दुविधा.... की अद्वैत!


पल्लवी

चावीने दार उघडून मी घरात शिरले तेव्हा पाच वाजून गेले होते. समीराची वाढदिवसाची पार्टी पाच वाजता होती. पण बँकेतून निघायलाच मला उशिर झाला होता. वास्तविक समीराचे घर माझ्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर होते, पण कपडे बदलून पोहोचेपर्यंत साडेपाच वाजणार होते. मी घरात शिरल्याशिरल्या पायातल्या चपला स्टँडच्या दिशेने उडवल्या, अंगावरची साडी सोडून पलंगावर फेकली, आणि कपाटातला माझा आवडीचा ड्रेस घाईघाईत चढवला. केसांचा बन सोडून मोकळ्या केसावर एकीकडे कंगवा फिरवत दुसरीकडे गळ्यात डायमंडचा नेकलेस अडकवला. ओठांवर हलकीशी लिपस्टिक फिरवून कपाळावर लहानशी मॅचिंग टिकली चिकटवली आणि पायात हाय हिल्स घालून दरवाजा लॉक केला. अॅक्टिव्हा चालू करणार तेव्हढ्यात ध्यानात आले की आपण समीराची गिफ्ट घरातच विसरलो आहोत. परत दार उघडून गिफ्ट घेण्यात अजून पाच मिनिटे गेली.

समीराच्या घरी पोहोचले तेव्हा सर्वजण माझीच वाट पहात होते. सॉरी म्हणतंच मी समीराला मिठी मारली आणि माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केक तर मेणबत्या लावून तयार होताच. यथासांग केक कापून समीराच्या आणि इतरांच्याही गालाला फासून वाढदिवस साजरा झाला. केक कापणे ठीक आहे पण गालाला वगैरे लावणे जरा अतीच होते असे माझे स्पष्ट मत आहे. पण सर्वांच्यापुढे आपले काही चालत नाही हेच खरे.

खरतरं माझी आणि समीराची टी.वाय. च्या शेवटच्या वर्षीच ओळख झाली. पण सहा महिन्यातच आमची घट्ट मैत्री झाली होती. मला बँकेत जॉब लागल्यावर देखील आम्ही जवळजवळ रोजच एकमेकांना भेटत होतो. ती देखील एका खाजगी कंपनीत जॉब करत होती. पण संध्याकाळी एकत्र आमचा टाईमपास होतंच होता.

सर्व स्थिरस्थावर झाल्यावर मी आणि कश्मीराने, समीराची मोठी बहिण, सर्वाना खाण्याच्या डीशेस वाटल्या आणि शेवटी हुश्य म्हणून मी खाली बसले. पार्टीत बहुतेक चेहरे ओळखीचे होते पण काही नवीन देखील होते.

का कुणास ठाऊक, पण समीराच्या घरात शिरल्यापासुनच कुणीतरी आपल्याला सारखं न्याहाळतंय असे फीलिंग मला येत होते, पण कोण ते लक्षात येत नव्हते.

“पल्लू, लक्ष कुठे आहे तुझे? मघा पासून मी हाका मारते आहे तुला पण तू आपल्याच ह्याच्यात!” ,समीरा म्हणाली आणि मी भानावर आले,” हा निखिल, निखिल पाणिग्रही, माझा चुलत भाऊ.” समीराने ओळख करून दिली, “आणि ही पल्लू म्हणजे पल्लवी, माझी सख्खी मैत्रिण!” समीराने आपल्या स्टाईल मध्ये ओळख पूर्ण केली. समीराचे डोळे देखील ओळख करून देताना जरा जास्तच चमकत होते. माझी आणि निखिलची नजरानजर झाली आणि माझ्या लक्षात आले की याचीच नजर मघापासून आपला पाठलाग करत होती. ‘अरे देवा, हा पण निखिलच का?’, मी मनांतल्या मनात म्हटले. प्रत्यक्षात मात्र मी “हलो” केले. पण त्याने मात्र बिनदिक्कत आपला हात पुढे करून हस्तांदोलन करत मला स्पर्श करण्याची संधी सोडली नाही.

समीराला सख्खा भाऊ नाहीये. पण निखिल हा तिच्या सख्ख्या भावासारखाच होता हे मला नंतर समजले. अर्धा एक तास गपा मारून मी समीरा आणि इतर सर्वांचा निरोप घेतला. जरी निखिलची नजर माझ्यावरच होती तरी आमच्यात फारसे संभाषण मात्र झाले नव्हते. निखिल लाजरा असावा असे तर वाटत नव्हते. कुठेतरी काहीतरी पाणी मुरत होते हे मात्र नक्की!

निखिल

ती दरवाज्यातून आत शिरली, आणि खरं सांगतो, ‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला’ अशी माझी अवस्था झाली. तसे पहिले तर ती खूप सुंदर तर नक्कीच नव्हती. पण पहिल्या भेटीतच आकर्षून घ्यावी अशी काहीशी तिची पर्सनॅलिटी होती. उंची जेमतेम सव्वा पाच फूट असेल. अंगावर साधाच कॉटनचा ड्रेस होता पण तिला खूप शोभून दिसत होता. आणि समीराला पाहून जे काही स्मितहास्य तिच्या चेहऱ्यावर झळकले, त्याने कुणालाही मोहवले असते, आणि मी तर त्याला अजिबात अपवाद नव्हतो. घाईघाईत निघाल्यामुळे असतील कदाचित, पण मोकळे सोडलेले केस थोडेसे अस्ताव्यस्त विखुरलेले होते. पण तिच्या त्या मोहक चेहऱ्याला छान शोभून दिसत होते. ती आता आल्यापासून माझी नजर तिच्या चेहऱ्यावरून हलत नव्हती. आणि हे तिला पण जाणवत होते हे देखील मला समजत होते.

केक कापून झाल्यावर मी समीराला बाजूला घेऊन ‘ही कोण?’ अशी पृच्छा केली. तेव्हा डोळे मिचकावत,’ थांब, तुझी ओळख करू देते’, असे म्हणून समीरा मला तिच्याकडे घेऊन गेली. समीराने दोनतीनदा हाका मारल्यावर ती दचकून भानावर आली. समीराने ओळख करून देताना ‘ही पल्लू, पल्लवी’ असे म्हटल्यावर मी मनातल्या मनात जरा चमकलोच होतो. तिचे नाव ऐकून माझे मन क्षणभर परत भूतकाळात जाऊ पहात होते. तिच्याशी हस्तांदोलन करताना माझा हात एक क्षण जरा जास्तीच तिच्या हातात रेंगाळला होता हे मला जाणवत होते.

त्यानंतर जरी माझी नजर तिचा पाठलाग करत होती तरी कुठेतरी माझे मन मला मागे खेचत होते. त्यामुळे त्यानंतर माझे तिच्याशी काहीही संभाषण अशक्य होते.

रात्री कितीतरी वेळा मी अंथरुणावर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होतो. कधीतरी मध्यरात्री माझा डोळा लागला असावा. झोपेत पण बहुतेक पल्लवीचीच स्वप्ने मला पडत असावीत. पण चेहरा मात्र अंधुकच दिसत होता.

सकाळी माझे सर्व आवरून ब्रेकफास्टसाठी टेबलावर बसल्यावर आई म्हणाली,
“अरे निखिल, बरेच दिवसांपासून माझे सर्व दागिने घरीच पडले आहेत. जरा बँकेत जाऊन लॉकरची चौकशी करशील का आज?”

बँकेत पोहोचल्यावर काउंटरवरच्या माणसाने ऑपरेशन्स मॅनेजरच्या क्युबिकलकडे अंगुलीनिर्देश केला. तिथे एक तरुणी पाठमोरी उभी होती.

“एकस्कुज मी, मला सेफ डिपॅाझीट लॉकरबद्धल विचारायचे होते.” मी म्हणालो.
“एक मिनिट हं, बसा जरा.” असे उत्तर आले. अजूनही माझ्याकडे तिची पाठच होती. इतर काही उपाय नसल्यामुळे मी बसून तीची स्लीव्हलेस ब्लाउज मधील पाठ न्याहाळत होतो. अखेर मी देखील एक पुरुष आहे! दोन मिनिटांनी तिने आपला चेहरा माझ्याकडे केला आणि आम्ही दोघेही एकदमच उद्गारलो, “तुम्ही?”

समोर पल्लवी उभी होती. साडीमध्ये ती अधिकच आकर्षक दिसत होती. मी पुन्हा एकदा माझ्या मनाला आणि नजरेला काबूत आणण्याचा प्रयत्न केला.
“हो, मी इथे ऑपरेशन्स मॅनेजर आहे. काय काम होतं?” पल्लवीने सरळ मुद्याला हात घातला. का कोण जाणे, तिच्या स्वरात मला एक तुटकपणा जाणवत होता.
“माझ्या आईचे इथे माझ्याबरोबर अकाउंट आहे. आम्हाला एका सेफ डिपॅाझीट लॉकरची गरज आहे. मिळू शकेल का?” माझे बोलणे एकून तिचा चेहरा थोडासा निवळला.
“आत्ता या क्षणाला तरी लॉकर रिकामा नाहीये, पण चार पाच दिवसात मिळू शकेल.” पल्लवी म्हणाली.
“हरकत नाही. मी पुन्हा कधी भेटू तुम्हाला?” मी विचारले.
उत्तरादाखल तिने मला तिचे विजिटिंग कार्ड दिले. “चार दिवसांनी या नंबरावर फोन करा. तो पर्यंत लॉकर फ्री होईल.”

“धन्यवाद”, म्हणून मी तिचा निरोप घेतला. उत्तरादाखल तिच्या ओठावर उमटलेल्या छानश्या स्मितामुळे माझे पुढील चार दिवस चांगले गेले हे मात्र नक्की!

पल्लवी

समोर अचानक निखिलला पाहून मी जरा गडबडूनच गेले होते. तरी स्वत:ला सावरून माझा चेहरा शक्यतो निर्विकार ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न मी केला होता. पण शेवटच्या क्षणाला ते स्मितहास्य चेहऱ्यावर उमटलेच! हे जे काही होतंय ते ठीक नाही असे मी स्वत:च्याच मनाला सारखे बजावत होते. पण काय करणार, ‘दिल है के मानता नाही’, अशी अवस्था मनाची झालीच होती.

अपेक्षेप्रमाणे चार दिवसांनी निखिलचा फोन आलाच! लॉकर आहे म्हटल्यावर विसाव्या मिनिटाला निखिल त्याच्या आई बरोबर बँकेत आला. मी मग त्याना बँकेचे सर्व व्यवहार पूर्ण करून लॉकर त्यांच्या स्वाधीन केला. बोलता बोलता निखिलने जणू त्याचा बायोडाटाच मला सांगितला.

निखिलचे वडील, म्हणजे समीराचे काका, लहानपणीच गेले होते. पण समीराच्या वडिलांचे निखिलला भरपूर पाठबळ लाभले होते. तीन वर्षापूर्वीच त्याने ‘कलाकुसर’ नावाची आर्ट फर्म चालू केली होती. त्याचे अकाउंट आमच्याच बँकेत होते. आई सरकारी नोकरीतून नुकत्याच निवृत्त झाल्या होत्या.

ते दोघेही निघून गेल्यावर मी माझ्या इतर कामात गुंतले. पण माझं चित्त मात्र ठिकाणावर नव्हते. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. राहून राहून त्याचाच चेहरा डोळ्यापुढे येत होता. गेले सहा महिने थोडेफार शांत झालेले मन परत वेडेपिसे झाले होते. रात्री अंथरुणावर पडल्यावरही तेच विचार मनात घिरट्या घालत होते. माझे मन सारखे पंधरा वर्ष मागे जाऊ पहात होते.

निखिल

ऑफिसला पोहोचलो तर टेबलावर कामाचा ढीग पडला होता. मी फोन उचलून सायलीला म्हटले,” जरा मिस जोशीना आत पाठव.”
“सर, मिस जोशी रजेवर आहेत. चार दिवसांनी त्यांचे लग्न आहे ना!.” सायली म्हणाली.

त्यानंतर दहा मिनिटे काहीही न करता मी नुसता बसून होतो. जरा वेळाने रेश्मा, माझी पार्टनर, आत आली.
“काय रे, शून्यात नजर लावून बसला आहेस. बरा आहेस ना? काही होतंय का? कॉफी मागवू का?” रेशमाने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. मी दचकून भानावर आलो. “अग हो, किती बोलशील? जरा दमाने घे.” मी जरा वैतागूनच म्हणालो. “अरे काय झालय? एखाद्या प्रेमभंग झालेल्या मजनू सारखा चेहरा करून बसला आहेस. मी अजून तरी तुला नकार दिलेला नाहीये!” ही एक बिनधास्त बाई आहे. काय तोंडाला येईल ते बोलते.
“तू नकार द्यायला मी विचारलंय का तुला?” मी अजूनच उचकलो.
“मग विचार ना! कधी विचारतोस?” रेश्मा.
“अग, अजून खूप मुली आहेत रांगेत! त्या नाही म्हणाल्या तर विचारीन तुला!”
“आलाय मोठा मजनू! तोंड बघ आरश्यात!”
“मला काय, तूच विषय काढलास!”
“मग काय करू, समोर कामाचा ढीग पडलाय आणि तू अर्धा तास एक फाईल पण उघडली नाहीस. अशाने दुकान बंद होईल आपलं!”
“काही बंद वगैरे होत नाही. मला दहा मिनिटे दे.”

“ठीक आहे. मी कॉफी पाठवते.” असे म्हणून रेश्मा बाहेर गेली. रेश्माशी बोलल्यामुळे माझे मन जरा हलके झाले होते. पुढील अर्ध्या तासात मी सर्व फाईल्स हातावेगळ्या केल्या. नंतर पूर्ण दिवसभर क्लाएंटचे फोन, मीटिंग्स यात दिवस कसा निघून गेला ते समजलेच नाही. पण रात्री झोपायची वेळ झाली आणि मन पुन्हा त्याच विचारात गुरफटले. पुन्हापुन्हा तिचाच चेहरा डोळ्यासमोर येत होता.

पल्लवी

शेवटी ज्या दिवसाची मला धास्ती वाटत होती तो दिवस उजाडला. माझं मन विषण्ण झाले होते. एकदा वाटत होत की काहीतरी कारण सांगून जाऊ नये. पण आमच नातंच असं होतं की न जाणे शक्य नव्हते. जरी मन मानत नव्हते तरी सर्व स्त्रीसुलभ साजशृंगार करून चेहऱ्याला वॅार पेन्ट लावून आकर्षक केशरचना करून मी हॉलमध्ये दाखल झाले. लग्न समारंभात देखील मी मागेच बसून होते. परंतु दोघे वर-वधू स्टेजवर आल्यानंतर मात्र मला त्यांना भेटणे आवश्यक होते. मी वर स्टेजवर जाऊन म्हणाले, “हलो निखिल, पल्लवी, तुमच्या दोघांचे मन:पूर्वक अभिनंदन!”
“पल्लू, इतका वेळ होतीस कुठे? मी केव्हापासून तुला शोधतोय!” निखिल माझ्यावर ओरडलाच.
“अरे जरा उशिर झाला, सॉरी!” मी निखिलची नजर चुकवत म्हणाले. गोरापान, जवजवळ सहाफुट उंच निखिल खूपच हँडसम दिसत होता. पल्लवी पण खूप छान दिसत होती. दोघे एकमेकाना नक्कीच सूट होत होते. मी परत एकदा दोघांचे अभिनंदन करून खाली उतरणार तेव्हढ्यात माझ्या बाजूला कुणीतरी उभे आहे याची मला जाणीव झाली.
“हाय पल्लवी, अभिनंदन!” मी चमकून वर पाहिले. बाजूला निखिल पाणिग्रही उभा होता. हा इथेपण माझा पाठलाग करतोय की काय?
“अरे निखिल मी तुला सांगितले होते ना! हा निखील पाणिग्रही, माझा बॉस!” पल्लवी म्हणाली.
“हलो निखील, काँग्रॅटस्!” निखिल म्हणाला.
“हाय पल्लवी, कशा आहात?” असे म्हणून निखिलने मला ग्रीट केले.
“अरे वा तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता?? कसे काय?” पल्लवी उद्गारली, “एकाच वेळेला दोन पल्लवी आणि दोन निखिल एकाच जागी? केव्हढा मोठा योगायोग आहे!”
“हो, पण ती वेगळीच स्टोरी आहे. नंतर सांगेन”, असे म्हणून निखिलने काढता पाय घेतला
पडत्या फळाची आज्ञा समजून मी पण स्टेजवरून खाली उतरले.

“आईस्क्रीम?” निखिलने विचारले.
“हो चालेल”, मी नाईलाजाने म्हणाले.

आम्ही दोघे आईस्क्रीम घेऊन एका टेबलावर बसलो. निखिल अगदी सुटाबुटात आला होता. मी आईस्क्रीम खाताखाता डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याला पहात होते. पण तो देखील फारश्या बोलण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता. काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय हे मला परत एकदा जाणवलं.
“तुम्हाला माहिती आहेच की माझी आर्ट फर्म आहे. पल्लवी माझी एक सहकारी म्हणून तिथे काम करते.” निखिल म्हणाला.
“आणि निखिल माझा बालमित्र आहे. आम्ही लहानपणापासून एकमेकाना ओळखतो.” मी पण माहिती पुरवली.
“खरतरं किती आनंदाचा दिवस आहे आज! पण मग आपण दोघेही इतके दुख्खी का आहोत?” निखिलच्या तीक्ष्ण नजरेला सर्वच गोष्टी कशाकाय दिसतात ते मला समजत नव्हतं. एव्हढा का माझा चेहरा बोलका आहे? अर्थात मला पण त्याच्या बाबतीत हे जाणवलं होतं हेही तितकेच खरे!

दोन मिनिट आम्ही आमच्याच विचारात मग्न होतो. शेवटी शांतता असह्य होऊन मी म्हणाले, “शेवटपर्यंत मला वाटत होतं की निखिल मला विचारेल. पण कॉलेजमध्ये त्याला पल्लवी भेटली आणि या पल्लवीचा पत्ता कट झाला.”
“जेव्हा पल्लवी ‘कलाकुसर’ मध्ये जॉईन झाली तेव्हाच मला आवडली होती. पण तिच्या आयुष्यात वेगळाच निखिल आहे हे मला जरा उशिराच समजलं.” निखिल म्हणाला.

एकंदर आम्ही दोघेही समदुख्खी होतो तर! हा निखिल त्या पल्लवीच्या प्रेमात होता. पण ती पल्लवी त्या निखिलच्या प्रेमात होती. आणि ही पल्लवी पण त्याच निखिलच्या प्रेमात होती. ही मोठीच दुविधा होती. पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात या पल्लवीचे याचं निखिलशी अद्वैत जुळेल अशीच भावना वाढीस लागली होती.

Comments

Complicated a bit.... nice 👍

By : Pratibha Tarabadkar
16/06/2023 3 : 06 : 52 PM

याम् चिंतयामि सततं मयि सा विरक्ता ....

By : Bhalchandra Shrikhande
17/06/2023 8 : 38 : 56 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article