खुर्च्या
त्या विस्तीर्ण सभागृहात शेकडो खुर्च्या पसरल्या होत्या
काही ताठ मानेने बसल्या होत्या
तर काही दोन्ही पाय पुढे पसरून मागे टेकल्या होत्या
काहींनी आपले दोन्ही हात बाजूच्या खुर्च्यांच्या पाठीवर पसरले होते
तर काही ध्यानस्थ मुद्रेत नाकासमोर पहात होत्या
घंटानाद झाला आणि व्यासपीठावरील पडदा वर गेला
एका टेबलामागे पाच उंच खुर्च्या ताठ मानेने बसल्या होत्या
एका खुर्चीने मंचावरील दीप प्रज्वलित केला
पहिल्या खुर्चीने भरड्या आवाजात नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या शोडशवर्षीय युवतीचे मनोगत कथिले
हात पाय पसरून बसलेल्या खुर्च्या सावरून बसल्या
तो भरडा आवाज बराच वेळा भिंतींवर आदळत राहिला
खुर्च्यांनी परत आपले हातपाय पसरले
मग दुसऱ्या खुर्चीने आपल्या मधुर आवाजात एका विशीतील तरुणाने केलेले आपल्या प्रेयसीचे प्रियाराधन ऐकवले
बहुतेक सर्व खुर्च्यांची अवस्था स्वप्नवत झाली
तिसर्या खुर्चीने खड्या आवाजात केलेल्या राष्ट्रभक्तीच्या गर्जनेने स्वप्नावस्था भंग पावली
त्याच्या सिंहगर्जनेचे आसूड खुर्च्यांच्या नादपटलांवर बराच वेळ आघात करत राहिले
नंतर चौथ्या खुर्चीने अगम्य भाषेत सामान्य माणसाची कथा ऐकवली
एव्हाना सभागृहातील बहुतेक खुर्च्या निद्रिस्त झाल्या होत्या.
शेवटी पहिल्या खुर्चीने सभेचा ताबा घेऊन सभेचा शेवट केला
काही वेळानंतर सभागृहात स्मशानशांतता पसरली
व्यासपीठावर नंदादीप जळत होता
छतावरील पंखे करकरत फिरत होते
बाकी सर्व नि:शब्द होते



Comments
सभागृहाचे यथायोग्य वर्णन.फक्त कंटाळवाण्या स्वागतगीताचा उल्लेख राहिला.
By :