लग्न करावे पळून
लग्न करावे पळून
शशांक पुरंदरे
शिवानी-प्रशू, आज भेटूया का? जरा अर्जंट आहे.
प्रशांत-शिवा, ठीक आहेस ना? काय झालंय? काही प्रॅाब्लेम आहे?
शिवानी-हो. भेटल्यावर बोलू. नेहमीच्या जागी, संध्याकाळी चार वाजता?
प्रशांत-ठीक आहे. चार वाजता. बाय.
शिवानी-काय रे, साडेपाच वाजलेत. मी कंटाळून निघाले होते परत जायला.
प्रशांत-मुलगी बघायला थांबलो होतो म्हणून उशीर झाला, सॅारी!
शिवानी-सॅारी? नालायका, लाज वाटते का? इथे माझ्याशी टाका भिडवतोय, आणि तरीही मुली न्याहाळतोयस??!!
प्रशांत-शिवा, मुली नाही, मुलगी!
शिवानी-दोन्हीमधे काय फरक आहे???
प्रशांत-मला बघायला मुलगी आली होती घरी! माझ्या घरचे माझे लग्न ठरवताहेत.
शिवानी-अरे वा!! मग आवडली का? तुला तर काय सगळ्याच मुली आवडतात!
प्रशांत-काहीही बोलू नकोस. मला नाही पण घरच्यांना आवडली आहे. सहा महिन्याच्या आत बार उडवून देऊ असे म्हणताहेत. मुलीकडचे पण तयार आहेत.
शिवानी-सेम हियर! माझे पण सहा महिन्यात लग्न लावणार आहेत. मी पण काल मुलगा पाहिला. घरच्यांना पसंत आहे.
प्रशांत-पण तू घरी सांगितले नाहीस की आपले एकमेकांवर प्रेम आहे आणि आपण लग्न करणार आहोत ते?
शिवानी-तू सांगितलेस?
प्रशांत-मला भीती वाटते.
शिवानी-सेम हियर! पण तू पुरुष आहेस ना?
प्रशांत-तुला शंका आहे?
शिवानी-पुरुष असूनही घाबरतोस काय मुली सारखा!
प्रशांत-ठीक आहे. आपण दोघांनीही आज आपापल्या घरी सांगून टाकूया की आपले एकमेकांवर प्रेम आहे आणि आपण फक्त एकमेकांशी लग्न करणार आहोत.
शिवानी-चालेल. उद्या याचवेळी याच ठिकाणी भेटूया. चल बाय.
प्रशांत-बाय.
प्रशांत-छान, आज तुलाच उशीर झालांय!
शिवानी-हो रे, पण तो परवाचा मुलगा नेमका मला भेटायला आला. मग बोलत बसलो आणि मग उशीर झाला.
प्रशांत-म्हणजे तू घरी सांगितले नाहीस!
शिवानी-अरे, सांगणारच होते, पण त्याआधीच आमचं भेटायचं ठरलं, मग कसं सांगणार ना! पण तू सांगितलेस का?
प्रशांत-नाही, आमचं पण आज भेटायचं ठरलंय.
…………
…………
शिवानी-हे काही खरं नाही. त्यापेक्षा आपण असं केलं तर?? ….. नको, त्यापेक्षा तसं करुया. का असंच करुया?? मला काहीच समजत नाहीये.
प्रशांत-तुला कसंतरीच होतंय का? घे, जरा पाणी पी.
…………
शिवानी-पाणी पिऊन जरा बरं वाटलं. आपण पळून जाऊन लग्न करुया!!
प्रशांत-गुड आयडिया! आपल्याला तयारी करायला सहा महिन्यांचा वेळ आहे. आपण पुढच्या महिन्यात पळून जाऊ.
शिवानी-डन! पण तोपर्यंत आपण एकमेकांना भेटणं बंद करुया. कुणी पाहिले तर वाट लागेल! आपण एक तारखेला चार वाजता इथेच भेटू. बॅग घेऊनच ये.
प्रशांत-ठीक आहे. बाय.
एक तारखेला चार वाजता-
प्रशांत-आज दोघेही कसे वेळेवर आले.
शिवानी-पण एक प्रॅाब्लेम झालाय. कपडे वगैरे आणले नाही आहेत.
प्रशांत-पण बॅगतर आहे ना! मग??
शिवानी-रिकामी आहे. आत्ताच विकत घेतली. अरे, मी त्या मुलाला रोजच भेटते आहे, त्यामुळे बॅग विकत घ्यायला जमलेच नाही. पण मुलगा चांगला वाटतोय. छान नोकरी आहे, एकुलता एक आहे.
प्रशांत-मग?? विचार काय आहे?
शिवानी-दोन दिवसांनी पळूया. मी उद्या सहा वाजता त्याला इथेच बोलावले आहे. मी लाल ड्रेस घालून येईन म्हणजे परवा पळायचे नक्की आहे असे समज. मग परवा चार वाजता इथेच भेटू.
पण तिने त्या दिवशी पिवळा ड्रेस घातलेला असतो.
नंतरच्या दिवशी-
शिवानी-अरे काल गोची झाली. आईने नेमका माझा लाल ड्रेस धुवायला टाकला होता. सॅारी.
प्रशांत-आता उद्या मला वेळ नाही. त्या मुलीला भेटायचे आहे. बरी आहे, दिसायला तर छानच आहे. पण ते जाऊदे, तुझी सर्व तयारी झाली की मला फोन कर. किंवा वेळ लागणार असेल तर आठ दिवसांनी भेटूया. बाय.
आठ दिवसांनंतर-
प्रशांत-मला फोन का नाही केलास?
शिवानी-अरे, माझा फोन पाण्यात पडला.
प्रशांत-ते जाऊदे, आपण आत्ताच पळून जाऊया.
शिवानी-नाही जमणार, कारण माझं उद्याच लग्न आहे. पण तू लग्नाला नक्की ये.
प्रशांत-माझे पण उद्याच लग्न आहे. तू पण ये जमल्यास!
मधुचंद्राच्या रात्री-
प्रशांत-पण काही म्हण, तुझी कल्पना भन्नाटच होती. शेवटपर्यंत वाचकांना गुंगवत ठेवलं.
शिवानी-हो ना, अजिबात सुगावा लागून दिला नाही की आपण दोघे एकमेकांशीच लग्न करतोय, ते ही पळून न जाता!



Comments
हा हा हा
By : Hemangi Pradeep Kulkarni
कहानी में twist 😄 niiice!
By : Sheela Bahadkar
👌😄😂
By : Nandkumar Thorat
झक्कास.
By : Shirish joshi