नाद ब्रह्म


नाद ब्रह्म

शशांक पुरंदरे

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठी लवकरी वनमाळी उदयाचाली मित्र आला
गावातील देऊळातून ऐकू येणार्‍या या किंवा अशा भूपाळीच्या धीरगंभीर स्वरांनी पूर्वी सारे गाव जागे व्हायचे. पाउस नुकताच पडून गेलेला असल्यामुळे पानाफुलांनी डवरलेल्या झाडांच्या घरट्यांमधून असंख्य पक्षी किलबिलाट करत विहार करू लागायचे. पूर्वेला उषाराणी आपल्या गुलाबी स्वप्नातून जागी होऊन रविराजाचे स्वागत करायची. सर्ज्या आपल्या ढवळ्या-पवळ्याची जोडी बैलगाडीला बांधून कारभारणीने दिलेली कांदाभाकर घेऊन शेताकडे जायला निघायचा. त्याच्या बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा घंटानाद वंगण न घातल्यामुळे चाकातून निघणाऱ्या खटाक खटाक आवाजात मिसळून एक नवीनच संगीत निर्माण करायचा. गोठ्यात वासराला पाजताना मधेच एखादी गाय सुखाचा हंबरडा फोडायची. स्वयंपाकघरात थोरली सून मामंजीसाठी चुलीवर चहाचे आधण चढवताना भांड्यांचा किणकिण निनाद कानी पडायचा. माजघरात म्हातारी धाकल्या सुनेच्या कानात दबक्या आवाजात काहीतरी सांगायची. ओसरीवर मामंजी सकाळची पहिली विडी शिलगवायाचे. अंगणात मंदी तुळशीला पाणी घालायची आणि बंडू परसात झाडाखाली बसून गणिताचे पाढे मोठमोठ्याने पाठ करायचा.
आता अशी गावेही कमी झाली आणि ते आवाजही लुप्त झाले. हल्ली तुम्ही शहराच्या कुठल्या भागात राहता यावर तुम्हाला कुठल्या आवाजाने जाग येईल ते अवलंबून आहे. नव्वद टक्के लोकं मोबाईलच्या अलार्मने जागे होतात. तुम्ही अंधारात मोबाईल शोधून स्नूझ बटण दाबता. पाच मिनिटांनी परत अलार्म वाजतो. बंद करून तुम्ही नाईलाजाने उठता. दोन मिनिटांनी डोअरबेल वाजते. बाहेर दुधवाला उभा असतो. मग पेपरवाला, कचरेवाला, कामवाली बाई, सतत बेल वाजतच राहते.

जे मोबाईल अलार्म लावत नाहीत त्यांना गाडीच्या किंवा वाहनांचा आवाज, वॅाचमनची शिट्टी, शेजाऱ्याचे ओरडणे किंवा केवळ सवय, यापैकी कशानेही जाग येऊ शकते. अगदीच नाही तर ‘अहो उठा, अजून किती लोळायचं राहिले आहे?’ हा सर्वात जालीम उपाय आहे. यापुढे आर्ग्युमेंट नाही.

बाहेर येऊन चहाची वाट पहात तुम्ही टीव्ही चालू करता. कन्यारत्नाने रात्री वाढवलेला आवाज कमी करेपर्यंत उरलेले घर जागे होते. टीव्हीवरील वृत्तनिवेदिका नेहमीप्रमाणे एखाद्या राजकीय पक्षातील दोन गटांमधील मारामाऱ्यांमधेच गटांगळ्या खात असते. शहरात सर्व आलबेल आहे आणि ऑफिसला जाण्याशिवाय पर्याय नाही हे पाहून निराशेने तुम्ही टीव्ही बंद करता. ‘अहो, निदान आत येऊन चहा तरी घेऊन जा’, अशी आरोळी आल्यावर तुम्ही आत जाता.

काही जण सुदैवी असतात. त्यांचे घर जरा निवांत जागी असते. समोर हिरवळ, झाडी, एखादा डोंगर असतो. त्यांना पक्षांच्या किलबिलाटाने जाग येते. स्वयंपाकघरातून पैंजणांच्या आवाजाबरोबर चहा बाहेर येतो. वाफाळलेल्या चहाचे घोट घेता घेता आज नाश्त्याला गोडाचा शिरा केला आहे अशी माहिती मिळते. डब्यात कुठली भाजी देऊ अशी गोड विचारणा केली जाते. संध्याकाळी आल्यावर लागू बंधूंकडे जायचे लक्षात आहे ना अशी लाडिक आठवण देखील करून दिली जाते. असते एकेकाचे नशीब!

शेवटी हिने दिलेला डबा बरोबर घेऊन तुम्ही घराबाहेर पडता. समोरच लिफ्ट बंद असल्याचा साक्षात्कार होतो. चार जिने खाली उतरून मेन गेट पर्यंत पोहोचेपर्यंत एक रिकामी रिक्षा समोरून जाते. नंतरचे चार रिक्षावाले तुमच्याकडे ढुंकूनही पहात नाहीत. तुम्ही रस्त्यावर थोडे पुढे जाता. आज कधी नव्हे तो नवा पांढरा शुभ्र सदरा तुम्ही घातला आहे. तेव्हढ्यात एक कार पचाक करून चिखल उडवून जाते. तुमच्या सदऱ्यावर उडालेले डाग तुम्ही रुमालाने पुसायचा प्रयत्न करता. पण पुसले न जाता ते अधिकच पसरतात. या सर्व गडबडीत अजून दोन रिक्षा समोरून जातात.

एका बाजूला रस्त्यावरच्या कोलाहलाचे पार्श्वसंगीत तुमच्या कानावर आदळत असताना टकटक असा आवाज तुमच्या कानावर येतो. दुसऱ्या मजल्यावरची रश्मी आपले सीलेटॅान वाजवत अवतरते. तुमच्याकडे एक गोड हास्य फेकून समोरच्या रिक्षावाल्याला अंगुलीनिर्देश करते. कृष्णाने अर्जुनासमोर रथ आणावा तशाच चपळाईने तो रिक्षा रश्मी समोर उभी करतो, रश्मी रथात आरूढ होते आणि क्षणार्धात अंतर्धान पावते. शेवटी रिक्षाचा नाद सोडून तुम्ही महापालिकेची बस पकडता आणि पंधरा मिनिटे उशिरा स्टेशनावर पोहोचता.

तुम्हाला सांगतो, तुमच्या कडे मोकळा वेळ असेल तर स्टेशनवर जाऊन बसा. छान वेळ जाईल. पण चांगले मोठे स्टेशन हवे. एकतर सारखे कोणीतरी इकडून तिकडे जात असते. सारखे धावत असतात सगळे! स्टेशनचा एक सामुदायिक आवाज असतो. पण तिथे ध्वनिक्षेपकावरून होणाऱ्या घोषणा खास असतात. सुरुवातीला तिथे उद्घोषक असायचे. ते काय बोलताहेत हे समजण्यासाठी तुम्हाला तिसरा कान हवा! पण नंतर संगणकीय उद्घोषक आले.
“लोकमान्य तिलक टर्मिनससे चलने वाली गोरखपूर एक्स्प्रेस छत्तीस घंटे देरीसे चल रही है| यात्रीयोन्के असुविधा के लिये खेद है|”
मध्येच एक माणूस म्हणतो, “गायत्री देवी, आपके रीश्तेदार आपकी राह देख रहे है| कृपया स्टेशन मास्टरके ऑफिस मे चले आईये|”

जेव्हा तुम्ही गर्दीमध्ये असता तेव्हा अनेक आवाज एकदम तुमच्या कानावर आदळत असतात, पण तुम्हाला समजेल असे काहीच ऐकू येत नाही. असा हा जीवनाचा कोलाहल कायम सुरु असतो. कधीतरी वाटते की या सर्व आवाजांपासून दूर निघून जावे, अशा ठिकाणी की जिथे फक्त निशब्द शांतताच ऐकू यावी.

Comments

आवाज / ध्वनी / स्वरातून प्रकट होणारी जीवनशैली साकारली आहे लेखात! त्या ध्वनीसोबत आपले नाते आणि ओळखसुद्धा. ध्वनीचित्र म्हणूया का त्याला

By : स्वाती मराठे
22/09/2024 09 : 31 : 02 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article