माझा स्तंभ १७-०८-२०२४


माझा स्तंभ १७-०८-२०२४

शशांक पुरंदरे

हल्ली आयुष्यातून विनोद कमी कमी होऊ लागला आहे असे तुम्हाला नाही वाटत? एक तर चांगले विनोदी लेखक कमी होत चालले आहेत. म्हणून मी हल्ली माझ्या आजूबाजूला विनोदाचे स्रोत शोधत असतो. आणि म्हणतात ना, शोधा म्हणजे सापडेल, तसेच होते काहीसे!

परवाच एका मराठी वृत्तवाहिनीवर एक जाहिरात पाहिली. कसली होती ते आठवत नाही पण flat५०% off चे मराठी भाषांतर ५०% सपाट सूट हे वाचून माझी छान करमणूक झाली.

मध्यंतरी खूप पाउस झाला. एक हिंगवे नावाची वार्ताहर बिचारी भर पावसात गुडघाभर पाण्यात उभी राहून लाईव्ह बातम्या देत होती. मनात विचार आला, पावसाच्या पाण्यात जर हिंग विरघळून गेला तर फक्त रस्ता शिल्लक राहील ,नाही?

आडनावे पण काही भन्नाट असतात. वपुंच्या भाषेत म्हणजे, एक घायाळ नावाची मुलगी होती, तिने लग्न केले त्याचे नाव उदास! आता बोला!!

हल्ली Instagram वर बरेच one liners येतात. म्हणजे, परदेशातून मुंगी आली तर तिला काय म्हणाल: Import-ant, किंवा दहा मुंग्यांना काय म्हणाल: Ten-ant, वगैरे वगैरे. मध्ये अथर्व सुदामेचे पुणेरी विनोद बरे वाटले पण आता जरा बोअर होतात.

सर्वात्मका म्हटल्यावर नव्वद टक्के लोकं हात जोडतील. मला मात्र एक विनोद आठवला आणि त्याची कविता झाली.

सर्वात्मका

एके दिवशी भर दुपारी
ऊन डोक्यावर रणरण करी
म्हटलं बसू शांत सावलीत
करू पेटपूजा थोडी न्याहरी

समोरच होते क्षुधाशांती गृह
नाव त्याचे सर्वात्मका
वाटले मिळेल शुध्द सात्विक
भूक भागेल थोडी तरी

कसचं काय कसचं काय
गोगलगाय अन् पोटात पाय
दिसतं तसं कधीच नसतं
एकूणच सगळे दस नंबरी

मागवले दोन पदार्थ खायला
नावे त्यांची छान दिसायला
केली सुरुवात पदार्थ खायला
अन् ठसका की हो लागला

कसलं शुध्द कसलं सात्विक
नुसतं सगळं तिखट जाळ
नाव मात्र होतं सार्थ
कारण होता सर्वात मका

वर्तमानपत्रातील राजकीय विनोद पण खूप करमणूक करतात.

संजय राउत यात आघाडीचे कलाकार आहेत. लाडकी बहिण योजनेला यांचा विरोध आहे. दोन महिन्यांनी आमचे सरकार आले की ही बंद होईल आणि एका वेगळ्या स्वरूपात आम्ही ती परत आणू असे यांचे म्हणणे आहे. म्हणजे योजना चांगली आहे पण दु:ख महायुतीने आणली याचे आहे. आहे की नाही विनोद!

लाडकी बहिण योजनेचे पैसे आधीच सर्वांच्या खात्यात जमा झालेत. पण योजनेचे उद्घाटन आज होणार आहे. या विनोदाला तोड नाही.

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये घेत नाहीत म्हणून बाळ आदित्य रागावलेत. पण याच जर आत्ता घेतल्या असत्या तर पावसाच्या आणि सणासुदीच्या काळात घेतली म्हणूनही हे रागावले असते. चीत भी मेरी और पट भी मेरी!!

सध्या तर मला अजित पवार सर्वात प्रामाणिक नेते वाटतात. स्वत:ची चूक उघडपणे मान्य करायला धाडस लागते. पण एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांना आपण पवारांना सोडल्याचे दु:ख नाहीये (असे सद्या तरी वाटतंय, राजकारणात काहीही होऊ शकत) पण कुटुंब विभागले गेले याचे वाईट वाटतंय.

उध्दव ठाकरे? no comments. बस नाम ही काफी है.

पण सर्वात मोठा विनोद म्हणजे स्वत:च्याच राज्यात होत असलेल्या अत्याचाराविरूध्द स्वत:च मोर्चा काढणे, हे केवळ ममता बॅनर्जीच करू शकते.

एकंदरीत, सध्याच्या धाकाधाकीच्या रुक्ष जीवनात असे विनोदी कोपरे शोधत रहा. चांगली करमणूक होईल.

शशांक पुरंदरे

Comments

मध्यंतरी संजय राऊत यांनी राज्यसभेत एक भन्नाट जोक ऐकवला. द्रोणाचार्यांनी द्रोणागिरीवरुन लक्ष्मणासाठी संजीवनी आणली. हल्ली fusion चं युग असल्याने राऊतांच्या संजयने रामायण महाभारत एकत्र करून वेगळेच रामाभारत करून टाकले. अरे हाय काय आन नाय काय

By : Pratibha Tarabadkar
17/08/2024 12 : 13 : 46 PM

हाहाहा..खुसखुशीत लिखाण. धम्माल आली. खरंय हल्ली सुदामेभाऊ बोअर करायला लागलेत. सगळे राजकारणी सारखेच...

By : हेमांगी प्रदीप कुलकर्णी
17/08/2024 12 : 16 : 36 PM

Well written.

By : Amol Bhagwat
17/08/2024 12 : 32 : 08 PM

🙂🙂😆

By : Sandeep V Nachane
17/08/2024 12 : 41 : 02 PM

छान लेख .

By : योगिनी लोथे
17/08/2024 3 : 12 : 58 PM

छान विनोदी लेख!!

By : Bhal
18/08/2024 06 : 58 : 11 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article