नात्यांची गोष्ट : भाग १४: २०३०
आज माझा सत्तरावा वाढदिवस आहे.
दिवाणखान्यात जमलेले सर्व पाहुणे आपापल्या घरी परतले आहेत. मी आणि अदिती, दोघेच कधी एकमेकांकडे पहात तर कधी ग्लासातील वाईनचा रंग न्याहाळत बसलो आहोत. जे काही बोलायचे आहे ते आम्हाला एकमेकांच्या नजरेत स्पष्ट दिसत आहे. त्यासाठी शब्दांची गरज आता उरलेली नाहीये.
पंचेचाळीस वर्षांपूर्वी आमच्या आयुष्याचा सारीपाट मांडला गेला होता. त्यातील काहीच सोंगट्याच आता शिल्लक आहेत, आणि शिल्लक आहेत आयुष्यभराच्या आठवणी. तो पहिला स्पर्श, तो पहिला शहारा अजूनही जाणवतो. ती पहिली मिठी अजूनही आठवते. त्या पहिल्या चुंबनाची चव अजूनही ओठांवर रेंगाळते आहे. एकत्र बघितलेल्या पहिल्या सिनेमाचे नाव आठवत नाही, पण लास्ट रो मधील त्या सीट्स मात्र कायम लक्षात आहेत. पहिली रात्र, विन्या व कालिंदीचे जन्म, त्यांचे मोठे होणं, आमची भांडणं, त्यांची भांडणं, सर्व काही कालच झाल्यासारखे वाटतंय. आयुष्याचा ७० एमेम चलचित्रपट सतत डोळ्यासमोरून सरकतो आहे.
आदितीला पण गेल्या महिन्यात सदुसष्ठ वर्षे पूर्ण झाली. आता आम्हा दोघांनाही आमची वयं जाणवताहेत. तशी त्याची सुरुवात बऱ्याच वर्षांपूर्वीच झाली आहे पण मन कुठेतरी मानायला तयार नव्हते. पण आता शेवटी तेही भूतकाळातून वर्तमानात येऊ पहाते आहे.
आयुष्याच्या सकाळी पाहिलेली सर्व स्वप्ने आज संध्याकाळी प्रत्यक्षात उतरली आहे. फार कमी लोकांना हे भाग्य लाभते. आम्ही दोघे त्या बाबतीत खरे नशीबवान आहोत. काय कमी आहे आज आम्हाला? जे जे ठरवले होते ते पूर्णत्वाला नेता आले. जे हवे होते ते सर्व भरभरून मिळाले. एक पूर्णत्वाची भावना आज आमच्या दोघांच्याही डोळ्यात आहे.
आज मुले त्यांचे स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. गरज पडली तर कधीही हाकेला ओ द्यायला तत्पर आहेत. रवि, मृणाल सारखे मित्र कायम सहवासात असतात. मंजिरीचा मधूनमधून फोन येतो. तसे म्हणण्यासारखं माझ्यात आणि मंजिरीमध्ये जे कधी काळी होते ते केव्हाच लुप्त होऊन एक आजीव मित्रत्वाची भावनाच शिल्लक आहे. आजकालच्या इलेक्ट्रॅानिक युगात प्रत्यक्ष अंतरे केव्हाच नाहीशी झाली आहेत. सारा आणि शरयू, दोघीही आमच्या नाती म्हणण्या पुरत्याच आहेत, आमच्या मैत्रिणी जास्ती आहेत.
परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे आज मला अदितीची आणि तिला माझी साथ आहे. आज खऱ्या अर्थाने आम्ही एकरूप आहोत. आमचे एकटे अस्तित्व आता उरलेलेच नाही. तुझा मी आणि माझी तू हीच आता खरी ओळख आहे आमची!
या जगाच्या नियमानुसार वेळ कधीच थांबत नसतो. तो नेहमी पुढेच जात असतो. पण आम्हाला हे नियम लागू होत नाहीत. आमच्या दृष्टीने काळ इथेच थांबला आहे आणि तो असाच चिरंतन राहणार आहे.



Comments
हृदयस्पर्शी शेवट.सिंहावलोकन करताना नेहमी चांगल्या गोष्टी आठवाव्यात, कटू अनुभव म्हणजे आयुष्यात शिकलेला एक धडा अशा दृष्टीने त्याकडे पहावे तरच शिल्लक आयुष्य सुखात जाईल.
By : Pratibha Tarabadkar
Excellent. Now a days this is the story of many old couples. Nicely written. Very precise and touchy
By : Prasad khare
Beautiful !! Very touching and " touch wood " !!! As they say, if you spend your this current moment that is front of you, where you are alive, breathing, thinking , doing all the tasks and are happy with a smile of satisfaction on your face..it prepares you for the NEXT COMING MOMENT !!! Take life by these moments ! Never have any regrets, because otherwise this list can get longer... We are blessed with a good , healthy long life and it is surely a huge blessing !! Count the blessings, take the best and leave the rest !!! Happy living !! This philosophy is good for anyone , even those who are living alone. Because ..I believe in this - If you are alone and feel lonely then you are in bad company !! I always say , I am with myself first and then with so many people, things, situations, etc.etc.
By : Madhavi Mauskar Kharshikar