गुलाबी दिवस


गुलाबी दिवस

शशांक पुरंदरे

सकाळी नेहमी प्रमाणे सहा वाजता जाग आली. बाजूला गौरी पहुडली होती. मी उठून पंखा बंद केला. ‘चहा ठेवतो’ असे गौरीला सांगून बेडरुम मधून बाहेर पडलो आणि सवईप्रमाणे चिरंजीवाच्या रुम मधे डोकावून पाहिले, आणि तुम्हाला सांगतो, माझा माझ्या डोळ्यांवर क्षणभर विश्वासच बसला नाही. साडेसहा ते सातच्या मधे अनेकवेळा हाका मारुनही न उठणारा हा पठ्ठ्या आज चक्क जागा होता. पांघरूणाची घडी घातलेली होती. साहेबांचे पूर्ण लक्ष मोबईलवर केंद्रित झालेले होते.

मी आवाज न करता किचनमधे शिरलो. फ्रीजमधून दुधाची पिशवी काढून उभी धरून तिच्या टोकाला कात्रीने छेद करुन मिल्क कुकरमधे रिकामी केली, दुधाचा एकही थेंब खाली न सांडता! हे विस्ताराने सांगण्याचे प्रयोजन असे की वाटते तितके हे काम सोपे नाही. माझ्या पहिल्या प्रयत्नात पूर्ण एक लीटर दूध ओट्यावर सांडले होते आणि मला पूर्ण दिवस बिन चहाचा घालवावा लागला होता. लग्न झाल्यावर नको त्या जागी शौर्य दाखविल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. जे होतकरु ते तरुण गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत त्यांनी हे कृपया ध्यानात घ्यावे. अर्थात सध्याच्या लिव्ह इन च्या युगात ही परीक्षा आधीच घेतली जाते. दुसरा प्रेमळ सल्ला म्हणजे दूध मिल्क कुकरमधेच तापवावे, म्हणजे ऊतू जात नाही. ओट्यावर सांडलेले दूध पुसायला पंधरा मिनिटे तर ऊतू गेलेले दूध पुसायला तेवीस मिनिटे लागतात, त्यात गॅसच्या शेगडीचा देखील समावेश होतो.

बारीक गॅसवर दूध व चहाचे आधण ठेवून मी गुलाबी कोलगेट मॅक्स फ्रेशने दंतमंजन करुन चहाची प्रक्रिया पूर्ण केली. एका ट्रे मधे चहाचे दोन कप आणि चिरंजीवांचा ओव्हलटीन किंवा बोर्नव्हिटा म्हणा हवेतर, घातलेला दूधाचा कप घेऊन डायनिंग टेबलावर ठेवेपर्यंत आपल्या पिंजारलेल्या केसांना क्लीप लावत गौरी बाहेर आली आणि अहो आश्चर्यम, लगेचच चिरंजीव आदित्यही प्रकट झाले.

“गुड मॅार्निंग.” डायनिंग चेअरवर स्थानापन्न होत आम्ही तिघेही एका सुरात उद्गारलो. आदित्य आज चक्क गुलाबी टी शर्ट, ब्लू जीन्स अशा वेषात तयार होऊन बाहेर आला होता. मी आणि गौरी एकमेकांकडे पहातच राहिलो.

“आजपासून नो ओव्हलटीन, फक्त व्हॅलेंटाईन! मी कॅाफी घेईन, ब्लॅक, नो शुगर!” आदित्यने घोषणा केली.>br>
“मग हा बोर्नव्हिटा कोण पिणार? तुझा बाप?” मी वैतागून म्हणालो. “आणि कॅाफी हवी असेल तर बनवून घे. तुला कशी करायची ते माहित नसेलच!”

“मला थियरी माहित आहे. मॅडीने सांगितली आहे मला!” मधुरा आदित्यची क्लासमेट आहे. पण मधुरा असे छान नाव असताना याने तिला मॅडी बनवले होते.

“पपा….!”
“किती वेळा सांगितले आहे तुला की मला पपा म्हणू नकोस. तुला जन्माला घालून पाप केल्यासारखे वाटते मला!”
“ओके पॅाप्स, मी तुला बाबा म्हणेन आजपासून. सो ओल्ड फॅशन्ड! पण युवर चॅाईस. तर मी चौदा वर्षांचा झालो आहे. सम चेंजेस आर कमिंग! आज व्हॅलंटाईन्स डे आहे.”
“म्हणजे?”
“तेराव्या सेंच्युरीमधे रोममधे व्हॅलेंटाईन नावाचा संत जन्माला आला होता.”
“संत?”
“संत म्हणजे त्याला मराठीत सेंट म्हणतात.”
“अरे पण सेंट म्हणजे सुवास ना?”
“ममा, कशी तू तुझ्या नवऱ्याला टॅालरेट करतेस?”
“सोळा वर्षांची तपश्चर्या आहे बाबा!” गौरी उद्गारली.
“तेराव्या शतकात रोमन सैन्यातील सोल्जर्सना लग्न करण्याचा अधिकार नव्हता. व्हॅलंटाईनने त्यांची लग्ने लावली म्हणून १४ फेब्रुवारीला त्याला फाशी देण्यात आले. तेव्हापासून जगभरात सर्व प्रेमिक हा दिवस साजरा करतात. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे.”
“म्हणून तू आज गुलाबी डगला घातला आहेस तर!”
“आजकाल प्रत्येकाचा एक व्हॅलेंटाईन असतो. कधी अनेकही असू शकतात. आज मॅडी माझी फर्स्ट व्हॅलेंटाईन आहे.”
“फर्स्ट?”
“हो, ती काही कारणाने भेटू शकली नाही तर सँडी स्टँड बाय आहे.”
“सॅंडी म्हणजे संध्या!”
“हो. तसा डिकी तिचा फर्स्ट चॅाईस आहे. आम्ही एका तासाने कॅालेज कट्ट्यावर भेटणार आहोत.”
“पण सोमवारी तुझी परीक्षा आहे ना?”
“आज अभ्यासाला सुट्टी!”
“पण भेटून तुम्ही काय करता?” “गुलाब गुलाबीच असतात.”
“चूक. पिवळे लाल काळे देखील असतात. मुली आम्हाला गुलाबी ग्रीटींग्ज देतात. सर्व वातावरण गुलाबी होऊन जातं.”
“पण गुलाब, ग्रीटींग कार्डस याला पैसे पडतात. बापाने दिलेला पॅाकेटमनी तुम्ही असा उडवता?”
“आजचा गुलाबी दिवस प्रेमाचा दिवस आहे. युद्धात व प्रेमात रंग सर्व क्षम्य असते. व्हॅाट इज मनी? आणि तसाही मी सध्या कायद्यानुसार नोकरी करु शकत नाही. चाईल्ड लेबर इज प्रोहिबिटेड!”

आदित्यच्या डिपार्चर नंतर वातावरण जरा शांत झाले. मी आणि गौरी थंड झालेला गुलाबी चहा मायक्रोवेव्ह मधे गरम करुन शांतपणे पिऊ लागलो. माझे सहज लक्ष गेले, गौरीने गुलाबी टॅाप घातला होता. खाली गुलाबीच स्लॅक होती. केसातील क्लीपदेखील गुलाबीच होती.
“यू टू ब्रूटस! तुझापण आज गुलाबी डे आहे वाटतं?”

गौरी गोड हसली. त्यामुळे तिच्या गालांवरही गडद गुलाबी छटा उमटली होती.

“काय ग, आपल्या बाथरूममध्ये नवीन गुलाबी बाटली कसली आहे? हॅंडवॅाश, फेसवॅाश की शांपू विथ कंडिशनर?”

लग्नाला सोळा वर्ष झाल्यामुळे मलापण काही गोष्टी समजू लागल्या होत्या. तशीदेखील आमच्या घरी दर आठवड्याला एक तरी बाटली नवीन येते, म्हणजे शांपू वगैरे, गैरसमज नसावा.

“अरे नवीन बॅाडी वॅाश आलाय. म्हटलं बघूया वापरून.”

आमच्या वेळी तीर्थरुपांनी मोजून तीन मुली बघून अडम तडम तडतड बाजा करत गौरी आमच्या गळ्यात बांधली होती. नशीबाने ती चांगली निघाली. सोळा वर्ष टिकल्यामुळे तिचे देखील माझ्याबद्दल असेच मत असावे. तेव्हा पैशाची भ्रांत असल्यामुळे गुलाब, ग्रीटींग कार्ड या चैनीच्या वस्तु होत्या. आला तो दिवस गुलाबी समजून पुढे जात होतो.

“लक्ष कुठे आहे तुझे?” मी भानावर आलो. गौरी कधी उठून माझ्या मागे उभी राहिली तेच मला समजले नाही.

“चल ना, नवीन गुलाबी बॅाडी वॅाश कसा वाटतोय ते पाहूया.” आपले दोन्ही हात माझ्या गळ्यात घालत गौरी उद्गारली.

Comments
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article