उमेदवार


उमेदवार

शशांक पुरंदरे

आला रे आला
तो पहा आला
लोकसभेचा
उमेदवार आला

बरोबर आहेत
शंभरएक साथीदार
नाचवत आहेत
निशाणी वारंवार

गळ्यात पट्टा
कपाळावर गंध
इकडेच येतोय
चाल थोडी मंद

पांढरा लेंगा
पांढरा सदरा
सध्यातरी वाटतोय
निष्कलंक बरा

चेहऱ्यावर आहे
थिजलेलं हास्य
डोळ्यात मात्र
भयाचे भाष्य

जुळले आहेत हात
कापताहेत जरा
जोडून करतोय
नमस्कार भराभरा

तो पहा बघा
आजींसमोर वाकला
छोटा मुलगा उचलून
कडेवर घेतला

समोर जमवली आहेत
पंधरावीस डोकी
मधे उभा राहून
फोटो काढला की

फोटो झाल्यावर
तो पहा निघाला
इतका वेळ
एक शब्दही न बोलला

म्हणतात ना,
शब्दावाचून कळले सारे
तो काही न बोलला,
तेच बरे

निघाला सोडून
सुटकेचा निःश्वास
घश्यात अडकला होता
त्याचा श्वास

पाच वर्षांपूर्वी
आला होता सायकलवरुन
आत्ता मात्र गेला
मर्सिडिस मधून

अरे जरा थांबा,
तुम्ही कुठे निघाला
तो पहा बघा
दुसरा उमेदवार आला

Comments

वास्तव छानपणे रेखाटले आहे

By : Deepak Tikekar
18/05/2024 09 : 45 : 10 AM

nice and it’s true

By : Mohini
18/05/2024 3 : 55 : 50 PM

Realty with a dash of humour 👌👌👌

By : Sheela Bahadkar
20/05/2024 10 : 34 : 29 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article