नात्यांची गोष्ट : भाग ११ : कलेचे दालन
“नमस्कार, मी कला.”
दुकानाचे दार बंद करता करता मी चमकून मागे पाहिले. एक साधारण पस्तिशीतील सुंदर बाई समोर उभी होती. आता पस्तिशीतल्या बाईला युवती वगैरे म्हणणे जरा जास्तीच झालं असतं. परंतु तशी छान होती. म्हणजे गोरापान वर्ण, काळेभोर मोठे डोळे, लांबसडक केस वगैरे वगैरे. कपाळावर बाजारात मिळेल ती सर्वांत मोठी लालभडक टिकली आणि कानात (खरे की काचेचे ते मला समजत नाही ) लोंबते डूल, गळ्यामध्ये चोकर. (इतके वर्ष संसार केल्यामुळे एवढे सगळे मला समाजते. बिलं माझ्याच खात्यातून जातात.). स्लीवलेस ब्लाउज आणि काळी पारदर्शक शीफाँनची साडी, इतकं सगळं माझ्या दृष्टिपटलातुन मेंदूपर्यंत क्षणार्धात पोहोचले. तसा मी कोणाही बाईच्या फंदात कधीही पडत नाही. हिला विचारा पाहिजेतर. आणि तिशीतल्या सुंदर मुली देखील माझा आदर ठेवून माझ्याकडे ढुंकूनही पहात नाहीत.
“??“
माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नाचिन्ह तिला लगेच समजले. तसा माझा चेहरा बोलका आहे.
“कला देशमुख. तुमच्या बाजूचे कलेचे दालन माझे आहे.”
ओह! म्हणजे माझ्या दुकानाच्या बाजूच्या आर्ट गँलरीच्या या मालकीण बाई होत्या तर !
“मी अशोक! तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. काय एखादा लँपटाँप वगैरे हवाय का?”, कुठलीही सुंदर मुलगी कामाशिवाय माझ्याशी बोलणार नाही याची मला खात्री होती. माझे काँप्यूटरचे दुकान असल्यामुळे लगेच माझ्यातला सेल्समन जागा झाला.
“नाही हो! मी तुम्हाला नेहमी बघते म्हणून वाटले की बोलावं एकदा तुमच्याशी.”
अजूनही आपल्यात काहीतरी अपील शिल्लक आहे हे पाहून मला जरा बरं वाटलं.
“अच्छा, म्हणजे हे कलादालन तुमचे आहे तर !” मी उगाचच काहीतरी बोलायचे म्हणून म्हणालो.
“हो ना, येताय का बघायला?”
रात्रीचे साडेआठ वाजले होते. दुकान बंद करुन मी घरी निघालो होतो. आमचं अर्धांग घरी वाट पहात होतं.
“आत्ता जरा उशिर झालाय नाही? आपण उद्या भेटूया का?”
“हरकत नाही“, मानेला नाजूकसा झटका देता कला म्हणाली. तो पाहून लगेचच कलांदोलन का करू नये असा विचार मनात आला नसता तरच नवल. पण घरी जायला उशिर झाला तर जो झटका बसेल त्याच्या विचाराने आधीच्या विचारला खो घातला.
“ठीक आहे, उद्या नक्की भेटूया पण!“ आता मानेला विरुध्द दिशेला झटकत कला उद्गारली. त्या झटक्यांनी तिचे कानातील डूल हेलकावे घेत होते आणि केसांचा शेपटा देखील.... . मी वेळीच भानावर आलो म्हणून बरं!
दुसऱ्या दिवशी जरा दाढी वगैरे करून, ठेवणीतील कपडे घालून आणि सध्या चालणारा बिना गँसवाला फॉग अंगावर उडवून मी दुकानात दाखल झालो. दोन मिनिटांत कला हजर! माझी वाटच बघत होती बहुधा! हीचं दालन चालतं नसावं अशी एक शंका मनाला चाटून गेली. बाकी सर्व तसेच होते फक्त साडीचा रंग गडद निळा झाला होता आणि ब्लाउजला मेगा स्लीव्हज् फुटले होते. हे देखील मला समजतं हल्ली! खरतरं मेगा म्हणजे मोठं. त्यामुळे अर्ध्या स्लीव्हज् ना मेगा का म्हणतात हे काही मला समजत नाही.
“येताय ना?” परत मानेचं तेच रुटीन, तेच डुलणारे डूल आणि तोच हेलकावे खाणारा केसांचा शेपटा!. लवकरच हिला स्पॅांडिलायटिस होईल की काय असे मला वाटायला लागले. अर्थात मन वेगळ्याच हेलकाव्यात बुडालं होतं ती गोष्ट वेगळी!
केशवला दुकानावर लक्ष ठेवायला सांगून मी कलादालनात शिरलो. म्हणजे मला हाताला धरून कला मला आत घेऊन गेली. दालन म्हणजे वीस बाय वीसची खोली होती. सर्वत्र मंद प्रकाश पसरला होता. चारही भिंतींवर तीन बाय दोनची पेंटिंग्ज टांगलेली होती. खोलीच्या मधे दोन रो मध्ये डिसप्ले बोर्डस होते त्यावरदेखील चित्रं होती. साधारणपणे चाळीस एक तरी ‘कला’कृती प्रदर्शनात ठेवलेल्या होत्या. प्रत्येक चित्रावर दिवे लावलेले होते.
परत एकदा मानेचे रुटीन दाखवून कला म्हणाली, “हे माझे आर्टवर्क! हे सर्व अॅबस्ट्रॅक्ट वर्क आहे. चार भागात विभागलेले आहे. पहिला विभाग भौमितिक चित्रांचा आहे.“
“म्हणजे दुसरा अंकगणीतिक असेल.” मी विनोद केला.
“अय्या, तुम्ही कसं ओळखलत?” मी (मनातल्या मनात ) कपाळावर हात मारला.
“तिसरा कॉस्मिक आणि चवथा फ्रीहँड ड्रॅाँईंग आहे.“ मी ताणून माझा आखडलेला हात फ्री केला.
“अरे वा!“ इति मी.
“हे पहिले चित्र पहा”, असे म्हणून हाताला धरून ती मला पहिल्या चित्रासमोर घेऊन गेली. मला हाताला आणि मेंदूला झिणझिण्या आल्या, श्वास अडकतोय की काय असे वाटायला लागले. परंतु पहिले चित्र पाहताक्षणीच एक विलक्षण शांतता पसरली. भिंतीवर एक तीन बाय दोनचे कॅनव्हास लावले होते. त्यावर मध्यभागी एक काळा ठिपका होता. ते पाहून मला एक जुना विनोद आठवला.
एकदा एका प्रदर्शनात फक्त एक पांढरा कागद लावून खाली “गवत खाणारी गाय” असे शीर्षक दिले होते. गवत कुठे आहे असे विचारल्यावर ते गाईने खाऊन टाकले आहे असे चित्रकार म्हणाला. मग गाय कुठे आहे हे विचारल्यावर चित्रकर्ता उद्गारला, “गवत खाउन झाल्यावर तिथे थांबायला तो काय बैल आहे का?”
“हा काय सिम्बॅालीझम आहे?” असे विचारून मी कलेला एक गुगली टाकला.
“काय परसेप्शन आहे हो तुमचं! हे एक शून्य आहे. विश्व त्यातूनच निर्माण झाले आहे.“ कधीकाळी जर नारळीकर हे प्रदर्शन बघायला आले तर त्यांना सुरवातीलाच चक्कर येईल एवढे मात्र खरे.
“या चित्राचे नाव शून्य असेच ठेवायला हवे नाही?” इति मी.
“करेक्ट, तेच ठेवलंय.”
मी पुढच्या चित्राकडे वळलो. त्यात वर हिरवा आणि खाली लाल रंग फासला होता आणि मध्ये एक आडवी काळी रेघ काढली होती.
“सीमा?” मी उगाचच मटका लावला.
“कमाल आहे हं तुमची!”, हे बोलून मानेला एक हिसका दिला गेला. इतका वेळ तिने माझा हात धरूनच ठेवला होता.
पुढील चित्रामधे असतील तेव्हढ्या रंगांचे वेगवेगळ्या साईझचे त्रिकोण काढलेले होते. चित्राचे नाव अर्थातच “त्रिकोण प्रेमाचे” असे होते. हे ओळखल्यावर तिने मला मिठी मारायचीच फक्त बाकी ठेवली होती.
“आत्तापर्यंत माझ्या चित्रांचे एव्हढे अॅप्रिसिऐशन कोणीच केले नव्हते.“
“पण याचा अर्थ काय?” वास्तविक कॉलेजमध्ये सर्व वेळ या असल्या त्रिकोणांमधेच गेला होता.
“आता बघा ना“, मी अनिमिष का काय म्हणतात त्या नेत्रांनी तिच्याकडेच पहात होतो.
“त्रिकोणात एक अ असता, एक ब असतो आणि एक क असतो. ब आणि क चे अ वर प्रेम असते, पण अ चे ब आणि क वर प्रेम नसते. त्यामुळे ब आणि क, ई आणि फ वर प्रेम करतात. अ चे मधल्या ड वर प्रेम असते. आता ग आणि –“
“अग हो, आलं लक्षात.“ परत गमभन शिकण्यात मला अजिबात रस नव्हता. आता पुढील चित्र काय असेल हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच. त्या चौकोनात आत एक आणि बाहेर दुसरा रंग फासला होता. चौकटीच्या बाहेरही एक विश्व आहे असे कला मला सांगत होती. पण मी जर चौकटीबाहेर पडलो तर भलता अनर्थ होईल हे मला जाणवले.
“तुमचे प्रदर्शन खूपच छान आहे. पण या चित्रांचं तुम्ही काय करता?”
“अहो म्हणजे काय, विकते!”
“साधारण काय किंमत असते हो एका चित्राची?”
“तुम्हीच ओळखा पाहू.” अजून एक मानेला झटका.
“पाच...,” मी रुपये म्हणणार होतो पण चुकून पाच हजार म्हणालो.
“गम्मत करताय ना माझी? अहो माझ्या दालनाचं भाडं पन्नास हजार आहे. या प्रेमाच्या त्रिकोणाची किंमत सहा लाख आहे.”
उगाच नाही लोकं म्हणतात की खरं प्रेम अनमोल असतं. कलेचा हात माझ्या हातात होता म्हणून बरं नाहीतर मी खालीच पडलो असतो. हे विकत घ्यायला मला किती वर्ष किती संगणक विकावे लागतील हा विचार माझ्या अ’कले’च्या बाहेरचा होता. या जगात अशी ‘कला’प्रेमी लोकं किती असतील असा प्रश्न माझ्या मनाला स्पर्शून गेला. उरलेले दालन आपण नंतर पाहू असे म्हणून मी कलेला हाताशी घेऊन बाहेर पडलो. दालनाबाहेर तिचा हात सोडणं भाग होतं. मी तिला म्हटलं, “तुम्हाला माहिती आहे का, एक नवीन सॅाफ्टवेअर आले आहे. आर्टवर्क नावाचं, त्यामध्ये ही सगळी चित्रे तुम्ही संगणकांनी बनवू शकता. थोडं महाग आहे पण तुम्हाला एक महिन्याची फ्री ट्रायल मी देऊ शकतो आणि विकत घेतलं तर लॅपटॅाप फ्री मिळेल.”
कलेच्या चेहऱ्यावरचे अविर्भाव पाहून मासा गळाला लागतोय याची मला जाणीव झाली. तिच्या कडून वायदा घेऊन मी (नाईलाजास्तव) तिचा निरोप घेतला.
संध्याकाळी हा सर्व किस्सा आदितीला सांगितल्यावर तिने बरोबर वर्मावरच बोट ठेवले.
“तुमची चाळीसपैकी फक्त चारच चित्र बघून झाली आहेत. उरलेली बघायला अजून नऊदहा दिवस तरी लागतील. मला पण मॅाडर्न आर्ट मध्ये रस आहे. मी पण उद्यापासून “कले”चे दालन बघायला येईन असं म्हणतेय.”
असं म्हणतात की स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळची माता असते, पण ती आपली बाप देखील असते याची जाणीव मला त्या क्षणी झाली.



Comments
कलेची ऐशीतैशी... मिश्किल शैलीत..
By : Pratibha Tarabadkar
Always fiasco in common man's life. Very nice.
By : Prasad khare
शेवटची punch line मस्त
By : Deepak Tikekar
मस्त मिश्किल शैली तुझी छान च 👌👌 पुढचं वाचायची उत्कंठा वाढली 👌👌r
By : रोहिणी joshi