नात्यांची गोष्ट : भाग ८: विन्या


तीन चार वर्षांपूर्वी आम्ही आमच्या चार बेडरूमच्या घरात रहायला आलो. विसाव्या मजल्यावरच्या या घरात मध्यभागी वीस बाय वीसचा हॉल आहे. चार बाजूला चार बेडरूम्स आहेत. दोन बेडरूमच्या मध्ये किचन आहे. घरात सर्व आधुनिक सुखसोई उपलब्ध आहेत. तरीदेखील मधून मधून घरातील रहिवाशी दु:खी होतातच. आता परवाचंच बघा ना!

चांगली शुक्रवाराची संध्याकाळ होती. आदिती आणि मी (नाईलाजाने) एक मराठी मालिका बघत होतो. म्हणजे आदिती मालिका बघत होती आणि मी मालिका संपायची वाट बघत होतो. कालिंदी कानाला हेडफोन्स लावून गाणी ऐकत होती. विन्या आणि निशा सिनेमाला गेले होते. अशा शांतप्रहरी दरवाज्याबाहेरील घंटेचा निनाद झाला. मी दरवाजा उघडला आणि विन्या आणि त्याच्या मागोमाग तणतणत निशा आत आली. विन्या जाऊन सोफ्यावर बसला आणि निशाने तोंडाचा पट्टा सुरु केला.

“डॅङी, तुमच्या मुलाला समजवा, (म्हणजे हिचा नवरा, म्हणजे लिव्ह इन पार्टनर, आता परत माझा मुलगा झाला होता तर) हे वागणं बरोबर नाही. मी अर्धा तास ह्याची वाट पहात मल्टिप्लेक्स बाहेर उभी होते, याचा पत्ता नाही, फोन नाही. आणि उशिरा येऊन म्हणाला, घरी जाऊ, सिनेमा कॅन्सल!”
“हो विन्या, बरोबर नाही, म्हणजे बरोबर आहे, म्हणजे तिचं बरोबर आहे आणि तुझं बरोबर नाही.”
“डॅङ, तुम्ही पण?” विन्या.
“मग काय, लिव्ह इन सासरा म्हणून माझी जबाबदारी आहेच ना!” मी.
“अरे पण काय झालंय ते तुम्हाला माहीत देखील नाही आणि तरीही तिची बाजू घेताय तुम्ही?”
“हो, कारण नवरा बायकोच्या भांडणात बायको नेहमीच बरोबर असते. लिव्ह इन मधे पण हाच नियम लागू होतो. हीच तर खरी सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे.”
“ तुम्ही काय मराठी नाटकात काम करायला लागलाय की काय हल्ली? डायलॉग कसले मारताय? आणि मुळात मी हिचा लिव्ह इन पार्टनर आहे, नवरा नाही.”
“अरे पण मुळात झालंय काय? सिनेमा का नाही पाहिलात? पण एका अर्थी बरं केलंत. मुळात एक शाहरुख खान तीन तास टॉलरेट करणं कठीण आहे. इथे तर त्याचा डबल रोल आहे.”
“अय्या, हे मला माहित नव्हतं”, निशा किंचाळलीच, “डबल मझा और कम दाम, बघ विन्या, तुझ्या मुळे माझा सिनेमा मिस झालाय.”
“हे बघ, माझा मूड नव्हता आज!” विन्या.
“असं काय झालंय मूड जायला?” निशा.
“तेच तर तुला सांगायचा प्रयत्न करतोय केव्हापासून, पण तू ऐकशील तर शपथ!” विन्या वैतागून म्हणाला.

“अरे वा, तुमच्या सह्जीवनिक राहाण्याचं पाहिलं भांडण साजरे तर केलेच पाहिजे. चला बियर पिऊया.” कानावरचे हेडफोन्स काढून कालिंदी म्हणाली. कालिंदीला बियर पिण्यासाठी काहीही कारण चालतं.
“यस, आय बॅडली नीड बियर! कालिंदी मला पण एक पाइंट आण फ्रीजमधून!” विन्या.
“हो, मला पण एक आण. ह्याच्या डोक्यावरच फोडते थांब!” निशाचा राग अजून शांत झाला नव्हता.
शेवटी डायनिंग टेबलावर बसून प्रत्येकाच्या हातात एकेक पाइंट आल्यावर घरात शांतता पसरली. कोण म्हणतं दारू वाईट असते म्हणून!

“आता तरी सांगणार आहेस का काय झालं ते?” अदिती म्हणाली.
“काय होणार? भांडला असेल कोणाशी तरी! बहुतेक रिटाशीच! हो ना?” निशा म्हणाली. लिव्ह इन आणि लग्नात फारसा फरक नसावा बहुतेक!

“रिटाशी नाही पण तिच्यामुळेच भांडण झालं हे नक्की!” विन्या. रिटा विन्याची सहकारी आहे ऑफिसमधली. तीन वर्षांपासून एमबीए मार्केटिंग करून विन्या एका आयटी कंपनीत काम करत होता. यावर्षी त्याला प्रमोशन अपेक्षित होतं. पण आज त्याला डावलून त्याच्यापेक्षा जुनियर रिटाला प्रमोशन दिलं गेलं होतं. त्यामुळे विन्या अपसेट झाला होता.

“विन्या, मी तुला माझ्या आणि रविकाकाबरोबर काम करण्याची तेव्हाच संधी दिली होती.”
“हो पण मला बाहेरचा अनुभव हवा होता म्हणून मी जॉब निवडला होता.” विन्या म्हणाला.
“हो, बरोबरच आहे तुझे. पण बाहेर असे हे अनुभव येतच रहातात. त्यांच्यातूनच आपण शिकत असतो. तेव्हा अशा गोष्टींनी अपसेट होऊन काहीच उपयोग नसतो. आणि त्याचा राग निशावर काढणे तर चुकीचेच आहे, नाही का?” मी म्हटले.
“यस डॅड, बरोबर आहे तुमचं. आय एम सॉरी निशू!” उत्तरादाखल निशुने बियरची बॉटल क्लिक केली.
“चलो, बॉटमस् अप! आणि धन्यवाद डॅड, नाहीतर माझ्या हातून खून झाला असता आज!” निशा.
“बेटा, एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न असो किंवा लिव्ह इन, पेशन्स इज नीडेड इन एनी रिलेशनशिप.” मी म्हटले.
“तथास्तु” असे म्हणून अदितीने बॉटल रिकामी केली.

आठच दिवसात विन्या आणि निशुने रीतसर विवाहाची नोटीस दिली. एखाद्या वर्षात विन्या मला आणि रविला जॉईन करेल असं दिसतंय.

“बरं झालं, ” मी आदितीला म्हटलं, “तुझा दिवाळसणाचा खर्च फुकट नाही गेला!”

Comments

शेवटी live in काय आणि लग्न काय बाई नेहमीच बरोबरच असते हे (कटू) सत्य स्वीकारलं की पुरुषाचं आयुष्य सोपं होतं नेहमीच्या मिश्किल शैलीत सांगितले आहे. फक्त बीयरचा उल्लेख पाणी पिण्याच्या सहजतेने केला आहे तो माझ्या 'डोंबिवलीकर मनाला 'खटकला.

By : Pratibha Tarabadkar
13/05/2023 11 : 51 : 52 AM

Times have changed.

By : Admin
13/05/2023 6 : 07 : 35 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article