अपहार
अपहार
शशांक पुरंदरे
महाराज विक्रमादित्य पहाटे ९ वाजता राजसभेच्या दालनात अवतीर्ण झाले. शिपायाने महाराजांना मुजरा केला.
“आमच्या सचिवांना पाचारण करा.” महाराजांनी आज्ञा दिली.
“कुणाचे चरण धरु महाराज?” बुचकळ्यात पडून शिपायाने प्रश्न केला.
“म्हणजे सेक्रेटरींना बोलवा.” महाराजांनी सोप्या भाषेत खुलासा केला.
सचिव झाडमोडे यांनी दालनात प्रवेश केला.
“महाराज चक्रमादित्यांचा विजय असो.” झाडमोडे म्हणाले, आणि मग आपली जीभ चावली. “क्षमा असावी, जरा जीभ घसरली.”
“ शिशुपालाला देखील शंभर गुन्हे माफ होते, तर तुमची काय स्टोरी, आपलं कथा! कथेवरून स्मरण झाले, आपल्या शिपायांना मराठी का उमजत नाही बरे?”
“च-विक्रमादित्य महाराज, मराठी भाषेचा फतवा कालच आला आहे. कार्यान्वित होण्यास काही अवधी द्यावा लागेल.”
“किती?” महाराजांनी डायरेक्ट मुद्यास हात घातला.
“म्हणजे पहा, या वर्षी पहिलीत मराठी कंपल्सरी, माफ करा, परत जीभ घसरली, सक्तीची केली जाईल. नंतर दुसरी, असे करत पाच एक वर्ष तरी लागतील. शेजारच्या राज्याने हाच पॅटर्न, माफ करा, उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पहिलीत बसण्याचा हुकूम दिला आहे. “
“यात वेळ खूप जाईल. दुसरा काही उपाय?”
“आहे महाराज. आपण खासगी संस्थेशी करार करुन संयुक्तिक अभ्यासक्रम राबविला तर एका महिन्यात काम होईल. शेजारचे राज्य तेच करते.”
“झाडमोडे, तुम्ही मघापासून शेजारच्या राज्याचा उल्लेख करताय, परंतु आपले राज्य पटेलांनी केव्हाच खालसा केलंय, आणि उरलीलुरली स्वायत्तता निवृत्ती वेतन देऊन शहांनी खालसा केली. आपले राज्य केवळ नाममात्र उरले आहे. असो. आमच्या वडिलोपार्जित संपत्तीमधून महालाचा रहाटगाडगा आम्ही हाकतो आहोत. झाडमोडे, नावावरून आठवण झाली. राजवाड्याभोवतालची झाडे वजनाने मोडायच्या अवस्थेत आहेत. शिवाय गवत उंच दाट दाट झाले आहे. आपण याबाबत त्वरित कारवाई का केली नाहीत?”
“क्षमा असावी, परंतु गवत कापणी यंत्रातील तेल संपले आहे. रशियाकडून आयात करावी का?”
“काही गरज नाही. बाजूच्या पेट्रोल पंपावरुन आणण्यात येईल. झाडमोडे, तुम्हाला कशासाठी नेमले आहे?”
“व्यवस्था पहायला.”
“मग आमच्या चहाची काय व्यवस्था आहे?”
“मी आत्ताच मुदपाकखान्यात जाऊन चहापानाची व्यवस्था करतो.”
“झाडमोडे, समूह असेल तर चहापान होते, इतर वेळेस नुसताच चहा होतो. आणि हल्ली चहापान फक्त बहिष्कार घालण्याकरता ठेवले जाते. राणीसरकार उठल्या का?”
“नाही महाराज, महाराणी सरोजिनी आणि देवी अजूनही निद्रिस्त आहेत. काल रात्री त्यांची किटी पार्टी होती.”
“झाडमोडे, आमचा दुसरा विवाह कधी झाला?”
“महाराज?”
“या ‘आणि देवी’ कुठून उत्पन्न झाल्या?”
“क्षमा असावी, जरा जीभ घसरली, आम्हाला सरोजिनी देवी म्हणायचे होते.”
“तुमची जीभ आज सतत का घसरते आहे?”
“आज येताना साजूक तुपातील शिरा सेवन केला होता, त्यामुळे जीव्हा गुळगुळीत झाली आहे.”
“आमच्या न्याहरीची काय व्यवस्था आहे?”
“दुग्धमिश्रित फुललेल्या लाह्या तयार आहेत महाराज!”
“तुम्हाला साजूक तुपाचा शिरा, आणि आम्हाला लाह्या? होमात घाला त्या!” राजे वैतागून म्हणाले.
“त्यासाठी आपणास दुसरा विवाह करावा लागेल.”
“झाडमोडे. रिकाम्या पोटी विनोद सहन होत नाही!”
“क्षमा असावी, पण महाराणी सरोजिनीदेवींचा तसा आदेश आहे. त्याने शरीरातील मेद कमी होण्यास मदत होते.”
“तसे असेल तर आम्ही दुसऱ्या लग्नाचा विचार करु.”
“महाराज??”
“आम्ही देखील विनोद करु शकतो. आई ग! रिकाम्या पोटी केल्यामुळे पोटात मुरडा आला. जा, चहा आणि न्याहरी घेऊन या. लाह्या खाण्याच्या विचाराने आमच्या शरीराची लाहीलाही होत आहे, पण इलाज नाही. राणीसरकार नेहमी आमच्या भल्याचाच विचार करतात.”
“इथे मी आपणास कळवू इच्छितो”, झामो म्हणाले, “की काल किटीपार्टी नंतर रमीचे डाव देखील झाले. दुर्दैवाने त्यात सरोजिनी देवी दहा हजार रुपये हरल्या. रमी मधे अजूनही सरोजिनी देवींना सिक्वेन्स कसा लावायचा ते समजत नाही.”
“हार आमच्या नशिबात लिहिलेली आहे. लग्नाच्या हारापासून सुरुवात झाली आहे.” लाह्या खाताखाता महाराज उदगारले.
“आपली लग्नाची काय कथा आहे महाराज?”
“ती अतिशय रंजक आहे.” महाराज चहाचा घोट घेताना सांगत होते. “ आमचे पिताश्री उदयनराजे पहिल्यापासून सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांनी सामूहिक विवाह प्रथा सुरु केली आणि आमचा विवाह तेंव्हाच लावला गेला. पण शंभर विवाहांच्या गर्दीत आमची नियोजित पत्नी आणि सरोजिनी देवी यांची अदलाबदल झाली. मधे अंतरपाट असल्यामुळे लक्षात आले नाही.”
“तरीच आम्ही विचार करत होतो की आपण काळेसावळे, जेमतेम पाच फुटी, तरी सरोजिनी देवींनी आपल्याशी कसा विवाह केला.” झामो म्हणाले.
“तुम्ही आमचा अपमान करताय?”
“नाही महाराज, आम्ही फक्त वस्तुस्थिती कथन केली.”
“करु नका.”
“होय महाराज.”
“विवाहानंतर लगेचच महाराणी सरोजिनीदेवी काडीमोड घेणार होत्या पण आमच्या-“
“व्यक्तिमत्व?”
“संपत्तीवर भाळून त्यांनी तो विचार रद्द केला. नंतर आम्हाला रत्नाराजे हे कन्यारत्न आणि विक्रम व आदित्य ही जुळी अपत्ये झाली. आमचे कन्यारत्न राजकुमारी रत्नाराजे कुठे आहे?”
“त्या रात्रीच शहर मॅरेथॅानमधे भाग घेण्यासाठी रवाना झाल्या. जाताना त्यांनी मातोश्री विजयादेवी यांचा आशिर्वाद घेतला. त्यांनी ‘सावकाश पळ, पडलीस तर लागेल’, असा आशिर्वाद दिला. पण त्यास न जुमानता जोरात पळून राजकुमारी पहिल्या क्रमांकावर आल्या.”
“न ऐकणे आमच्या घराण्याची परंपरा आहे. विक्रम आणि आदित्य कुठे आहेत?”
“अजून निद्रिस्त आहेत. सकाळी सहा वाजता शयनगृहात गेले होते. काल रात्री सगेसोयऱ्यांबरोबर जलसा झाला.”
“सगसोयरे म्हणू नका, मित्रमैत्रीणी म्हणा. हल्ली सगसोयरे याचा नक्की अर्थ काय यावर बरेच चर्वीचर्वण सुरु आहे.”
“काय… सुरु आहे??”
“जाऊदे. हे समजणे तुमच्या कुवती पलिकडचे आहे.”
“महाराज, थोडे बोलायचे होते. संयुक्त अभ्यासक्रमासाठी एक खासगी संस्था एका महिन्याच्या दहा लोकांच्या उच्च मराठी शिक्षणासाठी दहा लाख रुपये मागत आहे.”
“मग?”
“आपल्या तिजोरीत एव्हढे पैसे नाहीत.”
“का?”
“कालच्या जलशासाठी विक्रम आणि आदित्य राजांनी एक नृत्यांगना बोलावली होती. तिला एक लाखाचे मानधन देण्यात आले. मद्यपान आणि भोजनावर दोन लाख रुपये खर्च झाले.”
“काय?? हा खर्च कुणी मूर्खाने मंजूर केला होता?”
“काल रात्री आपणच मंजुरी दिली होती.”
“कधी? मला का स्मरत नाहीये?”
“कारण ….. रात्री आपल्याला जरा जास्त झाली होती.”
“बरं…बरं. आम्ही काहीतरी व्यवस्था करू. आपले एकंदर किती कर्मचारी आहेत?”
"मी धरुन अकरा. पण या सर्वांना, म्हणजे मी सोडून इतरांना कर्मचारी ही उपाधी अयोग्य आहे. कारण कामे कोणीच धड करत नाही.”
“झामो, याचा अर्थ तुम्ही काम करत नाही असा होतो. कारण कामे करुन घेणे हे तुमचे काम आहे.”
“होय महाराज.”
“आपली आयात कमी करा, पैसे वाचवा. सकल घरेलु उत्पन्न वाढवा, आपल्या निर्यातीचा आपण जरा आढावा घेऊ या. या, आसनस्थ व्हा.”
“महाराज!!??”
“म्हणजे बसा !” असे म्हणून महाराज सिंहासनावर विराजमान झाले. “बोला.”
“काय…. महाराज?”
“आपल्याकडे शंभर एकर जमीन आहे. यात आपण काय करतो?”
“एक क्रिकेटचे मैदान आहे. दोन्ही युवराज, सगेसोसऱ्यां.. क्षमा असावी, परत जीभ घसरली, मित्रांसमवेत तिथे खेळत असतात.”
“झामो, मी निर्यातीबद्दल बोलतोय.”
“आपण शंभर गाढवं, पन्नास गाढवेआणि पन्नास गाढवाीणी आहेत. आपण गाढवांच्या शेपटीचे केस वापरुन त्यांचे ब्रंश बनवतो जे अमेरिकेला निर्यात होतात.”
“या ब्रशचा काय उपयोग आहे?”
“ब्रशचा उपयोग गालाला ब्लश लावण्या करता केला जातो.”
“ब्लश म्हणजे काय?”
“ब्लश म्हणजे लाली. आपण राजकुमारी रत्नाराजे यांच्या पार्लर मधे जाऊन बघू शकता. आता अमेरिकेने टॅरिफ लावल्यामुळे आपण युरोपला निर्यात करु लागलो आहोत. अमेरिकेच्या अध्यक्षांनी यासाठी अमेरिकन गाढवं वापरण्याचे आदेश दिले आहेत, पण ते अव्यवहार्य आहे. कारण अमेरिकन गाढवं कामाची नाहीत. त्यांना अतिशय आखूड शेपट्या असतात. आपण आपल्या गाढवांची पैदास वाढविण्याकरता कंबर कसली आहे.”
“का? त्यासाठी गाढविणी नाहीत??” असे म्हणून महाराज खोखो हसले.
“महाराज…..! कमरेखालचे विनोद आपणांस शोभत नाहीत.”
“बरं…!”
“शिवाय गाढवींचे दूध आपण आफ्रिकेला पाठवतो. तिथे त्याला खूप मागणी आहे. या सर्व व्यवसायातून आपल्याला वर्षाला दहा लाख डॅालर मिळतात. शिवाय इतरही अनेक कुटीरोद्योग आहेत. एकंदरीत बरं चालले आहे.”
“ते सर्व ठीक आहे, पण झामो, काल राज्याचे लेखापाल आम्हाला भेटले होते.”
“आपल्या राजवाड्यात पाल? हे बरे नव्हे. मी आजच पेस्ट कंट्रोलची निविदा जारी करण्याचा हुकूम देत आहे.”
“या राज्यात राजे कोण आहेत?”
“आपण महाराज!”
“मग तुम्ही हुकूम का देत आहात?”
“क्षमा महाराज, पुन्हा जीभ घसरली!”
“आणि पाल नव्हे राज्याचे लेखापाल आम्हांस भेटले. त्यांनी तुमच्या विरुद्ध पुरावे सादर केले आहेत.”
“क.. कसले पुरावे महाराज?”
“तुम्ही राज्याच्या निधीचा अपहार केला आहे.”
“उपहार? आम्ही घरूनच न्याहरी करुन जेवणाचा डबा घेऊन येतो. आम्ही इथल्या उपहारगृहात जात देखील नाही.”
“उपहार नव्हे, अपहार! त्याला मराठीत फ्रॅाड म्हणतात. राज्याच्या प्रत्येक निविदेमागे तुमचा पंधरा टक्के रेट आहे,”
“पंधरा नाही पंचवीस-.” झामोनी जीभ चावली.
“बरे झाले तुम्ही स्वतःच कबूल केले. आम्ही तुम्हाला कामावरून ताबडतोब काढून टाकत आहोत. यामिनी, आत या!”
एक पंचवीस वर्षांची सुंदर तरुणी दालनात आली.
“आज पासून यामिनी तुमचे काम पाहिलं. आपण या आता! राज्याचे न्यायमूर्ती रामशास्त्री तुमच्यावर रीतसर खटला चालवून तुम्ही आत्तापर्यंत खाल्लेले सर्व धन तुमच्याकडून व्याजासकट वसूल करतील!!!”



Comments
उपहासात्मक fantasy सॉरी ज्याला मराठीमध्ये कल्पनारम्यता म्हणतात. वाचायला मजा आला की आली
By : Deepak Tikekar
Excellent Sacratication. Very nicely written.
By : PRASAD KHARE
Humour and sarcasm, good mix, very entertaining!
By : Sheela Bahadkar