तेजस्विनी: सामान्यातील असामान्यत्व
२००९ मध्ये मी Masters in Social Work करत असताना मला HIV वर बुधवार पेठे मध्ये वेश्यांबरोबर काम करत असलेल्या सहेली संस्थेबरोबर फील्ड वर्क करायला सांगितले होते. खूप सूचना ही दिल्या गेल्या होत्या. मला धाकधूक होती पण मी तिथे कधी रुळले ते कळलेच नाही. वेश्या व्यवसाय सोडून सहेली बरोबर काम करणाऱ्या peer educators बरोबरच वस्तीत जाऊन काम करायचे, सर्वांनी एकत्र जेवायचे. त्यातील काही जणी तर HIV positive होत्या. खालच्या मजल्यावर वस्तीतील मुलांसाठी असलेले Day Care Centre, वस्तीतील बायकांसाठी माफक दरात चांगलें पौष्टीक अन्न देणारे त्याच वस्तीतील बायकांनी चालवलेले स्वयंपाकघर, हे सर्व नेटाने चालवण्याऱ्या सर्वांच्या "तेजु” mam. ३५/३६ वय असेल नसेल. साधा पेहराव आणि वागण्यात बोलण्यात असलेला त्यांचा उत्साह मला भावला. आज 12 वर्षांनी हया निमित्याने परत त्यांच्याशी बोलण्याचा योग् आला.
२५ वर्षं, सहेलीच्या स्थापनेपासून आज पर्यंतची त्यांची वाटचाल व अनुभव तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचा हा प्रयत्न.
तेजस्वी सेवेकरी, समाज गौरव, सावित्रीबाई फुले सन्मान, Sharon Maxwell award for Social Impact (USA) असे अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळून, अनेक शोध-निबंध सर्व स्तरावर प्रसिद्ध होऊन सुद्धा खूप प्रसिद्धीच्या झोतात नसलेली ही तेजस्विनी.
कर्वे शिक्षणसंस्थेमधून MSW करत असतानाच तेजस्वी ताईनी स्त्रीयांच्या प्रश्नांवर काम करायचे ठरवले होते. एक महिन्याची assignment त्यांनी १९९१ पासून HIV prevention वर वेश्यांबरोबर काम करणाऱ्या Indian Health Organization बरोबर करायला सुरुवात केली. त्या वेळी भारतात HIV फार वेगाने पसरत होता. त्या बद्दल नीट महिती पण नव्हती, गैरसमज खूप होते, त्यामुळे इथे काम करणारी माणसे पण कमी होती. वस्ती मध्ये HIV बद्दल माहिती देणे, ट्रीटमेंट व टेस्टिंग साठी हॉस्पिटलला नेणे असे काम peer educators च्या मदतीने चालू होते. Peer educators ची काम करायची तयारी, शिकायची तयारी, संवाद साधण्याची पद्धत, नेतृत्वगुण यातून ताईंना कामाची उर्जा मिळत होती. खटकत होते ते म्हणजे रोग्यांना सर्व ठिकाणी मिळणारी वागणूक. HIV positive व त्यातून वेश्या ह्या मुळे प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचे होत होते.
1997 मध्ये ही संस्था बंद झाली पण वस्तीतील बायका काम पुढे चालू ठेवण्यावर ठाम होत्या. पण कसे हा खूप मोठा प्रश्न होता. ह्याच वेळी कलकत्त्यामध्ये sex workers ची national conference झाली होती. त्या साठी तेजुताई वस्तीतील काही बायकांना घेऊन गेल्या होत्या. परत आल्यावर कलकत्ता व कर्नाटक प्रमाणे पुण्यात अशी संस्था स्थापन करायचे ठरवले. पण अशिक्षित असल्याने वस्तीतील बायका अशी संस्था स्वतः चालवण्या बाबत साशंक होत्या. तेव्हा तेजुताईंनी त्यांना 'मी आयुष्यभर तुमच्या बरोबर काम करेन' असा शब्द दिला आणि आज पर्यंत पाळला.
1998 मध्ये शासनाने अशी फ़क्त वेश्यांची संघटना स्थापन करता येणार नाही असे सांगितले, मग सल्लागार मंडळाची निवड करून "सहेलीची" स्थापना करण्यात आली.
महाराष्ट्रात ही पहिलीच संघटना होती. इथे इतर राज्यातूनही बायका येत होत्या, त्यामुळे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होते. फक्त HIV हा एकच प्रश्न नव्हता तर TB सारखे इतर आजार, कमी आयुष्यमान, कर्जबाजरी असणे, पोलिसांशी संघर्ष, त्यांच्या मुलांचे प्रश्न अश्या अनेक समस्या होत्या.
ह्या दरम्यान सहलीला HIV prevention साठी Bill Gates foundation ची भरघोस मदत मिळायला लागली. सरकारी मदत सुध्दा मिळायला लागली होती, पण दोन्ही मदतीचा कल हा जास्त testing target पूर्ण करण्याकडे होता. त्या मुळे इतर महत्वाच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत होतें ह्या कारणास्तव एवढी मोठी पैशांची मदत नाकारून त्या दोन्ही 'funding' मधून बाहेर पडायचा निर्णय अवघड होता. पण सहेलीने तो मोठया हिमतीने घेतला. पुढील काही दिवस फार कठीण होते, पगार देणे पण जमत नव्हते. संस्था बंद करायची नाही हा विचार मात्र ठाम होता.
सहेली ही संस्था ही खरोखरच चांगलं काम करीत आहे हे अनेकांना तोपर्यंत समजले होते त्यामुळे अनेक व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या. आज सहेलीकडे आंतरराष्ट्रीय मदत घेण्यासाठी लागणारे FCRA certificate उपलब्ध आहे. तशीच सध्या Villoo Poonawala foundation ची पण मदत चालू आहे.
आज सहेली HIV व्यतिरिक्त वस्तीतील बायकांसाठी बरेच इतर कार्यक्रम राबवत आहे उदा. सुरक्षित गर्भपात, शारीरिक व मानसिक आरोग्य समुपदेशन, HIV support group, तसेच बायकांना बँक खाते, आधार व इलेक्शन कार्ड काढून देण्याची मदत, इत्यादी.
कोविड काळात वस्तीतील बायकांचे काम बंद होते, त्यांची मुले पण शाळा व शेल्टर होम बंद झाल्यामुळे घरी होती/आहेत. ह्या काळात सहेली त्यांना रेशन देणे, मुलांना online शाळांसाठी मोबाइल व इतर वस्तू देणे हे काम करत आहे.
तेजुताई आत्ता सहेलीच्या Executive Director तर आहेतच तसेच National network of sex workers (India) ह्या संस्थेच्या कामामध्ये सुद्धा त्यांचा मोठा हात आहे. त्याच प्रमाणे Aids Clinical Trial Network (Global) हया सारख्या HIV वर काम करणाऱ्या संस्थांसाठी सल्लागार म्हूणन काम करतात.
हया सगळ्या व्यापातून वेळ काढून सध्या त्या TISS मधून PHD करत आहेत. अवघ्या ४८वर्षी एवढे सगळे केवळ कुटुंबाच्या पाठिंब्या शिवाय शक्य नाही असे त्या मानतात. कधी कधी संस्था, घर दोन्ही सांभाळताना ताण येतो, तसेच काही गोष्टी हातातून निसटून जातात अशी खंत वाटते पण हा त्यांनी निवडलेला पर्याय आहे असे त्या म्हणतात.
हळूहळू जग बदलत चालले आहे वस्तीतल्या बायकांचे पण प्रश्न बदलत आहेत पण संपत किंव्हा कमी मात्र होत नाहीयेत, तसेच त्यांच्याकडे बघायची समाजाची दृष्टी ही बदलली नसल्याची त्यांना खंत आहे. त्याच प्रमाणे वेश्या व्यवसायाचे गुन्हेगारीकरण हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये बदल होणे फार गरजेचे आहे असे त्यांना वाटते.
अश्या लहान वयात खूप काही करणाऱ्या हया सामान्यातल्या असामान्य तेजाविनीला मनापासून नमस्कार आणि पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
तळटीप: तेजस्वी सेवेकरी या “सहेली” या सेवाभावी संस्थेच्या डायरेक्टर आणि फाउंडर सदस्या आहेत.



Comments
खरंच सामान्यातील असामान्य
By : Pratibha Tarabadkar
खूपच छान सेवाभावी उपक्रम. वाटचालीसाठी शुभेच्छा!
By : सुनील फाटक
Sunder vyakta zala ahe..
By : Divakar
खरंच ग्रेट!
By : SHEETAL SURESH KHIRE