बदलांचे वारे आणि त्यांचा वेग


बदलांचे वारे आणि त्यांचा वेग

शशांक पुरंदरे

२०२५ संपले आणि २०२६ उजाडले. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे, समाधानाचे आणि आरोग्यवर्धक जावो हीच इच्छा.

पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा ३६५ दिवसांत पूर्ण करते त्यानुसार वर्षाचे मापन केले जाते. यामुळे वर्ष ३६५ दिवसांनंतर बदलते. जुने वर्ष संपून नवीन वर्ष सुरु झाले तरी आपल्या जगण्यात फारसा फरक पडतो असे मला स्वतःला वाटत नाही, पण ३१ डिसेंबरला जागून रात्री बारा वाजता नवीन वर्षाचे स्वागत करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. ही प्रथा साजरी करण्याची प्रत्येकाची वेगळी पध्दत असते. एक सर्वमान्य पध्दत आपणां सर्वांनाच माहित आहे, त्यामुळे त्याबद्दल मी वेगळे काही लिहू इच्छित नाही. पण इतरही काही प्रथा पाळणारे लोक आहेत.

काही विद्रोही जण एक जानेवारीला नवीन वर्ष सुरु होते असे मानतच नाहीत. पण जे सर्व जगाने मान्य केले आहे ते मानायला काही हरकत असावी असे मला तरी वाटत नाही. फारतर त्यांनी त्यांच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी देखील मदिरा प्राशन करुन टुन्न व्हायला आमची काहीच हरकत नाही.

वर्षाच्या पहिल्या दिवशी काही लोकं मंदिरात जाऊन देवदर्शन घेतात, तर ख्रिश्चन लोकं चर्चमध्ये जातात.

काही दरवर्षी आपण पुढील वर्षी काय करणार याचे संकल्प करतात. उदाहरणार्थ, मी व्यायाम करेन, अभ्यास करेन, दारु-सिगारेट सोडेन, वगैरे वगैरे. यातील बहुतेक संकल्प एखाद्या महिन्यातच संपतात.

मी अनेक वर्षांपूर्वी एक संकल्प केला होता, की आयुष्यात कधीही असले संकल्प करणार नाही आणि तो मी आजतागायत पाळला आहे.

नवीन वर्ष सुरु झाले की गेल्या वर्षी काय झाले, आपण स्वतः काय केले, काय करायला पाहिजे होते याची उजळणी सुरु होते, पण मी हे देखील काही करत नाही.

परंतु काही प्रमाणात पुढे काय करायचे आहे ते कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात दडलेले असतेच. माझ्याच काय, सर्वांच्याच बाबतीत हे खरे असते. हे सर्व वैयक्तिक पातळीवर होत असते. आजुबाजूला होणाऱ्या घटनांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम आपल्या जीवनावर होतंच असतो.

नवीन शैक्षणिक धोरण गेल्या वर्षी देशात आणि राज्यात अंमलात आले. संगणकीकरण, कृत्रिम बुध्दिमत्ता आणि वेगाने बदलणारी भौगोलिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब यात दिसत आहे.

देशात लोकसंख्येच्या मानाने डॅाक्टरांची संख्या कमी आहे, पण इंजिनीयर पदवीधरांना रोजगार उपलब्ध होत नाहीयेत. विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांचीही हीच परिस्थिती आहे. कृत्रिम बुध्दिमत्ता आणि यंत्रमानव वापराचा परिणाम रोजगार उपलब्धतेवर होऊ लागला आहे. आयटी क्षेत्रातही अशीच अवस्था आहे. सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामधे झपाट्याने होणाऱ्या बदलांमुळे हे सर्व होत आहेत. पुढे जाऊन परिस्थिती अजून बिकट होईल.

यासाठी पारंपरिक शिक्षणात बदल करावा लागेल. नवीन शैक्षणिक धोरण यादृष्टीनेच आखण्यात आले आहे. मात्र याचे परिणाम दिसण्यासाठी काही वेळ जावा लागेल. या नवीन शैक्षणिक धोरणाचा आढावा कालच्या Times Of India मधे घेण्यात आला आहे. वाचकांनी तो जरुर वाचावा.

मला शिक्षण क्षेत्राचा फारसा अनुभव नाही, परंतु माझ्या अनेक वाचक मित्रमैत्रीणी या क्षेत्रात काम करतात. मला त्यांची या विषयावरील मते जाणून घ्यायला नक्की आवडेल.

इथून पुढे प्रत्येकाला सर्वच क्षेत्रात काय प्रचलित आहे हे जाणून घेणे गरजेचे ठरणार आहे. उदाहरणार्थ, कला क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिला देखील कृत्रिम बुध्दिमत्ता, संगणक या विषयांची माहिती असणे आवश्यक होणार आहे. किंबहुना, सर्वच क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्यांना देखील हे गरजेचे आहे. म्हणूनच नवीन शैक्षणिक धोरणात सर्वसमावेशक शिक्षणावर भर दिला जाणार आहे.

Comments

khara ahe

By : Mona
05/01/2026 2 : 26 : 07 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article