जित्याची खोड


जित्याची खोड

शशांक पुरंदरे

“कार्यबाहुल्यामुळे अस्मादिकांना आपणांस संपर्क करणे शक्य झाले नाही, क्षमस्व!”
“कशामुळे कोणाला काय करणे शक्य झाले नाही?” मी वैतागून म्हणालो. नंद्यांची जुनी खोड आहे ही मधेच शुध्द मराठीत बोलायची!
“अरे मी शुध्द आणि अस्खलित मराठीतच बोललो.”
“तुझे शुद्ध आणि अस्खलित मराठी मला समजत नाही. साध्या नस्खलित भाषेत बोललास तर समजेल.”
“अरे मी बिझी होतो.”
“आता कसे बोललास? कशात बिझी होतास?”
“तुला गावस्कर आठवतोय का?”
“सुनील?”
“त्याचा माझा काय संबंध?”
“मग?”
“अरे कॉलेजातला रमेश रे! काय क्रिकेट खेळायचा यार. पोरी मरायच्या त्याच्या वर. तो परवा भेटला होता. काय अवस्था झाली आहे त्याची. वय फक्त चाळीस, पण छप्पर पार उडालंय. पोट सुटलंय. त्याच्या घरी गेलो होतो. त्याने त्याच्या जुन्या मैत्रिणीशी लग्न केलं आणि पस्तावला. आत्ता क्रिकेटची बॅट कपडे धुवायला वापरतो धोपटणे म्हणून. म्हणून मी नेहमी सांगतो, मैत्रिणीशी लग्न करू नका, लग्न करून बायकोला मैत्रीण बनवा, पण माझे ऐकतो कोण?” एव्हढे सर्व बोलून नंदू शांत झाला.

नंदू माझा बालमित्र. आम्ही शाळा कॉलेज एकत्र होतो. बीए करून नंदू गाडीला डबा लागावा तसा रेल्वेत चिकटला. सध्या तिकीट काऊंटर सर्वेक्षक आहे. नोकरी इमाने-इतबारे करतो. पण फावल्या वेळात हजार धंदे पण करतो.

“परवा शैलू भेटली होती.” नंदू परत सुरु झाला. न बोलता एक मिनिट देखील हा बसू शकत नाही. शैलू म्हणजे शैलजा चितळे. कॉलेजमध्ये नंदू आणि शैलूची जोडी लैला-मजनू सारखी शैलू-नंदू म्हणून प्रसिध्द होती. “काय सांगतोस? काय म्हणतेय शैलू?”
“जशी होती तशीच आहे. लग्न करून देखील. दोन मुली आहेत तिला.” नंदूच्या सुरातले नैराश्य मला जाणवत होते.
खरतरं नंदू खूप हुशार आहे. दिसायला हँड्सम आहे. अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व आहे. करायचे ठरवले तर काहीही करू शकेल. पण याला एकच सवय आहे, आणि ती म्हणजे सतत कुणाच्या तरी प्रेमात पडणे! कधीकधी तर एकाच वेळी तो दोनतीन मुलींच्या प्रेमात पडायचा. आता बोला!! अगदी शाळेत समजायला लागल्या पासूनची ही त्याची खोड आहे. आत्तापर्यंत तो प्रेमात पडलेल्या मुलींची यादी केली तर एक मोठी वही सहज भरेल. सर्वात मोठा प्रेमवीर म्हणून गिनीज बुक मध्ये खरतरं त्याचे नाव आले पाहिजे. अर्थात त्याला यात फारसे यश लाभले नाही हे मात्र खरे! असे नंदूच्याच बाबतीत का होते ते काही कळत नाही.

पाचवीत आम्हाला इंग्रजीने पहिला स्पर्श केला. आणि सहा महिन्याच्या आत त्याने एका गुलाबी कागदावर लाल पेनाने ay lov yu लिहून तो कागदाचा बोळा तिसऱ्या बाकावर बसलेल्या कुंदाला फेकून मारला होता. त्याचा नेम चुकून तो बाजूच्या चंदाला लागला. तिने त्याच कागदावर मागे मोठ्या काळ्या अक्षरात I hat you असे लिहून त्याची परतफेड केली. नंतर दहा मिनिटे ही आपल्याला hat घालायला का सांगते आहे याचा नंदू विचार करत होता. इंग्रजीच्या आणि प्रेमाच्या पहिल्याच परीक्षेत नंदू नापास झाला होता.

नंदूला प्रेमात पडायला काही खास कारण लागत नसे. कधी त्याला निळ्या डोळ्यांची क्षमा आवडायची तर कधी डोळ्यांची उगाचच पिटपिट करणारी रमा भावायची. कधी कुणाच्या लांबसडक केसात त्याच्या जीवाचा गुंता व्हायचा तर कधी कुणाच्या नाकावर सतत येणारी केसांची बट त्याला मोह्वायची. कधी केसातला गुलाब किंवा मोगरा त्याला भुलवायचा तर कधी केसांचा शेपटा त्याला झुलवायचा. कधी कुणाचा मंजुळ आवाज त्याच्या कानात मळ साठावा तसा साठून राहायचा, तर कधी कुणाचे मोहक हास्य त्याला रात्रभर जागे ठेवायचे. नंदूचा एकपत्नी व्रतावर कधीच विश्वास नव्हता. त्यामुळे एकाच वेळी तो अनेक जणींवर प्रेम करू शकत होता. कधीकधी तर ही का ती या प्रश्नांनी त्याला शाळेत वर्गात झोप देखील येत नसे.

एक मात्र होते. नंदू अभ्यासात हुशार असल्यामुळे डिफिकल्टी घेऊन मुली सतत त्याच्या मागे असायच्या. पण नंदूची मुख्य डिफिकल्टी मात्र कधी कुणी सोडवली नाही.

जसं वय वाढत गेलं तसं नंदूचे प्रेम प्रगल्भ होत गेले. म्हणजे कॉलेज मध्ये प्रेमासाठी त्याला ठोस कारणे सापडू लागली. उदाहरणार्थ, एखादी मुलगी तिच्या लाल रंगाच्या गाडीमुळे आवडायची तर दुसरी लाल साडीत छान दिसायची.

अखेर त्याला शैलू भेटली. हे प्रकरण जरा सिरीयस होतं. तब्बल सहा महिने हे प्रियाराधन चालू होते. शैलू-नंदू जोडी कॉलेजात फेमस झाली. पण शेवटी पाणी वळचणीला जाते तसेच झाले. शैलजाला पैसेवाला भेटला आणि जोडीची कायमची ताटातूट झाली.
“तरी तिने मला लग्नाला बोलावले होते,” सुवर्णपदक नाही तरी चौथा तर आलो अशा भाषेत नंदूने तिचे समर्थन केले होते. त्याचे घराचे गडगंज होते आणि सरकारी सेवेत नंदूपेक्षा वरच्या हुद्यावर असल्यामुळे पेन्शन पण जास्ती मिळणार होती हे सांगायला पण नंदू विसरला नव्हता.

अरे हो, एक सांगायचेच राहिले. नंदू एक चांगला कवी आहे. प्रेमभंग झाला की माणूस कवी होतो. नंदूही त्याला अपवाद नाही. त्याचे जाई का सुकली?, काळा गुलाब यासारखे अनेक कविता संग्रह प्रसिध्द झाले आहेत. त्याचा माझे काय चुकले?, हा कविता संग्रह नक्कीच तुमचे हृदय पिळवटून टाकेल.

“चल, निघतो आता. सरोज यायची वेळ झाली.” नंदूच्या वाक्याने मी भानावर आलो.
“नंदू, थांब. मला काही बोलायचे आहे तुझ्याशी.”
“अरे पण सरोज-“
“त्या संदर्भातच आहे. आता मुलींमागे फिरणे बंद कर आणि रीतसर लग्न कर. मी वधूवर सूचक मंडळात तुझे नाव घातले होते. उद्या एक मुलगी तुला भेटायला येणार आहे. मी सर्व चौकशी केली आहे. तुला साजेशीच आहे. उद्या संध्याकाळी सहा वाजता इथेच ये. आणि जरा नीटनेटका दाढी वगैरे करून ये.”

याची केस हाताबाहेर चालली आहे हे माझ्या केव्हाच लक्षात आले होते म्हणूनच मित्र म्हणून हे पाउल मला उचलावे लागले.

आणि नंदू चक्क दुसर्‍या दिवशी सहा वाजता हजर झाला. दोनच महिन्यात आम्ही त्याला बोहल्यावर चढवला. लग्नाच्या दिवशी संध्याकाळी रिसेप्शनला मी त्याच्या बाजूला उभा होतो. जोडी छान दिसत होती. एव्हढ्यात सरोज हॉलमध्ये दाखल झाली. नंदू माझ्या कानात कुजबुजला,

“अरे त्या सरोज बरोबर ती गुलाबी साडीत मुलगी आहे ती कोण आहे ?”
“नंद्या, आता तरी सुधार. लग्न झालंय तुझं आता.” मी खेकसलोच त्याच्यावर.
“अरे, तसं नाही रे. मी आपलं असंच विचारलं-“
म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तेच खरं!!!

Comments

पु.लं.च्या व्यक्ती आणि वल्ली पुस्तकात असेच एक पात्र आहे.अतिशय प्रेमळ

By : Pratibha Tarabadkar
26/08/2024 11 : 16 : 11 AM

गेले ते दिन गेले

By : Deepak Tikekar
05/09/2024 08 : 11 : 05 AM

पु लं च्या नाथा कामतं ची आठवण झाली

By : रोहिणी
13/09/2024 04 : 13 : 41 AM

[21/09, 17:38] Sh Ay love yu I hat you.. गरम तेलात आलं लसूण मिरचीचा ठेचा घातल्यावर लागतात तसे थेट ठसके, खकाणेच!

By : स्वाती मराठे
21/09/2024 5 : 50 : 31 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article