जेष्ठ नागरिक


जेष्ठ नागरिक

शशांक पुरंदरे

एक आटपाट नगर होते. राजा विक्रम आणि महाराणी तारामती तिथे राज्य करत होते. त्यांना राजपुत्र अजय आणि राजकन्या आदिती नावाची दोन अपत्ये होती. राज्याचा सर्व कारभार सुरळीत चालू होता. सर्वत्र सुबत्ता होती. राज्यातील चाळीस टक्के जनता पन्नास वर्षांच्या आतील होती. बहुतेक सर्वांना रोजगार उपलब्ध होते. महाराज स्वतः सत्तर वर्षांचे होते, पण तरीही रोज आठ आठ तास काम करुन राज्याचा कारभार चालवीत होते. महाराणी देखील पासष्ट वर्षांच्या होत्या पण महिला वर्गात सतत कार्यरत होत्या. राजकुमार अजय आणि कन्या आदिती देखील आपापल्या कार्यात व्यग्र होते.

महाराज सकाळी आपल्या दालनात आले आणि त्यांनी प्रधानजी हिरोजींना पाचारण केले.

“बसा प्रधानजी. राज्याची काय खबरबात?” राजांनी विचारणा केली.
“सर्व आलबेल आहे महाराज.”
“काही तंटा-बखेडा, नाखुषी वगैरे?”
“लहानसहान भांडणे होत असतात, पण विशेष काही नाही.”
“आपल्या राज्यात तीस टक्के जनता वयाने साठ किंवा त्यापेक्षा जास्ती आहे. त्यांच्या काही समस्या?”
“कोणी आमच्याकडे तक्रार तरी केलेली नाही.”

“कसं आहे प्रधानजी, वृध्दांच्या समस्या वेगळ्या असतात. त्यांना एकटेपणा, नैराश्य, शारीरिक व्याधी सारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. या गोष्टी ते इतर कुणाला सांगत नाहीत. तुम्ही एक काम करा. जरा या गोष्टींचा आढावा घ्या आणि आठ दिवसांनी मला अहवाल सादर करा. काही समस्या असतील तर आपण त्यावर उपाय शोधू.”

“जशी आज्ञा महाराज.”

आठ दिवसानंतर प्रधानजी अहवाल घेऊन महाराजांच्या दालनात आले.

“बोला प्रधानजी, काय म्हणताहेत आमचे जेष्ठ नागरिक?”
“महाराज, वरवर पाहिले तर सर्व ठीक आहे पण जरा खोलात शिरलात तर खूप समस्या आहेत.”
“अशा काय समस्या आहेत?”
“सांगतो. मी साधारण दोनएकशे लोकांशी बोललो. बऱ्याच जणांना वयानुसार उद्भवणाऱ्या रक्तदाब, मधुमेह अशा व्याधी आहेत. पण आपण वैद्यकीय मदत देतो त्यामुळे ती समस्या नाही.”
“आपण जी वैद्यकीय मदत देत आहोत त्याचा एकदा आढावा घ्या आणि कमी पडत असल्यास मदत वाढवून द्या.”
“ठीक आहे महाराज. साठ पासष्ठी नंतरच्या लोकांच्या वेगळ्याच समस्या आहेत. काही जोडपी एकत्र कुटुंबात राहतात. मुलगा, सून, एक किंवा दोन नातवंड अशी कुटुंब व्यवस्था असते. जर सूनबाई घरीच असेल तर यांचा नातवंडांबरोबर छान वेळ जातो. पण सूनबाई नोकरी करत असेल तर नातवंड सांभाळण्याची जबाबदारी आजी-आजोबांवर येते. काही जण ती आनंदाने पार पाडतात पण वयानुसार काही जणांना ते झेपत नाही, पण नाईलाजास्तव काम करावे लागते. मग त्यांच्या तब्बेती खालावत जातात, आजार बळावतात. त्यांना स्वतःचा असा वेळ मिळत नाही, खूप मानसिक कुतरओढ होते.“
“या समस्येवर राजा काही उपाययोजना करु शकत नाही. घरातील व्यक्तींनी समजुतीने यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. मुलांनीच आईवडिलांवर फार कामे करण्याची वेळ येऊ देऊ नये, शिवाय त्यांचा स्वतःचा वेळ मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. मुले ही आईवडीलांची जबाबदारी असते, आजी आजोबांची नाही.”
“महाराज, समस्या इथेच संपत नाहीत. काही वयस्कर जोडप्यांची मुले परदेशात राहतात. त्यांच्याकडे लक्ष द्यायला तर कोणीच नसते. कोणी आजारी पडले तर शेजाऱ्यापाजाऱ्यांचीच मदत घ्यावी लागते. परदेशातील मुले आईवडीलांना बाळंतपणासाठी किंवा नातवंडे सांभाळण्यासाठी परदेशी बोलावून घेतात. सुरवतीला आईवडीलांना बरे वाटते पण दरवर्षी जाणे जमत नाही आऱ्णि तब्बेतीमुळे झेपत देखील नाही. आजी किंवा आजोबांपैकी एकच व्यक्ती हयात असेल तर अजूनच जास्त समस्या निर्माण होतात. त्यांच्या मुलाला वा सूनेला त्यांच्याकडे बघायला वेळ नसतो.
महाराज, मी तर एक अशी गोष्ट ऐकली की अंगावर काटा आला माझ्या! एका जोडप्याला दोन मुले होती आणि दोन्ही मुले परदेशात वास्तव्यास होती. वार्धक्याने वडिलांचे निधन झाल्यावर मोठा मुलगा धाकट्या मुलाला म्हणाला, ‘या वेळेस तू जा, पुढील वेळेस मी जाईन. आता बोला!”
यावर महाराज देखील निरुत्तर झाले.
“हल्ली जागोजागी जेष्ठ नागरिकांचे समूह तयार झाले आहेत. हे सर्वजण सकाळ संध्याकाळ भेटतात. तास दोन तास एकत्र वेळ घालवितात. गप्पा मारतात. खेळ खेळतात. खाणेपिणे होते. कधी एकत्रित सहलीला जातात. हे सर्व चांगलेच आहे. पण यातूनही काही समस्या निर्माण होतात.”
“त्या कशा?”
“हे सर्व समवयस्क असतात. बरेच लोकं जुन्या आठवणीत रमतात. आपल्यावेळी कसं सगळं छान होते आणि आत्ताच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, अशी एक सामुहिक विचारधारा निर्माण होते. नवीन पिढीतही चांगले गुण आहेत यावर यांचा विश्वास नसतो.
हल्ली नवनवीन उपकरणे बाजारात येतात ती यांना वापरता येत नाहीत. काहींना तर या गोष्टींचा तिटकारा असतो. या लोकांना शिकवायला कोणी नसते आणि यांना स्वतःला शिकण्याची इच्छा देखील नसते.”
“आपण काही तरुण लोकांना यासाठी शिक्षक म्हणून नेमू शकतो.”
“ही छान कल्पना आहे. मी लगेचच कामाला लागतो.”
“शुभस्य शीघ्रम !”
“हे सर्व ठीक आहे, परंतु मला एक नवीनच समस्या भेडसावत आहे.”
“ती कोणती?”
“हल्ली वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने सुधारणा होत आहे, त्यामुळे मनुष्याने वयोमान वाढले आहे. परंतु साधारण सत्तरीला आलेल्या माणसाला हे आकलन होत नाही की आपण अजून पंधरा ते वीस वर्षे जगणार आहोत. सत्तरीचच यांना जीवनाबद्दल नैराश्य येऊ लागते. आपला काही वेळ आपल्यापेक्षा तरुण व्यक्तींबरोबर घालवावा, त्यामुळे मनाला उभारी येईल काही नवीन शिकता येईल हे यांना उमजतच नाही. सत्तरीनंतर आकलन शक्ती कमी होते हे खरे आहे पण म्हणून नवीन गोष्टी शिकायच्याच नाही हे बरोबर नाही. खरंतर आपला मेंदू जितका जास्ती वापरू तितकी बुद्धी जास्ती तल्लख राहते.
“हे तुमचे मत एकदम बरोबर आहे. म्हणून तुमच्या लक्षात ही गोष्ट आली असेल की माझे सर्व सल्लागार तरुण आहेत. जगात नवीन काय घडतंय याचे त्यांना ज्ञान असते त्यामुळे मला दिशानिर्देश देणे सोपे जाते.”
“महाराज, ज्येष्ठांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण अजुनही कमीतकमी पंधरा ते वीस वर्ष जगणार आहोत आणि हा खूप मोठा काळ आहेत. हा काळ नैराश्यात न घालविता या काळात आपण अजून काय करु शकतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.”
“प्रधानजी, तुम्ही म्हणताहेत ते योग्यच आहे. आता प्रत्येक मनुष्य नव्वदी गाठेल असे नाही. पण एखादा स्नेही लवकर गेला तर आपण देखील काही न करता ‘त्याच्या’ बोलावण्याची वाट पाहणे हे चुकीचे आहे.
प्रधानजी मला एक कल्पना सुचली आहे. आपण आपल्या राज्यात एक समुपदेशकांची फौज तयार करुया जी या जेष्ठांना मार्गदर्शन करेल, त्यांना मनोबल देईल आणि त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. तुम्ही ताबडतोब कामाला लागा, प्रधानजी!”
“जशी आज्ञा महाराज!”
“प्रधानजी, आपण काहीतरी विसरलो आहोत.”
“काय महाराज?”
“स्री वर्गाच्या काही वेगळ्या समस्या असू शकतात. महाराणी तारामतीदेवींना पाचारण करा. आपण त्यांचे मत देखील विचारात घेतले पाहिजे.”
“होय महाराज!”

तळटीपः ही एक कथा म्हणून लिहिली आहे परंतु सध्या समाजात या खरोखरच्या समस्या आहेत हे वाचकांनी लक्षात घ्यावे. यावर उपाय शोधणे ही आपलीच जबाबदारी आहे.

Comments

अप्रतीम लेख आहे, कूप छान प्रकारे जेष्ठ लोकांच्या समस्या मांड्या आहेत .

By : Sameer Peshave
14/12/2025 00 : 26 : 50 AM

शशांक, तुझे फारच छान निरिक्षण आहे , सामाजिक जाण आहे. खरोखरीच वृद्धांच्या समस्या व्यक्तीसापेक्ष आहेत, अनेक आहेत. शशांक, केवळ समस्या न मांडता, तू त्याला "समुपदेशन" हा फारच योग्य उपाय सुचवला, जो मला भावला आणि ज्याची समाजात निकडीची गरज आहे. छान.👌🙏😊

By : नंदकुमार आनंद थोरात
15/12/2025 10 : 05 : 47 AM

Remarkable presentation of the current situation of senior citizens.

By : Sheela Bahadkar
17/12/2025 11 : 34 : 26 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article