आली दिवाळी, दिवाळी आली


आली दिवाळी, दिवाळी आली

मराठी निबंध
लेखिका संजना जोशी: वय वर्ष १२

बाईंनी या विषयावर निबंध लिहायला सांगितला आहे. त्याचे शीर्षक “आली दिवाळी”, की “दिवाळी आली” हे ठरत नव्हते म्हणून शेवटी “आली दिवाळी, दिवाळी आली” असे दिले आहे. म्हणजे शीर्षक सुरवातीलाच आहे पण ठरवायला वेळ लागला म्हणून शेवटी म्हटले. कृपया गोड मानून घ्यावे.

दिवाळी दरवर्षी येते. यावर्षी अधिक महिन्यामुळे उशिरा आली. हा अधिक महिना का येतो ते समजले नाही. बाई म्हणाल्या तुम्हाला पुढच्या वर्षी शिकवले जाईल. या महिन्यात बाबांनी अश्विनी आत्याच्या मिष्टरांना स्कुटी घेऊन दिली. का ते माहित नाही. तू लहान आहेस, तुला मोठेपणी समजेल असे बाबा म्हणाले. त्यामुळे यावेळेला दिवाळीचे बजेट कोलमडणार असेही बाबा म्हणाले. म्हणून मला सहा ऐवजी पाचच फ्रॉक घेतले आहेत. असो

दिवाळी दरवर्षी येते. आठ दिवस आधी बाबा घरात दिवे लावतात. “अहो, नेहमी बाहेर लावता, आता घरात लावा”, असे आई बाबांना म्हणाल्याचे मी ऐकले होते. बाजारात छान छान दिवे आले आहेत. पण बजेट कोलमडल्यामुळे गेल्या वर्षीचेच दिवे यावर्षी लावले आहेत. पण छान दिसत आहेत. असो.

दिवाळी दरवर्षी येते. ती चार दिवस असते. तीन दिवस आधी सुरु होते, वसुबारसाने. यादिवशी माझी मैत्रीण वसुधा हिचे बारसे झाले होते. पण गिफ्ट मात्र गाईच्या वासराला देतात म्हणे. नंतर धनत्रयोदशी येते. आई लॉकर मधून दागिने काढून त्यांची पूजा करते, आणि मग परत लॉकरमध्ये ठेवून देते. इतर वेळेला खोटेच दागिने घालते. नरकचतुर्दशीला आई सकाळी पाच वाजता उठवते. मला उठवायचे काम माझा भाऊ संजय मोठ्या आनंदाने करतो. मला अजिबात आवडतं नाही. पण काही इलाज नसतो. उटणे, तेल लावून आंघोळ होते. मग नवीन फ्रॉक घालून मी तयार होते. टीव्हीवर राहुल काळे का महेश देशपांडे किंवा तत्सम गायक मोठ्याने गात असतो. मग आम्ही फराळ करतो. दिवाळीमध्ये नो ऑमलेट! पण लाडू, चिवडा, चकली खायला मजा येते.

दिवाळी दरवर्षी येते. आमच्या वेळी आम्ही सकाळी फटाके वाजवायचो, पहिला बॉम्ब कर्पेकर आजींच्या घरासमोर फोडायचो, असे बाबा सांगतात. हल्ली सरकारला अस्थमा झाल्यामुळे फटाके बंद आहेत असे बाबा म्हणतात. नंतर मी मैत्रिणींबरोबर फिरायला जाते. सगळीकडे छान दिव्यांची रोषणाई केलेली असते. मज्जा येते. असो.

दिवाळी दरवर्षी येते. लक्ष्मीपूजन झाल्यावर पाडवा येतो. बाबा आईला साडी देतात. ती एक दिवस नेसते आणि मग पुढे वर्षभर कपाटात ठेवून देते. कारण इतर वेळेला ती ड्रेसच घालते. भाऊबीजेला संजय मला बाबांनी घेऊन दिलेला नवीन मोबाईल देतो. मग मैत्रिणींना दाखविण्यात सर्व दिवस जातो. फक्त सहा ते नऊ फटाके वाजवायला परवानगी असते. त्यामुळे फक्त रात्रभर फटाके वाजतात. असो.

दिवाळी दरवर्षी येते. अरे हो, दिवाळीत आम्ही घराबाहेर रांगोळी काढतो हे लिहायचे राहिले. दुसर्‍या दिवशी शेजारचा संतोष ती पायाने पुसून जातो. मग त्याची आणि संजयची मारामारी होते आणि त्याच्या आणि माझ्या बाबांची बाचाबाची होते. मग आमची आई आणि संतोषची आई भांडण सोडवतात. संतोषने मला दिवाळीचे ग्रीटिंग कार्ड दिले आहे, पण तुम्ही कुणाला सांगू नका हं! असो.

दिवाळी दरवर्षी येते. चार दिवसांनी संपते. मग काही दिवसांनी तुळशीचे लग्न लावतात. दरवर्षी लग्न का लावतात आणि कुणाशी लावतात ते मला समजत नाही. हे पण पुढील वर्षाच्या सिलॅबस मध्ये आहे म्हणे. पुढील वर्षी अधिक महिना नाही, मग उणे महिना आहे का? दिवाली दोन महिने आधी येईल, आणि बजेट देखील कोलमडणार नाही. दिवाळीची सुट्टी पण संपत आली आहे. सरकारच्या लहरीप्रमाणे ही आठ दिवस ते एक महिना कितीही असू शकते. असो.

दिवाळी दरवर्षी येते. आता हा निबंध संपवते. उद्या बाईंना द्यायचा आहे. याचे शीर्षक “आली दिवाळी, दिवाळी आली,” ऐवजी “आली दिवाळी, गेली दिवाळी” असे ठेवावे का असा एक विचार मनात येतोय. तुम्हाला काय वाटतंय?

Comments

chan

By : mona
09/11/2023 10 : 03 : 19 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article