भेळपुरी
भेळपुरी
शशांक पुरंदरे
मी आणि सौ. हातात हात घालून समुद्रकिनाऱ्यावर त्या ओल्या वाळूत चालत होतो. वेळ संध्याकाळी सहा-सव्वासहाची. त्या लांबवर पसरलेल्या किनाऱ्यावर गर्दी तशी तुरळकच होती. खरतरं बऱ्याच महिन्यानंतर आम्हाला असा मोकळा वेळ मिळाला होता. दोघांच्या सेवानिवृत्तीनंतर बहुतेक प्रथमच आम्ही समुद्रकिनारी फिरायला म्हणून आलो होतो.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी काही दिवस आधीचा सूर्यास्त कधी अनुभवला आहे का तुम्ही? आकाशात थोडे काळे ढग तरंगत असतात. समुद्र उधाणलेला असतो. आकाशाच्या गर्द निळाईच्या छटा सहचरीच्या गालावर उमटत असतात. मधूनच एखादा समुद्रपक्षी अवकाशातून पाण्यावर झेपावतो. जसजसा सूर्याचा लोहगोल क्षितिजाकडे झुकतो तसतश्या विविध रंगछटा पश्चिमेवर उमटत रहातात. हळूहळू अवकाशात मेघांची दाटी होऊ लागते. मेघांची जरीकिनार उसवत सूर्यकिरणे लपंडाव खेळत असतात. दूर लालबुंद सूर्यबिंब सागररेषेवर विसावते आणि लगेचच अवकाशात इंद्रधनूच्या रंगांची उधळण होते. प्रिय व्यक्तीचा हात हातात घेऊन अनिमिष नेत्रांनी हे दृष्य कितीही वेळा अनुभवलं तरी मन भरत नाही.
“अहो, आज भेळ खाऊया का आपण? आणि नंतर नारळपाणी पिऊया.” सौ. च्या आवाजाने मी भानावर आलो.
“हो, चल.” असे म्हणून आम्ही भेळपुरीच्या रांगांकडे वळलो. समोरच एक गाडी होती व त्यावर ‘वाचक भेळपुरी’ असे नाव लिहिले होते. मला नाव जरा वेगळं वाटलं. गाडीसमोर तीन चार कॉलेजचे विद्यार्थी, काही मध्यमवयीन महिला आणि दोन वृद्ध गृहस्थ भेळ खात उभे होते. एक साधारण चाळीस वर्षाचा माणूस गाडीवर भेळ बनवत होता.
“भैया, दो भेलपुरी देना.”
“साहेब, मी मराठीच आहे. देतो पाच मिनिटात.” असे म्हणून तो कामाला लागला.
भेळपुरीच्या गाडीवर मी मराठी माणसाची अपेक्षाच केली नव्हती. मी त्याच्याकडे नीट निरखून पाहिले. चांगला शिकलेला माणूस वाटत होता. त्याच्या गाडीवर भेळपुरीसाठी लागणारे नेहमीचे साहित्य होते. शिवाय भेळपुरी बांधून देण्यासाठी म्हणून कागदांचे पाच सहा वेगवेगळे गठ्ठे होते. पण तो जेव्हा भेळपुरी कागदात घालून देत होता तेव्हा मला काहीतरी वेगळेपण जाणवलं. तो आधी गिर्हाईकाकडे पाहून एका विशिष्ट गठ्ठ्यातील कागदात बांधून तो भेळपुरी देत होता. शिवाय खाण्याकरता वेगळे लाकडी चमचे पण होते.
“साहेब, घ्या.” असे म्हणून त्याने मला आणि सौ. ला भेळपुरी दिली. वर एकेक चमचा दिला. मी चमचा निरखून पहिला तर त्याच्या दांड्यावर आचार्य अत्रे यांची स्वाक्षरी होती, तर सौ. च्या चमच्यावर जयवंत दळवी यांची सही होती.
“हा काय प्रकार आहे?” मी न राहवून त्याला विचारले.
“साहेब, आधी भेळतर खाऊन पहा, मग सांगतो.”
हे सर्व पाहून आमचे कुतूहल जागृत झाले नसते तरच नवल! अपेक्षेनुसार भेळ स्वादिष्ट होती. चमचा तर संग्रही ठेवण्याजोगा होताच, पण खाऊन झाल्यावर टाकण्यापूर्वी मी भेळ बांधलेला कागद उलगडून पाहिला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. त्या कागदावर आचार्य अत्रे यांचे भाषण छापलेले होते. सौ. च्या कागदावर जयवंत दळवी यांची एक कथा होती.
बाजूला कॉलेज तरुण उभे होते, त्यांच्या हातात जे कागद होते त्यावर सिनेनटांची किंवा खेळाडूंची चित्रे होती.
“कशी वाटली भेळ? आवडली का?”
“भेळ तर मस्तच आहे पण हे सगळं काय आहे, सांगाल का मला?”
“हो सांगतो.”
जरा वेळाने तो आमच्या जवळ आला.
“मी गजानन पाटील. मी कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरला आमची खाण्यापिण्याची बरीच दुकाने आहेत. मुंबईचे मार्केट कसे आहे ते पहाण्यासाठी मी ही गाडी टाकली आहे. तसा मी कला शाखेचा स्नातक आहे. मला वाचनाची खूप आवड आहे. भेळपुरी बरोबर लोकांना काहीतरी वेगळे द्यावे ह्या हेतूने मी हा प्रयोग सुरु केला आहे. पोटाबरोबर डोक्यालाही खाद्य मिळावं अशी माझी कल्पना आहे. मी समोरच्या माणसाची देहबोली पाहून त्याप्रमाणे कागद निवडून भेळ बांधून देतो. नव्वद टक्के लोकं तरी कागद वाचतात आणि चमचे संग्रही ठेवतात. कागदांमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्यप्रकार, सिनेमा नटापासून प्रसिद्ध खेळाडू आणि महत्वाच्या सार्वजनिक व्यक्ती यांच्याशी संबंधित लेख मी तयार करून भेळेबरोबर लोकांना देतो. तेव्हढेच थोडे समाजकार्य घडते हातून!”
माझ्या प्राध्यापकी जीवनात मी अनेक प्रकारच्या व्यक्ती पाहिल्या होत्या. पण याच्यासारखा अवलिया प्रथमच पहात होतो. मी मनापासून या उपक्रमाबद्धल त्याचे अभिनंदन केले आणि अजून एका भेळेची विनंती केली. या वेळेस आम्हाला दोघाना पुलंची दोन वेगवेगळी व्यक्तिचित्रे मिळाली.
घरी जाऊन पुलंची व्यक्तिचित्रे वाचताना मनात विचार आला, आयुष्यात पुलंना अनेक व्यक्ती आणि वल्ली भेटल्या असतील, पण असा अवलिया भेळपुरीवाला भेटणे मात्र माझ्याच नशिबात होते.



Comments
वाचक भेळपुरी, कल्पना आवडली .भन्नाट कल्पनाशक्ती.पावसापूर्वीच्या समुद्राचे, आसमंताचे वर्णन मस्त.
By : हेमांगी प्रदीप कुलकर्णी.
खूप छान! पुलंना असा अवलिया भेटला असता तर चितळे मास्तर,नारायण यासारखा व्यक्ती आणि वल्ली मधून आपल्या भेटीला आलाच असता.कल्पना मस्तच.
By : योगिनी लोथे
Brilliant idea !!!
By : Pradeep Deshpande