नात्यांची गोष्ट : भाग ७ : डॉक्टर डॉक्टर


अदिती बेडरूम मधे आल्याआल्या मी तिला म्हटले,” आज काय झाले याची कल्पना आहे का तुला?”
“नाही, पण तू मला सांगशीलच याची पूर्ण खात्री आहे मला.” अदिती उद्गारली.

“ऐक, आज मी नेहमीपेक्षा जरा लवकर घरी आलो. आपली बेबिसिटर बाहेर टीव्ही पहात बसली होती. मी तिला विचारले, ‘कालिंदी कुठे आहे?’ विन्याला यायला अजून अवकाश होता. पण कालिंदी एक तास लवकर येते. शांता म्हणाली की कालिंदी आणि तिची मैत्रिण अनया आत रूम मध्ये खेळताहेत. मी मुलांच्या रूम मधे जाण्यासाठी दरवाजा ढकलला तर तो आतून बंद होता. मी टकटक केल्यावर कालिंदीचा आवाज आला,’ कोण आहे?’ मी म्हटले ‘मी आहे. काय करताय तुम्ही दरवाजा लावून? दार उघड.’ तर कालिंदी म्हणाली, बाबा, दोन मिनिटं थांबा, मी अनयाला तपासते आहे. आम्ही डॉक्टर डॉक्टर खेळतोय.”

हे ऐकल्यावर अदितीने एक मिनिट माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि खोखो हसत सुटली.

“अग हसतेस काय? मी तुला सिरीयसली काहीतरी सांगतोय आणि तू हसण्यावारी काय नेतेस?” मी वैतागून म्हणालो.
“अरे काय रे, डोंट टेल मी, तू लहानपणी कधी डॉक्टर डॉक्टर खेळला नाहीस?” एव्हढे म्हणून अदिती परत हसायला लागली.

दोन मिनिटं मला काय बोलावे ते समजेना.

“अरे हे वयच आहे तसं. याच वयात मुलांना आपल्या शरीराबद्धल जाण निर्माण होते. आणि हे सर्व नैसर्गिकच आहे. आपण देखील या वयात हेच केलय, ते पण लपून छपून. आपली मुलं आपल्याला सांगताहेत तरी!” अदिती म्हणाली.

आमच्या घराच्या जमदग्नीला आम्ही हे सांगितले असते तर आमच्या घराण्याचा इतिहासच बदलला असता असे मी आदितीला म्हटल्यावर ती परत खोखो हसायला लागली.
“एव्हढा तुझ्या वडिलांना घाबरत होतास तू? आता तुझ्याकडे पाहून वाटत नाही तसं!” आपले हसू आवरत अदिती म्हणाली.
“ते सगळे ठीक आहे. आता समाज पण जास्ती ओपन झाला आहे. पण यातून काही वाईट घडू नये याची काळजी तर घेतली पाहिजे की नाही?” मी म्हणालो,” पण मुलाना त्यांच्या शरीराबद्धल, सेक्सबद्धल सांगणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे.”
“तू म्हणतोस ते पण बरोबर आहे. आता वेळ आलीच आहे. मी उद्याच डॉ. सरला जोशींना भेटते.” अदिती म्हणाली. डॉ. जोशी अदितीची गायनॅकोलॅाजिस्ट होती.

दुसऱ्या दिवशी रात्री अदितीने मला डॉ. सरला जोशींकडून आणलेली दोन पुस्तके दाखविली. त्यात अतिशय सोप्या, मुलांना कळेल अशा भाषेत आपल्या शरीराचे वर्णन होते. जोडीला चित्रांमधून केलेली इलस्ट्रेशनस् होती. ती वाचून आमची पण शरीरशास्त्राची उजळणी झाली.
“यातील काही गोष्ट तर मलापण आत्ताच समजताहेत.” मी आदितीला म्हटले.
“म्हणून तर पहिल्यापासून तुला माझ्या गाईडन्सची गरज पडली ना!” अदिती मिश्किलपणे म्हणाली.
“अशोक, याचं महिन्यात विन्या आणि कालिंदीचे वाढदिवस आहेत. त्यावेळेला आपण ही पुस्तके त्यांना भेट देऊया.”
“गुड आयडिया! त्याआधी आपण नीट वाचून ठेवूया, म्हणजे काही डिफीकल्टी यायला नको.” मी म्हटले.
“तू विसरला असशील पण मला रिव्हिजनची गरज नाही.” अदितीने विषयच संपवला.

ठरल्याप्रमाणे विन्याच्या वाढदिवसाला इतर गिफ्ट्स बरोबर आम्ही दोघांनाही ही पुस्तके दिली. जरी एकाचा वाढदिवस असला तरी गिफ्ट्स दोघांनाही द्याच्या लागतात हे आम्हाला पहिल्या दोनतीन वर्षातच समजले होते. आमच्या समोरच दोघांनी पुस्तके उघडली. पुस्तक पाहून विन्या म्हणाला, ”थँक्स! संजयकडे हे पुस्तक आहे. मी तुम्हाला सांगणारच होतो की मलापण हवे आहे म्हणून!”
“म्हणजे हे तुला सर्व माहिती आहे?” मी विन्याला विचारले.
“म्हणजे काय बाबा, मी आता लहान आहे का?” विनयने माझी विकेटच काढली. कालिंदी मात्र मोठ्या उत्सुकतेने पुस्तक चाळत होती.
“आई, मला यातलं फारसे काहीच माहिती नाही. पण आजच वाचेन मी. मला समजले नाही तर सांग मला.” हे ऐकून माझे आणि अदितीचे डोळे मोठे झाले नसते तरच नवल!

कधीकधी तर मला वाटते की आपण मुलांचे आईबाप नसून ही मुलंच आपले बाप आहेत.

Comments

जमाना बदल गया है... नेहमीप्रमाणे मिश्किल वर्णन त्यामुळे एका गंभीर विषयावर सहजपणे लिहिलंय!

By : Pratibha Tarabadkar
12/05/2023 11 : 56 : 06 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article