मी आत्मचरित्र लिहितो


गडकरी, किल्लेदार आणि राजवाडे प्रकाशनाच्या कचेरीत मी सकाळी दहा वाजता पोचलो. दरवाजा समोरच एक सुंदर सचिवी (स्रीलींगी सचिव) बसली होती. तिने लालभडक ओष्ठद्वयातून आपल्या पांढऱ्याशुभ्र कुंदकळ्या दाखवित एक स्मितहास्य केलं व उद्गारली

“सुप्रभात, मी काय सेवा करू आपली?”
“मला गडकरी किल्लेदार किंवा राजवाडे यापैकी एकाला भेटायचे आहे.”
“मुलाखतीची वेळ आधी ठरवली होती का?”
“नाही.”
“ठीक आहे, बसा”, असे म्हणून ती बाला आत चालती झाली.

दोन मिनिटांनी अजून एक युवती बाहेर आली. ती देखील जवळजवळ त्या सुंदर सचिवीची बहीण वाटावी अशीच होती.
“नमस्कार! मी मनीषा! काय काम होतं आपलं?”
“नमस्कार! मला गडकरी किल्लेदार किंवा राजवाड्यांना भेटायची मनीषा होती.” मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे मी कोट्यावधी कोट्या करू शकतो. परंतु चेहरावरील एक स्नायूदेखील न हलवता ती उद्गारली,
“मी त्यांची सहायिका आहे. मी काय मदत करू आपली?”
“मला एक आत्मचरित्र प्रकाशित करण्याची इच्छा आहे.”
“या, आपण केबिनमध्ये बसूया.”

आम्ही त्या आतल्या प्रशस्त केबिनमध्ये विराजमान झालो. अर्थातच केबिन वातानुकूलित होती. एकंदरीतच गडकरी किल्लेदार आणि राजवाड्यांचा व्यवसाय तेजीत होता यांत काही शंका नव्हती. मी मनातल्या मनात नोटा मोजायला सुरूवात केली.

“आपल्याला कुणाचे आत्मचरित्र प्रकाशित करायचे आहे?” मनीषाने विचारले.
“अहो कुणाचे म्हणजे काय? माझे स्वत:चे!”
“आपलं?” अचंबित होत मनीषा म्हणाली.
“हो! काही प्रॅाब्लेम आहे?”
“नाही, म्हणजे आत्मचरित्र वगैरे मोठ्या लोकांची छापतात.”
“का? त्या देशपांडेनी नाही लिहिलं! साधे कारकून तर होते एका कंपनीत!”
“कोण देशपांडे?”
“अहो ते नाही का पुल देशपांडे!”
“काहीतरी काय! त्यांची आणि तुमची काय बरोबरी?”
“अहो त्यांनीच तर म्हटलंय, चालणे राजहंसाचे, म्हणून काय इतरांनी चालूच नये की काय?”
यावर मनीषाची बोलतीच बंद झाली.
“ठीक आहे, बघू तुमचे हस्तलिखित!”
“अहो अजून ते लिहायचे आहे.”
“ठीक आहे” एक निःश्वास सोडून मनीषा म्हणाली, “लिहून झाले की घेऊन या, मग बघू.”
“अहो, मला लिहिता येत असतं तर तुमच्याकडे कशाला आलो असतो? आत्तापर्यंत लिहून छापले नसते का?”
“हो, पण लिहिल्याशिवाय कसे छापणार?”
“हो ना, मग तुम्ही लिहा, मी सांगतो काय लिहायचे ते.”
“अच्छा, म्हणजे तुम्हाला घोस्ट रायटर हवा आहे! ठीक आहे, मी तुम्हाला मदत करेन.”
“हो, पण अक्षर चांगले आहे ना?”
“अहो हातांनी लिहायचे दिवस गेले आता. सगळे काही कॉम्पुटरवर होतं हल्ली.”
“ठीक आहे. मग कधी सुरवात करायची?”
“त्या आधी मला तुमची आत्मचरित्राची रूपरेषा समजून घावी लागेल. ती आमच्या साहेबांना सांगावी लागेल. त्यांनी पसंत केल्यावरच आपण पुढे जाऊ शकतो.”
“तशी मी रूपरेषा तयार केली आहे. सांगू का तुम्हाला?”
“चालेल. लगेचच सुरुवात करुया आपण.”
“कामाला सुरवात करण्या आधी मी काही गोष्टी स्पष्ट करते”, मनीषा म्हणाली, “आमचे रेट फिक्स आहेत.”
“रेट्स? मला वाटले होते की पुस्तक छापून मला पैसे मिळतील. इथे तर तुम्हीच पैसे मागताय!”

“मी सांगते. जरा समजून घ्या. पुस्तक छापायला जो काही खर्च येतो तो आम्ही कस्टमर कडून आधी घेतो. यात छापायला लागेल ते सर्व आम्ही करतो. आता तुम्हाला लेखक पण हवा आहे. त्याचा वेगळा खर्च येईल. शिवाय पब्लिसिटी वगैरेचे चार्जेस वेगळे असतील. पण आम्ही तुम्हाला बेस्ट रेट देऊ. जेष्ठ नागरिक सवलत पण देतो आम्ही. तुम्हाला फक्त आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन द्यावे लागेल!!! अहो गम्मत केली, हल्ली असे म्हणायची पद्धत आहे म्हणून!” माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून मनीषाने खुलासा केला.

“पुस्तके विकली गेल्यावर प्रत्येक पुस्तकामागे तुम्हाला रॉयल्टी देऊ आणि प्रत्येक शंभर पुस्तकामागे बोनसपण मिळेल. तुम्हाला दहा पुस्तके फुकटात मिळतील.”
हे म्हणजे अवघड काम होतं. माझेच पुस्तक मलाच फुकटात देणार म्हणे!
“तुमचे चार्जेस कसे आहेत?” मी मूळ मुद्याला हात घातला.
“आम्ही पुस्तकाचे हजार रुपये बुकिंगसाठी घेतो. नॉन-रिफन्डेबल! हे तुम्हाला काम सुरु करण्याआधी द्यायला लागतील. नंतर प्रत्येक चॅप्टर मागे पहिल्या तीन पानांना दहा रुपये रेट आहे. जादा पानांना प्रत्येकी दोन रुपये अधिक पडतील. फोटो वगैरेसाठी वेगळे चार्जेस आहेत. आणि घोस्ट रायटर करता आम्ही पाच हजार घेतो पण तुम्हाला आम्ही अडीच हजारच चार्ज करू.”
“बापरे, खर्चिक काम आहे की हे!” मी म्हणालो.
“हे बघा, कसं आहे, तुम्ही टॅक्सी बुक करता तेव्हा आधी मीटर डाऊनचे पैसे देता मग पर किलोमीटर मागे पैसे देता. टोल, वेटिंग वगैरेचे वेगळे पैसे होतात, तसंच आहे हे!”. मनीषाने साध्याच शब्दात आम्ही तुम्हाला कसे लुटणार आहोत ते सागितले.
“तुमच्या या प्रकाशनाच्या टॅक्सीला पण ट्रॅफिकजॅम्स लागतात का हो?” मी टेन्शन कमी करायला म्हटलं. खर तर मला ऐकून त्या एसी ऑफिस मध्ये पण घाम फुटला होता. पण आत्मचरित्र लिहिणार म्हणजे लिहिणारच असा पण मी केला होता. आणि शेवटी पुस्तक विकून प्रचंड फायदा होणार हे तर नक्की होते.
“तुम्ही रॉयल्टी किती देता?” मी परत मुद्याला हात घातला.
“पुस्तकाच्या किमतीच्या दहा टक्के आणि बोनस शंभर पुस्तकाना वीस टक्के.” मनीषा म्हणाली.

आत्ता किती पुस्तके विकली जातील हे आताच सांगणे अवघड होत. म्हणून सध्यातरी या मुद्याला बगल देत मी मुख्य कामाकडे वळलो. खिशातून पाचशेच्या दोन नोटा मनीषाला देऊन बुकिंग केले. आता थोडेफार पैसे खर्च होणार होते. बायकोच्या दोनतीन साड्या कमी येतील. पण एव्हढं मोठे काम करायचं म्हणजे थोडाफार त्याग करायला नको का?

“मी रिसीट नंतर देते.” मनीषा म्हणाली. “ काम चालू करुया?”
मी खुर्चीवर जरा ऐसपैस बसून माझी नोट्सची वही बाहेर काढली.

“बोला.” मनीषा उद्गारली.
“आमचे घराणे खूप जुने आहे,” मी सुरवात केली,” म्हणजे पहिला पुरुष सोळाशे सालात जन्माला आला असा पुरावा उपलब्ध आहे. पुढच्या वर्षी आमच्या घराण्याला ४२० वर्ष पूर्ण होतील.”

“अरे वा,” जरा छद्मीपणे हसतच मनीषा म्हणाली. पण पुढच्याच क्षणाला स्वत:ला सावरून घेत, ”म्हणजे खूपच पुरातन आहे की!”, असे म्हणून सारवासारव केली. बाई हुशार होती यात शंका नव्हती. “पण तुम्हाला तुमचं आत्मचरित्र लिहायचं की घराण्याचे?” मनीषाने योग्य मुद्दा मांडला.

“माझचं आहे पण थोडी बॅकग्राउंड हवीच ना. तर, १९५० पर्यंत आमच्या आठ ते नऊ पिढ्या होऊन गेल्या. माझी दहावी आहे. मध्ये पाचव्या पिढीत कोणालाच मुलगा झाला नाही.”
“अरे बापरे, मग घराणच खुंटल की!” मनीषाने परत आपली हुशारी दाखवली.
“नाही तेव्हा अंगवस्त्र असायचीच ना. आमचे घराणे अनौरस पुत्रांनी पुढे चालवले.”
“ऑं! हे सर्व तुम्ही लिहिणार आहात?” मनीषाचा ऑ होणे सहाजिकच होते.
“आत्मचरित्र वास्तविक असलं पाहिजे. गुणदोषांसकट सर्व नोंदी आवश्यक आहेत. हे सगळं तर ठीक आहे. खरी गम्मत तर पुढेच आहे. पाचव्या पिढीतल्या अनौरस सर्जेरावाच्या मुलाने परत आमच्या पिढीतील औरस मुलीशी लग्न केले. त्याचा मुलगा बाजीराव त्यामुळे सेमी-औरस झाला. आणि त्याचा मुलगा परत रीतसर औरस झाला. त्यामुळे सर्व नोंदी पहाता मी औरस आहे हे नक्की.”
“खूपच इंटरेस्टिंग आहे हे सगळं!” मनीषाचा पुन्हा ऑ होण्याच्या बेतात होता.
“पण पुढचे तर यापेक्षा विलक्षण आहे. बघालच तुम्ही!”
“मला वाटतं तुम्हाला आधीच्या नऊ पिढ्यांसाठीच नऊ चॅप्टर लिहावे लागतील.” मनीषाचा व्यावहारिक मेंदू पण तेव्हढाच तल्लख होता.
मी पण काही कमी नव्हतो. “आधी माझा तोच विचार होता, पण तुमचे रेट पाहून एकाच चॅप्टर मध्ये लिहावे लागेल. पण कुठल्याही परिस्थितीत गुणवत्तेत तडजोड नाही.”
“मला आता पहिला चॅप्टर लक्षात आला आहे. आता दुसरा चॅप्टर!” मनीषा म्हणाली. “आधी तुमचं नाव काय ते सांगा.”
“तो सस्पेन्स आहे. ते शेवटच्या पानातच उघड होईल. सध्या आपण सदानंद म्हणूया. माझं पाळण्यातले नाव आहे ते.”
“तुमचा जन्म किती सालचा?” मनीषाने बेसिक प्रश्न केला.
“महाराजांप्रमाणे माझ्याही जन्म तारखेचा घोळ आहे. आपण १ जुलै एकोणीसशे सत्तावन्न धरून चालू. त्याच झालं असं की माझा जन्म झाल्यानंतर कागदोपत्री नोंद करायला आमचे तीर्थरूप विसरले. बासष्ट मध्ये शाळेत नाव घालायची वेळ आली तेव्हा मग पाच वर्ष आधीची तारीख म्हणून एक जुलै १९५७ अशी नोंद केली. पण माझा जन्म १९५७ मध्ये कधीतरी झाला हे मात्र नक्की.”
“हे तर खूपच धमाल आहे.” मनीषाची गाडी आता गियरमध्ये आली होती.
“मला एक सांगा, तुम्हाला किती आत्मचरित्र लिहिण्याचा अनुभव आहे?”
“अहो आत्मचरित्र सर्वजण आपापली लिहितात. तुम्हीच पहिले आहात जे लिहून घेत आहेत.”
“मग यानंतर स्वतःचे आत्मचरित्र तुम्ही नक्कीच लिहू शकाल.”
“ते राहूद्या हो, तुम्ही शाळेत दाखल झालात, पुढे?”
“मी एक सामान्य विद्यार्थी होतो. घरी दिवे होते त्यामुळे नगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागला नाही, नाहीतर दुसरे बाळ गंगाधर टिळक झालो नसतो का? पहिलीत कॅापी करताना पकडलं होतं मला. मी सरळ सांगितलं, मला येत नव्हतं म्हणून पुस्तकात पाहिलं. टिळकांचा बाणा, मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले कोणी टाकली ते सांगणार नाही, तेव्हा पासूनच माझ्या अंगात सडेतोडपणा भिनलेला आहे. एकदम सडेतोड!
मी अकरावी पास झालो आणि दोन वर्षांनी सरकारी नोकरीत लागलो, ते निवृत्त होईपर्यंत.”

“झालं? मग आता आत्मचरित्रात मटेरीअल काय लिहिणार?” मनीषा जरा चक्रावलीच.
“पण अठरा ते साठ या आयुष्यात काय काय झाले हे अजून कुठे सांगितलाय मी तुम्हाला?” मी सस्पेन्स वाढवायचा प्रयत्न केला.
“मग सांगा ना!” मानेला हेलकावे देते मनीषा म्हणाली. तिच्या या अदांनी माझं मन पण हेलकावे खात होते.
“शाळेत आमच्या मास्तरांचे आमच्यावर विशेष लक्ष असायचे. आमचे लक्ष मात्र मास्तर काय सांगतात ते सोडून इतर सर्वत्र असायचे. त्यामुळेच माझा सर्वांगीण विकास झाला हे मी नमूद करु इच्छितो.” अकरावीच्या परीक्षेत, म्हणजे एसएससीमध्ये, माझी सायकल पाच टक्क्यांनी हुकली. ती पण दोनदा!”
“ती कशी काय?”
“तेव्हा जर बरोबर पस्तीस टक्के गुण मिळाले तर बोर्ड सायकल बक्षीस द्यायचे. मला पहिल्यांदा तीस टक्के मिळाले. पण मी जिद्दीने परत प्रयत्न केला, तर पेपर तपासणाऱ्याने चाळीस टक्के दिले. नशीब, दुसरे काय!
नोकरीला लागल्यावर तीर्थरूपांनी चार वर्षातच आमचे लग्न लावून दिले. त्यांच्याच लंगोटीयारची मुलगी.
“नाव काय वहिनींचे?” मनीषाने लगेच मला जमिनीवर उतरवले.
“शांता. म्हणून माझे मित्र मला सदाशांत म्हणतात. चांगली बीऐ पास आहे शांता.
तेव्हा माझ्याकडे स्कूटर होती. लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी शांताला घेऊन मी बाहेर पडलो. मागे शांता बसली होती. पुढल्या चौकात आल्यावर तिला नीट बसली आहेस का विचारायला मागे पहिले तर शांता गायब! परत मागे आलो तर बाईसाहेब तिथेच उभ्या. मला म्हणाली मी बसायच्या आधी तुम्ही निघून पण गेलात.

मला हनिमूनला सोडायला सर्व मित्रांची फौज एसटी स्टँडवर आली होती. हिला गाडीत बसवून मित्रांशी गप्पा मारत बसलो होतो. थोड्यावेळाने पहातो तर एसटी गायब! कधी एसटी सुटली ते आम्हाला समजलेच नाही. मग मी नंतरची एसटी पकडून बायकोच्या मागे गेलो. नंतरची हनिमूनची गोष्ट सेन्सरड् आहे. परंतु या सर्व प्रसंगांमुळे बायको खूप लवकर स्वत:च्या पायावर उभी राहिली.

सर्वात मजा तर आमच्या पहिल्या मुलाच्या डिलीव्हरीला झाली. घरी येताना मी चुकून बाजूचाच मुलगा घेऊन निघालो होतो.”
‘अरे बापरे, म्हणजे तुमचे खानदान परत अनौरस होताहोता वाचले की!” मनीषाने विनोद करायची संधी अजिबात सोडली नाही.
“हो. नंतर बरेच वर्ष आम्ही सुखाने संसार केला. म्हणजे बायको सुखात होती आणि मी संसार करत होतो.
“इथपर्यंत ठीक चाललय पण पुढे काय? गोष्टीत इंटरेस्ट राहिला पाहिजे ना?” मनीषाने प्रथमच रास्त प्रश्न केला.
“आम्हाला अजून दोन मुले झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. आमचा संसार सुखात सुरु होता.”
“अहो हे रिपीट झाले.”
“सॉरी, नोट्स मध्ये चुकून दोनदा लिहील गेलं. संसार एकदाच सुखाचा झाला.”
“इश्य, फारच विनोदी आहात हो तुम्ही!” मनीषा म्हणाली.
“मग, उगाच नाही मला आमच्या कॅाम्प्लेक्सचा पुलं म्हणतात!”
“बरं, आता जरा तुमच्या सरकारी नोकरीबद्धल बोलूया का?” आता मनीषाचा घोडा दौडू लागला होता.
“शालेय शिक्षणानंतर लगेचच मी सरकारी नोकरीला लागलो. तेव्हा खाजगी नोकऱ्यांची चलती होती. तेव्हा सरकारी नोकरी मिळणे अवघड नव्हते. मी लोअर लिपिक म्हणून माझा प्रवास सुरु केला आणि सुपरवायझर म्हणून निवृत्त झालो.”
“म्हणजे तुम्हाला एकून तीन पदोन्नत्या मिळाल्या तर!” मनीषाबाई पण कमी नव्हत्या. अगदी वर्मावरच बोट ठेवलं होत तिने.
“आमचा साहेब म्हणजे हुकूमशहा होता. त्याचे आणि माझे नेहमीच मतभेद झाले. सरकारी नोकरांनी दहा वाजता ऑफिसमध्ये हजर असले पाहिजे आणि साडेपाच नंतरच ऑफिस सोडले पाहिजे हा त्याचा कायम आग्रह होता आणि तो मला मान्य नव्हता”
“का?” हिला वार्ताहर म्हणून पत्रकार परिषदेतच पाठवायला हवे! प्रश्न विचारून उच्छाद मांडेल तिथे.
“अहो ट्रेनला गर्दी किती असते. ठाणे लोकल पकडायला सकाळी मुलुंडला जायला लागायचं, आणि संध्याकाळी मस्जिद! मग दहा ते साडेपाच वेळ कशी साधणार, तुम्हीच सांगा शिवाय हा स्वत: भेंडीबाजारात रहायचा. पैसे वाचवायला चालत यायचा. हे बरोबर आहे का?”
“पण मग जरा घरातून लवकर निघायचे ना!” मनीषा वार्ताहराबरोबर वकीलही होऊ शकली असती. एव्हढं टॅलेंट असूनही इथे जॉब करते म्हणजे गडकरी, किल्लेदार आणि राजवाडे हिला नक्कीच चांगला पगार देत असणार!
“अहो गाडीत येताजाता आमचे रमीचे डाव चालायचे. त्यामुळे ठराविक गाड्या पकडणं भाग होत मला! सरकारी नोकरीत किती पैसे मिळतात हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे इतर कमाईसाठी रमी कामी यायची. शिवाय मुलुंडला फाफडा जलेबी मिळायची. त्यामुळे घरी नाश्त्याचा प्रश्न नव्हता. येताना वडापाव असायचा.
आम्ही गाडीत जुगार खेळतो अशी कोणीतरी तक्रार केली की पोलिसांची धाड पडायची”
“मग?”
“मग काय, आम्ही भजनं म्हणायला सुरवात करायचो. त्यावरही हे लोकं खूप आवाज करतात म्हणून तक्रार गेली की आम्ही सर्व तेव्हढ्यापुरते झोपायचे नाटक करायचो. येताना शेअरबाजार वाले आमच्या बरोबर असायचे. त्यांच्या टिप्स वर तर आम्ही पैसे कमाविले. आता तुम्ही सांगा, हे सर्व सांभाळून ऑफिसला वेळेवर जाणे, योग्य वेळी आणि व्यवस्थित कामं करणे शक्य झाले असते का? बरं घराच्या जबाबदाऱ्या काही कमी असतात का? आधी बंडू झाला, मग चिंगी! हे सर्व आपल्या हातात असतं का? देवाची करणी आणि नारळात पाणी! सुट्ट्या पण व्हायच्या मधेमधे.”
“त्या कशासाठी?”
“दोन महिन्यातून एकदा गावी जायला लागायचे. सर्व गाव म्हणजे आमचेच नातेवाईक! लग्न, जन्म, मृत्यू हे चालू असायचेच. सण, समारंभ असायचे. शिवाय पावसाळ्यात ट्रेन बंद! मग कसे येणार ऑफिसला. परत राजकीय बंद होतेच चालू. टेस्ट मॅचेस असायच्या टीव्हीवर. हे सगळं मॅनेज करणे किती अवघड आहे तुम्हीच बघा.”
हे सर्व बोलणे ऐकून मनीषा निरुत्तर झाली नसती तरच नवल होते. तिने हार्बर लाईन जशी मस्जिदला मार्ग बदलते त्याप्रमाणे आपल्या प्रश्नांचा रोख बदलला.
“हे सर्व ठीक आहे, पण तरीदेखील ऑफिसमध्ये काहीतरी कामे तर तुम्ही केली असतीलंच ना?”
“म्हणजे काय, सरकार आपल्याला त्यासाठी तर पगार देते. कामे ही झालीच पाहिजेत. हल्लीच्या मुलांना फुकट पैसे हवेत. आमच्या वेळी तसे नव्हते. साहेब अकरा वाजता उगवला की आम्ही मान खाली घालून कामाला लागायचो.”
“अकरा वाजता? पण तुमची वेळ तर दहाची होती ना?”
“इतका वेळ मी तुम्हाला काय सांगितले? ट्रेनमुळे आम्हाला ऑफिसमध्ये पोहोचायला साडेदहा व्हायचे. मग चहापाणी गप्पाटप्पा होईपर्यंत अकरा वाजणारच ना! परत एक ते दोन लंचटाईम. ते अडीच वाजेपर्यंत चालायचं. चार वाजता परत चहा आणि पाच वाजता घरी जायची तयारी. त्यामुळे कामाला तसा खूपच कमी वेळ असयाचा. पण इतर वेळेला नुसती खर्डेघाशी! अगदी मान मोडायची पाळी यायची, तुम्हाला सांगतो!!!”
“एकंदरीत खूपच कष्टकारक आयुष्य गेले तुमचे!” मनीषाच्या बोलण्यातील उपरोधाकडे मी दुर्लक्ष केले.
“अरे हो, एक सांगायचे राहून गेले. एव्हढे सगळे सांभाळून मी ऑफिस मधल्या फावल्या वेळात अनेक कविता देखील लिहिल्या आहेत. नमुन्यांदाखल ‘पांढरं फुटलं, काळोखाचा उजेड, ती की तो?, समुद्राच्या उन्हात’ अशी बरीच नावे सांगता येतील. आत्मचरित्राचे काम झाले की आपण कवितांचे पुस्तक देखील छापुया.”
“एव्हढे करुनपण तुम्ही ऑफिसमध्ये फावला वेळ शोधलात म्हणजे कमाल आहे तुमची!” मनीषाच्या आवाजात आदरमिश्रित आश्चर्य होते की तिरस्कारयुक्त उपरोध होता ते मला पटकन उमजले नाही.
“आता आपण आपल्या परिवाराबद्धल बोलूया का? प्रथम तुमच्या धर्मपत्नी पासून सुरुवात करूया.”
“शांता सुरुवातीपासूनच शांत होती. तिच्यामुळेच आमच्या संसारात एव्हढी शांती आहे. माझ्यावर कधी काही बोलायची किंवा सांगायची पाळी आलीच नाही. आमच्या संसाररथाची दोन्ही चाके तीच आहे. मी फक्त रथ ओढणारा घोडा आहे. आणि आता तर तिची दुसरी इंनिंगच जणू सुरु झाली आहे. ती आता घराबाहेर पडली आहे. समाजकार्य करते आहे. ऑनलाईन शॉपिंग करून देशाची अर्थव्यवस्था बळकट करते आहे. किटीपार्टीज करून हॉटेल उद्योगाला चालना देते आहे. इतरांच्या मुलांना मार्गदर्शन करते, जे वेळेअभावी स्वत:च्या मुलांसाठी तिला करता आले नाही. आणि ती बाहेर पडल्यामुळे माझे सुप्त गुण देखील विकसित होऊ लागले आहेत. आता मला घरातील कामे जमू लागली आहेत. कुकर लावता येतो. भाजीला न जाळता फोडणी देता येते. इतकी वर्षे ‘तुम्हारी सास, मेरी बहु’ सारख्या सिरीयल्स मी मिस करत होतो, त्या मी पाहू लागलो आहे.”
“आणि मुले?”
“मोठा मुलगा टी.वाय. ला आहे.( टिवल्याबावल्या करून वेळ घालवतो हे अगदी माझ्या ओठावर आले होते. पण आत्मचरित्र असले तरी सर्वकाही खरे सांगायची गरज नसते हे प्रतिथीयश लेखकांनी ध्यानात ठेवावे.) मुलगी देखील आपल्या कलागुणांना विकसित करायच्या प्रयत्नात आहे. (म्हणजे झुम्बा क्लासेसना जाते, मॉलमध्ये सिनेमे बघत वेळ घालवते आणि जमले तर कॅालेजला जाते हे सर्व अर्थातच मी मनात म्हटले.)
“आता आपण शेवटच्या प्रकरणावर आलो आहोत.” हे हिला कसे समजले ते मी विचारणार एव्हढ्यात ती पुस्तकाच्या प्रकरणाबद्धल बोलते आहे हे माझ्या लक्षात आले, “म्हणजे, तो सध्या काय करतो?, असा वाचकांना लेखकाबद्धल प्रश्न पडणारच ना?”
“तुम्ही आता सेवानिवृत्त आहात, तेव्हा तुमचा वेळ कसा जातो?” मनीषाने विचारले.
“मी माझी दिनचर्याच तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी सकाळी सहाला उठतो. उठल्यावर माझा आणि पत्नीचा चहा करतो. ही उठल्यावर आम्ही चहा पितो. सात वाजता मी उठून बागेत जातो. तिथे आमचा हास्यक्लब आहे. तिथे अर्धापाउण तास हाहाहुहू केल्यावर मन प्रसन्न होते. माफक व्यायाम झाल्यावर मग कुणा ना कुणाचा वाढदिवस खाऊन पिऊन साजरा होतो. नंतर घरी आल्यावर शहर, देश आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर मी बारीक नजर ठेवून असतो.”
“म्हणजे?”
“अहो म्हणजे वर्तमानपत्रे वाचतो आणि बातम्या ऐकतो. मराठी चॅनेल्सवर बातम्या ऐकणे म्हणजे एक कसरतच असते”
“म्हणजे?”
“अहो, बातम्या कमी आणि ब्रेक्स जास्ती असतात. बातम्या कधी संपल्या ते समजतच नाही. पण मी एक दिवस दोन बातम्यांमध्ये कितीवेळ ब्रेक असतो ते घड्याळ लावून मोजले. ब्रेक बरोबर साडेसात मिनिटांचा असतो. मग तीन मिनिटे बातम्या, मग परत ब्रेक. मी काय करतो, ब्रेक आला की फॅशन टीव्ही लावतो आणि साडेसात मिनिटांनी परत बातम्या लावतो.”
“पण फॅशन टीव्ही या वयात म्हणजे जरा..?”
“अहो तसे नाही, आपल्या मुलांनी कोणत्या पद्धतीचे कपडे घालू नयेत हे कळण्या करता मी असे करतो.”
“हा, मग ठीक आहे.” मनीषा उद्गारली.
“नंतर मी बायकोला किचन आवरायला मदत करतो.”
“का?”
“हा काय प्रश्न झाला? ती नाही का मला इतर घर आवरायला मदत करत?”
“जेवणानंतर थोडी वामकुक्षी आवश्यक असतेच. माझी पाहिल्यापासुनची सवय आहे ती. ऑफिसात देखील...!” मी बोलता बोलता जीभ चावली. “म्हणजे कधी वेळ मिळाला नाहीच, पण एक पाच मिनिटांच्या डुलकीनंतर मन अगदी फ्रेश होते.” मनीषाने मोठ्या कष्टाने आपल्या चेहऱ्यावरचा निर्विकारपणा ढळू दिला नाही.

“आमच्या सोसायटीतही मी हल्ली लोकप्रिय झालो आहे. मध्ये पहिली ते चौथीच्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होते. तेव्हा मला जज म्हणून बोलावले होते. शेजारच्या पिंकीने ‘मेरा पिया घर आया’ वर नाच केला होता. बबडीने ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. हल्लीच्या मुलांना लहान वयातच किती समज आहे तुम्हाला सांगू! मला त्यांचे आणि त्यांच्या आईवडीलांचे पण खूप कौतुक वाटते त्यांना एकस्पोजर दिल्याबद्धल! आमची मजल ‘विठू माझा लेकुरवाळा’ किंवा ‘सुंदर ते ध्यान’ च्यापुढे गेलीच नाही कधी. पहिलं बक्षीस मी पिंकीलाच दिले. तिची आई आमच्या हास्यक्लबमधे रोज येते. या वयातही छान फॅार्म राखला आहे त्यांनी! त्यामानाने आमचे कुटुंबच जरा...! पण ती तरी काय करणार. आधीपासूनच सुखवस्त कुटुंबात वाढली आहे ती. सवई अशा पटकन जात नाहीत हेच खरे. आता तर मला मोठ्या मुलांच्या गाण्याच्या क्लबमधे पण बोलावले आहे. त्यामुळे हल्ली एमटीव्ही जरा बघायला लागलो आहे. हे सर्व असले तरी मी धार्मिक माणूस आहे. यंदा गणपती बसविण्याची जबाबदारी पण मलाच पार पाडावी लागेल असे दिसतंय. एक ‘फॅशन शो’ बसवायचा विचार आहे बघुया कसं काय जमतेय ते!”

आतापर्यंत नोट्स काढून मनीषाचे हात दुखू लागले होते. माझी रूपरेखा पण जवजवळ संपलीच होती.
“तर ही माझी ढोबळ रूपरेखा आहे. याशिवाय मी लहान वयात आमच्या चाळीचा गोट्या चॅम्पियन कसा झालो, पूर्ण शालेय जीवनात शेवटचा बाक कसा सोडला नाही वगैरे गोष्टी आहेत. माझ्या साहित्यात शाळेच्या मैत्रीणींना लिहिलेली प्रेमपत्रे आहेत. इंग्रजी समजत नसताना इंग्रजी सिनेमे का बघितले, कमीतकमी पैशात ब्लॅकमध्ये हिंदी सिनेमांचे फर्स्ट डे फर्स्ट शो कसे बघितले, साहेबाला त्याच्या सचिवीबरोबर रेड हँडेड पकडले त्याचा उपयोग ऑफिसमध्ये कसा करून घेतला, पाहिलं प्रेम (एकतर्फी), पहिली सिगारेट, पहिला पेग, पहिले ऑम्लेट यासारख्या अनेक गोष्टी माझ्या पोतडीत आहेत. ते आपण आत्मचरित्रात लिहूच.

“ठीक आहे. आता आपण समारोपाकडे वळूया. तुमची कथा मजेदार आहे यात शंका नाही. पण सर्व सामान्य माणूस असेच जगतो. त्यात वेगळे काय आहे?”
“तेच तर वेगळे आहे सामान्य माणूस जगतो, पण किती जण त्यावर लिहितात? मग आपण का लिहू नये?”
“तुमचे पण बरोबर आहे. मी आमच्या साहेबांशी बोलते. मग काय करायचे ते बघू,”
"आता एक शेवटचा प्रश्न. तुम्ही अजूनही तुमचे नाव सांगितले नाही."
"हो."
"अहो हो काय? सांगाना." मनीषा पुढे 'गडे' लावायच्या बेतात होती पण तिने वेळीच स्वत:ला सावरले.
"माझे नाव, जाउद्या हो, पुस्तक छापायच्या वेळी सांगेन. "
"मग रिसीट कोणाच्या नावे देऊ?" बाई पण काही कमी नव्हती.
"लिहा अज्ञात जोशी म्हणून."
"जोशी आडनाव आहे तुमचे?"
"नाही, पण कुलकर्णी नको म्हणून जोशी म्हटले."

मनीषाने दिलेली चहाबिस्किटे फस्त करून मी गडकरी, किल्लेदार आणि राजवाडे प्रकाशनाच्या कचेरीचा आणि मनीषाचा निरोप घेतला. गडकरी, किल्लेदार आणि राजवाडे हे लवकरच माझे आत्मचरित्र छापतील याची मला खात्री आहे. तुम्हाला देखील कधी एकदा हे पुस्तक वाचतो असे झाला असेल. प्रत्येक प्रतीमागे पाचशे रुपये जर तुम्ही मला आगाऊ पोचते केले तर पुस्तक छापून आले की लगेचच घरपोच पाठविण्याची व्यवस्था मी करू शकेन. आणि हो, नंतर लगेचच माझा कविता संग्रह देखील प्रसिद्ध होतोय बरं का!

Comments

अफलातून आत्मचरित्र. कधी प्रकाशित करताय? माझी १०० प्रतींची आगाऊ नोंदणी लक्षात ठेवा

By : Pratibha Tarabadkar
05/05/2023 12 : 13 : 51 PM

मजा आली वाचून बरेचदा हेच दिसून येत

By : शितल
05/05/2023 2 : 00 : 47 PM

It's very nicely written. This is the TRUE picture of life of common man. Very much confused about his own entity and always feel he has Don something great.

By : Prasad khare
05/05/2023 4 : 06 : 44 PM

मस्त कथा!! खुसखुशीत विनोद!

By : SHUBHANGI JOSHI
06/05/2023 4 : 08 : 23 PM

👌👌आत्मचरित्र प्रकाशित झाल्यावर एक प्रत राखून ठेवा. 😃

By : भाग्यश्री
10/05/2023 08 : 27 : 01 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article