१२.०५ डोंबिवली स्लो


सचिवालय जिमखान्यासमोर वर्किंग वुमेन्स हॅास्टेलची इमारत आहे. त्याच्या बाजूला जलवायू नावाची तीन मजली इमारत आहे. या इमारतीत जोशी असोसिअेटस् यांचे ऑफिस आहे. अँड. अनिल जोशी दक्षिण मुंबई मधला एक नावाजलेला क्रिमिनल लॉयर आहे. ऑफिस मधले दिवे बंद करून दरवाजा लॉक करून अनिल आणि मि. वधवानी आपापल्या ब्रीफकेसेस सांभाळत बिल्डिंगच्या खाली आले तेव्हा रात्रीचे पावणेबारा वाजून गेले होते. मि. वधवानींनी बुक केलेली उबर दोन मिनिटात दारात हजर झाली. त्यांच्या पाठोपाठ अजून एक टॅक्सी आली. वर्किंग वुमेन हॉस्टेलचा एक डायनिंग हॉल आहे. त्यातून एक तरुण युवती येऊन टॅक्सीत बसली. रात्रीचा वेळ असल्यामुळे दोन्ही टॅक्सीज दहा मिनिटात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येऊन थांबल्या.

अनिल आणि मि. वधवानी तीन नंबर प्लॅटफॅार्मवर दाखल झाले तेव्हा १२.०५ ची डोंबिवली स्लो समोर उभी होती. मुंबई नेव्हर स्लीप्स असे जे म्हणतात त्याची खात्री रात्री बारा वाजल्यावरही जेव्हढी वर्दळ स्टेशनवर दिसते त्याने लगेचच पटते. जरी गर्दी असली तरी फर्स्ट क्लासच्या डब्यात तुरळकच प्रवासी होते. अनिल आणि मि. वधवानी यांना समोरासमोरच्या विंडो सीट्स मिळाल्या. गाडी सुटायला एक मिनिट असताना एक तरुणी येऊन अनिलच्या बाजूला बसली. वर्किंग वुमेन्स हॉस्टेलबाहेर आपल्या मागच्या टॅक्सीत बसलेली युवती हीच होती हे अनिलच्या लगेच लक्षात आले.
“माफ करा, मी इथे बसले तर चालेल ना?” अतिशय मधाळ आवाजात तिने अनिलला विचारले.
“ओह शुअर नो प्रॉब्लेम!” अनिल म्हणाला. रात्री उशिरा एखादी सुंदर तरुणी स्वत:हून आपल्या बाजूला बसते, यापेक्षा चांगले भाग्य काय असू शकते असा विचार अनिलच्या मनात आला नसता तरच नवल.

अनिल पंचेचाळीस वर्षाचा होता. गेल्या दहा वर्षात क्रिमिनल लॉयर म्हणून त्याने चांगलेच नाव कमावले होते. जवळजवळ सहाफुट उंच, गोरापान अनिल अजूनही अविवाहित होता. कुठल्याही मुलीला आकर्षित करून घेईल अशीच त्याची पर्सनॅलिटी होती.
“काय झाले की आज आमचे ऑफिसचे एक गेटटुगेदर होते. पण पार्टी जरा जास्तीच लांबली. मी सचिवालयात काम करते. ठाण्याला स्टेशन जवळच रहाते. पण एव्हढा उशिर कधी होत नाही. इतरवेळी लेडीज फर्स्टक्लास मध्ये बसते पण इतक्या रात्री एकटीला बसायला भीती वाटते. आजकाल कधी काय होईल याची शाश्वती नाही. म्हणून तुम्हाला विनंती केली.” आपल्या कपाळावर येणारे केस मागे करत तिने खुलासा केला.
“काही हरकत नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्हीदेखील ठाण्यालाच जाणार आहोत.” अनिल उत्तरला.
“बाय द वे, मी अनिल जोशी.”
“आणि मी रश्मी. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला”. रश्मी म्हणाली.

रश्मी दिसायला खूप सुंदर नसली तरी आकर्षक नक्कीच होती. साधारण साडेपाच फुट उंची, गहूवर्ण आणि शेलाटी बांधा आणि स्वत:ला कॅरी करण्याची एक स्टाईल हे सर्व खूप मोहक होत. खांद्यावर रुळणारे बॉब केलेले केस तिच्या नाजूक चेहऱ्याला खुलून दिसत होते. तिने ओठावरची हलकीशी लिपस्टिक सोडली तर इतर काहीही मेकअप केलेला नव्हता. पार्टी साठी म्हणून निळ्या रंगाची सिल्कची साडी परिधान केलेली होती बहुतेक. पण एकंदर ‘वस्तु’ छान होती.

अनिलने रश्मीची मि. वधवानीची ‘माझा क्लाऐंट’ म्हणून ओळख करून दिली. पण वधवानीला मात्र रश्मीमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. तो कायम खिडकी बाहेर बघण्यातच मग्न होता. भायखळा स्टेशनवर अजून काही प्रवासी डब्यात शिरले. एकजण येऊन रश्मीच्या बाजूला बसला. त्यामुळे रश्मी अजूनच अनिलजवळ सरकली. गाडीच्या हिंदकळ्यांमुळे अधून मधून रश्मीच्या खांद्यांचा स्पर्श अनिलला होत होता. तो देखील दुर्लक्ष केल्यासारखे दाखवत खिडकीतून बाहेर बघत होता.

“तुम्ही काय करता?” रश्मीच्या विचारण्याने अनिल भानावर आला.
“मी क्रिमिनल लॉयर आहे.” अनिल म्हणाला.
“अरे वा, हाऊ एक्साईटिंग!” रश्मी उद्गारली, “मी क्रिमिनल्स फक्त सिनेमात बघितले आहेत. प्रत्यक्षात पण तसेच असतात का हो?”
“सिनेमात दाखवतात तसे खऱ्या आयुष्यात काही नसतं. नेहमीचेच रुटीन असते. खूप कष्ट मात्र करायला लागतात.” अनिल म्हणाला.
“भरपूर पैसे मिळत असतील ना तुम्हाला? म्हणजे माफ करा, मला तसे म्हणायचे नव्हते. पण मला खूप उत्सुकता आहे या प्रोफेशन बद्धल.” रश्मी म्हणाली.
“अगदी खूप नाही, पण मिळतात थोडेफार.”
“पण तुम्ही ट्रेनने का प्रवास करता? तुमची स्वत:ची गाडी असेलच ना?”
“आहे, पण आज जरा काम आहे म्हणून गाडी नाही आणली.”
“काम? रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्हाला अजूनही काम आहे?”
“काय करणार? हा व्यवसायच असा आहे की कधीतरी रात्रीचा दिवस करायला लागतो.”
“पण म्हणजे रोजचं असंच असत की काय? बायको रागवत नाही तुमच्यावर?”
“रागावायला मला बायको आहे कुठे? अजून लग्न झाले नाहीये माझे.” अनिल म्हणाला.
“काय सांगता? मला वाटले होते की दोनतीन मुले असतील तुम्हाला!” रश्मी आश्चर्याने उद्गारली.
“माझे जाउदे. तुमच्या बद्धल सांगा काहीतरी.” अनिलने विषय बदलला.
“माझे काय? नऊ ते पाच सरकारी नोकरी, नवरा, मुले सासू सासरे वगैरे वगैरे. रुटीन कंटाळवाणे आयुष्य.” रश्मी उद्गारली, “मध्ये अश्या पार्ट्या झाल्या तर तेव्हढाच जरा विरंगुळा.”

मधल्या स्टेशनवर बरेचसे प्रवासी उतरून गेले होते. मि. वधवानी अजूनही खिडकीबाहेर बघत होता. मागच्या बाकावर दोन तरुण एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते. मुलुंड गेल्यावर मि. वधवानी उठला. जरा दारात उभा राहून हवा खातो असे म्हणून दरवाज्यात उभा राहिला.

“अरे बापरे, तुमच्याशी बोलण्यात वेळ कसा गेला ते समजलेच नाही.” रश्मी भानावर येऊन म्हणाली.
“सेम हियर!” असे म्हणून अनिलने तिला आपले विनिंग स्माईल दिले. उत्तरादाखल रश्मी पण गोड हसली. ठाणे स्टेशन बाहेर गाडीने वेग कमी केला आणि अनिल व रश्मी उठून उभे राहिले.
“तुम्ही होतात म्हणून मी निर्धास्तपणे आले. नाहीतर एव्हढ्या रात्री प्रवास करणे जरा कठीणच असते. चला परत भेटू कधीतरी.” असे म्हणून रश्मी दरवाज्याजवळ गेली.

स्टेशन आल्यावर रश्मी गाडीतून खाली उतरली आणि अनिलला बाय करून पुढे चालू लागली. तिच्या चपलांचा टकटक आवाज अनिलच्या कानावर पडत होता. मि. वधवानीच्या हाकेने तो भानावर आला.

“इथेच थांबूया. जाधव येईल इथेच.” वधवानी म्हणाला. एक तासाच्या रश्मीच्या सहवासात अनिल आपण ज्या कामासाठी वधवानीबरोबर इथे आलो आहोत तेच विसरून गेला होता. गाडीतून उतरलेले बहुतेक प्रवासी निघून गेले होते. एकदोन प्रवासीच पुढील गाडीची वाट पहात स्टेशनवर घुटमळत होते. खांबाआडून जज जाधव समोर आले. काहीही न बोलता वधवानीने आपली ब्रीफकेस जजच्या हातात दिली.

“सीबीआय इन्सपेक्टर रागिणी देसाई! आपले हात वर करा. यू आर अंडर अरेस्ट!”
समोर रश्मी उभी होती. तिच्या हातातील स्नबनोज .२२ रिव्हॅाल्व्हर ट्यूबलाईटच्या प्रकाशात चमकत होते. सोन्याच्या बांगड्या घातलेला तिचा हात अतिशय स्थिर होता.

“अहं, पळायचा प्रयत्न करू नका. तुमच्या मागे अजून तिघेजण उभे आहेत आणि त्यांच्या हातातही रिव्हॅाल्व्हरस् आहेत.” रश्मी म्हणाली. तिच्या आवाजाला आता एक वेगळीच धार होती. अनिलने मागे वळून पाहिले. त्या तिघांपैकी दोघेजण ट्रेनमध्ये त्यांच्यामागेच बसले होते हे अनिलच्या आत्ता लक्षात आले.
“अनिल जोशी, गेले दोन महिने आम्ही तुमच्या मागावर आहोत. जाधव साहेबांनी दोन महिन्यापूर्वीच आम्हाला कल्पना दिली होती. आज तुम्हाला रेड हँडेड पकडले आहे. चला, बाहेर व्हॅन उभी आहे. बेड्या ठोका रे या हरामखोरांना!”

Comments
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article