तुम्ही स्वत:ला कोण समजता?


तुम्ही स्वत:ला कोण समजता?

शशांक पुरंदरे

संध्याकाळचे चार वाजून गेले होते. चिंचणीकर अबब माझावर पुण्याचा पुढचा महापौर किंवा महापौरीण कोण होणार यावर एक रंगतदार चर्चा सुरु होती ती पहात होते. एव्हढ्यात घंटानाद झाला. जॉकीची चट्टेरीपट्टेरी चड्डी आणि रुपाची बनियन अशा अवस्थेत त्यांनी दरवाजा उघडला. एक गृहस्थ त्यांना बाजूला ढकलून घरात शिरले आणि सोफ्यावर विराजमान झाले. आपले दोन्ही पाय समोरच्या टीपॉयवर ठेवून त्यांना विचारते झाले,

“मी आत येऊ का?”
“अजून आत कुठे, किचनमध्ये येताय?” चिंचणीकरांनी वैतागून विचारले.
“नाही, हो, अशी विचारायची पध्दत असते म्हणून आपलं विचारले झालं. जरा लिखिते.”
“जरा कशाला, पुरा लिखा!”
“जगन्नाथ रामचंद्र लिखिते, माझे नाव.”
“तुम्ही आत आलाच आहात तर बसा. तसे तुम्ही बसलेलेच आहात, पण अशी म्हणायची पध्दत असते म्हणून म्हटले. काय काम आहे?”
“तुम्ही स्वत:ला कोण समजता?”

चिंचणीकरांनी या गृहस्थाकडे जरा निरखून पाहिले. उंची साधारण पाच फुट, पांढऱ्या पँटीत खोचलेला पांढरा शर्ट, काळा बेल्ट, डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा आणि डोक्यावर विस्कटलेल्या केसांचे टोपले अशी ही मूर्ती त्यांच्याच घरात शिरून त्यांनाच विचारात होती की तुम्ही स्वत:ला कोण समजता. तिकडे टीव्हीवर चर्चेला रंगतदार वळण लागले होते. या जरा चा दाबणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी टीव्हीचा गळा दाबला. पण दाबला असता तर बरे झाला असते कारण जरा परत सुरु झाले.

“कोण समजता तुम्ही स्वत:ला? लेखक? कवी? साहित्तिक? समाजसुधारक? की राजकीय नेता?”
“मी..”
“एक ब्लॉग काय लिहायला लागलात, हवा डोक्यात गेली की काय तुमच्या?”
“अहो..”
“एक दहा पंधरा कविता लिहिल्या तर काय कवी झालात? आणि काय ती कविता..! आहाहा!
मी तिला पाहिले
तिने मला पाहिले
आमची नजरानजर झाली
आणि चप्पल सालीवरून घसरली!
कोण ही साली?”
“अहो, केळ्याची साल...”
“मग ते केळं कोण लिहिणार? वाचणाऱ्याने काय समजायचे? दुसरी ती कोणती कविता? हं, ती फलाटावर उभी, इंजिनाची शिट्टी वाजली, अरे, ही काय कविता झाली?”
“अहो, मला कविसंमेलनात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले त्यासाठी!”
“हल्ली कुणालाही बक्षीस देतात. मराठी तर सोडा, तुम्ही हिंदीलाही सोडले नाही. हिंदी कविता पण! त्यातही उर्दू शब्द. फक्त संस्कृत राहिलंय. तुम्हाला संस्कृत काय कळणार म्हणा? त्यातून तुम्ही पडला नास्तिक. म्हणजे आधीच मर्कट, त्यातही मद्य प्याला!
आणि तुमच्या कथांबद्दल तर काय बोलावे? सरळ लिव्ह इन रिलेशनशिपवर कथा लिहिता? अशाने आपल्या समाजावर विघातक परिणाम होईल की नाही?”

“मी माझ्या पत्नीबरोबर गेले अनेक वर्ष लिव्ह इनच राहतो आहे, लग्न करून! लग्न म्हणजे समाजाकडून मिळालेले सर्टिफिकेट आहे एव्हढेच.”

“कठीण आहे! आणि बाकी कथा म्हणजे, लिफ्टमध्ये प्रेम, शिवनेरीत प्रेम, लग्नात प्रेम आणि तुम्हीतर कॉलेज प्राध्यापिकेला देखील सोडले नाही. आणि पुनर्विवाहाचा पण पुरस्कार करता तुम्ही. सदाशिवपेठी पुणेकराला शोभतं काय हे! आणि तुम्ही काय स्वत:ला सदाशिवपेठेतील पुल समजता काय?”
“मी असे कधी म्हटले?”
“म्हणायला कशाला हवंय, बाहेर पाटीवर लिहिलंय!”
“ते मी नाही, टारगट पोरांनी खडूने लिहिलंय!”
“पण तुम्ही पुसू तर शकता. ते जाउदे. तुम्ही मराठी स्तंभ लिहिता. त्यात इथून तिथून गोळा केलेली माहितीच टाकता ना?”
“नाही, मी माझी मते...”
“ती निवडणुकीत द्या ना. लिहिता कशाला? मोठे राजकारणी आहात का तुम्ही?”
“या देशात आपले मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही नका वाचू हवेतर.”
“प्रत्येकाला वाचायचा अधिकार पण आहे. जरा पाणी पाजा.” ओरडून जरांचा घसा सुकला होता. शेवटी चिंचणीकरानी जरांना पाणी पाजलेच. पण जरांमध्ये अजूनही जर शिल्लक होती.

“आणि इंग्रजीतही लिहिता! वर आपल्या राजकारण्यांपासून अमेरिकेच्या अध्यक्षालाही सुनावता. तो कशाला वाचतोय तुमचा स्तंभ?? मुलांनाही सोडत नाही. गणित, विज्ञान शिकायला सांगता. त्यांना, त्यांच्या शिक्षकांना उपदेश देता. अहो हल्ली शेअर मार्केट मध्ये जास्ती पैसे मिळतात. काय उपयोग गणित, विज्ञान शिकून?”

“आणि पैसे जातात देखील.” चिंचणीकरांना मिळालेल्या बोलण्याच्या संधीचे त्यांनी सोने केले. कारण जरांना बोलून जरा धाप लागली होती. “आणि पैसे मोजायला देखील गणित यावे लागते. हल्लीच्या मुलांना साधी बेरीज करायला कॅलक्युलेटर लागतो.”
“अहो सोय आहे म्हणून वापरतात.”
“पण मग साधी गणितं जमत नाहीत त्याचे काय? भाजीवाला पण पटकन हिशोब करतो हल्ली!”
“पण गरज काय? भाजी ऑनलाईन मिळते हल्ली. GPAY केले की काम झाले. आहे काय नी नाही काय! ते जाउदे, मुद्दा हा आहे की तुम्ही स्वत:ला कोण समजता? आणि हो! तुम्ही विज्ञान देखील फाडताय लेखामधून. तुम्ही काय वैज्ञानिक आहात? तुम्ही स्वत:ला.....!”

“या देशाचा जबाबदार नागरिक समजतो. मला पटेल ते मी लिहितो. तुम्ही वाचा, वाचू नका, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या.” चिंचणीकरांनी आता आपला आवाज जरा चढवला. त्याबरोबर जरा जरा नरमले.

“म्हणजे अगदीच तसं नाही म्हणायचंय मला! पण मी काय म्हणतो, हे सगळं कसं जमतं तुम्हाला? मला पण शिकवा ना जरा!” आपले नाव सार्थ करत जरा उद्गारले. “मी लिहिण्याचा प्रयत्न करतो पण जमत नाहीहो तुमच्यासारखे लिहायला!”

“अच्छा, हा प्रॉब्लेम आहे तर! मग आधीच सांगायचे ना! रोज संध्याकाळी पाच ते सात मी लेखन वर्ग चालवतो. आत्ता मी तिकडेच जातोय. येताय? महिन्याला फक्त एक हजार रुपये मानधन घेतो मी.”

हजार रुपयांची रक्कम ऐकून जरांचा चेहरा चांगलाच पडला.
“मी तुम्हाला हवा तेव्हढा मान देईन, पण धन देणे कठीण आहे.” ज. रा. लिखिते म्हणाले.

“चला, तुम्हाला एक महिना फुकट शिकवतो. तुमच्या आडनावाचा तरी मान राखला पाहिजे ना! तुम्ही व्हा पुढे, मी आलोच पेहराव बदलून.” असे म्हणून चिंचणीकरांनी मानेनेच जरांना बाहेरचा रस्ता दाखवला.

Comments
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article