नवविवाहाचे कवित्वः तेरड्याचा रंग तीन दिवस
नवविवाहाचे कवित्वः तेरड्याचा रंग तीन दिवस
शशांक पुरंदरे
“नूतनवर्षाभिनंदन!”
बंडूची स्वारी दारातून आत आली. मागे स्वाती होती. २६ डिसेंबरच्या सुमुहुर्तावर ज्यांनी लग्नगाठ बांधली त्यात हे दोघे देखील होते.
“बंड्या, अरे लग्न झालंय तुझं आता! आतातरी हे नूतन, वर्षा वगैरे बंद कर!” राजाने उगाचच किल्ली मारली.
“बघा ना राजाभाऊ, लग्नाला पंधरा दिवस झालेत, पण जुन्या सवयी सुटत नाहीत. रस्त्यात एखादी सुंदर मुलगी दिसली की थबकलेच! वळून वळून पहात असतो हा तुमचा मित्र!” आता हा बंडू राजाचा मित्र झाला होता.
“तरी मी आधीच सांगितले होते की सुंदर मुलीकडे ढुंकूनही पाहू नकोस. पण ऐकेल तर विन्या कसला?”
बंडूचे खरे नाव विनायक आहे. विनायकांवरुन विन्यावर यायला स्वातीला पंधरा दिवस पुरले होते.
“अगं पण बघितल्या शिवाय कसं समजणार मुलगी सुंदर आहे की नाही ते?” बंडूने पृच्छा केली. त्याचा प्रश्न रास्तच होता.
“ठीक आहे, कुठल्याही मुलीकडे पाहू नकोस.”
“परत तेच! मुलगी आहे की मुलगा हे समजण्यासाठी तरी पहावेच लागेल, आणि हल्ली ते देखील पटकन कळत नाही.”
“म्हणून काही खाली वाकून वळून पाहण्याची गरज नाही.” स्वाती फणकारली.
“ती मी बुटाची नाडी बांधत होतो तेव्हा!”
“हो!!?? नाडी बांधताना बुटाकडे पाहतात, मुलीकडे नाही!”
राजा आणि उमा इतका वेळ हे युद्ध ऐकत होते. आता त्यात तह करण्यासाठी उमा स्वातीला म्हणाली,
“स्वाती, तू चल आत. आपण जरा नाश्त्याचं बघूया.”
दोघी आत गेल्यावर दोन मिनिटे शांततेत गेली.
“सकाळी सकाळी आगीत तेल ओतायची काही गरज होती का?” बंडू वैतागून म्हणाला.
“अरे जरा गंमत केली. मला काय माहित एव्हढा भडका उडेल.” राजा म्हणाला.
“ते जाऊदे. कसा झाला तुमचा हनिमून? सिमला कुलू मनाली ना?” राजाने विचारले.
“छान झाला.” बंडूने तुटकच उत्तर दिले.
“काय काय पाहिले?”
“राजा, आम्ही हनिमूनला गेलो होतो, सिमला पहायला नाही.”
तेव्हढ्यात चहा पोह्यांबरोबर उमा आणि स्वाती बाहेर आल्या. पुढची पांच मिनिटे ताटल्यांवर चमच्यांचे आवाज येत होते. मग चहा नावाचे अमृत प्राशन झाले. तेव्हा कुठे स्वातीचा लाल झालेला चेहरा मूळ पदावर आला.
“अहो,” उमा जरा जुन्या पठडीतील असल्यामुळे राजाला सर्वांसमोर अहो जाओ करते, “मी आणि स्वाती जरा दोन तास बाहेर जातोय. तुम्ही आज लंच बाहेरून मागवा, आणि नेहमीप्रमाणे बीयर ढोसत बसू नका. विनायक, स्वातीचं सोमवारचं व्रत असतं. तेव्हा दारु आणि नॅानव्हेजला सुट्टी!”
उमाने डोळेदेखील मिचकावले असे राजाला वाटले.
“मला दहा हजार रुपये द्या.” स्वाती बंडूला म्हणाली. नीट बसला होता म्हणून बरं, नाहीतर बंडू खुर्चीतून खालीच पडला असता.
“इ..इतकी कॅश न..नाहीये माझ्या कडे.” बंडू ततपप करत म्हणाला.
“मग क्रेडिट कार्ड द्या.” स्वातीने विषयच संपवला.
नंतर पांच मिनिटे घरात फक्त शांततेचा आवाज येत होता. अखेर बंडूने तोंड उघडले.
“राजा, नालायका, लग्न हे असं असतं याची मला आधीच कल्पना दिली असतीस तर मी रजिस्ट्रार समोर सहीच केली नसती.”
“मग काय केलं असतंस?”
“आजन्म ब्रह्मचारी राहिलो असतो किंवा लिव्ह इन मध्ये राहिलो असतो.”
“लिव्ह इन? तुला काय महिती आहे लिव्ह इन बद्दल? भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था होते भल्याभल्यांची!
“अरे कसं आहे, लग्नानंतर सुरुवातीचे दिवस हे असेच असतात. मी लिहून देतो, स्वाती तुला देखील एक शर्ट घेऊन येईल बघ! जरा विचार कर, तुला जर कोणी सांगितलं की उद्यापासून तुला कायमचे तुझ्या सासरी राहायला जायचं आहे, तर तुझी अवस्था कशी होईल? अरे, बायकांच्या मनात थोडी असुरक्षीततेची भावना असते आणि ते साहजिकच आहे. काही दिवस जाऊ देत, मग सगळे ठीक होईल.”
बंडूने एक दीर्घ सुस्कारा सोडला.
“संध्याकाळपर्यंत ठीक होईल ना सगळं?”
“संध्याकाळ? अरे ती दोन तासांनी येईल तेव्हाच सर्व काही बदललेलं असेल. खरेदी हा बायकांचा वीक पॅाईंट आहे. खरेदी झाली की त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तजेला येतो आणि मन कसं प्रसन्न होतं.”
“बरं बाबा, तुम्हीच आमचे गुरुदेव आता!”
“बरं ते जाऊदे. जेवायला काय मागवू ते सांग.”
“मुगाची उसळ मागव. आता आयुष्यभर मूग गिळून बसण्या शिवाय काही पर्याय आहे का दुसरा?”



Comments
Nice
By : Mona
मुगाची डाळ आणि मुगाची मऊ मऊ खिचडी!!
By : Bhalchandra Shrikhande
हाहाहा
By : Hemangi
😜
By : Vaijayanti Palkar