मराठी दिवसाच्या निमित्ताने


मराठी दिवसाच्या निमित्ताने

२७-०२-२०२४

शशांक पुरंदरे

शाळेत असताना आमचे मुख्याध्यापक श्री. कुलकर्णी सर नेहमी म्हणायचे, इंग्रजी अक्षरे म्हणजे फळीवर ठेवलेले डबे असतात, तर मराठी अक्षरे म्हणजे दोरीवर वाळत घातलेले कपडे. हल्लीच्या किचन ट्रॅालीज आणि पूर्ण वाळणाऱ्या कपड्यांच्या जमान्यात हल्लीच्या मुलांना ही उपमा समजणार नाही कदाचित! पण दोन भाषांचे यापेक्षा यथार्त वर्णन मी कधी ऐकले नाही.

अर्थात भाषा म्हणजे केवळ आद्याक्षरे नव्हेत. प्रत्येक भाषेचे आपले वैशिष्ट्य आणि सौंदर्य आहे. इंग्रजी भाषेत फक्त मुळाक्षरे वापरली जातात. पण मुळाक्षरांबरोबर काना, मात्रा, उकार, आकार, ईकार वगैरे मिळून मराठी भाषा बनते. साहजिकच लेखी मराठी इंग्रजीपेक्षा अवघड आहे. सर्वच देवनागरी लिपींचे हे वैशिष्ट्य आहे.

मराठी असे आमुची मायबोली! मायबोली म्हणजे आईच्या उदरात असल्यापासून जी कानावर पडते ती मातृभाषा! मराठी भाषेत काही विशिष्ट मुळाक्षरे आहेत, ज्यामुळे तिचे सौंदर्य वाढले आहे. ळ आणि ण ही मुळाक्षरे मराठी भाषेला तिचे स्वत:चे वेगळेपण देतात.

प्रत्येक भाषेचे स्वत:चे व्याकरण असते, नियम असतात. ती भाषा लिहिताना या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असते. ह्रस्व दीर्घ पाळणे आवश्यक असते. बोली भाषा म्हणून वापरताना शब्दांचे उच्चार बरोबर होणे अतिशय गरजेचे असते.

गेले काही दिवस भाषेच्या शुध्द-अशुध्दतेवरून उलटसुलट विधाने केली जात आहेत. भाषेमध्ये शुध्द-अशुध्द असे काही नसते असे विचार मांडण्यात आले. हे अतिशय चुकीचे विधान आहे.

वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक भाषेचे नियम असतात. लिहिताना अथवा बोलताना हे नियम पाळले नाहीत तर भाषा अशुध्द ठरते. लेखी भाषा ही शुध्दच असली पाहिजे.

मुख्य वादंग बोली भाषेमध्ये आहे. बरेच जण ळ आणि ण चा उच्चार नीट करू शकत नाहीत. मराठी भाषेचे खरे सौंदर्य या दोन मुळाक्षरांमध्येच आहे. जर सर्व मुळाक्षरे नीट उच्चारता येत नसतील तर ती भाषा अशुध्दच असते.

काही वेळा नीट मराठी बोलता येत नाही म्हणून इतर भाषा, म्हणजे हिंदी किंवा इंग्रजी भाषांचा आधार घेतला जातो. ही मराठी भाषेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे.

हल्ली शाळांमधून हायर आणि लोअर मराठी असा भेदभाव देखील केला जात आहे. पण भाषा ही भाषा असते, त्यात हायर, लोअर असे काही नसते. असे करून शिक्षण खात्याने मराठीच्या ह्रासाला खतपाणीच घातले आहे.

दुर्दैवाने मराठी लोकच मराठीच्या खच्चीकरणाला जबाबदार आहेत. लहान मुलांना मराठी शिकवले जात नाही. सर्व भर इंग्रजीवर दिला जातो. घरातच जर मराठी बोलले, लिहिले वाचले जात नसेल तर इतरांना दोष का द्या?

Comments

मस्तच लिहलंय👍

By : Kanchan Vipat
27/02/2024 10 : 13 : 16 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article