नात्यांची गोष्ट : भाग ६: तुझे माझे जमेना


सकाळी सात वाजताच माझा पेजर वाजला. रवीचा फोन नंबर डिस्प्ले होत होता. मी रविला फोन केला. आमच्या अमेरिकन संगणक प्रणालीत काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. एका तासात मला ऑफिसला पोहोचणं भाग होतं.

ही २००० च्या आधीची गोष्ट आहे. पेजर टेक्नोलॉजी भारतात येऊन काहीच महिने झाले होते. इंटरनेट फक्त ऑफिसमधेच उपलब्ध होत. मोबाईल्स अजून आले नव्हते. आता प्रॉब्लेम असा होता की आमची दोन्हीही अपत्ये, विन्या आणि कालिंदी, वय अनुक्रमे बारा आणि नऊ, आज घरी होती कारण आज काही कारणाने शाळा दुपारी एक वाजता होती आणि आमची बेबिसिटर अकरा वाजेपर्यंत उगवणार नव्हती. ‘द स्टुडिओ’, म्हणजे आदितीच्या वर्कप्लेस मधे नऊ वाजता एका अॅडव्हर्टायझिंग कम्पेनचं महत्वाचं प्रेझेन्टेशन होते. आणि या दोन्ही मुलांना एकत्र एकटं सोडणं म्हणजे कठीण काम होतं.

तशी आमची दोनीही मुलं गुणी आहेत, पण एकमेकांशी भांडण्याची एकही संधी दोघं सोडत नाहीत. म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशीच काहीशी अवस्था आहे. आणि हे नातं विन्याचं लग्न झाले तरी तसेच कायम आहे. अजूनही लहान मुलांसारखी भांडतात एकमेकांशी.
पण त्या वेळेला आम्हाला फारसा चॅाईस नव्हता. त्यामुळे दोघांनाही नीट वागण्यासाठी भरपूर तंबी आणि संध्याकाळी आईसक्रीम खाण्याचे आमिष दाखवून मी आणि आदिती घराबाहेर पडलो. पण शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झालं. मी ऑफिसला पोहोचल्यावर कॅान्फरन्स कॉलच्या आधी कालिंदी कॉल अटेंड करावा लागला.

“डॅड, विन्याने माझा पिझ्झा खाल्ला”! कालिंदी.
आदल्या दिवशी रात्री पिझ्झा पार्टी झाली होती. आमच्या घरात काही अलिखित नियम होते. घरात एखादी खाण्याची गोष्ट आणली आणि जर त्या दिवशी संपली नाही तर आदिती रात्री ती फ्रीजमध्ये टाकत असे. झोपण्याआधी विन्या आणि कालिंदी फ्रीजचे इन्स्पेक्शन करून कुठल्या गोष्टींचे किती पिसेस शिल्लक आहेत हे नोट करून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी त्या वस्तू बरोबर डिव्हाईड करून खाल्या जायच्या. आज आम्ही कोणी घरी नव्हतो याचा फायदा बहुतेक विन्याने उचलला होता. कालिंदीला संध्याकाळी आईस्क्रीमच्या एक्स्ट्रॉ स्कूपचा वायदा करून मी हा वाद संपवला.

यानंतर पंधरा मिनिटांनी विन्याचा आदितीला फोन गेला.

“ममा, कालिंदीने माझी नोटबुक विंडो मधून खाली टाकली.” विन्या.
“कालिंदीला फोन दे” अदिती.
“त्याने माझं डेस्क अडवलं होत. मी नोटबुक बाजूला करत होते. चुकून पडली.” कालिंदी.
“आईस्क्रिम कॅन्सल.” अदिती.
“सॉरी ममा, परत नाही करणार.” कालिंदी.
“विन्याला फोन दे.” अदिती म्हणाली, “विन्या, परत कोणाचीही कम्पलेंट आली तर संध्याकाळी माझ्याशी गाठ आहे.” तिचा पण पेशन्स संपला होता.

नंतरचा फोन मला आला.

“विन्याने माझं पेन घेतलं.” कालिंदी.
हे जुळ्याचे दुखणे बहुतेक सर्वच घरी असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट दुप्लिकेटमध्ये आणली जायची. परत कोणती वस्तू कोणाची आहे हे समजण्याकरता वेगवेगळ्या रंगात आणावी लागायची. कालिंदीचा पिंक आणि विन्याचा निळा रंग ठरलेला असायचा. तरीही दुसऱ्याची वस्तू वापरण्याचे आकर्षण दोघाना कायम असायचे आणि त्यावरून भांडणे व्हायची ती व्हायचीच.
मी कसंबसं दोघांच भांडण मिटवलं. तो पर्यंत आमची बेबिसिटर घरी पोहोचली होती. मुलांची शाळेची वेळ होत आली होती. त्यामुळे नंतरचे काही तास तरी शांत जातील असं वाटत असतानाच शांताचा फोन आला.

“दादा, दोघही शाळेत जायचं नाही म्हणताहेत. पोटं दुखताहेत म्हणे.”
हे एक नॉन व्हेरीफायेबल दुखणं असतं. नेहमी अदिती मुलांना स्कूलबस मध्ये बसवून मग घरातून बाहेर पडते. आज ती नसल्यामुळे मुलांनी शांताला गुंडाळायचा प्रयत्न चालू केला होता. अशा बाबतीत मात्र दोघे एकत्र असतात. परंतु मी पण त्यांचा बाप होतो. या सर्व ट्रिक्स लहानपणी वापरल्यामुळे मला पाठ होत्या.

“अरे बापरे”, मी विन्याला म्हटलं, आत्ता तो दोघांचा स्पोकस् मन होता, “डॉक्टरला दाखवावे लागेल. संध्याकाळी आईस्क्रीम पण आणता येणार नाही. मी डॉक्टर काकाना फोन करून बोलावतो.”
“डॅड, नको, आता जरा बरं वाटतंय, अजून बस यायला वेळ आहे. तोपर्यंत ठीक होईल.” विन्या.
“पण कालिंदीला दाखवावं लागेल ना.” मी.
“नाही डॅड, मी पण ओके आहे.” कन्यारत्न मागून ओरडलं.

एक वाजता शाळेची बस आली आणि दोन्ही अपत्ये रवाना झाली. आता निदान सहा वाजेपर्यंत तरी उसंत होती. पण एव्हढे आमचे नशीब कुठले? अडीच वाजता विन्याच्या टीचरचा शाळेतून आदितीला फोन गेला. विन्या व इतर चार जण वर्गात मारामारी करत होते म्हणून त्यांना वर्गाबाहेर उभे रहायची शिक्षा देण्यात आली होती, पण पंधरा मिनिटांनी टीचर बाहेर आली तेव्हा हे सर्व गायब होते. ते शाळेच्या मैदानात मजेत क्रिकेट खेळत होते. टीचर मुलाना सस्पेंड करण्याच्या विचारात होती. पण आदितीने चार वाजता शाळेत जाऊन विन्या परत असे करणार नाही असे अंडरटेकिंग लिहून दिले तेव्हा कुठे टीचर शांत झाली.

संध्याकाळी घरी पोहोचलो तरी अदिती तणतणतच होती. हे सहाजिकच होते. पण मी मात्र शांत होतो. कारण अस्मादिकांनी शाळेत असताना असले उद्योग भरपूर केले होते. कपड्यांवर शाई उडवणे, वर्गात कागदी बाण उडवणे, मारामारी करणे हे सर्व काही आम्ही केले होते. आणि मी इतरांचे डबे खातो ही तक्रार तर कायमच घरी यायची. पण हे सर्व मुलांसमोर आदितीला सांगून काही उपयोग नव्हता. तिने मला घराच्या बाहेर उभे केले असते. रात्रीचे विन्याचे आईस्क्रीम रद्ध झाले होते आणि शिक्षेची जाणीव रहावी म्हणून मुद्दाम आम्हा तिघांचा विन्यासमोर बसून आईस्क्रीम खाण्याचा कार्यक्रम देखील झाला. वायद्याप्रमाणे कालिंदीला एक्स्ट्रॉ स्कूपदेखील देण्यात आले. त्या रात्री कालिंदी आणि विन्या गप्पच होते. विन्याच्या शिक्षेचा परिणाम नकळत का होईना कालिंदीवर देखील झाला होता.

रात्री बेडरूममध्ये आल्यावर आदिती गालातल्या गालात हसत होती. मी तिला काय झाले म्हणून विचारले,

“मला माझी शाळेची आठवण झाली. पाचवीत असतानाची गोष्ट आहे. मी नेहमी दुसऱ्या बाकावर बसायाचे. माझ्या समोर वीणा आणि करुणा नावाच्या दोघी जुळ्या बहिणी बसायच्या. दोघींचेही केस खूप छान लांबसडक होते आणि दोघीही शेपटा बांधून यायच्या. एकदा मी बसल्या बसल्या दोघींचे शेपटे एकमेकाना बांधून टाकले होते. नंतर बाईंनी मला बडवबडव बडवले ती गोष्ट वेगळी!”

माझ्या शाळेतील उद्योगांची आदितीला कल्पना होतीच. त्यामुळे मुले आपल्यावरच गेली आहेत याची आम्हाला खात्री पटली होती हे मात्र नक्की!

Comments

मिश्किल कथा.मुलांचा बालपणातील निरागस खोडकरपणा कथेत छान उतरला आहे.

By : Pratibha Tarabadkar
11/05/2023 1 : 43 : 08 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article