कधीतरी


कधीतरी, आयुष्यभर कष्ट करून, साठी उलटून गेल्यावर, आपली साठी क्षणभर विसरून जावे.

कधीतरी, आजूबाजूचा अंधार विसरून अवकाशात तळपणाऱ्या सूर्याकडे पहावे.

कधीतरी, पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे चांदणे डोळ्यात साठवून घ्यावे.

कधीतरी, उमललेल्या फुलांचा गंध श्वासात भरून घ्यावा.

कधीतरी, त्याच फुलांचा गजरा आपल्या सह्चारीच्या केसात माळावा.

कधीतरी, स्वयंपाकघरात काम करत असताना, अचानक जाऊन तिला मिठीत घ्यावे.

कधीतरी, कारण नसताना, उगाचच तिच्यावर रुसावे.

कधीतरी, संपर्कात नसलेल्या जुन्या मित्राला फोन करून तासनतास त्याच्याबरोबर जुन्या गोष्टीची उजळणी करावी.

कधीतरी, उगाचच, सकाळी सकाळी कामात असलेल्या मैत्रिणीला कारण नसताना फोन करून त्रास द्यावा.

कधीतरी, सकाळी अकरा वाजता डोक्यावर पांघरूण घेऊन गुडूप झोपून जावे.

कधीतरी, घरात मित्रमैत्रिणींच्या मैफलीं भरवाव्यात.

कधीतरी, एखाद्या मित्राबरोबर पूर्ण रात्र जागवावी.

कधीतरी, घरात बसून त्याच्याबरोबर पूर्ण बाटली संपवावी.

कधीतरी, रात्रभर झोपून दुपारी एक वाजता उठावे.

कधीतरी, पहाटे पाच वाजता उठून योगाभ्यास करावा.

कधीतरी, मित्रमैत्रीणींबरोबर सहलीला जावे.

कधीतरी, पाय दुखत असताना आणि श्वास लागत असताना देखील एका दिवसात लेण्याद्री, शिवनेरी चढावा व उतरावा, आणि दुसर्‍या दिवशी सुजलेल्या पायांची मालीश करत बसावे.

कधीतरी, मित्रांना आपल्यासारखेच काहीही न करण्याचे फुकटचे सल्ले द्यावेत.

आणि कधीतरी, आपल्या ग्रुपवर असले काहीतरी लिहून मित्रमैत्रिणींना उचकवावे.

Comments

कधीतरी मस्त कविता....... 👌👌 कधीतरी असंच मित्रांमैत्रिणींबरोबर परत एखाद्या किल्ल्यावर जावं आणि मिलिंदने नेटाने सगळ्यांबरोबर मस्त किल्ला सर करा

By : रोहिणी जोशी
20/04/2023 10 : 07 : 14 AM

मस्त आहे कविता.खरंच कधीतरी आपले वय विसरून उनाडपणा करावासा वाटतो.मनातलं बाल्य ओसरलं नसल्याने असेल कदाचित छान कविता

By :
20/04/2023 12 : 01 : 33 PM

sunder

By : SUNILMOGHE
26/04/2023 7 : 24 : 58 PM

👌 छान कविता !

By : ऋता कुलकणी
26/04/2023 8 : 49 : 25 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article