जाहिरातींची कथा
कथा लताची
लता सिटीबस -
* आरामदायक प्रवासासाठी सिटीबस. आपली सीट आधीच बुक करा. *
- मधून खाली उतरली आणि घराकडे चालू लागली. एल् आय सी -
* जिंदगीके साथभी, जिंदगीके बादभी, जीवन विम्याला पर्याय नाही. *
-च्या ॲाफिसमधून निघाली तेव्हाच ती खूप दमली होती. कॅडबरी -
* कुछ मीठा हो जाऐ.*
- जंक्शनपासून तिचे घर खरतर पाचच मिनिटांच्या अंतरावर होते. पण तेव्हढे चालणे देखील तिच्या जिवावर आले होते. तिच्या मनगटावरील टायटन रागा -
* टायटन रागा सिरीज कपल्स साठी. याला प्रेमाचा सुगंध आहे. *
- मधे संध्याकाळचे सात वाजून गेले होते. तरीही झपाझप पावले टाकत लता आपल्या लोढा हेरीटेज –
* लोढा हेरीटेज, जिथे प्रत्येक दिवस अविस्मरणीय असतो. *
च्या दरवाजातून आत शिरली. समोरच लॉबीमध्ये ओटिस –
* ओटिस, २४/७ तुमच्या सेवेसाठी. *
- लिफ्ट होत्या. तिचे घर दहाव्या मजल्यावर होते. घराचे दरवाज्याचे गोदरेज –
* गोदरेज कुलूप. तुमच्या घराचा पहारेकरी. *
कुलूप उघडून ती आत शिरली. वसंत अजून आला नव्हता. त्याला हल्ली रोजच उशीर होत हाता. अमेयपण अजून क्लासमधून आला नव्हता. बारावीसाठी त्याला आकाश –
* आकाश म्हणजे मेडीकलला प्रवेशाची हमी. *
मध्ये नाव घातले होते. पाचच मिनिटे चालून देखील लता घामाघूम झाली होती. आधी तिने हॉल मधला अटमबर्ग –
* अटमबर्ग पंखा. इलेक्ट्रिसिटी वाचवतो. *
- पंखा सुरु केला. जरा बसल्यावर तिला बरे वाटले. जेवायला काय करायचे हा विचार केव्हापासून तिच्या डोक्यात चालूच होता. (क्रमश:)
* या कथेचे प्रस्तुतकर्ते होते निरमा. वॉशिंग पावडर निरमा. दुधासारखी शुभ्रता निरमा पासूनच येते. *
लता काय स्वयंपाक करणार? वसंत वेळेवर येणार का? अमेयचा अभ्यास ठीक सुरु आहे का?? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील भागात. वाचायला विसरु नका, निरमा प्रस्तुत, कथा लताची !
तळटीप: आजकालच्या जाहिरात युगात काही काळानंतर तुम्हाला अशा कथा वाचायला मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. २०२३ च्या एका दिवाळी अंकात १४७ पानांपैकी पहिल्या ७३ पानांवर फक्त जाहिराती होत्या. इतर अंकामध्ये कथा कुठली आणि जाहिरात कुठली हे पटकन समजतच नव्हते. शेवटी मी अंक वाचणे बंद केले.



Comments
हल्ली वर्तमानपत्रात तर फक्त जाहिरातींची पुरवणी असते.
By : प्रतिभा ताराबादकर