आजच्या दिवसातील काही (अ)विचार ०८-११-२०२५
आजच्या दिवसातील काही (अ)विचार ०८-११-२०२५
शशांक पुरंदरे
मध्यंतरी माझ्या एका मित्राने मला एक किस्सा सांगितला. तेव्हा त्याचे नुकतेच लग्न झाले होते आणि तो एकत्र कुटुंबात एका चाळीत रहात होता. साहजीकच त्याच्या पत्नीला कामाची फारशी सवय नव्हती. वर ती नोकरी पण करत होती, त्यामुळे सकाळी स्वयंपाक करताना गडबड गोंधळ होणे अपरिहार्य होते. त्यांच्या शेजारी एक 'काकू' रहात होत्या. त्यादेखील नोकरी करत होत्या. तरीही त्या तिला म्हणाल्या, 'तुझा खूप गोंधळ होतोय ना? मी पोळ्या करून देऊ का?' ही गोष्ट तिने संध्याकाळी माझ्या मित्राला सांगितली तेव्हा तो खोखो हसायला लागला. पत्नी म्हणाली, 'अहो, किती आपुलकीने मला विचारात होत्या त्या, आणि तुम्ही हसताय?' मित्र म्हणाला, 'हसू नको तर काय करू? हिच्या घरी पोळ्यांसाठी बाई आहे आणि ही तुला पोळ्या करून देणार?'
सांगायचा मुद्दा असा की कालच एक बातमी वाचली. एका समारंभात भारताची पहिली महिला नीता अंबानी रडणाऱ्या नातवाला कडेवर घेऊन गप्प करत होती म्हणून सोशल मिडीयावर तिचे तोंड भरून कौतुक होत आहे. आमच्या आया आणि आज्या आयुष्यभर हे करत आल्या आहेत. पण त्यांचे कुणी कौतुक केल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही. ह्याच नातवाला घरी चोवीस तास आया सांभाळत असेल. तेव्हा आजपासून सर्वांनी आईने किंवा आजीने लहान मुलाला कडेवर घेतले की लगेच फोटो काढून सोशल मिडीयावर टाकावा. नाही लगेच मेमरी फुल झाली तर नाव बदलून घेईन !
मला असे का वाटतंय की भारत पाकिस्तान युद्ध अजूनही सुरूच आहे. तात्यांनी आधी तीन विमाने पडल्यची माहिती दिली. आता ही संख्या आठवर गेली आहे. हे पडणे चालूच रहणार. तात्यांचा उमेदवार नाही का पडला न्यूयॉर्क मध्ये ! मोदीसाहेबांनी निमंत्रण दिल्यामुळे तात्या २०२६ मध्ये भारतात येणार आहेत. पण मुळात भारतीय प्रवक्त्याने यावर बोलायलाच नकार दिला आहे. पप्पू म्हणतो ते बरोबरच असावे. मोदी घाबरलेत !!!!!
सध्या रश्मीका मंधाना (स्मृतीशी काही संबंध नाही) अख्या भारताची 'क्रश' आहे म्हणे ! तिचे destination वेडिंग उदयपूरला आहे. तर ती उदयपुरला जायला निघाली आहे अशी बातमी विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे असे मी एका ठिकाणी वाचले. मलापण वाटलेच होते की लग्न उदयपूरला असल्यामुळे बहुतेक ती उदयपुरला जाईल !!! ही पूर्ण देशाची 'क्रश' आहे ही नवीन माहिती मिळाली. एका वेळेला किती 'क्रश' असण्याची परवानगी असते याबद्दल माझ्या तरुण वाचकांनी मला कळवले तर माझ्या ज्ञानात वृध्दी होईल. आणि हे क्रशेस स्वत:पुरतेच ठेवायचे की इतरांनाही 'पाजायचे' ते देखील कळवा.
पाउस सुरु झाला की खरीपाचा हंगाम सुरु होतो. मग शेतकरी पेरणी करतात. मग अतिवृष्टी झाली तर पिके वाहून जातात आणि मग शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. आता निवडणुकांचा हंगाम येऊ घातला आहे आणि दुबार मतदानावरून रणकंदन सुरु आहे. कुणीतरी म्हणे २२ वेळा मत दिले होते एका दिवसात. मतदार हा आहे का ही यावर दुबार, माफ करा दुमत आहे. आम्ही एकदा मत देताना देखील दमतो. त्यामुळे या व्यक्तीत काहीतरी सुपर पॉवर असावी असे मला वाटते. वास्तविक मतदार यादी संगणकात बंद आहे. त्यामुळे एका मतदार संघात नव्हे तर पूर्ण देशात दुबार मतदार शोधून काढणे हे एखाद्या coding येत असलेल्या मुलाला चार पाच दिवसात जमू शकेल पण...!
Coding वरून आठवण झाली. सध्या मी Quantum Computing बद्दल वाचायचा प्रयत्न करतोय. एक मिचिओ काकू नावाच्या भौतिक शास्त्रज्ञाचे भाषण ऐकत होतो. याचा वरच्या काकुंशी काही संबंध नाही. तो श्रोडींजरच्या मांजरीबद्दल सांगत होता. तिला एका पेटीत बंद केल्यावर ती जिवंत आहे का मेली आहे हे कसे समजेल? पण जर ती अतिसूक्ष्म अवस्थेत गेली तर Qutum सिद्धांताप्रमाणे एकाचवेळी जिवंत आणि मृत असू शकते. किंवा एखाद्या दुसऱ्या विश्वात जिवंत असेल तर इथे मृत असू शकते. यापेक्षा सोप्या भाषेत सांगायचे तर एखादे नाणे हवेत उडवले तर जमिनीवर हेड किंवा टेल या अवस्थेत आढळेल. पण हवेत ते एकाच वेळेला हेड आणि टेल दोन्ही असू शकते. काही समजले का? काळजी नसावी. रिचर्ड फेनमन म्हणतो, You must not fool yourself-and you are the easiest person to fool.!
हल्ली AI चा पण फार सुळसूळाट झालाय. साधा सुईत दोरा घालायचा झाला तरी AI ला विचारतात. आम्ही लहानपणी तेच करायचो. 'ऐ आई, जरा दोरा ओवून दे ना सुईत !
आजचा Bombay Times वाचायला वेळ मिळाला नाही, नाहीतर अजून मोठा झाला असता हा लेख!!!



Comments
😃👍
By : Vaijayanti Palkar
मस्त as usual
By : Deepak Tikekar
छान
By : नरेश कदम
😀😀😀
By : संदीप नाचणे
👌
By : Sheela Bahadkar
एकदम मस्त, AI आणि काकू ही
By : Devendra Buddhikot