पश्चिमवारा


सध्या खूप उकडतंय असं म्हणणे म्हणजे लताला गाता येते किंवा सचिनला क्रिकेट खेळता येते असे म्हणण्यासारखे आहे. बघता बघता पंचेचाळीस वर्षांचा झाला हो आपला सचिन! एवढासा असल्यापासून बघतो आहोत आपण त्याला! जाऊ दे, हे विषयांतर होतंय.

इतर देशांमध्ये समर आणि फॉल एवढे दोनच ॠतू असतात. आपल्याकडे मात्र उन्हाळा, पावसाळा, परत उन्हाळा, हिवाळा असे अनेक ॠतू आहेत. त्यात आमच्या मुंबई – ठाण्यातला उन्हाळा काही और आहे. इतकी वर्ष एसी ऑफिसमध्ये काढल्यामुळे याची धग फारशी जाणवली नाही. परंतु आता सेवानिवृत्तीनंतर नंतर घामाच्या धारा म्हणजे काय याची प्रचीती यायला लागली आहे. या धारा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वहात असतात. सतत पंख्याखाली बसणे किंवा एसी लावणे हे दोनच उपाय आपल्या हातात शिल्लक रहातात. मी मात्र या बाबतीत नशीबवान आहे.

आमचा कॉम्प्लेक्सच्या मध्यभागी सहाव्या मजल्यावर माझे घर आहे. याच्या लिविंग रुमच्या फ्रेंच विंडोज पश्चिमेला उघडतात. समोर दिसतो तो येऊरचा डोंगर. मध्ये हिरवीगार झाडी आहे. सकाळी पाच वाजता मी किंवा सौने केलेला वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन हॉलमध्ये बसण्यासारखी आनंददायी गोष्ट कुठलीच नाही. पहाटेचा किंगफिशरचा आवाज आम्ही वर्षानुवर्ष ऐकत आलो आहोत. पौर्णिमेच्या दिवशी डोंगरवर अस्ताला जाणारा पहाटेचा चंद्र मी या जन्मी विसरणार नाही. केवळ याच कारणासाठी सकाळी पाच वाजता उठणे आम्ही कधीच चुकवले नाही. सेवानिवृत्तीनंतर पाच चे सहा झालेत एवढेच!

सेवानिवृत्तीनंतर तू काय करतोस असं प्रश्न अनेकजण मला विचारतात. याच खर उत्तर म्हणजे मी सध्यातरी काहीच करत नाही. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात इतके वर्ष घालविल्यावर खरतर काही करण्याची इछ्या सामान्य माणसात उरतच नसेल. पण परिस्थितीमुळे म्हणा अनेक जण कष्ट करतच उरलेले आयुष्य काढतात. सुदैवाने माझ्यावर ती पाळी आली नाही. त्यामुळे मी काहीही न करू शकतो. आणि माझ्या अनुभवावरून मी असे म्हणेन की प्रत्येकाने काहीही न करून बघितले पाहिजे.

अर्थात घरातली नित्यकर्म कुणालाच चुकत नाहीत. पण ती सर्व करून दुपारी पोटभर जेवून लिव्हिंग रूम मध्ये बसून एखादे पुस्तक वाचण्यासारखी गोष्टच नाही बघा. आणि दुपारी दोन नंतर मंद वाऱ्याची शीतल झुळूक पश्चिमेला उगवते. आणि काय सांगू तुम्हाला, उन्हाळा, घामाच्या धारा क्षणात नाहीश्या होतात. वाचनात वेळ कसा जातो समजत नाही. कधीकधी तर हा वारा रौद्र रूप धारण करतो. एक गोष्ट जागेवर रहात नाही. दुपारी चार नंतर सूर्याची तिरकस किरणे घरात डोकावतात. जणू दुपारच्या चहाची घंटाच म्हणाना. या दुपारच्या भर उन्हात किंगफिशर, भारद्वाज, चिउकाऊ, सनबर्ङस, घारी इत्यादी पक्षी समोरच्या झाडीमध्ये विहार करत असतात. पाच साडेपाच नंतर उन्हाची प्रखरता कमी होत जाते. प्रत्यक्ष सूर्यास्ताचे दर्शन जरी होत नसले तरी त्याची अनुभूती मात्र क्षणोक्षणी जाणवत राहते. त्या पश्चिमेच्या वाऱ्याबरोबर येऊरच्या डोंगरावर उमटणाऱ्या रंगचटा इंद्रधनुष्याप्रमाणे बदलत रहातात. हळूहळू अंधार दाटू लागतो आणि घरट्याकडे परतणाऱ्या पक्षांची किलबिल कानात किणकिणत रहाते.

या पश्चिमवाऱ्याची मजा काही औरच आहे. ती वर्णन करून समजण्याच्या पलीकडची आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवणे हेच खरे. त्यासाठी एकतर तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल आणि माझ्या सारखे काही न करावे लागेल. आहे का तयारी?

सर्व उर्वरित आयुष्य असेच पश्चिमवाऱ्याच्या झुळुकीबरोबर वहात रहावे एवढीच माफक अपेक्षा आहे.

शशांक
२४ एप्रिल २०१८

Comments

सुंदर वर्णन केले आहेस, शशांक! निसर्ग सौंदर्य मनाला नेहमीच भुरळ घालते!

By : Bhalchandra Shrikhande
22/07/2023 1 : 16 : 47 PM

छान वर्णन केलंय पश्चिम वाऱ्याचं, निसर्गाचं !

By : Pratibha Tarabadkar
22/07/2023 1 : 34 : 14 PM

Wow. एकदा हा पश्चिम वारा अनुभवायला हवा.

By : Sandeep Nachane
22/07/2023 3 : 14 : 42 PM

सुख आसपासच्या छोट्या छोट्या गोष्टीत कसं शोधायचं आणि ते कसं उपभोगायच ह्याची trick तुम्हाला सापडलीय! Hope we find it too.

By : Sheela Bahadkar
22/07/2023 6 : 10 : 32 PM

मुंबईच्या पावसाळ्या सारखा अनुभव जगात कुठेच नाही. पश्चिम वार्याची झुळुक अगदी जाणवली तुझ्या वर्णनात .

By : मोहिनी चित्रे
22/07/2023 6 : 52 : 20 PM

पश्चिमवारा मनाला भावला.मी सुद्धा असाच पश्चिमवारा अनुभवत असते त्यामुळेच त्यातल्या भावना मनाला स्पर्शून गेल्या.

By : योगिनी लोथे
18/02/2024 12 : 39 : 16 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article