मन
“मन” ही तर एक संकल्पना आहे आपल्या शरीरातील त्याचे अस्तित्व तर कुठे आहे हे दाखवता येत नाही पण पूर्ण आयुष्याला अर्थ आणि प्रत्येक माणसाला इतरांपासून वेगळं असे व्यक्तिमत्व मनच देते. मनात उगवणाऱ्या चांगल्या वाईट भावना त्यांच्या विविध छटा, त्यात सतत चालणाऱ्या विचार प्रक्रिया मानवाचे आयुष्य घडवतात . जरी मन अमूर्त असले तरी विचार व भावना ह्याची उत्पती त्याची साठवण (memory)व त्याची आठवण (retrival)या सर्व प्रक्रिया मेंदू च्या काही भागामध्ये biologically होतात हे ही सत्य आहे. मनातील भावना आणि विचार इतके जास्त प्रभावी असतात की शरीरावर, त्याच्या चलन वलना वर परिणाम करतात, शरीर स्वास्थ्यावर परिणाम करू शकतात.
सर्व भौतिक गोष्टी व शारीरिक सुदृढता असून आयुष्य होत्याचे नव्हते करू शकणारे मन, तर फार शारीरिक, भौतिक अनुकूलता नसुनही आयुष्याला खूप छान अर्थ देऊ शकते असे सुदृढ मन. आपले पूर्ण आयुष्य आनंदात , समाधानात जाऊ शकेल किंवा नाही हे सर्वस्वी मनावर अवलंबून नाही का?
“रंग मनाचे “ ह्या विषयावर काय लिहावे हा विचार मनात सुरु असतानाच “फिनिक्स“ नावाचे पुस्तक हातात आले.आणि खूपच दिवसांनी एका दमात वाचून संपवले. ह्यात एका अक्सिडेंट नंतर डॉक्टरांकडून झालेल्या हलगर्जी पणा मुळे काँप्लिकेशन्स होऊन जवळ जवळ एक पाय गमावून बसलेल्या धनंजय गोडबोले नावाच्या व्यक्तिने आयुष्य कसे सावरले नुसतेच सावरले नाही तर यशस्वी केले ह्याची ही कथा त्यानी स्वतः आणि डॉ. मेघा देऊसकर ह्यांनी लिहिली आहे . आहार, व्यायाम, आणि इच्छाशक्ती च्या जोरावर जवळच्या माणसांच्या मदतीने . पण जर इच्छाशक्तीच नसेल तर ? आणि ती म्हणजे काय मनाची आंतरिक शक्तिच ना?
धनंजय गोडबोले, अरुणीमा सिन्हा (पहिली भारतीय एव्हरेस्ट सर करणारी अपंग महिला),
स्टिफन हॉकिंग, (theoretical physicist and cosmologist) किंवा खूप कठीण परिस्थितीतून कष्ट करुन मनाच्याआंतरिक शक्ती मुळे आयुष्यात यशस्वी झालेले अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी, ही यादी तर खूपच मोठी होऊ शकते.
आपल्या प्राचिन योगशास्त्रात “मन” यावर खूप भर दिला आहे “चित्तवृत्तीनिरोधः" म्हणजे तुमच्या मनाची आंदोलने थांबवून त्याला स्थिरता देणे,
योगासने, प्राणायाम , ध्यान (meditation) हे करण्यांनी मन स्थिर करता येते अशी नोंद योगशास्त्रात केलेली दिसते.
प्राचिन काळापासून भारतीय विचारवंतानी मनाचा आणि मानवी वर्तनाचा अभ्यास केलेला दिसून येतो , वेद, भगवद्गगीता, उपनिषदे अशा ग्रंथांमध्ये तो आढळतो. रामदास स्वामीनी
मनाच्या श्लोकातून मनाला उलगडून दाखविले आहे तसेच मनावर ताबा मिळवण्याचे अनेक मार्ग ही सांगितले आहेत.
“अचपळ मन माझे ,नावरे आवरिता” करुणाष्टकातला हा श्लोक केवेढे मोठे सत्य सांगून जातो मनाबद्दलचे. क्षणात इथे तर दुसऱ्या क्षणात मन कुठे धावेल हे सांगणे अवघड.
अश्या या माणसाला घडवणाऱ्या मनावरचा त्याचा स्वतःचा ताबा सुटतो तेंव्हा होत्याचे नव्हते होते. आज वाढत्या मनोरुग्णांची संख्या बघितली की समजते मनाची काळजी घेणे , मन जपणे, मनाला सुदृढ करणारे व्यायाम करणे किती आवश्यक आहे . प्राचीन काळात विद्वानानी, संतानी ज्या “मनाला “इतके महत्व दिले , कदाचित मधल्या प्रदीर्घ काळात त्याकडे दुर्लक्ष्य झाल्यामुळे तर आज मनोरुग्णांच्या संख्येमध्ये एवढी झपाट्याने वाढ होत नाहीये ना?
आजही आपल्या देशामध्ये मनोविकाराकडे पहायची दृष्टि ही कलंकित आहे , त्यांच्याकडे शारीरिक आजारांसारखे पहिले जात नाही, उपचार केले जात नाहीत, समाजापासून लपवण्याकडे कल असतो. खरतर इतर आजार, अपंगत्व या पेक्षा कितीतरी जास्त “मनोविकार" रुग्णाच्या कार्यशक्तीवर वाईट परिणाम करतात, त्याचे परिणाम खोलवर आणि कदाचित आयुष्यभर रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबाला भोगावे लागतात.
काही उपचारानी बरे होतात तर काही मनोविकार परत परत (relapse)होतात . मनोविकारांचे प्रकार खूप आहेत पण वेळीच ओळखून त्याचा स्वीकार करुन त्यावर उपचार करणे हाच एकमेव उपाय आहे.
सुदृढ शरीर आणि तल्लख बुद्धीला तेवढ्याच सुदृढ मनाची जोड मिळाली तर माणूस आकाशाला सुद्धा गवसणी घालू शकेल.
चला तर मग आपण आपल्या आणि इतरांच्या मनाची काळजी घेऊया.
आरती देशपांडे
9850091030



Comments
मन मनास उमगत नाही...
By : Bhalchandra Shrikhande
Nicely written
By : Mona
Very precise and eye opening different plight of mind.
By : Prasad Khare
झाल लिहीलं आहेस आरती. तुझी ही कला माहीतीच नव्हती. लिहीत रहा !
By : Shirish Moghe
एका सुदृढ मनाने..मानवी मन सुदृढ करण्यास दिलेला.. चांगलाच संदेश..
By : मिलिंद
वा छान आरती
By : सुप्रिया
Nice article. Should elaborate more about mental health , types of mental disorders/ illness.
By : Chitra Joshi
छान लिहिले आहेस आरती
By : Jayu
खूप छान. आवडला लेख. मी हे मनापासून लिहीतोय. समर्थ रामदास स्वामींनी लिहीलेले मनाचे श्लोक अफाट आहेत.
By : Shirish joshi
Good one
By : Ajay joshi
खूप छान लेख...
By : समीर पेशवे