ढगांचे पिसे
ढगांचे पिसे
अनायास येती झणी लुप्त होती
उदासी मनी आठवांचे ठसे,
गेले तरी माग सोडून जाती
जणू आसमंती ढगांचे पिसे...
क्षणी तेथ जाई क्षणी येई मागे
वढाया मना आवरू मी कसे,
प्रपातास जैसा दुजा भाव नोहे
सदा वाहतो आत्मनाशा जसे...
कसे आवरावे मना आकळेना
मनस्वी मनी पाशवी विभ्रम ,
मदोन्मत्त हत्तीस काबूत ठेवी
जसा अंकुशाग्रापरी संयम...
भालकवी
:
सुमंदारमाला वृत्त
लगागा सात वेळा, आणि गा गा
23 अक्षरे



Comments
मनाचे वेगवेगळे विभ्रम तेसुद्धा वृत्तामध्ये बद्ध करून वर्णन करणे सोपी गोष्ट नव्हे. खूप सुंदर कविता!
By : Pratibha Tarabadkar
खुप छान. अनेक शब्द नित्य वापरातले नाहीत. असे शब्द सुचतात ह्याचं कौतुक
By : Deepak Tikekar
Mast
By : Ashwini