मराठी विद्वान परिषद
रविवार सकाळची सुमारे साडेदहाची वेळ. सौभाग्यवतीने केलेले कांदेपोहे रिचवून चहाचा शेवटचा घोट घेऊन कप खाली ठेवला. तेव्हढ्यात दारावर घंटानाद झाला आणि त्या तिथे पलीकडे तिकडे कुणीतरी आहे याची जाणीव झाली. घरातली चट्टेरीपट्टेरी निळ्या पांढऱ्या लेंग्यांची फॅशन गेल्यामुळे हल्ली मी हाफ पँट आणि टी शर्ट घालू लागलो होतो. सौने सकाळीच घराची साफसफाई काढल्यामुळे खांद्यावर कळकट फडकं आणि जुना टी शर्ट या अवस्थेत मी दरवाजा उघडला. समोर एक अनोळखी गृहस्थ उभे होते. उंची साधारण सव्वापाच फूट, मध्यम बांधा, सुटलेले पोट, अंगात झब्बा आणि खाली डिझायनर जीन्स आणि पाठीवर सॅक असे हे सदगृहस्थ उच्चारते झाले.
“डॉक्टर पांढारकर इथेच राहतात का?”
माझ्या नावाची अशी ही चिरफाड लहानपणापासून चालू असल्यामुळे मला त्याची सवय होती. आमच्या शाळेतील बाई मला पुराणिक, पुरोहित असे काहीही म्हणायच्या.
“नाही”, म्हणून मी दरवाजा बंद करू लागलो. साहेबांनी सचिनला लाजवेल अश्या चपळाईने आपला डावा पाय पुढे टाकून दरवाजा तटवला.
“अहो बोर्ड तर लावलाय नावाचा!”
“नीट वाचा, डॉक्टर पुरंदरे असे नाव आहे.”
“मला तेच म्हणायचे होते.”
“तेच काय, पुरंदरे आणि पांढारकर मध्ये काही फरक आहे की नाही?”
“अहो नावात काय आहे असे बर्नाड शॉ ने म्हटलेच आहे.”
“बर्नाड शॉ नाही शेक्सपियरने म्हटले आहे.”
“अहो तेच ते.”
“पुन्हा तेच! तुमचे नाव काय?”
“अहो नावात काय आहे?”
“अहो निनावे, तुमचे काय काम आहे सकाळी सकाळी?”
“ते तुला कशाला सांगू मी? तुझ्या साहेबाला बोलाव.”
“साहेबाला? मग मी कोण आहे?”
“मला काय माहित?”
“अहो मीच डॉक्टर पुरंदरे आहे.”
“माफ करा हं, मी तुम्हाला ओळखले नाही.”
“हे बघा तुम्ही नंतर या, मी खूप कामात आहे.”
“ते तुमच्या कडे बघून समजले मला. बायकोने कामाला लावले तर माझ्यावर त्याचा राग का काढताय?”
“हे बघा तो माझा प्रश्न आहे, तुमचे काय काम आहे?”
“ते दरवाज्यात उभे राहून सांगू का?” काही पुरुषदाक्षिण्य आहे की नाही?”
“बरं या आत.”
“हे आधीच म्हटले असते तर तुमचाच बहुमूल्य वेळ वाचला नसता का?” असे म्हणून हे निनावे आत पधारले आणि बस म्हणायच्या आत सोफ्यावर विराजमान झाले.
“कोण आहे हो? चहा संपला आहे आता.” आतून आवाज आला. हीची नको तेव्हा बोलायची जुनीच खोड आहे.
“वाहिनी, मला एक कप चालेल. फक्त चहा आले घालून करा आणि चहाचा मसाला असेल तर उत्तमच!”
“अहो निनावे ...!”
“माझे नाव सदासुखी आहे. नि. त. सदासुखी, म्हणजे निवृत्ती तपन सदासुखी. माझे पिताश्री बोन्गाली होते ”
“ते आले माझ्या ध्यानात. गरीबाकडे काय काम काढलेत?”
“तुम्ही आणि गरीब? चांगला तीन बेडरूमचे घर आहे, दारात गाडी आहे आणि तुम्ही गरीब? मग आम्ही कोण?”
“हे बघा प्रवृत्ती..”
“निवृत्ती.”
“तेच ते. हे बघा मला भरपूर कामं आहेत, तुम्हाला काय हवे आहे ते बोला.”
”मी माझा परिचय करून देतो. मी निवृत्ती तपन सदासुखी. मी मराठी विद्वान परिषदेचा कार्यकारी अभिव्यक्ता आहे.”
“अहो मी पण मराठी विज्ञान परिषदेचा सदस्य आहे पण तुमचे नाव कधी ऐकले नाही, सदादुखी.”
“सदासुखी. मराठी विज्ञान नव्हे विद्वान परिषद. त्याचा मी अभिव्यक्ता आहे.”
“म्हणजे काय? मी अभियंता ऐकले होते हे व्यक्ता काय असते?”
“अहो व्यक्ता म्हणजे प्रवक्ता, बोलणारा!”
“ते तुम्ही मगापासून करताच आहात! पण ही विद्वान परिषद काय भानगड आहे?”
”हो भानगड काय म्हणताय, हा एक स्तुत्य उपक्रम आहे.”
“काय करते ही तुमची परिषद?”
“सध्या काहीच करत नाही. म्हणून तर तुमच्या कडे आलो आहे.”
“म्हणजे?”
“विद्वान परिषद ही एक कल्पना आहे."
“कोणाची?”
“कोणाची म्हणजे काय, माझी!”
“तुमची?”
“हो, आता असं बघा, महाराष्ट्रात अनेक विद्वान होऊन गेले. होत आहेत आणि होतील देखील. परंतु आत्तापर्यंत त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कोणी केला नाही.”
“बरोबर आहे, मराठी आणि विद्वान, त्यांचे एकमेकांशी पटणे शक्य तरी आहे का?”
“परंतु यामुळे मराठी अस्मिता रसातळाला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हल्ली साधे रिक्षावाल्याशी देखील मराठीत कोणी बोलत नाही. सर्वांची मुले इंग्रजीत शिकतात. हे बदलायला हवे.”
“पण हे करणार कोण?”
“त्यासाठीच तर मी इथे आलो आहे.
“पण या परिषदेत कोण आहे सध्या?”
“अहो ही तर सुरुवात आहे. मी प्रथम तुमच्या कडेच आलो.”
“अहो मी विद्वान आहे हे तुम्हाला कोणी सांगितले?”
“वा, सांगायला कशाला हवे? तुमची डॉक्टरकीच सांगते आहे. अनेक रोग्यांना तुम्ही बरे केले आहे आणि करत राहाल. यापेक्षा सामाजिक कार्य ते काय असते? तुमची विद्वत्ता थोर आहे यात शंकाच नाही.”
“अहो मी मेडिकल डॉक्टर नाहीये. मी पीएचडी आहे पदार्थविज्ञानात! मला मेडिकल मधला में पण करता येत नाही.”
“मग तर सोने पे सुहागा! असे किती मराठी पीएचडी आहेत? या परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी तुम्हीच योग्य आहात.”
“हे बघा सद्व्वृत्ती....”
“निवृत्ती.”
“मला सध्या भरपूर उद्योग आहेत. मला अजिबात वेळ नाही आणि नवीन कोणत्याही भानगडीत पडायचे नाहीये.”
“तीन महिन्यात पंधरा हजार सदस्य गोळा करण्याचा माझा निर्धार आहे. आपले बजेट सव्वादोन कोटी तरी असेल. सिंगापूर, लंडन, टोरांटो आणि लॉसएंजलीस मध्ये आपल्या शाखा असतील. आपले पहिले संमेलन रोम मध्ये भरविण्याचे ठरवले आहे.”
“सध्या तुमच्याकडे किती सदस्य आहेत?”
“तुम्ही धरून दोन.” निवृत्ती निर्विकारपणे उच्चारले.
“म्हणजे अजून जागा विकत देखील घेतली नाही आणि तुम्ही घराची वास्तुशांत देखील करायला निघालात.”
“तुमच्या या वाक्यातच तुमच्या विद्वानपणाची झलक दिसते.”
“तीन महिन्यात तुम्ही पंधरा हजार सदस्य आणि सव्वादोन कोटी रुपये कसे गोळा करणार?”
“अहो सोपे आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाचे अव्वर सचिव माझे साडू आहेत. त्यांच्या कडे साडेबावीस कोटी रुपये पडून आहेत. जर या तीन महिन्यात खर्च केले नाहीत तर ते सरकारला परत जातील.”
“अहो पण ते आपल्याला का देतील?”
“साधी गोष्ट आहे. संस्कृती आणि विद्वान यांचा घनिष्ट संबंध आहे. त्यात तुमचे नाव जोडले की सर्व काही व्यवस्थित होईल. कारण परिषदेचा अध्यक्ष चांगला विद्वान हवा एवढीच त्यांची अट आहे. म्हणून तर मी तुमच्याकडे आलो. म्हणतात ना अडला नारायण गाढवाचे पाय ... ”
“गाढव कोण?”
“अहो मी! नारायण तुम्ही!”
“अहो पण मी विद्वान आहे हे तुम्हाला कोणी गाढवाने सांगितले? नाही म्हणायाला आमचे तीर्थरूप लहानपणी उपरोधाने आम्हाला विद्वान आहात असे म्हणायचे, पण त्याचा अर्थ अतिशहाणे असा होता.“
“अहो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटलेच आहे.”
“या संस्थेसाठी जागा लागेल, त्याचे काय?”
“त्याची व्यवस्था होईल. चुनाभट्टीला मराठी विज्ञान परिषदेच्या बाजूलाच जागा उपलब्ध आहे. फक्त पस्तीस लाख लागतील.”
“ते कुठून आणणार?”
“पंधरा हजार सदस्यांची वर्गणी! प्रत्येकी पाच हजार रुपये! शिवाय कॉरपोरेट कलेक्शन होईलच ना! सुरवातीलाच सर्व कॉरपोरेट लोकांचा सत्कार करायचा आणि देणग्या मिळवायच्या.”
”पण सर्व कॉरपोरेट विद्वान थोडेच आहेत?”
“पण सर्व विद्वान कॉरपोरेट नाहीत ना!”
“आपण खरे विद्वान आहात!”
“तुम्ही मला अध्यक्ष करणार म्हणताय, पण बाकीचे लोकं तयार होतील का?”
“त्यासाठीच तर पहिली देणगी तुम्ही देणार ना!”
“देणगी!” पोटात गोळा आला.
“आता असे बघा, तुम्ही आता लवकरच निवृत्त होणार. तुमचा मुलगा अमेरिकेत आहे. मुलगी पण तेथेच आहे. एकुलती एक बायको आहे...!”
“इतरांना काय पाच सहा असतात काय?”
“माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की तुम्हाला पण नंतर काय करायचे हा प्रश्न राहणार नाही. मुला-मुलीकडे विद्वान परिषदेच्या कामानिमित्ताने सतत जाता येईल. नाहीतरी बहुतेक सर्व मराठी विद्वान सध्या अमेरिकेतच आहेत. त्यासाठी एखाद लाखाची इंव्हेस्टमेंट काही जास्ती नाही.”
या सगळ्या बोलण्याच्या नादात आमची सौ बाजूला येऊन कधी बसली ते माझ्या ध्यानातच आले नव्हते. तिला हा निवृतीचा कल्पनाविलास मनापासून पटला होतं. निवृत्ती भावजींना मसाला चहा आणि मस्का खारी देऊन तिने ही कल्पना पसंत असल्याचे जगजाहीर केले.
“अहो, तुमच्या पीपीएफ मधून एक लाख रुपये आपण देऊ शकतो.” एक लाख पीपीएफ मध्ये जमवायला दीड वर्ष कष्ट करावे लागतात हे बाईसाहेब सोयीस्करपणे विसरली होत्या. त्यांना अमेरिका वारी आता खुणावत होती. “भावजी, तुम्हाला, अजून चहा हवाय का?”
हो म्हणायला नि. त. सदासुख्यांच्या तीर्थरुपांचे काहीच जात नव्हते. ही अजून चहा करायला आत उठून गेली. हे प्रकरण हाताबाहेर जायच्या आत काहीतरी करणे मला आता भाग होते.
“सदाफुली ...”
“सदासुखी!”
“तेच ते हो, नावात काय आहे. मी काय म्हणतो, तुमची ही कल्पना मला अतिशय पसंत आहे. वास्तविक माझ्यासारख्या विद्वानाच्या डोक्यात ही आधीच यायला हवी होती. पण तुम्ही आज माझे डोळे उघडलेत. तुमचे आभार कसे मानावेत हेच मला समजत नाही.”
“अहो त्यात आभार काय मानायचे, मी मराठी भाषेसाठी थोडेफार करू शकतोय हेच माझ्या दृष्टीने खूप आहे”. मासा गळाला लागला याचा आनंद सदासुखीच्या आवाजात आता स्पष्ट जाणवत होता. “तुमच्या सारख्या विद्वानाची साथ लाभली तर आपली विद्वान परिषद सातासमुद्रापलीकडे भरारी घेईल यात शंका नाही.” आता सदाच्या तोंडून लाळ टपकायला लागली होती.
“ठीक आहे. आपण आजच कामाला सुरुवात करुया. वास्तविक मी तुम्हाला पैसे आत्ताच दिले असते, परंतु पीपीएफचे पैसे लगेच मिळत नाहीत. आता सरकारने एजंटचे कमिशन बंद केल्यामुळे हल्ली सर्व कामे आपल्यालाच करावी लागतात. पोस्टाच्या वेळा अशा आहेत की मला जाऊन पैसे काढणे शक्य नाही. मी जमेल तेव्हा जाऊन पैसे काढीन. मग मी तुम्हाला पैसे देऊ शकेन. तुम्ही एक पंधरा दिवसांनी या.”
यथासांग पैसे माझ्या खात्यात जमा झाले. त्यातून माझी इन्कमटॅक्सची रक्कम मी भरून टाकली. नंतर दर रविवारी सदासुखींची वारी आमच्या घरी येते. पण मी ताकास तूर लागून देत नाही.
“अहो मी पोस्टात गेलो होतो, पण तो कारकून गैरहजर होता त्यामुळे काम झाले नाही. झाले की लगेच पैसे देईन.”
आठ दिवसांनी सदासुखी परत हजर झाले.
“अहो, मी गेलो होतो, पण माझ्या खात्यातील रकमांमध्ये काहीतरी गोंधळ आहे. तो सुधारायला पंधरा दिवस लागतील.”
यानंतर सदासुखींनी दोन तीन वेळा चकरा मारल्या, पण मी ताकास तूर लावून दिला नाही. शेवटी कंटाळून सदासुखी एकदा म्हणाले,” ठीक आहे, एक लाख नाही तर निदान दहा हजार रुपये तरी द्या, म्हणजे मराठी विद्वान परिषदेचे काम तरी सुरु होईल.”
"अहो, मी नोकरदार माणूस आहे. पगारावर कसेबसे भागते. घराचे खर्च, लोन, गाडीचा हप्ता, इतर अवांतर खर्च भागवताना नाकी नऊ येतात. दहा हजार एकदम कुठून देवू? तुम्हीच मला काही मदत करू शकत असाल तर बघा. सुनेच्या बाळंतपणासाठी पुढच्या महिन्यात अमेरिकेला जावे लागेल. बघा काही मदत करता आली तर. तुमचे एव्हढे मित्र आहेत अमेरिकेत! मी विद्वान परिषदेचे काम देखील करीन फावल्या वेळात तिथे.”
यानंतर सदासुखी परत आले नाहीत.. त्यामुळे मराठी विद्वान परिषदेला अजूनही मुहूर्त सापडत नाहीये..
एकदा माझ्या पत्नीला मी समजावत होतो. “त्याचे काय आहे. सदासुखीसारखे मराठी विद्वान खूप आहेत. बघतात गळ टाकून मासा लागला गळाला तर! पण हा शेर तर मी सव्वाशेर आहे!”
बायकोने कधीनव्हे ते प्रेमळ नजरेने माझ्याकडे पहिले, दोन्ही हात कोपरापासून जोडले आणि म्हणाली, “विद्वान आहात!”



Comments
छान लिहिलंय. 👌👌
By : Shirish joshi
नर्म विनोदी कथा.हल्ली वेगवेगळ्या परिषदांच्या नावाखाली पैसे उकळले जातात हे खरं आहे आणि त्यांना टाळायला दरवेळी नवनवीन क्लृप्त्या लढवायला लागतात.
By : Pratibha Tarabadkar
Mast
By : Sheetal