अबोली


मी सहावी-सातवीत, बहुतेक सातवीत असेन. मला हळूहळू माझ्या शरीरात होणाऱ्या बदलाची जाणीव होऊ लागली होती. आणि एके दिवशी सर्व मुलींचे होते ते झाले. मी घाबरून अस्मिता, माझ्या ताईला जाऊन संगितले. ती म्हणाली, अग वेडे, यात घाबरण्यासारखे काही नाही. हे नैसर्गिक आहे. फक्त स्वच्छता राख म्हणजे झाले.

पण शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही होऊ लागले होते. हा सर्व हार्मोन्सचा परिणाम होता, पण ते तेव्हा माहित नव्हते. आजूबाजूचे जग जरा वेगळे भासू लागले होते.

मी ज्या शाळेत शिकत होते ती co-ed शाळा होती. साहजिकच मुले मुली हा भेदभाव फारसा नव्हता. पण स्पर्धा जबरदस्त होती.

मी आणि अक्षय एकाच सोसायटीत रहात होतो. आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलो, वाढलो होतो. आम्ही दोघेही तसे हुशार म्हणूनच गणले जात होतो. नेहमी पहिल्या पाच मुलांमधे आमचा नंबर असायचा. पुढे कोण जातो ही चढाओढ नेहमीच असायची.

मी दिसायला अगदी सुंदर नसले तरी ठीकच होते. सातवीमध्ये जरा जास्ती नीटनेटकी राहू लागले होते. आणि मला हळूहळू अक्षय बद्धल आकर्षण जाणवू लागलं होते. वर्गात चोरून त्याच्याकडे बघू लागले. मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात देखील माझ्या नजरा त्यालाच शोधू लागल्या होत्या.

त्याच्या वयाच्या मुलांच्या मानाने त्याची अंगकाठी मजबूत होती. काळेभोर केस, तरतरीत नाक आणि आव्हान देणारे डोळे हे सगळेच कुणालाही आकर्षित करेल असेच होतं. अभ्यासात तर तो हुशार होताच, पण त्याचा सेन्स ऑफ हुमर पण छान होता. पण ह्या सगळ्यात मोठी गोम अशी होती की त्याला माझ्याबद्ध्दल काही वाटत होते का? कारण तो सर्वांशी सारखाच मिळून मिसळून वागायचा.

मी फिजिकली जास्ती activ होते. बॅडमिंटनमध्ये शाळेची दोन वर्ष विनर होते. माझ्या सर्व मॅचेसना मला प्रोत्साहन द्यायला अक्षय आवर्जून उपस्थित असायचा. पण म्हणून काय?

दहावीनंतर आमचे मार्ग बदलले. मी सायन्सला अडमिशन घेतली. त्याला अर्थशास्त्रात रस होता. नंतर आम्ही वेगळ्या सोसायटीत राहिला गेलो. त्यामुळे आमचे संबंध अजूनच कमी झाले. नाही म्हणायला अधून मधून फोन व्हायचे. पण काय, कसे चाललंय, या पलीकडे विशेष बोलणे होत नव्हते. भेटणे तर लांबचीच गोष्ट होती.

मी आर्किटेक्टच्या तिसऱ्या वर्षाला असताना त्याचा अचानक फोन आला. बी. कॉम करून तो MBA करायला अमेरिकेला चालला होता. त्याला best of luck देण्या व्यतिरिक्त दुसरे काय होते माझ्या हातात?

डोकं सुन्न झालं होतं. डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला होता. त्या क्षणी मला जाणवले की मी अक्षयच्या प्रेमात होते. पण आता त्याचा काय उपयोग होता? तो तर अमेरिकेला निघून गेला होता.

नंतरचे तीन-चार महिने मला अतिशय अवघड होते. जोपर्यंत मी अभ्यासात बिझी होते तोपर्यंत ठीक होतं. पण मोकळा वेळ मला खायला उठायचा. सारखा अक्षय डोळ्यासमोर दिसायचा. काही सुचत नव्हतं. सर्व असह्य झालं होतं. बऱ्याच वेळेला मी नुसतीच शून्यात नजर लावून बसलेली असायची. अनेकदा वाटायचं, त्याला सरळ फोन करून सर्व सांगून टाकावे. पण नकाराची भीती मला थांबवत होती. कसा हा तिढा सुटणार होता???

एकदा मी अशीच टेबलावर डोकं ठेवून बसले होते. मला सगळं असह्य होत होतं. अचानक अस्मिता आता आली. मला पाहून म्हणाली,
“काय ग काय झालं?”
मी काही न बोलता उठून तिला मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागले. अस्मिताने जवळ घेऊन मला शांत केले आणि माझ्याकडे पाहून म्हणाली,
“अक्षयची आठवण येतेय?”
मी आश्चर्याने तिच्याकडे पहातच राहिले.
“तुला काय माहित?”
“अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात. बहीण आहे मी तुझी. तू त्याच्या प्रेमात आहेस याची जाणीव मला पूर्वीपासूनच होती.”
“मग कधी बोलली नाहीस ते?”
“तू तरी कुठे बोललीस? वेडाबाई, अक्षयला सरळ सांगून टाकायचं ना?”
“आणि तो नाही म्हणाला असता तर?”
“नाही कशाला म्हणेल? कारण तो पण तुझ्या प्रेमात आहे.”
“तुला कधी म्हणाला तो?”
“अशा गोष्टी सांगायच्या नसतात, समजायच्या असतात. आता वाट बघ तो परत येईपर्यंत!”

अस्मिताशी बोलून जरा मन हलके झाले होते. पण, एक हुरहूर, एक बेचैनी हृदयात कायम होती.

अधून मधून माझे आणि अक्षयचे मेसेजेस चालू असायचे. त्याच्या व्हिडिओ चॅटची मी चातकासारखी वाट पहायचे. पण आम्ही हाय, हेलो, कसा आहेस, काय चाललंय या पलीकडे कधी गेलो नाही. पण निदान त्याचे दर्शन तरी होत होते.

लवकरच माझा जॉब सुरु झाला आणि मी कामात पार बुडून गेले. माझा आणि अक्षयचा contact पण कमी होत होता. तो पण बहुतेक बिझी असावा.

एक दिवस अचानक त्याचा फोन आला.
“मी परत येतोय.”
“काय? कधी?”
“परवा पोहोचेन. मला भारतात जॉब मिळाला आहे. लगेचच जॉईन होतोय. भेटुया लवकरच.”

आठएक दिवसांनी सकाळी मी लिफ्टमध्ये शिरून चौथ्या मजल्याचे बटण दाबले. पण लिफ्टचा दरवाजा परत उघडला. आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. समोर अक्षय उभा होता. सहा फूट उंच, काळेभोर केस आणि तेच स्वप्नाळू डोळे!
“अक्षय? तू इथे काय करतो आहेस?”
“जॉब.”
त्याच्या बरोबर एक तरुणी होती. दोघेही लिफ्ट मध्ये शिरले.
“मी पाचव्या मजल्यावर आहे. Financial मॅनेजर म्हणून जॉईन झालो आहे. ही माझी सहकारी सायली.”
आम्ही दोघींनी हाय हेलो केले. तेव्हढ्यात लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहोचली होती. लवकरच भेटूया म्हणून मी लिफ्ट मधून बाहेर पडले.
“मी पण इथेच जॉब करते, कुलकर्णी असोसिएटस मध्ये.”

आमच्या बिल्डींगमध्ये तळमजल्यावर कॉफी हाउस आहे. ब्रेकमध्ये बहुतेक सर्वजण तिथेच येतात. मी आणि अक्षय बरेच वेळा तिथेच भेटलो. पण नेहमी सायली बरोबर असायची. त्यामुळे अवांतर गप्पाच होत होत्या. सायली दिसायला छान होती. मला कुठेतरी वाटत होतं की यांचे जमले असावे. दिवसागणीक माझे नैराश्य वाढत चालले होते.

पण एक दिवस अक्षय एकटाच खाली आला. सायली बहुतेक रजेवर असावी. आम्ही आमच्या नेहमीच्या टेबलावर बसलो. पण आज अक्षय माझी नजर चुकवत होता. इतका क्युट दिसत होता की काय सांगू!

दोन मिनिटे शांततेत गेली. शेवटी अक्षय म्हणाला,
“अबोली, मला तुला काही सांगायचे आहे.”
“बोलना.” मी चेहरा निर्विकार ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.
“I LOVE YOU !”
“काय?” मी इतक्या जोरात ओरडले की सर्व् कॉफी शॉप आमच्याकडे बघायला लागले.

मी तशीच उठले आणि अक्षयचा हात धरून त्याला खेचतच बाहेर नेले. आम्ही समोर बाकावर जाऊन बसलो.
“परत सांग काय म्हणालास?”
“मी अगदी पहिल्यापासून तुझ्या प्रेमात आहे.”
माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले.
“नालायक माणसा, हे सांगायला तू पंधरा वर्षे घेतलीस? इथे माझी काय अवस्था झाली होती याची कल्पना आहे तुला?”
“माझी देखील तशीच अवस्था होती. पण नाईलाज होता.”
“कसला नाईलाज? तू होमो आहेस का ते चेक करत होतास?”
“वाटेल ते बोलू नकोस. पण तू पण कधी बोलली नाहीस.”
“माझे नावच अबोली आहे.”
“कसे आहे, आधी मला माझी स्वत:च्या पायावर उभे राहायचे होते. शिक्षण, करीयर या गोष्टी सेटल झाल्यावर मी तुला सांगणार होतो.”
“आणि तोपर्यंत मी थांबले नसते तर?”
“अस्मिता होती ना तुला थांबवायला.”
“म्हणजे हे सर्व त्या म्हशीला माहित होतं? तुम्ही आधीच सर्व सेटिंग केलेलं होतं? मधल्या मधे मला मात्र किती भोगावं लागलं याची कल्पना आहे तुला? थांब, आता घरी गेल्यावर ती आहे आणि मी आहे.”
“ए बये, तिला काही बोलू नकोस. नाहीतर प्रपोजल रद्द होईल.”
“मी बरे होऊन देईन? तू कसाही असतास तरी मला हवा होतास.”
त्या दिवशी संध्याकाळी आम्ही हातात हात घालून कपल्स टेकडीवर गेलो. ती संध्याकाळ आम्ही एकमेकांच्या मिठीत घालवली. समोर विस्तीर्ण रानमाळ पसरले होते. पक्षी किलबिल करत आपल्या घरट्यांकडे निघाले होते. त्यांची किलबिल सोडली तर आजूबाजूला एक निशब्द शांतता होती. दूर क्षितिजावर सूर्य मावळतीकडे निघाला होता आपली सोनकिरणे मागे ठेवून. जणू रजनीला भेटायला आतुर झाला होता तो !!!

Comments

जशा सगळ्याच कथा छान तशीच ही पण

By : शितल
11/07/2023 11 : 49 : 32 AM

साधी सोपी सरळ प्रेम कथा.

By : Pratibha Tarabadkar
11/07/2023 11 : 53 : 55 AM

Premkatha chhan aahe..Kathechi Bandhani chhan Zale..

By : Priyanka
11/07/2023 2 : 30 : 53 PM

शशांक कथा खूप सुंदर.

By : Shubhangi
11/07/2023 6 : 59 : 20 PM

फारच छान कथा.

By : Shubhangi
11/07/2023 7 : 01 : 03 PM

गोड कथा

By : Sheela Bahadkar
11/07/2023 7 : 33 : 23 PM

छान गोष्ट. आवडली.

By : मीना घाटपांडे.
12/07/2023 09 : 00 : 45 AM

Beautiful story

By : Cyril David
12/07/2023 11 : 49 : 36 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article