राजा - बंडू कथासंग्रह


हळदीकुंकू

“बंड्या,” बशीतले कांद्याचे भजं पुदिना चटणी मध्ये बुडवून तोंडात टाकत राजा म्हणाला, “हल्ली या बायकांची ताईगिरी जरा जास्तीच वाढली आहे असे तुला नाही वाटत?”
“माझे लग्न झालेले नसल्यामुळे याचे उत्तर मी देऊ शकत नाही, पण माझ्या घरी आईगिरी मात्र नक्की वाढली आहे हे मात्र खरे! रोज सकाळी लाथ मारून सहा वाजता मला उठवते माझी आई!” असे म्हणून बंडूने दोन भजी एकदम तोंडात कोंबली.
“बायकांना वाटते, आपल्याला काहीच कळत नाही. हो आता भाजी विकत घेताना चुकतो माणूस कधीतरी. कोबी आणि फ्लॉवर मधला फरक पटकन नाही लक्षात येत. कोथिंबिरी ऐवजी कढीपत्ता येतो घरी चुकून. पण म्हणून एव्हढी ताईगिरी बरी नाही. आता हेच बघ ना, सकाळी बायकोने भाजीवाल्याला फोन करून भाजी मागवली. मी तिला मदत व्हावी या हेतूने दरवाजा उघडून भाजी घेतली आणि स्वयंपाकघरात नेऊन ओट्यावर ठेवली. त्यात कोबी होता म्हणून मी सहज हिला सुचवलं की आज सकाळी कोबीची भजी कर. तर ती चक्क नाही म्हणाली रे! म्हणाली कोबी भाजी करायला आणला आहे. मी म्हटले मग कोबीची पीठ पेरून भाजी कर. तर म्हणाली नाही, मी डाळ आधीच भिजत टाकली आहे. आता तू सांग याला काही अर्थ आहे का? आपण काहीही म्हटले की बरोबर त्याच्या उलटे करायचे. त्यामुळे आज कांदा भजी खावी लागत आहेत आपल्याला!” शेवटचे भजं संपवीत राजा उद्गारला.
“पण आपण तरी काय करू शकतो या बाबतीत? नाहीतर स्वयंपाक करायची पाळी आपल्यावर येईल.”
“पण काही क्षेत्रातील स्त्रीयांची मक्तेदारी आपण मोडू शकतो. माझ्या डोक्यात एक अफलातून कल्पना आली आहे. यावेळेला १५ तारखेला संक्रांत आहे. या बायकांना संक्रांत कशाशी खातात हे माहित नसेल पण हळदीकुंकू मात्र न चुकता करतात.”
“कशाशी खातात रे? म्हणजे त्या दिवशी तिळगुळ खातात हे माहिती आहे. पण का ते माहिती नाही.” बंडूने आपली अज्ञानाची कबुली दिली.
“अरे सध्या थंडीचे दिवस आहेत ना, गूळ उष्ण असतो, म्हणून तिळगुळ खातात.
“संक्रांत साजरी करण्याचे वैज्ञानिक कारण देखील आहे. त्या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात संक्रमण करतो.”
“म्हणजे?”
“म्हणजे इतके दिवस सूर्य दक्षिणेला जात असतो, तो उत्तरेला जायला सुरुवात करतो.”
“अरे पण सूर्य तर पूर्वेकडून पश्चिमेला जातो ना रोज!”
“बंड्या, तुझ्यात आणि या बायकांमध्ये फारसा फरक नाहीये. अरे पृथ्वी ज्या अक्षात स्वत:भोवती फिरते तो अक्ष २३ अंशांनी कललेला आहे, त्यामुळे दर १४ जानेवारीला हे संक्रमण होते. १४ तारखेला सूर्य मकरवृताच्या बरोबर डोक्यावर येतो आणि मग तो परत कर्कवृत्ताकडे जाऊ लागतो. म्हणून १४ तारखेनंतर उष्णता वाढू लागते. तुझ्या माहितीसाठी सांगतो, कर्कवृत्त भारतातून जाते.
पण मुद्दा तो नाही. बायकांची मक्तेदारी मोडण्यासाठी यावेळेला आपण हळदीकुंकू करूया.”
“म्हणजे आपण कपाळाला हळदीकुंकू लावायचे?”
“अरे नाही रे, आपण सर्व पुरुष मंडळीनी भेटून समारंभ साजरा करायचा.”
“समारंभ म्हणजे हे ना...?” ओठांकडे अंगठा नेऊन बंड्याने स्वाभाविक प्रश्न केला.
“म्हणजे अगदीच तसे काही नाही, पण म्हणजे पुरुषांचे स्नेहसंमेलन म्हण हवे तर!
यावेळेला संक्रांत १५ तारखेला आली आहे. रविवार आहे, सर्वांना सुट्टी आहे. माझी बायको हळदकुंकाला मैत्रिणीकडे जाणार आहे. तेव्हा सगळ्यांना माझ्या घरी बोलावू.”
“पण तिळाचे लाडू..?”
“प्रशांत कॅार्नर! आणि सोल्जर्स काँट्रीब्युशन! भरपूर खायला आणूया! चार वाजता आहे त्यामुळे पिणे जमणार नाही, पण चालेल एक दिवस! हळदीकुंकाऐवजी बुक्का लावू.”
“आणि वाण?”
“म्हणजे?”
“अरे, त्या बायका नाही का वस्तू वाटतात!”
“बंड्या लग्न झाले नाहीये तरी तुला बरीच माहिती आहे हं! आपण प्रत्येकाला एक पेग मेझर आणि सिगारेट लायटर देऊया. उपयोगी पडेल. आणि व्हिडीओ बनवून सगळ्यांना पाठवून देऊ. आणि त्याला शीर्षक देऊया, बायकांवर संक्रांत!
“बंड्या, तुला माहिती आहे का?, मी आधीच आपल्या लग्न झालेल्या आणि अविवाहित मित्रांना फोन करून आमंत्रण पण दिले आहे.”
“पण बायका तर फक्त विवाहित महिलांना बोलावतात.”
“आपण नवीन प्रथा पाडूया.”
“पण मग आपले मित्र काय म्हणाले?”
“सर्व अविवाहित मित्रांनी लगेच हो म्हटले. पण बहुतेक विवाहित मित्रांनी हिला विचारून कळवतो असे सांगितले आहे.”

ट्वेन्टी२०

संध्याकाळचा सातचा सुमार असेल. आमच्या घराची घंटा वाजली. कोरोना काळात आत्ता कोण आलं असेल असा विचार करत दार उघडले तर समोर बंड्या उभा. काय रे विचारेपर्यंत साहेब आत येऊन सिंकवर हात धुऊन सोफ्यावर विराजमान होतात्से मला म्हणाले, “अरे राजा, आयपीएल लाव जरा. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर मॅच आहे.”
बंडू माझे घर स्वत:चेच असल्यासारखा वागतो. आता उमालाही त्याची सवय झाली आहे.
“अय्या भावजी, तुम्ही! तुम्हाला वर सोडलं कसं वॅाचमनने?”, उमा उद्गारली.
“त्यात काय, मी तुमचा टीव्ही दुरुस्त करायला आलोय असे सांगितले. आहे काय नी नाही काय!”
“भावजी, धन्य आहे तुमची!” उमा कोपरापासून दोन्ही हात जोडून म्हणाली.
“वहिनी, जरा चहा टाका, आणि हो, हे बीयरचे कॅन फ्रीझर मध्ये टाका. एका तासात थंड होतील. आणि जरा कांदा भाजी तळा.” बंड्याने हॉटेलमध्ये वेटरला ऑर्डर द्यावी तशी ऑर्डर दिली.
“हो हो, मला पण आज भजी खावीशी वाटत होती. लगेच बनवते,” असे वदून आमची अर्धांगिनी मुदपाकखान्यात चालती झाली. हीच फर्माईश मी केली असती तर दहा मिनिटे ऐकावं लागलं असतं. हा बंड्या हिच्यावर काय जादू करतो कोण जाणे.

मी उठून मुकाट्याने टीव्ही ऑन केला. मी आयपीएलचा फारसा चाहता नाही पण वेळ जाण्यासाठी बघतो कधीतरी. मला टेस्ट क्रिकेट जास्ती आवडते.

पाच मिनिटात उमा चहा घेऊन बाहेर आली. बंडूने आधीच समोरच्या टेबलावर पाय पसरून स्वत:ला कम्फर्टेबल केले होते. उमाने चहाचा कप आणि बिस्किटांची प्लेट बंडू समोर ठेवली.

“कुणाची मॅच आहे? कुठे वानर वेडे स्टेडियमवर आहे का? किती ओव्हरची आहे. त्या हम्पायाराचा शर्ट किती छान आहे. मी तुम्हाला हाच रंग सांगत होते.” उमाचे धावते वर्णन सुरु झाले. खरंतर हिला क्रिकेटमधला क देखील कळत नाही.
“पहिली गोष्ट म्हणजे ते वानर वेडे नाही तर वानखेडे स्टेडियम आहे. आणि हंपायर नाही अंपायर म्हणतात त्याला. आणि मी ऑफिसला पिवळ्या रंगाचा शर्ट घालून गेलो तर कसे दिसेल?” मी वैतागून म्हणालो.
“तुम्हाला मेली कसली हौसच नाही. कायम पांढरे किंवा निळे शर्ट घालून जात असतात. हो की नाही भावजी?”
तोंडात बिस्कीट असल्यामुळे बंडूने येउ घातलेल्या भज्यांना स्मरून नुसतीच मान डोलावली.

“अरे वा रोहित आला आहे वाटते खेळायला. किती हँडसम आहे नं! उन्हात खेळून काळवंडलाय जरा. सगळ्या मॅचेस रात्रीच खेळवल्या पाहिजेत. सनक्रीमचा खर्च वाचेल. बायको मात्र सोसो च आहे त्याची.” कुठल्याही बाईने दुसर्‍या बाईचे कौतुक केल्याचे उदाहरण सापडणे कठीणच आहे.
पण दुसऱ्याच क्षणी उमाने माझी विकेट घेतली.
“विराटची मॅच आहे म्हणजे अनुष्का आली असेल ना. मला बाई खूप आवडते. डिलीव्हरीनंतरही छान फिगर मेंटेन केली आहे तिने.”
“सध्या कोरोनामुळे प्रेक्षकाना प्रवेश नाही.”
“उगाच थापा मारू नका. आवाज तर येतो आहे ओरडल्याचा!”
“अग तो रेकॅार्डेड आवाज आहे.”
“हो का? अगदी खरा असल्यासारखा वाटतोय!”
“अग बाई, खराच आहे पण आधीच्या मॅचेसमध्ये रेकोर्ड केलेला आत्ता वापरताहेत.”
“कठीण आहे बाई! खरं खोटं काही समजेनासे झाले आहे. टाळेबंदी मध्ये अनुष्का विराट बरोबर खेळत होती म्हणे! मग मुलाला कोणी संभाळलं असेल हो?”

मी काही न बोलता चहाचा कप तोंडाला लावला. बंडू मात्र शांतपणे आमचे संभाषण ऐकत चहा पीत होता.

“तुम्हाला माहिती आहे का मी शाळेत होते तेव्हा एका अक्राळ विक्राळ खेळाडू खेळायचा म्हणे! आमच्या वर्गात एक मुलगा होता तो कॅामेंट्री करायचा. तेव्हा तो सांगायचा, ही हॅज वन शॅार्ट लेग, वन लाँग लेग, वन स्क्वेअर लेग. अँड देअर इज नऊ रन. मला कल्पना पण करवत नाही कसा दिसत असेल. नऊ काय दहावीस रन सहज काढेल एव्हढे पाय असतील त्याचे तर.”
“माझे आई, तो फिल्डिंग पोझीशनचे वर्णन करत होता, आणि नऊ नाही नो रन असेल ते.”
“असेल बुवा. मला मेलीला काय कळतंय?” उमा फणकाऱ्याने उद्गारून भाजी तळायला आत निघून गेली. माझ्या दृष्टीने आपल्याला कळत नाही हे समजले हेच खूप होतं.

“दोन पायात जास्ती अंतर ठेवलं तर रोहित स्पिन नीट खेळू शकेल.” बंडूच्या एक्स्पर्ट टिप्पण्या सुरु झाल्या. “लग्न केल्यामुळे विराटचा फॉर्म गेला. आता तुझेच बघ ना,” बंडूने माझ्याकडे मोर्चा वळवला, “लग्नानंतर तुझे पण पोट सुटले ना.” माझ्या घरी येऊन माझ्याच तेलात तळलेली भजी खाऊन स्वारी माझ्या पोटावर उठली होती.

“बरोबर आहे तुझं. हे तुझ्या बाबतीत होणे शक्य नाही, कारण तुझे तर लग्न होण्याआधीच पोट सुटलंय.” मी बंडूचा पार त्रिफळाच उडवला.

थोड्या वेळाने बीयर, भजी आणि उमा बाहेर आली. बंडू मॅच विसरून भज्यांचा समाचार घेऊ लागला. इकडे रोहित शर्माची फटकेबाजी सुरु होती. प्रत्येक चेंडूला उमा किंचाळत होती आणि बंडू टाळ्या वाजवत होत. लवकरच वॉचमन वरती येईल अशी मला भीती वाटू लागली.

एव्हढ्यात रोहित शर्माने मारलेला शॉट शॅार्टलेगला उभ्या असलेल्या खेळाडूच्या पायाला लागला आणि तो खाली कोसळला.

“अग आई ग, कळवळला बिचारा!”, उमा ओरडली, “एव्हढा कडक चेडू का वापरतात? रबरी चेंडूने खेळायचं ना तुम्ही गल्लीत खेळतात तसं!”
“बरोबर आहे तुझं. मी लगेच कळवतो बोर्डाला.” मी उपहासाने म्हणालो.
“नाहीतर काय. हातपाय मोडतील ना!”
“मोडतात कधीकधी. म्हणून तर एव्हढे पैसे मिळतात त्यांना.”
“मी उद्याच वाचकांची पत्र या मध्ये मटाला पत्र लिहिते.”
“लिही बाई. तुलाच एकटीला बाकी सर्वांचा कळवळा आहे!”

शेवटी वीस ओव्हर्स झाल्या.

“हे बरोबर नाही. एव्हढा छान खेळतोय तो. त्याला अजून काही ओव्हर्स खेळून दिले पाहिजे.” उमा, दुसरे कोण?
“अग, मॅच वीस ओव्हर्सचीच आहे.”
“म्हणून काय झाले? प्रेक्षकांसाठी एव्हढे करायलाच पाहिजे.”
“पण प्रेक्षक आहेतच कुठे?”, मी गुगली टाकला.
“टीव्हीवर बघताहेत ना!” उमाचा चौकार. मी रिटायर्ड हर्ट.

पण नंतर विराटची फलंदाजी पाहून अनुष्काला झाला नसेल एव्हढा आनंद बंडू आणि उमाला झाला होता. एकंदरीतच मॅचेसमधे गोलंदाजांना फक्त पिटाईकरता घेतात असेच मला वाटते. शेवटी एक किलो भजी, चार बीयरचे कॅन्स आणि वीस ओव्हर्स नंतर सामना संपला.

“अहो, आपण एकदा मॅच बघायला जाउया ना.” उमा म्हणाली.
“बाई, दोनचार हजाराखाली तिकीट मिळत नाही. तोबा गर्दी असते, नीट काहीच दिसत नाही आणि तीन तासाच्या मॅचसाठी अख्खा दिवस जातो तो वेगळाच! त्यापेक्षा टीव्हीवर चांगली दिसते, आणि तीपण फुकट!”
“तुम्हाला बाई कशाची हौसच नाही. एखाद्या वेळेला केले पैसे खर्च तर काय होतं?” उमा वैतागून म्हणाली.

अखेर बंडू स्वगृही जाण्यास निघाला.

“भावजी, उद्या परत या. मी बटाटेवडे करते.” भावजींचे हो म्हणायला काय जाते?

आजूबाजूला उमा नाही हे पाहून मी दुसऱ्या दिवशी सकाळी बंडूला फोन केला.

“अरे, तू आज येणार होतास, पण आमचा टीव्ही खरंच बिघडला आहे. तेव्हा आमच्याकडे मॅच पाहता येणार नाही. मी आणि उमाच तुझ्याकडे येतो. फक्त नाक्यावरून चार प्लेट वडापाव, बीयरचे कॅन आणि इतर चकणा आणून ठेव.”
“खरतरं हरकत नाही, पण आज सोमवार, माझा उपवास असतो, त्यामुळे नाही जमणार. मी काल विसरलो सांगायला.” बंडू म्हणाला.

अशा रीतीने हा वीस षटकांचा सामना सुरु होण्याआधीच संपला.

कलाक्षेत्रातील मुशाफिरी

दरवाज्यावर टकटक झाले आणि माझ्या परवानगीची वाट न पाहता बंडू आत आला. मी टेबलावर बसून, म्हणजे खुर्चीवर बसून टेबलावर एक विनोदी कथा लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. दहाबारा अर्धवट लिहिलेले कागद टेबलावर अस्ताव्यस्त पसरले होते.

“काय राजा, काय चाललंय?” बंडू.
“कथा लिहितोय.”
“हाताने? लॅपटॅाप विकला काय? अरे एव्हढी कडकी होती तर मला सांगायचं ना. यार किसलिये होते है यार?”
“अरे नाही यार, काही सुचत नव्हतं म्हणून म्हटलं जरा हाताने लिहून बघू. पण हाताने लिहिण्याची सवयच गेलीये. आणि सुचत नाही ते वेगळंच! प्रतिभा कुठे लुप्त झाली आहे कोण जाणे!”
“आता ही प्रतिभा कोण? तू तर त्या प्रद्मावर लाईन मारतोस ना?”
“अरे प्रतिभा म्हणजे स्फूर्ति!” हा बंड्या म्हणजे कठीण काम आहे. याला पोरींशिवाय इतर काही सुचतच नाही.

बंडू प्लेग्रुप पासूनचा माझा जॉकी (लंगोटी) यार आहे. त्यामुळे त्याला माझ्या घरात येण्यासाठी परवानगीची तशीही गरज नसते. पहिली पासून बीऐपर्यंतच्या परीक्षा आम्ही एकत्रच दिल्या. एकूण आमची अभ्यासातील गती पाहून तीर्थरुपांनी आम्हाला रेल्वे बोर्डाच्या परीक्षा द्यायला लावून कारकून म्हणून चिकटवले आणि आपली इतिकर्तव्यता पार पाडली. बंडूपण माझ्या पावलावर पाय ठेवून कारकूनपदी विराजमान झाला होता. लेखन माझा फावल्या वेळातला छंद होता. सोमवार ते शुक्रवार नऊ ते पाच काम सोडले तर वेळच वेळ होता.

“मी आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला?” समोरच्या खुर्चीवर ऐसपैस पसरून दोन्ही पाय टेबलावर ठेवून पु. लं. च्या सखाराम गटणे स्टाईलमध्ये बंडू विचारता झाला. उत्तरादाखल मी त्याला बॉलपेन फेकून मारले.
“अरे या चला हवा येउद्या आणि हास्यजत्रा सारख्या कार्यक्रमांनी विनोदाची पार वाट लावली आहे. बायकांच्या वेषात पुरुषांना नाचवले की काय विनोद झाला?
“पुलंच्या जाण्याने मराठी साहित्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती मी भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे.”
“पुलामध्ये पोकळी निर्माण झाली तर तो पडणारच. तो वाचवायला सिव्हिल इंजीनीयर पाहिजे. तू लिहून काय होणार?”
“अरे पुल म्हणजे पु. ल. देशपांडे.” या बंडूला एखादी गोष्ट समजावणे म्हणजे कठीण असते. ” ते माझ्यासारखेच विनोदी लेखक होते.”
“पण मग तुझ्या मते विनोद म्हणजे काय?” माझ्या बॉलपेनने आपले कान कोरत बंडूने विचारणा केली. बंडू तसा हुशार आहे. आता काही लोकांना नसते पुस्तकी हुशारी! पण कधीकधी चालतं डोकं!

“सोपे आहे, जे पुलं लिहितात तो विनोद.”
“अरे पण आता नाहीत ना ते? मग?” अजूनही बंडू पेनाने कान खाजवत होता.
“बंड्या, कान खूप खाजतोय का रे?”
“हो रे, खूपच खाज येतेय.”
“मग एक काम कर.”
“काय?”
“खाजव बिनधास्त!” उत्तरादाखल बंड्याने तेच पेन मला फेकून मारले.
“बघ, याला म्हणतात विनोद!” मी पेनचा कॅच पकडता पकडता उद्गारलो. बंड्याने दोन्ही हात जोडून मला कोपरापासून नमस्कार केला.
“मग काय, झालं की. टाक लिहून.” बंडू.
“अरे हा एक छोटासा विनोद झाला. ह्याने गोष्ट कशी तयार होईल? त्यासाठी तुझ्यासारखे एखादे विनोदी पात्र असावे लागते, विनोदी घटना घडवावी लागते. म्हणजे असे बघ, शाळेत असताना आपले गुरुजी सारखे आपल्या विरुद्ध तक्रार करायला आपल्या पालकांना शाळेत बोलवायचे. मी एकदा तीर्थरूपांना म्हटले, की बाबा, तुम्हाला गुरुजींनी शाळेत बोलावले आहे. तर बाबा म्हणाले कशासाठी? मी म्हटले मीटिंग आहे. बाबांनी विचारले की कोणकोण आहे मीटिंगला? तर मी म्हणालो, तुम्ही, गुरुजी आणि मी. पण बाबांना माझा विनोद कळलाच नाही. त्यांनी माझे दोन्ही कान एकमेकांना भेटेपर्यंत ओढले. माझी प्रतिभा लहानपणापासून कोणाला उमगलीच नाही.”
“म्हणून तू आता प्रद्माच्या मागे लागला आहेस वाटतं?” बंडूने पण पीजे टाकला.
“शाळेतील शिक्षकांची पण तीच गोष्ट,“ बंडूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो, “आपला फुटाण्या नेहमी म्हणायचा, मुलांनो, मोठे व्हा. मोठमोठी स्वप्ने पहा. मग मी बाकावर डोके टेकून वर्गात झोपून जायचो. तर फुटाण्या खडू मारून मला उठवायचा. आता तू मला सांग स्वप्नं पहाण्यासाठी मुळात झोपायला हवे की नको?
आपल्या शाळेत मंदा आणि कुंदा नावाच्या जुळ्या बहिणी होती. अगदी सारख्या दिसायच्या. मग सर्वांना समजावे म्हणून त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून मी त्यांच्या पाठीवर चिकटवल्या. तर गुरुजींनी कौतुक करायचे सोडून मला कुदव कुदव कुदवला.
“पण अश्या गोष्टींमुळेच माझी विनोदबुद्धी प्रगल्भ होत गेली. मला एव्हढी विनोद्बुद्धी असूनही विनोदी लिखाण काही करता येत नाही हे मात्र खरं!
“पण ते काही नाही. कलाक्षेत्रात मुशाफिरी करण्याचे माझे स्वप्न मी पूर्ण करणार म्हणजे करणारच!”
“कलाक्षेत्रात मुशाफिरी म्हणजे?” बंडू.
“जाऊदे. उगाच तुझ्या लहान मेंदूला त्रास देऊ नकोस. तुला कलेबद्धल काय समजते?”
“राजा, उगाच बोलायचे काम नाही. जशी पद्मा तुझी लाईन आहे तशी कला आपली लाईन आहे. काहीपण खपवून नाही घेणार!” बंडू वैतागून म्हणाला.
“अरे, मी कलावती बद्धल नाही तर कला, म्हणजे आर्ट बद्धल बोलतोय.”
“मग ठीक आहे.”
“मी लहानपणापासून कलेचा चाहता आहे.”
“परत तेच!!!!” बंडू.
“अरे आर्ट, आर्ट बद्धल बोलतोय मी! शाळेत असताना गणित कधी जमलं नाही, सायन्स समजलं नाही आणि इंग्रजीत ग्रामर आणि स्पेलिंगचे वांधे! एका शब्दात पाच किंवा जास्ती अक्षरे आली की आमचं स्पेलिंग हमखास चुकायचं. तेव्हाच ठरवलं की कलाक्षेत्रात शिरायचं. पण आमचं नशीबच फुटकं! चित्रकलेच्या क्लासला गेलो तर सरळ लाईन मारता येत नाही म्हणून बाहेर काढलं. खरतरं शाळेपासून मी प्रद्मावर लाईन मारत होतो. पण नाही! भूगोलाच्या परीक्षेत मात्र लायनी एकदम सरळ, त्यामुळे नकाशांना नेहमी भोपळा. गाण्याच्या क्लासला सुरात गात नाही म्हणून बाहेर काढलं मला! ती प्रद्मी फिदीफिदी हसत होती माझ्याकडे बघून. माझ्या भावना तिला कळाव्यात म्हणून मी तिला वाढदिवसाला ग्रीटिंग पाठवलं. त्यात मी काव्य लिहिलं होतं,
तुझ्याविना काळीज हुळहुळतंय ग
तुझ्यासाठी दिल माझं जळतंय ग
पण सुरुवातीला प्रिय प्रज्ञा ऐवजी प्रिय दमा असं लिहिलं गेलं. मग काय, तिने चपलेनं दम लागेस्तोवर हाणलं मला! शिवाय ग्रीटिंग जाळून त्याची राख जमिनीत पुरली ती वेगळीच!
“पण आता तू काय करणार? तू कविता कर ना! फक्त दमा वगैरे शब्द वापरू नकोस म्हणजे झालं.” बंडू.
“ते पण करून झालं. पण यमक जुळवता येत नाही.”
“विनोदी कथा जमत नाही तर सिरीयस कथा लिहिण्याचा प्रयत्न कर.”
“केला, पण अगदीच हास्यास्पद झाला."
“मग मी विचार केला की निवेदकाच्या व्यवसायात शिरावं. झी चोवीस तास मध्ये निवेदक म्हणून अर्ज केला होता.”
“मग?”
“नीट अनिपानी बोलता येत नाही म्हणून रिजेक्ट केलं मला. सगळीकडे असेच प्रॉब्लेम्स! सह्याद्रीवाले म्हणाले, तुम्ही दिसायला चांगले आहात. एबीपी वाले म्हणतात, तुम्हाला खोटं बोलता येत नाही. रिपब्लिकने ओरडता येत नाही म्हणून नाही म्हटले. आता बोल!"
“एकंदरीतच तुझी केस मला जरा अवघडच दिसते आहे. मला जरा विचार करू दे.” बंडू टेबलावरील पेन उचलून परत कान खाजवू लागला. इतर लोकं डोकं खाजवतात, हा कान खाजवत होता.

“तुला आठवतंय, आपल्या लहानपणी संध्यानंद, संध्याकाळ वगैरे वर्तमानपत्र निघायची. काय त्यात एकेक हेडलाईन्स असायच्या. ‘एका माणसाने एकशे अकरा लोकांना ठकवले, नवऱ्याने बायकोच्या प्रियकराला उलटे टांगले, एकमेकांचा खून करून दोघेही पसार वगैरे वगैरे!” तू वार्ताहर बन.” बंडूने सूचना केली. तू राजकीय, सामाजिक, साहित्तिक, क्रीडा, कला यापैकी कुठलीही वार्ता करू शकशील. हाय काय नी नाय काय!”
“अरे नाहीरे, वृत्तपत्रांची पण तीच कथा आहे. मटा नी सांगितलं आम्हाला मराठी वार्ताहर नकोत. लोकसत्ताने माझे आयटी रिटर्न्स मागितले. नवाकाळ डबघाईला आलंय. वृत्तपत्र विकत घेत असाल तरच बोला असे म्हणतात. सामना मधे मुलाखतकार म्हणून अर्ज केला तर त्यांनी सागितले की आम्हाला सध्या आमचे संपादकच डोईजड झालेत, तुम्हाला कोठे ठेऊ?”
“त्यापेक्षा बेस्ट म्हणजे तू वृत्तपत्र काढ स्वत:चे.”
“ही कल्पना चांगली आहे.” मी म्हणालो. पहिल्या पानावर कालच्या मटा, लोकसत्ता आणि सामनाचे आदल्या दिवशीचे मथळे परत छापायचे. मजकूर कॉपी करायचा. शिवाय व्हॅाटस अॅप, फेसबुक आहे बातम्या पुरवायला. फोटो पण वापरू शकतो. संपादकीय मात्र स्वत:चे असेल. शिवाय, दिनविशेष, शब्दकोडं वगैरे आहेच. वाचकांच्या पत्रांकरिता एक अख्खे पान असेल. राशिभविष्य मात्र मी लिहिणार.”
“ते कसे?”
“अरे सोपे आहे. बारा भविष्ये बनवायची. म्हणजे, तुमचा आजचा दिवस आनंदाचा जाईल, आज दु:खाचे प्रसंग येतील, नवीन व्यक्ती भेटतील, आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील, विवाहयोग संभवतो वगैरे, वगैरे. रोज आलटून पालटून बारा राशींना चिकटवून द्यायची.”
“मग हे फायनल?” बंडू म्हणाला.
“फक्त लहानसा प्रॅाब्लेम आहे. पैसे कोण देणार?”
“आपण ऑनलाईन वृत्तपत्र काढलं तर?”
“अरे कोणी वाचणार नाही.”
“ते पण आहेच.”

नंतरची पाच मिनिटे शांततेत गेली. फक्त बंडूच्या कान खाजवण्याचा आवाज येत होता. शेवटी मी बंडूला म्हणालो, “एक शेवटचा उपाय आहे. शाळेच्या मुलांचा व्हॅाटस अॅप ग्रुप बनवायचा. दर महिन्याला मासिक काढायचं, आपण स्वत:च संपादक व्हायचं, मग त्यात आपल्याला पाहिजे ते लिहू शकतो. कशी आहे कल्पना?”

टीप: काही कथा आधी लिहिलेल्या आहेत त्यामुळे जुने संदर्भ आले आहेत.

Comments
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article