एक नमुना प्रेमपत्र
टीप : हा नमुना कुणीही होतकरू प्रेमवीर वापरू शकतो. योग्य जागी योग्य त्या सूचना केल्या आहेत. पत्र पाठविताना सूचना वगळण्याची काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी लेखकाशी संपर्क करावा. लेखकाला या बाबतीत प्रदीर्घ अनुभव आहे.
प्रिय टिंब टिंब टिंब, (टिंब टिंब टिंब च्या जागी आपले नाव लिहावे)
मी तुला पाहताक्षणीच तुझ्या प्रेमात पडलो आहे. अगदी रस्त्यावरून चालताना खड्यात पडावे तसेच! मी तुझ्यावर माझ्या पायांच्या तळव्यापासून (From the bottom of the heart चा स्वैर अनुवाद!) प्रेम करतो. तुझी माझी पहिली नजरानजर झाली तेव्हा माझ्या नजरेचा बाण तुझ्या नयनांमधून आरपार गेला. तू साठ वर्षांची असतीस तर तुझ्या डोळ्यातील मोतीबिंदू देखील किती पिकला आहे ते मी सहज सांगू शकलो असतो. तुझ्या त्या उजव्या गालावरच्या खळीत एक माशी सहज बसू शकली असती, तर माझी काय कथा! (हे वाक्य डावे उजवे पाहून खळी पडत असेल तरच लिहावे) तुझे गुलाबी गाल पाहून गुलाबाला देखील लाज वाटेल. तुझे ओष्ठद्वय म्हणजे गुलाबांच्या जणू पाकळ्याच! तुझ्या दातांच्या मोहक कुंदकळ्यांनी मला मोहवून टाकले. (हे वाक्य दात नीट तपासून (प्रेयसीचे) मगच लिहावे)
तुझ्या सर्व अवयवांचे मी असेच वर्णन करत राहिलो तर मोबाईल data पुरणार नाही. (हे प्रेमपत्र कुठल्याही सोशल मिडीयावर चालू शकेल. पण कृपया chat gpt वापरू नये. AI ला प्रेम कशाशी खातात ते माहित नाही!) पण हे नमूद करावेसे वाटते की तुझ्या काळ्याकभिन्न केसांमध्ये माझे हृदय पार गुंतून गेले आहे. कुठला शाम्पू वापरतेस ग? तुझ्या सर्वांगाचा सुगंध माझ्या घ्राणेंद्रियांमध्ये अजूनही वास करत आहे. कुठला डिओ वापरतेस हे सांगितलेस तर पहिल्या भेटीत तोच घेऊन येईन.
तुझा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे. तू स्टेसड जीन वापरतेस त्यामुळे लग्नानंतर खर्च कमी होईल. (लग्नानंतर हा शब्द स्वत:च्या जबाबदारीवर लिहावा) मी भेटायला येताना पुष्प्गुच्छ आणणार नाही. कारण तू फुलांपेक्षाही सुंदर आहेस. आणि फुले झाडावरच शोभतात.
अजून खूप काही लिहू शकतो. पण मग भेटल्यावर काय बोलणार? माझे हे पत्र मिळाल्यावर लगेच तू भेटीला तयार होशील याबध्दल मला खात्री आहे.
तोपर्यंत,
तुझा प्रेमाभिलाषी,
टिंब टिंब टिंब (हे वरच्या टिंबांपेक्षा वेगळे आहे. इथे स्वत:चे नाव घालावे)
तळटीप: हल्ली पोस्टाने प्रेमपत्रे पाठवीत नाहीत. हे कुठल्याही सोशल मीडिया वरून पाठवावे. योग्य तिथे योग्य त्या इमोजीज वापराव्यात. जर भेटीचे निमंत्रण आले तर एकट्यानेच भेटायला जावे. मित्राला बरोबर घेऊन जाऊ नका. तिलाही एकटीलाच बोलवावे. मैत्रीण बरोबर असेल तर उगाच गैरसमज वाढतात. अधिक माहितीसाठी लेखकाशी संपर्क साधावा.



Comments
I liked this article Any woman in her proper senses will select such theifty husband !!!
By : Aniruddha Patwardhan
Nice
By : Pratibha Tarabadkar
Absolutely!
By : Admin
हा हा चप्पल खायची तयारी ठेवा !!
By : Bhalchandra Shrikhande
बराच अनुभव गाठीस आहे वाटत...
By : Sheetal
Good one Shashank . I miss the actual hand written notes these days of emails and texts and greeting cards for every occasion !
By : Mohini chitre