ट्युशन फी
“अरे यार, काय बोअर आहे?” संजू मनाशी पुटपुटला. बाहेर छान मुसळधार पाउस पडत होता. शिक्षण खात्याने शाळांना सुट्टी जाहीर केली होती. परंतु लगेच मिसचा ममाला मेसेज आलाच. शाळा ऑनलाईन चालू राहणार होती. संजूने नाईलाजाने आपला टॅब सुरु केला आणि शाळेच्या साईटवर लॉगइन केले.
हे नेहमीचेच झाले होते. इतर शाळांमधील मुले मस्त सुट्ट्या एन्जॉय करत होती. पण संजूची शाळा मात्र नेहमीच सुरु रहात होती. संजूने खिडकीतून वाकून खाली पाहिले. त्याचे सर्व मित्र पावसात फुटबॉल खेळत होते.
सुदैवाने ममा आणि डॅड दोघेही ऑफिसला पोहोचले होते आणि संजू घरी एकटाच होता. त्याने शाळेचे सेशन रेकोर्ड करायला सुरुवात केली. फक्त प्रॅाब्लेम एकच होता. मिस मध्येच कधीतरी मुलांची हजेरी घेत असे. त्यामुळे हजेरी होईपर्यंत तरी टॅबसमोर बसणे गरजेचे होते नाहीतर लगेच ममाला मेसेज गेला असता. हजेरी झाल्यानंतर टॅब चालू ठेवला की झाले. जरी संजूला बाहेर खेळायला जावे असे वाटत होते तरी तो द्विधा मनस्थितीत होता. कारण मिस सध्या गुरुत्वाकर्षण शिकवत होती. चार दिवसांपूर्वीच चंद्रयान तीनचे प्रक्षेपण संजूने पाहिले होते. पृथ्वी आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण वापरून चांद्रयान चंद्राच्या कक्षेत कसे जाणार याबद्धल संजूला कुतूहल होते आणि मिस आज तेच सांगत होती. त्यामुळे संजूने बाहेर जाणे रद्ध केले.
तेव्हढ्यात लँडलाईन फोन वाजला. ममाचा फोन होता.
“ऑनलाईन शाळा सुरु आहेना, का व्हिडीओ पहातो आहेस?”
“ममा, मिस चंद्रयानाबद्धल सांगते आहे. मी नंतर फोन करतो,” असे म्हणून संजुने फोन कट केला.
मिसने चंद्रयान पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत कसे फिरते, ती कक्षा हळूहळू कशी वाढवून मग एका ठराविक कक्षेत पोहोचल्यावर चंद्रयानाला एखाद्या गलोलीप्रमाणे (catapult) चंद्राच्या कक्षेत कसे फेकले जाते आणि नंतर चंद्र त्याला आपल्या गुरुत्वाकर्षणाने कसे आपल्या कक्षेत घेतो हे सर्व समजावून सांगितले. हे सर्व ऐकून संजू खूपच प्रभावित झाला होता.
त्यानंतरचा गणिताचा क्लासदेखील संजूने खूप एन्जॉय केला. शाळा कधी संपली ते त्याला कळले पण नाही. शाळा संपल्या संपल्या रेवती, त्याच्या वर्गमैत्रिणीचा फोन आला.
“अरे संज्या, ते मिसने चंद्रयानाचे जे काही सांगितले ते मला काहीही समजले नाही. तू मला सांगतोस का जरा?” रेवती म्हणाली. मग संजूने तिला सर्व समजावून सांगितले.
“तुला कसं रे सगळं समजतं?”
“कारण मी जिनियस आहे!”
“मोठा आला! इंग्रजी स्पेलिंग विचारले तर ततपप होतं! ते मलाच विचारतोस ना!!” रेवती फणकाऱ्याने म्हणाली.
“बरं बाई, तू ग्रेट! मग झालं?”
“हं!” म्हणून रेवतीने फोन बंद केला.
दुपारचा एक वाजला होता आणि संजूला भूक लागली होती. तेव्हढ्यात पुष्पाताई आलीच. मग तिने संजूला जेवायला वाढले. पुष्पा अनेक वर्ष त्यांच्याकडे कामाला होती. त्यामुळे ममा संजुला घरी एकटी ठेवायला तयार झाली होती. तसापण आता तो तेरा वर्षाचा झाला होता.
अर्ध्यापाउण तासात घरातले सगळे काम करून पुष्पाताई निघून गेली. अजून बाहेर पाउस पडत होताच. मग संजूने फोन करून पक्या आणि इतर दोन मित्रांना बोलावून घेतले. मग काय विचारता? कॅरम, लुडो आणि इतर व्हिडीओ गेम्स खेळण्यात दोन तीन तास छान निघून गेले. फ्रीजमधे जूस तर होताच. त्याबरोबर कुरकुरे आणि चिप्स पण फस्त झाले. मध्ये ममाचा फोन येऊन गेलाच नेहमीप्रमाणे! आपल्या गुणी बाळाने शाळा एन्जॉय केली हे ऐकून ती पण सुखावली. नाहीतर एकटी मुले हल्ली घरी काय उद्योग करतील याचा काही नेम नसतो !
दुपारी एक डुलकी काढून संजू खाली उतरला. पाउस पडताच होता. त्यामुळे चिखलात फुटबॉल खेळून मुलांनी धमाल केली. सोसायटीतील मुलीदेखील मुलांच्या बरोबरीने खेळत होती. रेवती देखील होती. पण नंतर खूपच जोरात पाउस पडू लागला आणि सर्वजण आपापल्या घरी परतले.
ममाचा फोन आलाच तेव्हढ्यात! पावसामुळे तिला आणि डॅडला घरी यायला उशीर होणार होता. ममाने त्याला रात्री प्रज्ञामावशीकडे, रेवतीची आई, जायला सांगितले. संजूने प्रज्ञाला फोन केला.
“मावशी, मी कालचा पिझ्झा घेऊन येऊ का?”
“हो, आण. रेवतीला पण आवडेल खायला.” पिझा म्हटला की मुले खूष!
संजू रेवतीकडे पोहोचला तर ती भरतनाट्यमची प्रॅक्टिस करत होती. संजूला त्यात अजिबात रस नव्हता. पंधरा मिनिटे बोअर झाल्यावर तिची प्रॅक्टिस संपली. सर्वांनाच भुका लागल्या होता. जेवण झाल्यावर मावशीने दोघांना आईसक्रिम दिले. मग काय, मज्जाच मज्जा !
जेवण झाल्यावर प्रज्ञा किचन आवरायला आत गेली. रेवतीने गणिते सोडवायला संजूला हाताशी धरले. संजूने जरा नाईलाजानेच तिला मदत केली. प्रज्ञा बाहेर येउन दोघे चक्क अभ्यास करत आहेत हे पाहून वेडीच झाली. मोठ्या प्रयत्नाने आपला चेहरा निर्विकार ठेवण्यात ती यशस्वी झाली.
दहा मिनिटांनी ममाचा फोन आला. ती आणि डॅड घरी पोहोचले होते.
“संजूने काही त्रास नाही ना दिला?”
“त्रास? दोघेही बिघडले आहेत. रात्री दहा वाजता चक्क अभ्यास करत आहेत.” प्रज्ञा म्हणाली. “आपण उगाचच मुलांना नावे ठेवत असतो. ती मस्ती करतात. पण मस्ती मुलांनी करायची नाही तर कोणी करायची? पण तेव्हढाच अभ्यास पण करतात. आणि संजूचे एक मला खूप आवडले. तो रेवतीला अभ्यासात पण खूप मदत करतो. अर्थात ती देखील त्याचे इंग्रजी सुधारायच्या मागे आहे. पण खूप गुणी मुलगा आहे संजू!”
“शू, मोठ्याने बोलू नकोस. ऐकले तर डोक्यावर बसेल स्वारी!”
“नाही ग, दोघे बाजूच्या रूममध्ये आहेत. त्यांचा अभ्यास संपला की पाठवते संजूला. त्याचे जेवण झालंय. तुला जेवायला काही पाठवू का?”
“नको, पुष्पा सगळं करून गेली आहे. आत्ता बसतोच आहोत जेवायला. थँक्स, तू आहेस म्हणून मी निर्धास्त असते.”
“त्यात काय, गरज पडली तर तू पण रेवतीला सांभाळतेसच ना.”
“ठीक आहे. चल, पोटात कावळे ओरडत आहेत. नंतर बोलू.”
पांच मिनिटांनी संजू आणि रेवती बाहेर आले.
“संजू, ममा आली आहे घरी. आता गेलास तरी चालेल.”
“हो.” असे म्हणून संजूने पायात बूट घातले.
“आणि हे घे.” प्रज्ञाने संजूला दोन चॅाकलेटस दिली.
“हे कशाला?”
“घे रे, रेवतीची ट्युशन फी आहे.”



Comments
छान साधी सरळ कथा.शाळकरी मुलांची.अर्थात हल्लीच्या मुलांची.पूर्वी इतकं मनमोकळं वातावरण नव्हतं नाही का?
By : Pratibha Tarabadkar
या कथेत, मी माझ्या नातवालाच पहात होते. या पीढीचं अगदी यथार्थ चित्रण रेखाटलं आहेस शशांक.
By : हेमांगी
Story has a good flow, I got caught in the flow even though the story chronicled a regular day in the life of a 13 year old boy !!!
By : Aniruddha Patwardhan