल्या पैशावर आयुष्य काढावे असे आमचे स्पष्ट मत आहे. खरं सांगतो, समोरच्या डोंगरावर उतरलेले ढग पहात गरम वाफाळलेला चहा पिण्यासारखे सुख नाही. खड्यात गेली ती वेधशाळा आणि खड्यात गेला तो रस्ता!

आम्हाला काही गोष्टी कळत नाहीत. तुम्हाला काहीच कळत हे आमच्या हिचे, माफ करा ह्यांचे, मत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मते कशी मोजतात हे आम्हाला अजूनही समजलेले नाही. हे फक्त देवेन्दजीनाच कळते असे आम्हाला वाटते. म्हणूनच त्यांनी सर्व नउ उमेदवार निवडून आणले. त्यांनी अकरा उमेदवार उभे केले असते तरीदेखील ते सर्व निवडून आले असते यात शंका नाही. जर कॉंग्रेस परत सत्तेत आली तर ही निवडणुकीची पध्दतच बदलली जाईल असे वाटतंय.

आमची मते फुटणार हे आम्हाला आधीच कळले होते असे कबूल करून कॉंग्रेस नेत्यांनी आपली वैचारिक दिवाळखोरीच जाहीर केली.

हा स्तंभ लिहित असताना आम्ही आठ ते नउ या वेळात दूरदर्शनची रंगोली पहात आणि ऐकत होतो, त्यामुळे लिखाणात काही तृटी राहून गेल्या असतील तर आम्हाला माफ करावे. ॠषिता भटचे सादरीकरण पाहणे आणि यातील सुमधुर गाणी ऐकणे यासारखे सुख नाही. रेखाला मिठीत घेऊन ‘ये मौसम आया है’ म्हणणारा किंवा घोड्यावरून दौडत ‘आज उनसे पहली मुलाकात होगी’ म्हणत हेमाला भेटायला निघालेला राकेश रोशन जेव्हा किशोरच्या आवाजात गातो तेव्हा अहाहा ! एकच एक किशोर कुमार, बाकी सर्व फक्त शोरकुमार!

Comments

mast kya bat hai

By : Mohini
14/07/2024 10 : 26 : 42 AM

लेख वाचत जाताना शेवट कधी आला कळलं नाही. शेवटची punchline climax

By : Deepak Tikekar
14/07/2024 10 : 57 : 28 AM

सुंदर खुसखुशीत लेख. बालपणातल्या आठवणीं जाग्या झाल्या.

By : योगिनी लोथे
15/07/2024 8 : 26 : 40 PM

मस्त!शब्द पाऊसासारखे रिमझिम बरसलेत! ग्रीन अलर्ट was awesome!

By : Sheela Bahadkar
16/07/2024 12 : 28 : 28 PM

मिश्किल लेख

By : Pratibha Tarabadkar
03/08/2024 1 : 39 : 38 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article