माझा स्तंभ-५
आजचा स्तंभ संस्कृती आणि परंपरा यांचा अनाठाई उदोउदो करणार्यांसाठी आहे. दसऱ्याच्या दिवशी मला ताप होता. माझे घर मुख्य रस्त्यापासून साधारण ३००-४०० मीटरवर आहे. रस्त्यावरील मिरवणूकांचा एव्हढा आवाज होता की खिडक्या बंद करूनही बसणे अशक्य होते. रस्त्यावरचा डीजे जणू देवीला सांगत होता की नीट दांडा धरून बस नाहीतर पडशील. दहीहंडी, गणपती, नवरात्र सगळीकडे हाच प्रकार आहे. परंपरेच्या नावाखाली घातलेला धिंगाण्याबद्धल कुणी प्रश्न विचारू शकत नाही. परंपरेच्या नावाखाली कर्णकर्कश्य आवाजात मिरवणुका काढणे आणि त्यात अशी गाणी वाजवणे ही परंपरा बहुतेक अनंत कालापासून चालत आली असावी.
दुसरी परंपरा बाळ ठाकरे यांनी सुरु केली ती म्हणजे दसरा मेळाव्याची. शिवसेनेची दोन शकले झाल्यावर मेळावे पण दोन झाले. महाराष्ट्रातून गावागावातून “कार्यकर्त्याना” पकडून मुंबईला आणायचे, त्यांना आणि पर्यायाने पूर्ण शहराला दिवसभर वेठीला धरायचे, आणि मेळाव्यात भाषणे ठोकून एकमेकांना यथेच्छ शिव्या द्यायच्या यापलीकडे यातून काहीही साध्य होत नाही. पण काय करणार, परंपरा पाळली पाहिजे ना? हे फक्त माझे मत नाही. यासाठी महाराष्ट्र टाइम्स मधला अग्रलेख वाचावा.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करून शिंदे यांची खुर्ची वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. सत्तेचा दुरुपयोग किती करावा याचे हे उत्तम उदाहरण आहे. तसेही राज्याचे खरे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. पण सध्याच्या “बेकायदा” सरकारने दीड वर्षात जे काही काम केले आहे ते महाभकास आघाडीला अडीच वर्ष जमले नाही हेही तितकेच खरे आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाने एकंदरीत तळ गाठला आहे हे मात्र खरे! यातच मराठा आंदोलनाने परिस्थिती अधिकच अवघड करून टाकली आहे. पण काळजी नसावी, सर्वच राजकारणी निर्ढावलेले आहेत. आता काही निरपराध माणसांचे यात बळी जात आहेत आणि जातील देखील! पण त्याग केल्याशिवाय काही मिळत नाही. फक्त त्याग हा इतरांनी करायचा असतो, आपण नाही! स्वत: झेड सिक्युरिटी वापरायची आणि इतरांना म्हणायचे, लढा!!
तिलोत्तमा सेन, वय वर्ष १५. नाव लक्षात ठेवा. तीन वर्षापूर्वी छोटा भीम बघणारी ही मुलगी आज ओलिंपिक नेमबाजी स्पर्धेसाठी साठी पात्र ठरली आहे. दहा पंधरा वर्षांची ही मुले आज ते करत आहेत जे इतर करण्याचा विचारही करू शकत नाहीत.
आजची सकाळ उजाडली तीच एका दु:खद बातमीने. पूर्ण जगाला हसायला लावणाऱ्या “friend” मथ्यू पेरीच्या निधनाची बातमी. असा क्वचितच एखादा असेल ज्याने ही मालिका पहिली नसेल. अशी मालिका आणि असे कलाकार पुन्हा होणे नाही!!



Comments
Forget about outside noise, this Navratri, the aarti in our Society was unique too! Everybody was clanging टाळ such that nobody's hands were free to clap. To add to the commotion by the 5th day somebody had brought a brass ghadiyal ghanta and was hammering away to glory throughout the aarti.
By : Sheela Bahadkar