नात्यांची गोष्ट : भाग ९: आर्ट स्टुडिओ
“आदिती, एक कप चहा मिळेल का?”, गेला तासभर एका जागी बसून लॅपटॉपवर बिझनेस प्रपोजल बनवता बनवता अंग मोडून गेलं होतं. शीण घालविण्यासाठी चहाची नितांत आवश्यकता होती.
“अरे, जरा कमलला सांग ना करायला. मी जरा बिझी आहे.” आदितीचा आतून आवाज आला.
कमल म्हणजे आमच्या घरातील रामागडी आहे. “पण ही बाई गेली कुठे? दोन मिनिटांपूर्वी माझ्या पायावर झाडू फिरवत होती.”
“अरे बघ ना जरा, असेल घरात कुठेतरी.” कमल!!!!” अदिती आतून ओरडली.
“आले बाई!” अदितीची घरातील वट कमलवर पण चालते. एरवी कमल इतरांना अजिबात दाद देत नाही.
“हे बघ दादांना चहा हवा आहे. मी पण घेईन. जरा दोन कप चहा टाक.” अदितीने फर्मावलं.
कामवाल्या बाया विदाउट एक्सेप्शन घराच्या मालकिणीला ताई आणि मालकाला दादा म्हणतात. मला तर अशी भीती वाटते की एखाद्या दिवाळीत ओवाळणी पण घालावी लागेल. म्हणजे दिवाळी बक्षीस सोडून!
“एवढा फोन झाला की टाकते.” कमलचा बाल्कनीतून आवाज आला. बघावं तेव्हा ही बाई फोनवर असते. दिवसभर कोणाशी आणि काय बोलते काय माहित?
पाच मिनिटांनी आदिती आणि कमलचा चहा, दोन्हीही एकदमच टेबलावर आले. चहाबरोबर बिस्किटं पण होती. कमलला या गोष्टी मात्र बरोबर जमतात. त्यामुळेच ती आमच्या घरात इतके दिवस टिकून आहे.
“आज स्टुडिओला सुट्टी आहे वाटतं?” मी आदितीला विचारलं. चेहऱ्यावरून बाईसाहेबांचा मूड आज काही ठीक वाटत नव्हता.
“आय अॅम फेड अप!” अदिती उद्गारली.
“का, काय झालं?”
“अरे हा अनिल रे! वैताग आणलाय नुसता त्याने!”
आदितीची आर्ट फर्म आहे आणि अनिल तिचा पार्टनर आहे. क्रीएटिव्ह आर्ट पासून जाहिराती पर्यंत सर्व प्रकारची कामं “द स्टुडिओ” हाताळतो. दहा आर्टिस्ट स्टुडिओमध्ये काम करतात.
“का, काय झालं?”
“तुला माझ्या प्राथमिकता माहितीच आहेत. काही गोष्टींचा मला मनापासून तिटकारा आहे. उदाहरणार्थ, रात्री डिनरला बसल्यावर टीव्ही वर दाखविल्या जाणाऱ्या टॅायलेट क्लीनरच्या जाहिराती! म्हणून मी अनिलला आधीच सांगितलं होत की अशी कामं आपण घ्यायची नाहीत. पण एक नवीन कंपनी नवा क्लीनर बाजारात आणते आहे व त्यांची कॅम्पेन आम्ही करावी अशी त्यांची इच्छा आहे. डील पण लुक्रेटिव्ह आहे. आणि अनिलचा आग्रह आहे की आपण हे काम घ्यावं.”
मला आदितीचं म्हणणं पूर्णपणे पटतं. खाताना या जाहिराती बघणं म्हणजे कठीण प्रकार आहे. मला माझ्या आयुष्यातली बघितलेली पहिली जाहिरात आठवली. ती मर्फी रेडिओची क्यूट बेबी कोण विसरेल? दूरचित्रवाणी सुरु झाल्यावर आलेल्या जाहिरातील “ रोशन होता बजाज”, किंवा “हमारा बजाज” पासून आत्तापर्यंतच्या शाहरुख आणि अमिताभच्या अनेक जाहिराती अविस्मरणीय आणि तर काही विस्मरणीय आहेत. हे लोकं सिनेमात चांगली अदाकारी करतात की जाहिरातीत याविषयावर एक वादविवाद स्पर्धा भरवता येईल. टीव्ही, मोबाईल्स, वर्तमानपत्रे, मासिकं, रस्त्यावरचे बिलबोर्डस, ही सगळी जाहिरातींचीच दुनिया झाली आहे. पण जेवताना अक्षय कुमार टॉयलेट साफ करताना बघायला मलादेखील आवडत नाही.
“ताई, दुपारी भाजी कुठली करू?”. कमल.
“कारल्याची सर्वात कडू भाजी बनवं.” आदित्य वैतागून म्हणाली.
“ए बाई, मला जेवायचं आहे. काहीतरी खाता येईल असं बनवं. त्या अनिलचा राग माझ्यावर काढू नकोस.” मी पण तेवढाच वैतागून म्हणालो. ते ऐकून आदिती जरा वरमली. ती कमलला म्हणाली, “मी येते आत, मग बघू.”
“अरे त्या कंपनीने पस्तीस कोटीचे सुरवातीचं कॉन्ट्रॅक्ट देऊ केलयं. त्यात टीव्ही, प्रिंट मिडिया असं सर्व तऱ्हेचं पॅकेज आहे. म्हणून अनिल आग्रह करतोय. पण मला हे पटत नाही.”
“पण म्हणून एव्हढं चांगल डील नाकारणं बरोबर नाही. ठीक आहे, पण काहीतरी तोडगा निघेल याच्यावर. जरा शांतपणे घे ना!”
“तुला म्हणायला काय जातंय, पण त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत उत्तर हवं आहे”, असं म्हणून आदिती आत निघून गेली. आदितीशी मी पूर्ण सहमत होतो, पण म्हणून एवढं मोठं प्रपोजल नाकारणं हे बिझनेसच्या दृष्टीने बरोबर नव्हते.
जेवताना कारल्याची भाजी नव्हती, त्यामुळे बाईसाहेबांचा राग कमी झाला आहे हे मला जाणवत होतं.
“मग काय ठरवलंस?”, मी विचारलं.
“तू म्हणतोस ते पटतंय मला. पण काय करावं समजत नाहीये.”
“मला एक कल्पना सुचली आहे. पण समोरच्या पार्टीला जरा पटवून द्यावी लागेल. तुम्ही एका अटीवर कॉन्ट्रॅक्ट घ्या. त्यांना अंडरटेकिंग द्यायला सांगा की ही जाहिरात टीव्ही वर लंच वा डिनर टाईमला दाखवली जाणार नाही.”
“येस, हे चालेल! अशोक, तू जीनियस आहेस.”
“तो तर मी आहेच.”
“म्हणून तर मी मंजिरी पेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करते!” आदिती उद्गारली.
आता ह्यात मंजिरीचा संबंध कुठे आला? मी तिला केव्हाच विसरलो होतो पण कुठेतरी अदितीच्या मनाच्या कोपऱ्यात ती जाऊन बसली होती बहुतेक! अर्थात ती आहेच तशी म्हणा!
लंच नंतर अदिती “द स्टुडियो” ला निघून गेली आणि घर शांत झाले. अदिती आणि अनिलचा बिझिनेस चांगला चालतो. पण अनिलच्या डोक्यात मधूनमधून भन्नाट कल्पना येत असतात. आणि त्या खोडून काढताना अदितीची दमछाक होत असते.
संध्याकाळी घरी आल्यावर अंगठा दाखवून सर्व काही आलबेल असल्याची पावती अदितीने दिली आणि मी सुटकेचा निश्वास सोडला.
अनिल जे.जे. स्कूल ऑफ आर्टस चा विद्यार्थी होता. माझे आणि अदितीचे लग्न ठरण्या आधीपासून त्यांचा बिझिनेस चालू होता. तो एक उत्तम चित्रकार आहे. स्वत:ची अनेक प्रदर्शने देखील त्याने भरवली आहेत. पण त्यांचा बिझिनेस नीट चालविण्यात अदितीचा मोठा हात आहे. टिपीकल कलाकाराला बिझिनेस सेन्स जरा कमीच असतो आणि अनिलाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे सर्व बिझिनेस डीलस आदितीच हाताळते. पण जे आपल्याला जमत नाही त्यात पडू नये हे अनिलला जमत नाही. त्यात त्याचा इगो मध्ये येतो. त्यामुळे अधूनमधून असे प्रसंग उद्भवतात. मग अदितीचा फ्यूज उडतो आणि मला मधे पडावे लागते.
“मी कंपनीच्या संचालकांशी बोलून त्यांना माझी अट सांगितली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनाही तीच बाब खटकत होती. त्यामुळे त्यांनी माझी, म्हणजे तुझी, कल्पना लगेच मान्य केली.”, अदिती मला सांगत होती. “अनिलही खुष झाला.”
“तुम्ही सल्लागार म्हणून मला रिटेनर आणि कमिशन दिले पाहिजे.” मी म्हणालो.
“मोठा आलाय कमिशन मागणारा! अरे, बायको आहे मी तुझी! मैत्रिण नाही मंजिरीसारखी!” अदिती फणकारली.
“मी पुढच्या महिन्यात अमेरिकेला जातोय.” मी म्हटले.
“कशासाठी?” अदितीने विचारले.
“कशासाठी म्हणजे काय? मंजिरीला भेटायला. बरेच दिवसात भेटली नाहीये.” मी मुद्दाम आदितीला चिडवायला म्हटले.
“मी पण येणार.” अदिती आता बेडमधे उठून बसली.
“अग, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जातोय. तू कशाला उगाचच कबाब में हड्डी!” मी उगाचच अदितीची जरा खेचत होतो.
“एव्हढे होते तर तिच्याशीच लग्न करायाचेस की! मला कशाला मध्ये आणलस?”
“नाईलाज को क्या इलाज!”
“मग जा, माझ्याशी बोलू नकोस अजिबात!” असे म्हणून अदितीने भिंतीकडे तोंड केले.
“अग, एव्हढी काय चिडतेस? जरा गम्मत केली. मला इस्ट कोस्टला काम आहे. सॅन ओझेमध्ये नाही.”
“मग ठीक आहे.”
“हो, पण दोन दिवस जाईन म्हणतोय नंतर तिच्याकडे!” मी परत आदितीला डिवचले.
“जा रे बाबा, मला नाही फरक पडत.” अदितीने माझ्याकडे तोंड केले आणि मिश्किलपणे म्हणाली, “मी आणि अनिल पण जपानला जातोय कामासाठी!”
एकमेकांच्या मिठीत कधी गाढ झोप लागली ते आम्हाला दोघांनाही कळले नाही.



Comments
साधेच प्रसंग पण छान फुलवले आहेत.संवाद खुसखुशीत...
By : Pratibha Tarabadkar