गुढी पाडवा


गुढी पाडवा

शशांक पुरंदरे

राजा आणि उमा बंडूच्या घरी पोचले तेव्हा सकाळचे साडेदहा वाजले होते. राजा बंदगळा आणि सुरवार अशा पोषाखात होता. वर जॅकेट होते तर उमाने लाल रंगाची पारंपारिक पैठणी नेसली होती.

स्वातीने दरवाजा उघडला.
“अय्या, इंचपिंच!!!आपल्या दोघींच्या पैठण्या अगदी सेम टू सेम!”
“हो, अगदी बॅंडवाल्याच दिसताय.” मागून बंडू उद्गारला.
“बॅंड नाही, पण गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत ढोल वाजवायला जाऊ शकता.” राजाने पुस्ती केली.

वास्तविक पारंपरिक पोषाखात राजा आणि बंडूपण बॅंडवालेच वाटत होते.

“आणि तुम्ही काय वाजवणार? पिपाणी??” स्वातीने पण शालजोडीतून देण्याची संधी सोडली नाही. लग्न झाल्यावर सुरवातीला जरी थोडी बुजरी असली तरी आता या तिघांच्या सान्निध्यात स्वाती देखील चांगली तयार झाली होती.

एकमेकांचे नूतन वर्षाभिनंदन करुन चौघेही बंडूच्या दिवाणखान्यात स्थानापन्न झाले. माफक खर्चात आणि अल्पावधीतच स्वातीने घर छानच सजवले होते. आज गुढीपाडव्या निमित्त झेंडूच्या फुलांच्या विशेष सजावटीमुळे घर अधिकच सजले होते. शिवाय दिवाणखान्याच्या खिडकीत उभारलेली गुढी विशेष लक्ष वेधून घेत होती. स्वातीने आत जाऊन केशरी सरबताचे प्याले आणले. आता उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता त्यामुळे शीतरसांचे प्याले म्हणजे संजीवनीच होती. शरीर आणि आत्म्याची शांती झाल्यावर चौघांच्या गप्पा सुरु झाल्या.

“आज सुट्टी आहे ते बरं आहे. रोज वाहतुक मुरंब्यातून वाट काढताना दम निघतो.” बंडू म्हणाला.
“तरी बरं, तुमचे ॲाफिस जवळ आहे. राजाला रोज तीन वाहने बदलून प्रवास करावा लागतो.”
“त्रास तर आहे, पण आता सगळं अंगवळणी पडलंय.” राजा म्हणाला. “मेट्रोची कामे संपेपर्यंत हे असेच चालणार! येताना शोभायत्रा पाहून आलो. हल्लीच्या स्रीया जरा जास्तीच उत्साही झाल्या आहेत. सकाळी लवकर उठून घरचे सगळे आवरुन बाईक, स्कूटर वा सायकलवरुन शोभायात्रेत भाग घेणे म्हणजे खायचे काम नाही.”

“खाण्यावरुन आठवले, मी बटाटेवडे बनवले आहेत. आत्ता घेऊन येते.आणि जेवायला देखील थांबायचे आहे. आज श्रीखंडपुरीचा बेत आहे.” असे म्हणून स्वाती किचनमधे गेली. मागोमाग तिला मदत करायला उमा देखील आत गेली.

“या बायकांना हे सर्व करण्याचा उत्साह येतो कुठून?” राजा म्हणाला.
“मी सकाळी मराठी वृत्तवाहिन्या बघत होतो. सगळीकडे तेच चालू आहे. या राजकारण्यांनी तर हैदोस घातला आहे. गुढी पाडवा असो की ईद, प्रत्येक ठिकाणी हे पुढे! मला सांग, एक जानेवारीला आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो तेव्हा इंग्रजी नवीन वर्ष म्हणतो का? मग गुढी पाडव्याला हिंदू नवीन वर्ष म्हणण्याची काय गरज आहे? प्रत्येक ठिकाणी राजकारणी का हवेत? सेलेब्रिटी कशाला हव्यात? काही नाही, येनकेनप्रकारेन आपली पब्सिसिटी करायची. आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतोय हे दाखवायचं.” बंडू म्हणाला.

“ह्या मराठी नटनट्या म्हणतात की लोकं मराठी सिनेमा नाटकं पहात नाहीत. पण तुला सांगतो खूप कमी मराठी सिनेमे चांगल्या प्रतीचे असतात. मी ओटीटीवर काही सिनेमे पाहताना अर्धवट सोडले आहेत.

“याउलट मराठी नाटकांचा दर्जा खूप चांगला आहे, बऱ्याच वेळा तिकिटे देखील मिळत नाहीत इतकी गर्दी असते. आणि ॲानलाईन तिकिटविक्री हा तर मोठा स्कॅम आहे. फक्त मागच्या रांगेतील तिकिटे मिळतात. नाट्यगृहांची अवस्था तर फार वाईट आहे, मोडक्या खुर्च्या, सदोष ध्वनीप्रक्षेपण हे तर नेहमीचेच आहे. स्वच्छतागृहाबद्दल तर न बोललेलेच बरे! मेकपरुम बद्दल तर कलाकार तक्रार करुन थकले.”

“जाऊदे, फारच विषयांतर होतंय. मला सांग, राम खराच होता की नाही यावादात नको पडूया. त्याचा रावणावरील विजय साजरा करण्यासाठी गुढ्यातोरणे बांधली जातात. पण मला एक प्रश्न नेहमी पडतो. रावणाला जर दहा तोंडे होती तर तो त्याचा तोल कसा सांभाळत होता? म्हणजे राजकारणी दहा तोंडांनी बोलताना त्यांचा तोल सुटतो तो वेगळा! पण जर दहा तोंडं असतील तर एक मधे आणि एका बाजूला पाच तर दुसऱ्या बाजूला चारच तोंडं असतील. मग तोल कसा सांभाळणार?!!”

“बंड्या, हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता. पण याचे उत्तर इतिहास संशोधकच देऊ शकतील.”

एव्ढ्यात स्वाती आणि उमा बटाटेवडे आणि चहा घेऊन बाहेर आल्या आणि चारही तोंडं खाण्यात मग्न झाली.

समोर टीव्ही वर सर्व राजकारणी आणि सेलिब्रिटी आणि वेळ राहिला तर बाजूला उभे राहून निमूटपणे पाहणारे प्रेक्षक हे दिसत होते.

आपापल्या वेळी सर्व सेलिब्रिटी निघून गेल्यावर खऱ्या शोभायात्रा सुरु झाल्या.

Comments

Nice 👍

By : Sameer Peshave
24/03/2026 2 : 27 : 37 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article